The TCS Story & Beyond (द टीसीएस स्टोरी अ‍ॅंड बियॉंड)




पुस्तक : The TCS Story & Beyond (द टीसीएस स्टोरी अ‍ॅंड बियॉंड)
लेखक : S. Ramadorai ( एस. रामदुरै)
भाषा : English (इंग्रजी)
पाने : २८७
ISBN : 978-0-143-41966-2

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची भारतात पायाभरणी करणाऱ्या, वटवृक्षापणे फोफावून महत्त्वाची आयटी कंपनी ठरलेल्या टाटा कन्सल्टिंग सर्विसेस (टीसीएस) कंपनीचा हा इतिहास आहे. टीसीएसचे माजी सीईओ एस. रामदुरै यांनी हा इतिहास शब्दबद्ध केला आहे. 

अनुक्रमणिका :



टाटा समूह नेहमीच भारतात नवनवीन तंत्रज्ञान आणून भविष्यवेधी पावले उचलण्यात अग्रेसर रहिला आहे. त्याचप्रमाणे १९६०च्या दशकात टाटासमूहातील कर्नल सोहनी (Colonel Sawhney) यांनी कंपनीच्या आतली व्यवस्था सुलभ करण्यासाठी तेव्हाच्या संगणक प्रणाली तंत्रज्ञन वापरायची कल्पना पुढे आणली. जे. आर. डीं टाटांच्या गुणग्राहकतेमुळे ती कल्पना स्वीकारली गेली. आणि एका नव्या उद्योगाचे बीज रोवले गेले. 

TCS जन्मली गं TCS सखी जन्मली :
(कालच्या रामनवमीचा परीणाम :) 



पण अनोळखी तंत्रज्ञान, यंत्रांमुळे नोकऱ्या जातील ही भीती, समाजवादी पगड्यामुळे खाजगी उद्योगाकडे अविश्वासाने बघण्याची राजकीय पद्धती, अनिर्बंध निर्बंध (लायसन्स राज) मुळे होणारी दफ्तरदिरंगाई, आधीच महाग असणऱ्या यंत्रांवर दामदुप्पट कर, तुटपुंजे परकीय चलन अशा समस्यांचे पर्वत तेव्हा या बीजापुढे उभे होते. म्हणूनच पुढची दोन दशके संघर्षातच गेली. भारतातल्या या समस्यांमुळे भारतात उच्च शिक्षण घेतेलेल्या हुशार युवकांना तंत्रिक प्रशिक्षण देऊन परदेशात कामाला पाठवण्याचे प्रारूप टीसीएसने स्वीकारले. आपले पाय रोवून स्वतंत्र स्थान निर्माण केले. भारताची ओळख निर्माण केली. टीसीएस च्या पहिल्या काही कर्मचार्यांपैकी एक असणारे रामदुरै निवृत्त होईपर्यंत आणि अजूनही टीसीएसशी संबंधितच राहिले आहेत. त्यामुळे ह्या प्रवासाचे ते भागिदार साक्षिदार आहेत. त्यांच्या तोंडून हा सगळा इतिहास वाचणं रोमहर्षक आहे. कारण "युद्धस्य कथा रम्या"! हो, ही रक्तविहीन क्रांतीच आहे.

लेखकाने आतिशय खोलात जाऊन, तपशिलवार घटना लिहिल्या आहेत पहिला कॉंप्युटर भारतात कसा आला, सरकारी लालफीतशाहीतून संगणक हातात पडणं म्हणजे काय दिव्य होतं ते वाचल्यावरच कळेल. 

पहिला संगणक भारतात आणण्याच्या प्रसूतिवेदना :



पुढे प्रोजेक्ट कसे मिळवले, प्रत्येकाने दिवसरात्र मेहनत करून नवीन तंत्रज्ञान शिकून घेतलं, ग्राहक कंपन्यांचा विश्वास संपादन केला हे लिहिले आहे. टीसीएस वाढायला लागल्यावर कामाचा तोच दर्जा आणि तीच "टाटा नीतीमत्ता" प्रत्येकात असावी यासाठी ट्रेनिंग ची पद्धती सुरू झाली. वाढीबरोबरच "अप्रेजल"ची सिस्टीम मध्ये बदल करावे लागले. कंपनीची कॉंट्रॅक्ट वेगवेगळ्या देशात वाढू लागली. भारतात पुणे, मुंबई, चेन्नई, तिरुवनंतपुरम इ. ठिकाणी कँपस तयार झाली. तिथेही निसर्गस्नेही वातावरण असेल याची काळजी घेतली गेली.

