तत्रैव (tatraiv)

 


पुस्तक : तत्रैव (tatraiv)
लेखक : राजन खान (Rajan Khan)
भाषा : मराठी (Marathi)
पाने: २५५
ISBN :दिलेला नाही

रजान खान यांच्या दीर्घकथा संग्रहात चार कथा आहेत.


"एका अटीचा संसार" ही एका वृद्ध जोडप्याची गोष्ट आहे. मूलबाळ नाही आणि संसाराचा काही त्रासही नाही अशा स्थितीत एक वृद्ध जोडपं आपले दिवस ढकलतं आहे. एके दिवशी पावसाळ्यात त्यांच्या घरासमोर एक कुत्र्याचं लहानगं पिल्लू केविलवाण्या परिस्थितीत घरासमोर सापडतं. पावसापाण्यात ते वाचेल का नाही या काळजीपोटी त्याला घरात घेतात. राहू दे घरात थोडे दिवस असं म्हणत सांभाळ करतात. पण या पिल्लामुळे त्यांच्या रोजच्या निरस दिनक्रमात बदल होतो. एकमेकांशी बोलणं सुरू होतं. मुलं न होऊन देण्याचा बायकोचा निर्णय आणि त्याला कारण असणारं नवऱ्याचा तिला नोकरी करू न देण्याचा निर्णय हे विषय पुन्हा पुन्हा बोलण्यात येतात. पण पुन्हा पुन्हा बोलण्यातून स्वतःच्या तेव्हाच्या वागण्याबद्दल इतक्या वर्षांनंतर बघताना आता स्वतःची आणि जोडीदाराचीही नव्यानेच ओळख होते. आपण दुसऱ्याला आणि स्वतःलाही पूर्णपणे ओळखलं आहे असं म्हणू शकत नाही याची जाणीव होते.

दुसर्‍या गोष्टीतही नवरा बायकोचाच संवाद आहे. एक लेखक एक कथा लिहिताना अडलाय, कितीतरी दिवस त्याला पुढे लिहायला जमत नाहिये. अशवेळी त्या काथेतली पात्र असणारे नवरा बायको सजीव झाल्यासारखी बोलू लागतात अशी कल्पना केलीय. ते एकमेकांशी चर्चा करू लागतात . लेखक का लिहित नसेल. सुखाच्या संसाराचं चित्रण केल्यावार त्याला कथेत नाट्यमय वळण द्यायचंय. म्हणजे त्याला काय सुचवायचं असेल ? त्याला बायकोचा संशय आला असेल का? असेल तर का आला असेल ? संशय का येतो ? संशय आल्यावर माणसं सहज विचारून का टाकत नाहीत ? अशा समस्यांमध्ये सगळ्याचीच फरपट कशी होते अशी सगळी चर्चा ते करतात.

तिसऱ्या गोष्टीत एक लेखक आपल्याशी संवाद साधतोय आणि त्याला रहस्यकथा लेखन का जमत नाही ते सांगतो. त्याला एक रहस्यकथा लिहाविशी वाटतेय त्याच्या लहानपणी घडलेल्या आठवणींवर आधारित. आणि म्हणून तो लहानपणी काय झालं हे आपल्याला सांगतोय. खेडेगावातल्या लहान मुला-मुलींचे खेळ, भांडण, रुसवे-फुगवे आणि शेवटी एक अनाकलनीय घटना. आणि त्या मागचं रहस्य काय ? नकळत लेखक रहस्यकथा लिहितो पण ही रहस्यकथा तो का प्रसिद्ध करू शकत नाही हे आपल्यालाही पटतं. 

चौथी एक नेहमीसारखी म्हणजे त्रयस्थ निवेदन शैलीतली गोष्ट आहे. एका बंधकाम मजूरांच्या वस्तीत नव्याने तीन चार मजूर कुटुंब राहायला येतात. पोटपाण्यासाठी मोलमजुरी करतात. त्यांच्या बायका घरगुती कामं करतात. आणि घरगुती कामं करता करता प्रसंग असे घडतात की त्यांची पावलं वाममार्गाकडे वळतात. परिस्थितीमुळे, चार पैसे मिळतील या लालसेपोटी जे लपूनछपून सुरू होतं ते हळूहळू वाढत जातं. एकीला दोन, दोघीला निघी असं करत करत प्रकरण वाढत जातं आणि तसल्या वस्तीचाच जन्म होतो. आणि या बायकांना नादी लावणारीच्या आयुष्यातही काही वेगळंच घडतं.

