थोरली पाती (Thorali Pati)





पुस्तक :- थोरली पाती (Thorali Pati)
लेखक :- गजानन दिगंबर माडगूळकर - ग.दि.मा.  (Gajanan Digambar MadaguLakar - Ga.Di.Ma. )
भाषा:- मराठी (Marathi)

मराठी साहित्य सृष्टितील तेजस्वी व्यक्तिमत्त्व ग.दि. माडगूळकर यांच्या लघुकथा "थोरली पाती" या नावाने कथासंग्रह रूपात प्रसिद्ध झाल्या आहेत. गदिमांची सिद्धहस्त लेखणी म्हणजे बोलायलाच नको. आणि त्यातही विशेष म्हणजे पु.भा.भावे यांच्या सारख्या भाषाप्रभूने गदिमांच्या अनेक कथांपैकी २५ उत्तम कथा या संग्रहासाठी निवडल्या आहेत. म्हणजे सोन्याहून पिवळं.

त्यामुळे याहून अधिक परीक्षण लिहिण्याची आवश्यकताच नाही आणि या सारस्वतांपुढे काही लिहावं अशी माझी योग्यता नाही. त्यामुळे हे “परीक्षण” नाही तर पुस्तकाची ओळख आहे. 

गदिमांचे धाकटे बंधू व्यंकटेश माडगूळकर हे देखील लोकप्रिय कथालेखक आहेत. या भावंडांचा उल्लेख एका व्यक्तीने एकदा "धाकटी पाती-थोरली पाती" असा केला. त्यावरून गदिमांनी आपल्या कथा संग्रहाला हे नाव दिलं आहे.

पुस्तकातल्या बहुतेक कथा या गावात किंवा ग्रामीण पार्श्वभूमीवर घडतात. माझ्या सारख्या शहरी मुलाला गाव/खेडीपाडी ही सिनेमा, नाटकं किंवा अशा कथा-कादंबऱ्यांतून भेटतात. पण गाव म्हणजे फक्त "खेड्यामधले घर कौलारू" सारखं प्रेमळ, गोड, सुंदर नव्हे तर. तिथेही निसर्गाचे चटके आहेत, निसर्गाशी झगडा आणि माणसामाणसांत आढळणारे गुणावगुण सर्व आहे. 

गदिमा आपल्यासमोर ही अशी गावचित्रे, व्यक्तिचित्रे उभी करतात. या २५ कथांमधून कितितरी व्यक्ती आपल्या समोर येतात -  "औंधाचा राजा" मध्ये औधांचे राजे पंतप्रतिनिधी, किस्से रचणारा "रामा बालिष्टर", कट्टर मुस्लिम असूनही हिंदू रीतिरिवाजांबद्दल प्रेम असणरा नकवी, वय उलटून गेल्यावर आपल्या तरूणपणातल्या पैलवानकीच्या-रंगाढंगाच्या आठवणी जागवणारा नामा, नव्याने मुंबईत आलेली-नव्याने वयात आलेली शारिरिकआकर्षण अनुभवणारी तरुणी, "गावरान शेंग" मधली लहान मुलींना माया लावणारी पण या मायेमागचा विकृत चेहरा उघडा करून धक्का देणरी भिमा, गावाकडून "वसुली" करणारा बेरकी सावकार, एका वडारी मजूर पोरीच्या प्रेमात पडलेला गोरा साहेब ... अशी हाडामासाची अनेक पात्रे आणि माणसांना "अतर्क्य" फटकारे देऊन खेळवणारी अदृश्य नियती हे तर महा-पात्र.

गावाची, निसर्गाचीही रुपं वाचकांना दाखवताना गदिमा शब्दांना कसे खेळवतात, झुलवतात ते पहा - 
“दुपार नुसती जळत होती. खंडोबाच्या माळावरच्या चिमखड्यांच्या फुलून लाह्या होतील इतके ऊन तावत होते. नेप्ती बोराड्यांच्या फांद्या चित्रासारख्या स्तब्ध होत्या. बघताच डोळ्याला अंधारी येऊन उन्हात चित्रविचित्र रंगाच्या उलट्या-पालट्या रेघोट्या सरपटत होत्या. सारा माळ निर्मनुष्य भकास होता. खंडोबाच्या देवळाच्या पडक्या भिंतीला टिचभर सावलीत देवाचा रेडा अंग दाटून बसला होता - बाकी सारा शुकशुकाट.”

