पुस्तक : रुसी मोदी - द मॅन हू ऑल्सो मेड स्टील (Rusi Modi : The man who also made steel)
लेखक : पार्थ मुखर्जी, ज्योती सबरवाल (Partha Mukherjee & Jyoti Sabharwal )
भाषा : मराठी (मूळ पुस्तकाची भाषा : इंग्रजी)
अनुवादक : अंजनी नरवणे (Anjani Naravne)
पाने : २१०
टाटा आयर्न अँड स्टील (टिस्को) अर्थात सध्याची टाटा स्टीलचे माजी चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर रुसी मोदी यांच्या विषयीचे हे पुस्तक आहे.
रुसी यांचा जन्म सधन आणि प्रतिष्ठित पारशी घरात झाला. १९१८ साली. त्यांचे वडील सर होमी मोदी हे त्यावेळच्या मुंबई इलख्याचे गव्हर्नर होते. त्यांचे शिक्षण इंगलंडमधल्या शाळा-कॉलेजात झाले. शिकून परत आल्यावर त्यांनी टिस्को मध्ये नोकरी सीकारली. टाटा कुटुंब आणि मोदी कुटुंब यांचे अगदी जवळचे संबंध होते तरी त्यांनी एक साधा "खलासी" अशी कामगारवर्गातली नोकरी स्वीकारली. पुढची त्रेपन्न वर्षं ते सलग टिस्को मध्येच होते. आणि स्वकर्तृत्वाने एकेक पायऱ्या वर चढत शेवटी चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर झाले. नऊ वर्षं ते या पदावर होते.
या पुस्तकात त्यांचं बालपण, आई वडिलांनी केलेले संस्कार, इंग्लंड मधल्या शिक्षणाच्या वेळीही मौजमजेचं आयुष्य याबद्दल सविस्तर लिहिलं आहे. टिस्कोत लागल्यावर ते सर्वांशी सहज मैत्री करत; आपुलकीने वागत; कामगारांचे प्रश्न समजून सहृदयतेने निर्णय घेत. कामगारांकडे एक "संसाधन"(अॅसेट) म्हणून बघणे जे त्याकाळात दुर्मीळ होते- ते त्यांनी केल्यामुळेच कामगारवर्गाशी त्यांचे सूर जुळले. कंपनीतील वातावरण चांगले आणि उत्पादक राहिले आणि त्यातून आपोआप कंपनीची भरभराट झाली. या विषयीचे अनेक प्रसंग पुस्तकात वाचायला मिळतात.
कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर टाटा व्यवस्थापनाशी झालेल्या वादामुळे त्यांना कंपनी सोडावी लागली. त्या प्रकरणाच्या अतिशय विस्तृत चित्रणातून इतक्या मोठ्या उद्योगातील इतक्या मोठ्या हुद्द्यावरही राजकारण कसं चालतं, अहंकारंचा संघर्ष कसा होतो, कायदेशीर डावपेच आणि माध्यमांना हाताशी धरून बातम्या पेरून वातावरण निर्मिती कशी होते हे आपल्या लक्षात येतं.
टिस्कोतून बाहेर पडल्यावर - वयाच्या ७५ व्या वर्षीही- ते नवनवी आव्हाने स्वीकारत राहिले. नवीन कंपनी सुरू केली. एअर इंडीया व इंडियन एअरलाईन्सचे प्रमुख म्हणून त्यांना सरकारने नेमलं. आपला दांडगा अनुभव व कौशल्य पणाला लावून आपल्या पद्धतीने निर्णय घेत या कंपन्या सुधारण्याचा प्रयत्न केला. पण एकूणच सरकारी हस्तक्षेत, खासदारांचे राजकारण, नोकरशाही चा अडेलतट्टू पणा यामुळे त्यांचे हात बांधले गेले. नाईलाजाने त्यांनी राजिनामा दिला. पुस्तकातले एक प्रकरण या "प्रकरणावर" आहे.
पुस्तकात रुसींची जगण्याचा बऱ्याच पैलूंविषयीची मतं आपल्याला कळतात - आनंदी कसं जगावं, दुसऱ्याशी संवाद साधण्याचे फायदे, भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या दुरवस्थेची कारणं, एक कल्याणकारी हुकुमशाही भारताला कशी आवश्यक आहे इ.
असा एकूण या पुस्तकाचा अवाका आहे. २०० पानी हे पुस्तक मात्र अपूर्णच वाटतं. रुसींच्या त्रेपन्न वर्षांच्या टिस्कोतल्या वाटचालीत त्यांचे कामगारांशी संबंध कसे होते याचेच अनेक प्रसंग आहेत. पण एक अधिकारी-प्रमुख म्हणून त्यांच्या इतर पैलूंवर फार भाष्य नाही. कंपनी पुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानविषयक काय निर्णय घेतले; सरकारशी, प्रतिस्पर्ध्यांशी, ग्राहकांशी कसे संबंध होते याबद्दल काहीच नाही. ज्या दोन वादग्रस्त प्रकरणांचा उल्लेख वर केला आहे त्यातही रुसींची बाजू फक्त नीट मांडलेली आहे आणि विरुद्ध बाजूने काय लिहिले-बोलले गेले आहे हे लिहिलंय. पण ते तसं का झालं याचा कानोसा घ्यायचाही प्रयत्न नाही. त्यामुळे चित्रण एकांगी वाटतं.
रुसींचा स्वभाव मनस्वी, मनःपूत वागणाऱ्या श्रीमंती राजकुमाराला शोभेल असाच आहे. त्यांचं वागणं अनैतिक नसेलही पण स्वतःचं म्हणणं रेटण्याच्या वृत्तीचे वाईट परीणामही झाले असतील. या नकारात्मक, चुकीच्या किंवा दोषस्वरूप बाजूची फार चर्चा नाही. जे उल्लेख आहेत तेही, ती बाजूही उजळ करून दाखवायच्या भाषेत लिहिलेली. त्यांच्या वैयक्तीक आयुष्याचे उल्लेखही ओझरतेच. त्यांचा घटस्फोट झाला तरीही त्यांची पत्नी आणि ते मैत्रीच्या नात्याने वागत होते असे उलेख आहेत. कामगारांच्या संदर्भात रुसींच्यातलामाणूस दाखवाणरा लेखक खाजगी आयुश्यातला माणूस दाखवायचं मात्र सरळ टाळतो.
म्हणून मी पहिल्या परिच्छेदात लिहिलं तसं हे रुसी मोदी यांच्या विषयीचे हे पुस्तक आहे; चरित्र वाटत नाही - स्तुतिगाथा वाटते.
------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment