’च’ची भाषा ('Cha'chi bhasha)





पुस्तक : ’च’ची भाषा ('Cha'chi bhasha)
लेखक : अतुल कहाते (Atul Kahate)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २७७
ISBN : 978-93-80264-75-2

आपण एकमेकांशी वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधून आपल्या भावना आणि माहितीची देवाणघेवाण करतो. जेव्हा ही माहिती किंवा भावना खाजगी स्वरूपाची असते तेव्हा एकाने दुसऱ्याला सांगताना ते तिसऱ्याला कळू नये अशी अपेक्षा असते. मग आपण दुसऱ्याच्या कानात बोलतो, कोणी आजुबाजूला नसताना बोलतो, खाणाखुणा करून बोलतो किंवा सांकेतिक शब्दांत बोलतो. या सांकेतिक भाषेची तोंडओळख आपल्याला लहानपणी "च ची भाषा" हा गंमतीदार खेळ खेळताना होते. प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीचे अक्षर शेवटी नेत आणि सुरुवातीला ’च’ म्हणत वाक्य बोललं जात. उदा. "मी तुला एक गंमत सांगतो" हे वाक्य  "चमी चलातु चकए चंमतग चांगतोस" असं काहितरी बोललं जातं.  दोन व्यक्तींच्या संवादाची जागा जर दोन देशांमधल्या, दोन सैनिकांच्या तुकडी मधल्या किंवा गुप्त प्रकल्पावर काम करणाऱ्या दोन संशोधकांच्या संवादाची कल्पना केली तर मात्र या ’च’ची भाषा काही पुरेशी गूढ नाही हे सांगायलाच नको. अशा अतिमहत्त्वाच्या, गुप्त माहितीच्या देवाणघेवाणीसाठी तिऱ्हाईताला कळणार नाही अशा गूढ प्रकारे निरोपांची देवाणघेवाण करणे म्हणजे "क्रिप्टोग्राफी"."क्रिप्टोग्राफी" तंत्राचा रोमन,ग्रीक काळापासून ९० च्या दशकापर्यंतचा आलेख लेखकाने या पुस्तकात मांडला आहे. 

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती:



अनुक्रमणिका :



सुरुवातीच्या काळात निरोप लपवण्याकडे कल होता उदा. अदृश्य शाई ने लिहिलेला कागद, प्राण्याच्या पोटातून पाठालेला निरोप इ. याला म्हणतात "स्टॅगनोग्राफी". पण निरोप पाठवला जात आहे हे तिऱ्हाइताला कळलं तरी किंवा प्रत्यक्षात तो निरोप हातात मिळाला तरी तो त्याला समजणार नाही अशा गूढपद्धतीने लिहिणं म्हणजे "क्रिप्टोग्राफी". आधुनिक काळात विशेषतः दोन महायुद्धांच्या काळात या क्रिप्टोग्राफीची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावर कशी जाणवली. या गरजेपोटी नवनवीन पद्धती कशा शोधल्या गेल्या याचं सविस्तर वर्णन पुस्तकात आहे. उदा:



गूढसंदेश बनवण्याचं काम एक जण करत असताना त्याचा प्रतिस्पर्धी ते गूढ उकलायचा प्रयत्नही करणारच. युद्धकाळात जर्मन लोकांचे संदेश फोडण्याचं काम ब्रिटिश, अमेरिकन इ. मित्र राष्ट्रांच्या लोकांनी कसं कसं केलं, त्यासाठी काय काय क्लृप्त्या लढवल्या याचं उत्कंठावर्धक वर्णनही पुस्तकात आहे.  गूढ संदेश फोडल्यामुळे जर्मनांच्या हल्ल्याची पूर्वकल्पना येऊन मित्रराष्ट्रांनी आधीच हल्ला करून जर्मन लष्कराला चकित केलं होतं. लढाईत बाजी पलटवण्यासाठी शत्रूची गुप्त योजना हाती लागणं याची किती मदत होईल याची कल्पना तुम्ही करू शकालच. "युद्धस्य कथा रम्या"च असतात. युद्धांची ही अनोळखी बाजूही तितकीच रम्य. उदा:



तंत्रज्ञानात होणऱ्या सुधारणा, डिजिटल पद्धतीने डेटा इंटरनेटच्या आगमनामुळे क्रिप्टोग्राफी पुढे नवीन आव्हानं उभी राहिली तशीच नवीन शक्यताही निर्माण झाल्या. त्यातूनच "असिमेट्रिक-की", आरेसए तंत्रज्ञान, पीजीपी  तंत्रज्ञान पुढे आलं. त्यांच्या जन्मकथाही पुस्तकात आहेत. 

हे तांत्रिक विषयावरचं पुस्तक असलं तरी एक तांत्रिक दस्त-ऐवज नाही. एखादी गोष्ट सांगावी त्याप्रमाणे लेखकाने सांगितलं आहे. "क्ष व्यक्तीने असा विचार केला आणि असा संदेश पाठवला .. मग त्यातल्या उणिवा लक्षात घेऊन य व्यक्तीने त्यात या सुधारणा केल्या. पण प देशाला याची कुणकुण लागली आणि त्यातून काय गंमत घडली..." असं. त्यामुळे वाचताना कंटाळा येत नाही. पुस्तकाच्या ओघात चार-पाच क्रिपोटोग्राफीच्या संकल्पना उदाहरण देऊन नीट समजावून सांगितल्या आहेत. ज्याचा वापर करून आपणही आपला मेसेज "एनक्रिप्ट" करून बघायची मजा घेऊ शकतो. या उदाहरणांमुळे गूढ अनाकलनीय असं न राहता आपणही प्राथमिक पातळीवरचं "एनक्रिप्शन" करू शकतो याची मजा येते. यामुळे पुस्तक अजून जिवंत झालं आहे.


पुस्तकात ज्या व्यक्तींचे, यंत्रांचे उल्लेख येतात त्यातल्या बऱ्याच जणांचे फोटोही आहेत.


जवळपास तीनशे पानी पुस्तकात भारताबद्दल मात्र एकच परिच्छेद आहे. महाभारतात, जुन्या ग्रंथात हेरगिरीचा उल्लेख आहे; गुप्त संदेशवहनाला "गूढलेपक" म्हणायचे इतकाच उल्लेख आहे. बाकी अजिबात माहिती नाही. एका प्रकरणात भारतातून काही गुप्त संदेश येत होते असा उल्लेख आहे. पण ते कोण पाठवत होतं वगैरे माहिती नाही. ही बाब मला थोडी विचित्र वाटली. जुन्या ग्रीक, रोमन पुराणकाळातले उल्लेख लेखकाने दिले आहेत पण मौर्य, मगध, चोल या साम्राज्यांमध्ये असला प्रकार घडत असेलच ना ? मोगलाई, शिवाजी महाराज, पेशवाईच्या काळात हेरगिरी असणारच ना? शिवाजी महाराजांचे प्रसिद्ध गुप्तहेर बहीर्जी नाईक निरोप कसा पाठवत असतील? स्वातंत्र्यानंतर भारत-पाकिस्तान युद्धे झाली त्यात क्रिप्टोग्राफीचा वाटा असणारच ना? पण काहीच उल्लेख नाही. लेखकाने त्या दृष्टीने संशोधन केले नव्हते?  का पाश्चिमात्यांप्रमाणे भारतीय लोक "डोक्युमेंटेशन" करत नसल्याने आज पुरावे उपलब्ध नाहीत?  मी एका ठिकाणी असं वाचलेलं की "दोन  मोत्ये गळाली, सत्तावीस  मोहरा हरपल्या, सव्वा लाख बांगडी फुटली !!"  हेही कव्यात्मक वर्णन नसून तेव्हा पाठवलेल्या पत्रातील सांकेतिक निरोप आहे. जुनी हस्तलिखितं, देशभरातली वाचनालयं आणि परदेशातील संग्रहालयं यातल्या कागदपत्रांत हा मजकूर मिळणार नाही का?  महायुद्धांमध्ये घडलेल्या घटना आणि गूढ कामे यांची माहिती बऱ्याच वर्षांनी युरोपियन देशांनी हळूहळू उजेडात आणली तशी अजून भारत सरकारने केले नाहिये का ? आयटी क्षेत्र भारतात इतकं मोठं असताना सध्याच्या पिढी, भारतातल्या कंपन्यापण काहीच करत नाहियेत का? हे प्रश्न नक्कीच येतील. यांची उत्तरं लेखकच देऊ शकेल. कदाचित भारताच्या संदर्भात एक पूर्ण पुस्तकच कुणाला संशोधन करून लिहिता येईल.

असो ! पुस्तकातील माहिती महत्त्वाची, मनोरंजक आहे. जे तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत नाहीत अशा तरूणांना, प्रौढांनाही समजेल आवडेल अश्या भाषेत आहे. त्यामुळे पुस्तक आवर्जून वाचा. तंत्रज्ञान, विज्ञान विषयक लेखन मराठीत कमी होत असताना लेखकाने आपला इतका वेळ आणि श्रम ही माहिती संकलित करून मराठीत पुस्तक प्रकाशित करून मराठीला ज्ञानभाषा बनवण्याच्या प्रयत्नात योगदान दिलं आहे हे निश्चित.   


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...