तर पावसाळी चित्र रंगवताना ते लिहितात -
“ऋतुचक्राने वळसा पुरता घेतला होता. पुन्हा श्रावण महिना आला. गावाबाहेरहे विटके माळ पुन्हा हिरवळून आले. गावदरीची राने पुन्हा वाढीला पडली. गावातल्या घाणेरड्या रस्त्यांच्या कडा दुर्वांनी खचून गेल्या; माळवदावर हराळी मातली. लिंबाबाभळीचा पानपसारा अधिक तजेलदार झाला. चिंचांच्या झाडांवर नखाएवढी फळे लटकू लागली. बारा महिने रखरखीत भासणारा माणदेश इथून तिथून ओलावला.”
सकाळचे वर्णन करताना एका कथेत लिहितात - "सकाळचे फळ पिकून लाल झाले होते" तर दुसऱ्या कथेत संध्याकाळचं वर्णन करताना ते लिहितात "दिवसाचे फळ आभाळाच्या देठापासून तुटले".

माणूस इतक्या प्रकारचा असू शकतो हे गदिमा आपल्याला दाखवतात - सभ्य माणसाच्या अंगात इतका बिलंदरपणा आणि ज्याला दुर्जन समजयाचं त्याच्यात अनपेक्षित समंजसपणा, ज्याला पुरुषी वासना म्हणायची ती एखाद्या स्त्रीत भरलेली तर कुठे संन्यासी होऊनही ढळणारा बुवा. स्त्री-पुरूष संबंधांचेही - वेगवेगळे कंगोरे प्रत्ययाला येतात - मुग्ध प्रेम, शारिरिक आकर्षण, तत्कालिक वासना आणि चुकीची जाणीव झाल्यावर झाल्यावरही प्रत्येकावर होणारा परीणाम वेगळा. 

कुठलीही कथा वाचायला घ्या; अर्धवट टाकून उठावं वाटणार नाही. पु.भा.भावे यांची प्रस्तावना अर्थात त्यांनी केलेलं या कथांचं परीक्षण ही तितकच सकस वाचनीय.

इतकं सगळं लिहिल्यावर "नक्की वाचा" हे वेगळं लिहिण्याची आवश्यकताच नाही. तुमच्यापैकी काहीजण लगेच पुस्तक शोधायलाही निघाले असतील.


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- 
आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

Life of Pi (लाईफ ऑफ पाय)






पुस्तक :- Life of Pi (लाईफ ऑफ पाय)
लेखक :- यान मार्टेल (Yann Martel )
भाषा :- इंग्रजी (English) 


"लाईफ ऑफ पाय" हा गाजलेला हॉलिवूड चित्रपट ज्या कादंबरीवरून तयार केला गेला आहे ती "यान मार्टेल" याची कादंबरी नुकतीच मी वाचली. जहाजबुडीतून वाचलेला एक लहान मुलगा एका छोट्या लाईफ बोटीवर कित्येक महिने कसा राहतो, स्वतःचा जीव कसा वाचवतो, संकटांना तोंड कसं देतो याचं रोमहर्षक चित्रण यात आहे. आणि हो, या प्रवासात तो एकटा नसतो बरं. छोट्याश्या लाईफबोटीवर असतात त्याच्याबरोबर वाघ, तरस, गोरिला असे हिंस्त्र प्राणी. 

पॉंडीचेरी ला प्राणिसंग्रहालय चालवणारे एक कुटुंब आपलं प्राणिसंग्रहालय बंद करून कॅनडात स्थलांतरीत व्हायचे ठरवते. बहुतेक प्राणी विकले जातात. काही प्राणी विक्रीसाठी कॅनडाला न्यायचे असतात. म्हणून एका मोठ्या मालवाहू जहाजने ते प्रवासाला निघतात. प्राण्यांचे पिंजरेही जहाजावर चढवलेले असतात. आणि एके रात्री काही अपघात होऊन जहाज बुडू लागते. त्या कुटुंबातला एक लहान मुलगा - ज्याचं नाव "पाय"- तोच वाचतो कारण जहाजाचे कर्मचारी त्याला एका लाईफ बोटी वर फेकतात. पण हाच प्रसंग त्याच्या आयुष्यातला "ट्रनिंग पॉइंट" ठरतो. कारण "लाईफ" बोटी वर तो एकटा नसतो तर आधीच त्या बोटीत चढलेले/पडलेले वाघ, तरस, गोरिला असे हिंस्त्र प्राणी. 

ती बोट अथांग महासगरात वारा नेईल तशी फिरत राहते. आणि पुढचे तब्बल ७ महिने तो त्या बोटी वर कसे दिवस काढतो याचं वर्णन अंगावर काटा आणतं. जीव वाचवायचा तर बोटीत राहिलं पाहिजे आणि बोटीत गेलं तर प्राणी हल्ला करतील अशा विचित्र कात्रीत सापडलेला "पाय" छोटा तराफा बांधून बोटीजवळ राहायचा प्रयत्न करतो. बोटीतलं जीवनावश्यक सामान शिताफिने मिळवायचा प्रयत्न करतो. सगळं खाणं संपल्यावर अगतिक होऊन त्याला मासे/खेकडे/कासवं खावी लागतात आणि संपूर्ण शाकाहारी असणाऱ्या त्याला पहिल्यांदा हातात असलेला जिवंत मासा मारणं - एक हत्या करणं- किती जड जातं असे कितितरी हृदयस्पर्शी प्रसंग आहेत. 