"तत्रैव" म्हणजे "तत्र" + "एव" अर्थात "तिथेच".  या नावाचा या गोष्टींशी संबंध नीट जाणवला नाही. कदाचित मलपृष्ठावरच्या मजकुरातील, "..तेच तेच घडतं" या संकल्पनेप्रमाणे आपण "तिथेच" असतो असं काहीसं म्हणायचं असेल. मग खरं "..तेच तेच" साठी "तदेव" नाव ठेवायला हवं होतं. असो.

दोन गोष्टींचे विषय खूप नाविन्यपूर्ण आहेत असे नाहीत. पहिल्या तीन कथांची शैली वेगळी आहे. पण त्या खूपच लांबल्या आहेत असं वाटतं. तेच तेच संवाद, मुद्दे पुन्हा पुन्हा येतायत असं वाटतं. तिसऱ्या कथेतही मुख्य रहस्यकथा शेवटची काही पानेच आहे. आधी "बालपणीचा काळ सुखाचा" प्रकारचं वर्णन आहे. ज्यातून मूळ कथाबीजाला काही फार मदत होत नाही. तीनही कथांवर संपादकीय कात्री अजून चालायला हवी होती असं वाटतं. चौथी कथा मात्र मोठी असूनही प्रत्येक प्रसंग गोष्टीला पुढे नेतो, अधिक परिणामकारक करतो. आपल्याला ती गोष्ट खिळवून ठेवते. 
वेगळ्या शैलीतल्या तीन कथा आणि शेवटची परिणामकारक कथा म्हणून हा कथा संग्रह वाचायला हरकत नाही.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

Classic Horror Stories क्लासिक हॉरर स्टोरीज




पुस्तक : Classic Horror Stories (क्लासिक हॉरर स्टोरीज)
लेखक: अनेक लेखकांच्या कथांचा संग्रह
भाषा : English (इंग्रजी)
पाने: २४०
ISBN : 978-93-5012-172-6

वेगवेगळ्या इंग्रजी लेखकांच्या भयकथा/भूतकथा यांचा हा संग्रह आहे. 




"क्लासिक मास्टर्स"नी लिहिलेल्या कथांचा संग्रह असं मुखपृष्ठावर वाचल्याने "भीतभीतच" पुस्तक घेतले आणि वाचले. पण दोन तीन कथा वाचल्यातरी भीती अशी काही वाटली नाही. भयकथांपेक्षाही त्या रहस्यकथा किंवा गूढकथा जास्त वाटल्या. त्या वाचतनाही खूप मजा अशी आली नाही. त्यामुळे कंटाळून पुस्तक अर्धवटच सोडलं. म्हणून हे पुस्तकाचं परीक्षण म्हणत नाही तर पुस्तक ओळख आहे असं म्हणतो. आणि अधिक काही लिहीत नाही.

Lost and Founder (लॉस्ट अ‍ॅंड फाउंडर)




पुस्तक : Lost and Founder (लॉस्ट अ‍ॅंड फाउंडर)
लेखक : Rand Fishkin (रॅंड फिश्किन)
भाषा : English (इंग्रजी)
पाने : ३१२
ISBN : 978-0-24129-092-7

फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग, अ‍ॅमेझॉनचा जेफ बेझोस, गूगलचे निर्माते लॅरी आणि सर्गी यांच्या संपत्तीचे आकडे अधूनमधून बातम्यांमध्ये येत असतात. वयाच्या विशी-तिशीतच जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत ते जाऊन बसले आहेत. एक लहान नवोद्योग (स्टार्ट-अप) त्यांनी सुरू केला आणि त्यांचा व्यवसाय वाढत वाढत दशकभरात ते अब्जोपती झाले. अशी बरीच उदाहरणं आपल्याला वाचायला मिळतात. हा चमत्कार घडवणाऱ्या स्टार्ट-अप संकल्पनेकडे जगातले लोक ओढले गेले असते तर नवल नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या सोयींची प्रगती, आंतरजाल (इंटरनेट) चा वाढता प्रसार आणि प्रभाव, सरकारी धोरणांची अनुकूलता यामुळे स्टार्ट-अप आणखी अवाक्यात वाटू लागल्या आहेत. नवीन कल्पना असणारे, काहितरी वेगळं करण्याचे स्वप्न बघणारे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी जीवन सोपं करण्याचे ध्येय बाळगणारे तरूण (वयाने आणि मनाने) स्टार्ट-अप सुरू करत आहेत. भारतातही. 

