कृष्णदेवराय (krushadevarai)




पुस्तक :- कृष्णदेवराय (krushadevarai)
भाषा :- मराठी(Marathi)
लेखक :- डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली (Dr. Laxminarayan Bolli)

विजयनगरचं साम्राज्य हे भारतीय इतिहासातलं सुवर्णपान. हरिहर-बुक्क या बंधुद्वयांनी मुसलमानी आक्रमणाला विरोध करत हिंदूधर्मीयांचं स्वतंत्र राज्य स्थापन केलं. त्या पुढच्या राजांनी त्याला साम्राज्याचं स्वरूप आणलं. या साम्राज्याच्या भौगोलिक सीमा रुंदावण्याचं आणि त्याला समृद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवण्याचं काम केलं ते कर्तृत्ववान राजा कृष्णदेवराय याने. हे पुस्तक या कृष्णदेवरायाचं हे कादंबरीमय चरित्र आहे. 

हा राजा होता तरी कसा, हे थोडक्यात सांगतो म्हणजे हे चरित्र वाचण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागून राहील. 
आपल्या एकोणीस वर्षाच्या कारकिर्दीत राजाने राज्याच्या सीमा संपूर्ण दक्षिण भारतभर आणि श्रीलंकेतही पोचल्या. कटक प्रांतही त्याने जिंकलेला.आदिलशहाचा पराभव करून रायचूर प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्याच्या या पराक्रमामुळेच आदिलशहा, कुतुबशहा, निजामशहा यांच्या दक्षिण भारतातल्या विस्ताराला आळा बसला होता. 

पण तो नुस्ता साम्राज्यवादी नव्हता तर उत्तम प्रजापालक होता. शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरोवर, कालवे बांधणे; सारा वसुलीमधला अन्याय दूर करणे याबाबत तो जागरूक होता.
साहित्य, संगीत,कला यांना त्याने उदार राजाश्रय दिला. कन्नड, तेलुगू, तमिळ आणि संस्कृत भाषेतले कितीतरी कवी त्याच्या राजदरबारी होते. "अष्टदिग्गजलु" अशी उपाधी असणारे आठ तेलुगू महाकवी राजाच्या दरबारी होते. राजा बहुभाषिक, रसिक आणि स्वतः कवी होता. कन्नड असूनही "अमुक्त माल्यदा" हे मधुराभक्तीवर आधारित तेलुगू महाकाव्य कृष्णदेवरायाने लिहिले ज्याची गणना तेलुगुतल्या सर्वश्रेष्ठ अशा पंचकाव्यात होते. काव्य आणि वीरता ; शस्त्र आणि शास्त्र यांचा असा मिलाफ दुर्मिळच.
त्याच्या कारकीर्दीत वेगवेगळ्या ठिकाणी अतिभव्य आणि शिल्पकलेनी नटलेली मंदिरं, गोपुरं बांधून हिंदुर्मीयांच्या गौरवस्थानात भर टाकली गेली.

या कादंबरीत राजाच्या आगमनाची वर्दी देणारी ललकारी अशी दिलीये
श्रीमत समस्त भुवनाश्रय राजाधिराज राजपरमेश्वर
पूर्व पश्चिम दक्षिण समुद्राधीश्वर
अरि राजाराम गंडभेरुंड
यदुकुल संजात
तुळूव वंशोद्भव
नरासारायडू तनय
श्री विरुपाक्ष पद्माधारक
हिंदुधर्म प्रतिष्ठापनाचार्य
गो-ब्राह्मण प्रतिपालनाचार्य श्रीकृष्णदेवराय ...

कन्नड राज्यारमारमण बहुपराक्
कर्नाटकरत्न सिंहासनाधीश्वर बहुपराक् ...

साहित्य समारांगण सूत्रधार ...