प्राणी एकमेकांशी लढतात आणि शेवटी "पाय" आणि वाघच बोटीवर उरतात. अशावेळी त्याला वाघाची भीतीही वाटते आणि मैलोन्मैल पसरलेल्या पाण्यात त्याचीच सोबतही वाटते. आपला जीव वाचवायचा तर वाघाला कसं ठर करता येईल याचा विचार एकीकडे तर या वाघाच्या भीतीमुळे आपल्याला समुद्राची भीती वाटायला वेळच मिळाला नाही-त्याच्या मुळे आपण मानसिक सबळ राहिलो असा विचार दुसरीकडे. "पाय"च्या मानसिक आंदोलनांचं हृद्य वर्णन वाचलंकीच जाणवेल. वाघाला सर्कस प्रमाणे ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी प्राण्यांची बुद्धी कशी काम करते हे लेखकाने छान समजावून सांगितलं आहे. पायला पाण्या खालचं नैसर्गिक जलजीवन कसं दिसतं, एका अद्भुत बेटाला भेट आणि तिथला जीवन्मृत्युचा संघर्ष हे सगळं वाचकाला खिवून ठेवतं.

पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात "पाय" चे लहानपण, त्याच्या "पाय" या नावामागची कहाणी, त्याला सर्व धर्मांबद्दल वाटणारं आकर्षण हा भाग आहे पण तो पूर्ण अनावश्यक आहे. पहिली शंभर पानं वाचताना ’चुकीचं पुस्तक तर वाचत नाहीयेना मी’ असं वाटवं इतका अप्रस्तुत भाग त्यात आहे. फक्त त्या प्रकरणातून मिळणारी वन्यप्राण्यांच्या जीवनशैलीबद्दलची माहिती उपयुक्त आहे. तिसरं प्रकरण ही असंच अनावश्यक आहे. "पाय" वाचल्यावर जहाज कंपनीचे अधिकारी त्याला भेटायला येतात, तो त्यांना सर्व कहाणी सांगतो त्याच्यावर त्यांचा विश्वास बसत नाही मग त्यांना तो दुसरी एक कहाणी बनवून सांगतो. यात शेवटची तीसेक पानं रटाळपणा केला आहे.

त्यामुळे हे पुस्तक अवश्य वाचा पुस्तकाचं पहिलं प्रकरण भरभर वाचा. त्यातला प्राणीजीवनासंबंधीचा भाग मनोरंजक आहे आणि पुढच्या प्रकरणात "रिलेट" करण्यासाठी आवश्यक आहे. दुसरं प्रकरण हा मूळ गाभा आहे. तिसरं प्रकरण द्या सोडून.

हे पुस्तक वाचण्यापूर्वी मी चित्रपट बघितला नव्हता. पुस्तक अर्धं वाचून झालं तेव्हा अचानक चित्रपट बघायला मिळाला. पण पुस्तकाची मजा चित्रपटामधे आली नाही. समोर घडणाऱ्या प्रसंगांइतकेच पायच्या मनात घडणारी, प्राण्यांच्या मनात घडणारी आंदोलनेही तितकीच रोमहर्षक आहेत. कादंबरी वाचूनच ते कळेल. म्हणून चित्रपट बघितला असेल तरी कादंबरी अवश्य वाचा. कादंबरी वाचण्यापूर्वी चित्रपटाची झलक बघितली तर लाईफबोट, तिचा आकार, तिचे भाग हे एकदा डोळ्यासमोर आले की जास्त मजा येईल. कारण पुस्तकात बोटीच्या वेगवेगळ्या भागांचा उल्लेख आहे पण त्याचा अर्थ आणि स्वरूप नक्की काय हे कळलं नाही तर "पाय"ची कुठेतरी काहितरी धडपड चालू आहे इतकंच जाणवतं. म्हणून पुस्तक वाचताना मी बऱ्याच वेळा मी गूगलवरून फोटो लाईफ बघितले. पण चित्रपट बघितल्यावर बोटीचं, तराफ्याचं चित्र अजून स्पष्ट झालं. 

असो. बरंच लिहिलं. शेवटी एकच - पुस्तक सगळ्यांना आवडेल असंच आहे. नक्की वाचा.

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- 
आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...