आघाडीचे महिला नेतृत्व (Aaghadiche mahila netrutv )






पुस्तक : आघाडीचे महिला नेतृत्व (Aaghadiche mahila netrutv )
भाषा : मराठी  (Marathi)
मूळ पुस्तक : Leading Ladies (लीडिंग लेडीज) 
मूळ भाषा : इंग्रजी (English)
लेखिका : सुधा मेनन (Sudha Menon)
अनुवाद : सुमिता बोरसे (Sumita Borase) 
ISBN : 978-81-8498-538-2

या पुस्तकात पुढील १५ भारतीय कर्तृत्त्वान महिलांची ओळख करून दिली आहे.   

  1. अम्रिता पटेल : नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या (एनडीडीबी) च्या अध्यक्षा
  2. अनु आगा : थरमॅक्स उद्योगसमूहाच्या अध्यक्षा (निवृत्त)
  3. कल्पना मोरपारिया : जे.पी.मॉर्गन उद्योगसंस्थेच्या भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी. आयसीआयसीआयच्या व्यवस्थापनात कार्यकारी उपाध्यक्षा (माजी)
  4. किरण मुझुमदार-शॉ : बायोकॉन उद्योगसंस्थेच्या प्रमुख
  5. लिला पूनावाला : "अल्फा लावल इंडिया" आणि "टेट्रापॅक इंडिया" या उद्योगसंस्थेच्या अध्यक्षा (माजी)
  6. मल्लिका साराभाई : आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकार, निर्मात्या, दिग्दर्शिका
  7. मल्लिका श्रीनिवासन : ट्रॅक्टर्स अ‍ॅंड फार्म इक्विपमेंट लिमिटेड च्या उपाध्यक्षा
  8. मेहर पदमजी : थरमॅक्स उद्योगसमूहाच्या अध्यक्षा. (वर उल्लेख केलेल्या अनु आगा यांची मुलगी)
  9. नैना लाल किडवई : एचएसबीसी समूहाच्या सर्वसाधारण व्यवस्थापक आणी देशांतर्गत प्रमुख
  10. प्रिया पॉल : अपीजय सुरेंद्र पार्क हॉटेलच्या अध्यक्षा
  11. पीटी उषा : धावण्यामधील भारतातील महान खेळाडू
  12. शाहीन मिस्त्री : ’टीच फॉर इंडीया’ संस्थेच्या संस्थापक सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
  13. शिखा शर्मा : अ‍ॅक्सिस बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. यापूर्वी आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलच्या संस्थापक,  मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालिका
  14. शुभा मुद्गल : प्रख्यात गायिका , संगीत रचनाकार
  15. विनीता बाली : ब्रिटानिया उद्योगाच्या व्यवस्थापकीय संचालिका आणी मुख्य कार्यकारी अधिकारी

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती :


१५ मान्यवर महिलांची माहिती, त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्यांशी साधलेल्या संवादाचा काही भाग आणि त्यावर लेखिकेचे भाष्य असे पुस्तकाचे स्वरूप आहे. एकेका व्यक्तीबद्दल १५-१७ पाने माहिती आहे. 

साधारणपणे जी चरीत्र वाचण्यात येतात त्यात खेडेगावात बालपण; गरीबी, सामाजिक विषमता यांच्याशी संघर्ष, विपरीत परिस्थितीशी झगडत पुढे येणे असे स्वरूप असते. यातल्या यशस्विनी मात्र एखाददुसरा अपवाद सोडला तर उद्योगपतींच्या मुली, विद्वानांच्या मुली गेलाबाजार सुखवस्तू-सुसंस्कृत मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुली आहेत.  
( हे वाचताना एक गंमत आठवली : आम्ही चार मित्र गप्पा मारत होतो. एका मित्राने "स्लमडॉग सीए" हे या गरीबीतून वर आलेल्या एका मराठी सीएचे चरीत्र वाचले होते त्याबद्दल त्याने सांगितले. मग बाकीच्यांनी पण अशाच संघर्ष करून मोठं झालेल्या लोकांची उदाहरणे सांगितली. तेव्हा आम्ही गमतीने म्हणालेलो की आ"पण सगळे शहरात, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेलो. मोठं व्ह्यायला गरीबीत, गावात जन्म व्हायला पाहिजे. त्यामुळे आपण काही या जन्मात मोठे होऊ शकणार नाही". आमच्यातला एक गरीबीत नही पण छोट्या गावात जन्मलेला. त्याला आम्ही म्हटलं आता मोठा माणूस व्ह्यायची जबाबदारी तुझी. त्यामुळे ही पुस्तक वाचताना त्यांची ही पार्श्वभूमी चटकन जाणवली
त्यांच्यावर ज्ञानाचे, शिक्षणाचे, सचोटीचे, मेहनतीचे संस्कार लहानपणापासून झालेले दिसतात. उच्चविद्याविभूशित, परदेशात उच्च शिक्षण घेतलेल्या आहेत. त्यांच्यासाठी आपल्या क्षेत्रात यश मिळणं साहजिक असलं तरी सहज नक्की नव्हतं. स्वतःच्या घरच्या उद्योगसमूहाची जबाबदारी असो किंवा बॅंकांसारख्या त्रयस्थ उद्योगांची जबाबदारी असो स्वतःला घडवत, चुकांमधून शिकत, यश-अपयश पचवत त्यांनी नशीबाने मिळालेल्या अनुकूलतेचं सोनं केलेलं दिसतं. घरची किंवा स्वकष्टार्जित श्रीमंती, सामर्थ्य त्यांच्या डोक्यात गेलेलं नाही. समाजऋणाबद्दल त्यांच्या मनातली जाणीव ठसठशीत आहे. यातल्या बहुतेक जणी सामाजिक कार्यांना मदत करतातच पण बऱ्याच जणी स्वतः प्रत्यक्ष कामात सक्रीय आहेत, हे विशेष. 