९० च्या दशकात टीसीएसचं "ब्रँडिंग" केलं गेलं. कंपनीच्या नावात बदल करायचा का, पूर्ण नाव वापरायचं का अद्याक्षरं, घोषवाक्य काय असलं पाहिजे यावर कशी चर्चा झाली आणि कंपनीच्या क्षमतांचे योग्य दर्शन होईल असे ब्रॅंडिं कसे झाले हे सविस्तर लिहिलं आहे. वरकरणी साध्या वाटणऱ्या गोष्टीही किती काळजीपूर्वक करायला लागतात हे कळतं. 

टीसीएस हे नाव या उद्योगात सर्वज्ञात आणि सर्वमान्य झाल्यावर पुढचा टप्पा होता आयपीओचा. आत्तापर्यंत टाटा सन्सचा एक विभाग म्हणून काम चालत होतं. आता स्वतःचे समभाग भांडवल बाजारात विकून स्वतंत्र कंपनी स्वरूपात पुढे आली. हा उपक्रम सुद्धा अनेक वर्षांच्या चर्चा, अर्थिक फायदे तोट्याची गणिते, कायदेशीर किचकटपणा यांच्यातून कसा आकाराला आला याची सविस्तर माहिती दिली आहे. असाच किचकट भाग म्हणजे टीसीएसने केलेले दुसऱ्या कंपन्यांचं अधिग्रहण. त्यावरही स्वतंत्र प्रकरण आहे.

टीसीएस भारतातल्या संगणकीकरणाची प्रथम पासून भागिदार किंवा सेवा पुरवठादार कंपनी रहिली आहे. एनएसई सारखी स्टॉक मार्केट, मोठमोठे सरकारी प्रकल्प, समाजोपयोगी सरकारी किंवा सार्वजनिक मालकीच्या कंपन्याची कंत्राटेतीसीएसने मिळवून गरीब, शेतकरी, सर्वसामान्य व्यक्ती यांच्या उत्थानात कसा हातभार लावला आहे. तंत्रज्ञानाची वाटचाल या विकासात कसा हातभार लावू शकेल यावरही स्वत्रंत्र प्रकरणे आहेत.

या सगळ्यात सीईओ म्हणून लेखकाचा मोठा वाटा होता. सीईओ पदावर स्वतःच्या कार्यशैलीबद्दल लेखक लिहितात :



शेवटच्या प्रकरणात रामदुरै यांच्याबरोबर काम केलेल्या व्यक्तींनी त्यांचे आणि रामदुरै यांचे अनुभव सांगितले आहेत. टीसीएसच्या सुरुवातीच्या काळापासून आत्तापर्यंत त्यांनी जणू टीसीएसला वाहून घेतलं होतं. दिवस-रात्र, थकवा, सुट्टी याचा विचार न करता दिलेल्या डेडलाईन पाळण्यासाठी मेहनत करत राहिले. नवनवीन आव्हानं स्विकारत राहिले, आपल्या सहकाऱ्यांनाही त्यासाठी प्रोत्साहित करत राहिले. "..जणू माझं पहिलं लग्न टीसीएसशी झालं" होतं असं रामदुरै यांचं म्हणणं पुस्तकात बरेच वेळा येतं. "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" हे प्रत्ययाला येतंच. पण भारतीय "सर्विस बेस्ड" कंपन्या कर्मचाऱ्यांना पिळून घेतात, अमेरिकन "प्रॉडक्ट बेस्ड" कंपन्यांपेक्षा तिथे "वर्क-लाईफ बॅलन्स" वाईट असतो याचं कारण उच्चपदस्थांच्या या मानसिकतेत दिसतं. स्वतःही कामाला जुंपून घेतात आणि दुसऱ्यालाही त्याच चक्रात ओढतात असं वाटतं. 

टीसीएसच्या नंतर सुरू झालेल्या इतर भारतीय कंपन्यांबद्दल- पटणी, इन्फोसीस, विप्रो याबद्दल फर उल्लेख येत नाहीत. त्यांच्याशी स्पर्धा कशी होती हे जाणणंही रोचक ठरलं असतं. टीसीएस "प्रॉडक्ट बेस्ड" का झाली नाही किंवा बाजारात दबदबा निर्माण करेल असे प्रॉडक्ट का तयार करू शकली नाही याबद्दलही काही भाष्य नाही. 

तरीही भूत-भविष्य-वर्तमान अशा तीन्ही काळांना स्पर्षून खूप माहिती आपल्यासमोर मांडणारं हे तीनशे पानी पुस्तक आहे. वाचायला आणि माहिती पचवायला वेळ घेणारं आहे. पण वाचणं गरजेचं आहे.  याची एक संक्षिप्त आवृत्ती पण काढायला पाहिजे. पुस्तकप्रेमी, इतिहासप्रेमी, उद्योगप्रेमी, स्वमदत-पुस्तकप्रेमी, आयटी कर्मचारी सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...