अशा या बहुआयामी कर्तृत्ववान सम्राटाने राज्य कसं वाढवलं, अंतर्गत कालाहांचा सामना कसा केला, महाअमात्य तिम्मरसू यांच्या दक्षतेचा यात सिंहाचा वाटा कसा होता, गुरू व्यासराय आणि गुरुबंधु संत पुरंदारदास यांचं मार्गदर्शन कसं मिळालं, नातेवाईकांनी केलेल्या कपटानेच या राजाचं राजपद कसं गेलं हे सगळं वाचण्यासारखंच आहे.

चरित्राची शैली ऐतिहासिक कादंबऱ्यांना साजेशी रसाळ, ओघवती, काव्यमय आहेच. कुठेही विनाकारण प्रसंगला ताणलेलं नाहीये. योग्य ऐतिहासिक पार्श्वभूमी दिलेली आहे पण संदर्भांची चर्चा लांबवून कथेचा ओघ रोखला नाहीये.

हे पुस्तक वाचताना शिवाजी महाराज आणि कृष्णदेवराय यांची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज नाही आणि माझा इतिहासाचा अभ्यास जुजबीच आहे तरीही मला जाणवलेले काही मुद्दे असे -
कृष्णदेवरायाला साम्राज्य आयते मिळाले होते; शिवाजी महाराजांनी ते शून्यातून निर्माण केले. कृष्णदेवरायाने साहित्य-संगीत-कला इ. ना उदार आश्रय दिला आणि त्यावर भरपूर खर्च केला. महाराजांना तितकी स्वस्थता दुर्दैवाने मिळाली नाही. 
पूर्ण देशाला मुसलमानी सत्तेपासून मोकळं करून, दिल्लीपर्यंत साम्राज्य विस्तार करायची "थोरली मसलत" महाराजांचं स्वप्न होतं. पण राया मात्र दक्षिण भारतावर संतुष्ट वाटतो. 
महाराज जास्त राजकारणचतुर वाटतात. इंग्रज आणि पोर्तुगीजांचा कावाही त्यांनी ओळखला होता. राया मात्र पोर्तुगीज लोकांशी मैत्री जपून होता. बंदुका, घोडे यांच्यासाठी त्यांच्यावर अवलंबून होता. गोव्यात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांकडे काणाडोळा केलेला दिसतो.
शांततेच्या काळात स्वतःची ताकद वाढवायचे प्रयत्न महाराजांनी केले. स्वतःचं आरमार बनवलं. हा राया मात्र शांततेच्या काळात नवीन युद्धतंत्रज्ञान, विज्ञान याकडे लक्ष न देता साहित्यचर्चेत त्यांना प्रोत्साहन देण्यात रममाण झाला.
राया आणि त्याची प्रजा हिंदु धर्माभिमानी असली तरी महाराजांनी प्रत्येक मावळ्यात व पूर्ण रायतेत निर्माण केलेली "हिंदवी स्वराजयाची" आस, धग मात्र वेगळीच. म्हणूनच राया पायउतार झाल्यावर काहीच वर्षांत सिंहासनाच्या लोभापायी झालेल्या सुंदोपसुंदीत साम्राजाचा अंत झाला. उलट महाराजांच्या मृत्यूनंतर गृहकलह होऊनही महाराष्ट्र पुढची २५ वर्षं औरंगजेबाला पुरून उरला. आणि पुढे पेशव्यांनी महाराजांची "थोरली मसलत" पूर्ण केली. आज साडे तीनशे वर्षांनीही "हिंदवी स्वराज्याची" धग मराठी रक्तात सळसळते आहे. 

असो माझी मल्लिनाथी पुरे. महान व्यक्ती आपापल्या काळात कालानुरूप महानच असतात. त्यांचं चरीत्र वाचणं नेहमीच मार्गदर्शक असतं.



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

माणसांच्या गोष्टी (Manasanchya Goshti)

पुस्तक - माणसांच्या गोष्टी (Manasanchya Goshti) लेखिका - छाया महाजन (Chhaya Mahajan) भाषा - मराठी (Marathi) पाने - १४३ प्रकाशन - रोहन प्रका...