महिला यशस्विनी म्हटल्यावर त्यांनी संसार आणि करियर याची सांगड कशी घातली हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे. प्रत्येकीचा दृष्टिकोन आणि आयुष्य वेगळं. मूल न होऊ देण्याचा निर्णय कुणी घेतला तर कुणाला नशीबाने ही संधी नाकारली तेव्हा एकीकडे उद्योगात यश मिळतंय आणि मूल न होणं हे मात्र स्वतःचं अपयश आहे असं मानून स्वतःला दोष देण्याची मनःस्थिती कुणाची होती. कुणाला मुलांना वेळ देता आला नाही याची थोडी खंत व मुलांना अभिमानास्पद वाटेल असा वारसा तयार केल्याची मिश्रभावना आहे. तर कुणाला दुर्दैवाने पुत्रवियोगाच्या भयंकर दुःखातून स्वतःला सावरत पुढे जावं लागलंय. 

त्यांच्या कुटुंबियांच्या त्यांच्याबद्दलचा द्रुष्टिकोन पुस्तकात फार दिलेला नाही तरी त्यांची कौटुंबिक पार्शवभूमी बघता घरच्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल आणि वातावरण समंजस अनुकूल असेल असं वाटतं. करीअर करायचंय म्हणून घरी झगडावं लागलं नसणार. 

प्रत्येक व्यक्तीच्या करीयर मधील काही ठळक घडमोडींबद्दल या पुस्तकात सांगितलं आहे. पण लेखनाची शैली खूप तुटक तुटक वाटली. १५-२० पानं एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल वाचूनही चित्रण त्रोटक झालं असं वाटतं. एखादा व्यक्तीचरित्रात्मक लेख वाचल्यावर ती व्यक्ती कधी असेल याचं एक चित्र आपल्या मनात उभं राहतं. ते चित्र यथातथ्य, पूर्ण बरोबर नसेल पण दिलेल्या माहितीच्या आधारे काहितरी चित्र आपण मनाशी रंगवू शकतो. (उदा. जडणघडण ( दिवाळी अंक २०१६ )) या पुस्तकाच्या वाचनातून तसं होत नाही. त्या व्यक्तींबद्दल थोडीथोडी माहिती होते. पण बऱ्याच वेळा असं वाटलं की त्यांच्या जागी दुसरा कोणी सीईओ असता तरी त्याने हेच केलं असतं. या व्यक्तीने घेतलेल्या निर्णयामध्ये, वाढवलेल्या व्यवसायामध्ये "त्यांचं असं" काय वैशिष्ट्य आहे? ते जाणवत नाही. मराठी भाषांतरही काही काही ठिकाणी बोजड वाटतं. इंग्रजी पुस्तकाचं भाषांतर वाचतोय हे सारखं जाणवत राहतं.

वैचरिक पुस्तक असल्यामुळे मांडण्याची शैलीकडे थोडा काणाडोळा करून या यशस्विनींच्या यशाबद्दल थोडं जाणून घ्यायला काहीच हरकत नाही.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

2 comments:

  1. कौशिक !
    छान लिहले आहे! आणि श्रेणी देण्याची पद्धत त्यांची नवीन कल्पक shortcut नावे हे फारच आवडले !

    प्रदीप -
    whatsapp ग्रुप मेंबर -
    rajhans आणि itransform लेखन कार्यशाळा

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्हाला परीक्षण आवडलं हे वाचून बरं वाटलं. खास इथेही प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या पुस्तकप्रेमी मित्रमंडळींना सांगा या बद्दल
      - कौशिक

      Delete

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...