पण स्टार्ट-अप सुरू करणं म्हणजे यशाचा हमखास मार्ग नाही. सगळ्याच स्टार्ट-अप कंपन्या मोठ्या झाल्या असं नाही. काही बुडल्या, काहींमध्ये अपेक्षित फायदा झाला नाही, काहींमध्ये स्टार्ट-अप मधून संस्थापकालाच बाहेर जावं लागलं. इतर कुठल्याही व्यवसायाप्रमाणे स्टार्ट-अप मध्येही नफा-नुकसान, यश-अपयश, चढ-उतार आणि प्रचंड मेहनत हे आहे. स्टार्ट-अपच्या फायद्यांकडे डोळा ठेवून केवळ भावनेच्या आधारे जर कोणी स्टार्ट-अप काढत असेल तर फसगत होण्याची शक्यता जास्त. म्हणूनच ज्याला स्टार्ट-अप काढायची आहे किंवा ज्याच्या मनात फक्त गुलाबी चित्र आहे त्यांनी वस्तुस्थितीचं भान देणारं हे पुस्तक वाचलं पाहिजे.

एसईओमोझ (SEOMoz  (Moz.com)) या स्टार्ट-अप चा संस्थापक रँड फिश्कीन याने हे पुस्तक लिहिले आहे. स्टार्ट-अपच्या इविध पैलूंवर भाष्य केलं. अहे. अनुक्रमणिकेवर नजर टाकूया.

फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा


प्रचलित समज काय आहेत. वस्तुस्थिती काय आहे. त्याला आलेले अनुभव. त्याने घेतलेले धडे. काही सांख्यिकी (स्टॅटिस्टिक्स). इ. माहितीतून त्याने मुद्दे मांडले आहेत. 
उदा. स्टार्ट-अपचा संस्थापक खूप श्रीमंत होतो हा प्रचलित समज. तो योग्यही आहे. पण त्यात मेख अशी की ती संपत्ती स्टार्ट-अपच्या रोख्यांच्या (स्टॉकच्या) स्वरूपात असते. जोपर्यंत ते रोखे विकले जात नाहीत तो पर्यंत हातात पैसा नाही. आणि जोपर्यंत कंपनी व्यवस्थित नावाजली जात नाही तोपर्यंत असे जोखमीचे रोखे घ्यायला कोणी तयार होत नाही. त्यामुळे अशी विक्री किंवा आयपीओ होईपर्यंत त्या संस्थापक-सीईओला सुद्धा त्याच्या पगारावरच अवलंबून रहावं लागतं. 

नवोद्योगलाही स्वतःची काही तत्त्वे-मूल्ये असली पाहिजेत का? झटपट पैसा मिळवण्यासाठी ही मूल्ये बाजूला सारली तर थोड्या वेळापुरता फायदा होतो पण दीर्घकालीन वाढीवर त्याचा विपरित परिणाम होतो हे त्याने एका प्रकरणात विशद केलं आहे.

आपलं उत्पादन बाजारात कधी आणावं ? सगळं व्यवस्थित, नाव ठेवायला जागा नाही असं झाल्यावर बाजारात आणायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल. आणि अगदीच लवकर आणलं तर त्यातल्या त्रुटींमुळे लोकांना आवडणार नाही. याचा तोल साधणारं Minimum Viable Product (MVP) खरंच बनवता येतं का? रॅंडच्या कंपनीने असं प्रॉडक्ट बाजारात आणल्यवर त्याला काय अनुभव आला. त्यातून त्याने काय सल्ला दिलाय ते पुस्तकात वाचू शकता. त्याची थोडी झलक. 





लेखक स्वतः या सगळ्या प्रक्रियेतून गेला आहे. त्याचे अनुभव, भावनावेग आणि चुका, वेळोवेळी झालेली द्विधा मनःस्थिती इ. त्याने प्रमाणिकपणे पणे लिहिले आहेत. विषय गंभीर असला तरी लिखाणाची शैली गंभीर निबंधासारखी नाही तर सहज संवाद साधणारी आहे. अमेरिकन शैलीतली XX** घातलेली वाक्ये आणि प्रसंग पण आहेत. त्यामुळे पुस्तक वाचयला कंटाळवाणे होत नाही. 


त्यामुळे तुम्ही स्टार्ट-अपच्या विचारात असलात तर हे अवश्य वाचा. नसाल तरी "जावे त्यांच्या वंशा" चा अनुभव घेण्यासाठी पुस्तक नक्की वाचा.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...