ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM Electronic Matadar yantre)




पुस्तक : ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM Electrnic Matadar yantre)
भाषा : मराठी (Marathi)
मूळ पुस्तक :EVM - Electronic Voting Machines 
लेखक : आलोक शुक्ल (Alok Shukla)
मूळ भाषा : इंग्रजी (English)
अनुवाद : मृणाल धोंगडे (Mrunal Dhongade)
पाने : २२४
ISBN : 978-93-52011-19-3

लोकसभेच्या निवडणुका संपून जेमतेम पंधरा दिवस होतायत. त्यामुळे "निकालांमागे ईव्हीएम चा हात" हा विषय अजून ताजा आहे. त्यावरच्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद २३ एप्रिललाच प्रकाशित झालाय. त्यामुळे इतक ताजा विषय आणि इतके ताजे पुस्तक वाचायला मिळणे अलभ्यलाभ आहे. विशेष म्हणजे माझ्या वाचनालयात दाखल झाल्यावर पुस्तकाचा पहिला वाचक मीच आहे !

या पुस्तकाचे लेखक माजी आलोक शुक्ल हे सनदी अधिकारी(IAS) असून त्यांनी भारतात आणि भारताबाहेरही निवडणूक प्रक्रियेत काम केले आहे. त्यांची पुस्तकात दिलेली ओळख बघून या विषयावर भाष्य करण्यास ते अगदी योग्य आहेत याची खात्री पटेल.



अनुक्रमणिका :

पुस्तकात निवडणुक प्रक्रियेत झालेल्या बदलांचा मागोवा घेतला आहे. उदा. अगदी पहिल्या निवडणुकांत प्रत्येक उमेदवारासाठी वेगळी पेटी असे. मतदार कोरी मतपत्रिका आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या पेटीत टाकत असे. नंतर उमेदवारांची नावं असणारी मतपत्रिका आली. लाकडाच्या ऐवजी स्टीलच्या पेट्या आल्या. मतदानकेंद्र बळकावण्याच्या घटना कशा घडायच्या याचेही दाखले आहेत. त्या त्या वेळच्या प्रक्रियेत काय त्रुटी किंवा अडचणी आहेत याचा थोडा उल्लेख आहे. जुनी छायाचित्रे सुद्धा आहेत.
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)


इलेक्ट्रिक यंत्र वापरण्याच्या कल्पनेचे श्रेय भारताचे सहावे निवडणुक आयुक्त एस. एल. शकधर यांना जाते. सत्तरच्या दशकात त्यांनी अशा यंत्राची आवश्यकता ओळखून इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ला अशा यंत्राची रचना मांडायला सांगितली. आयोगाची ही भूमिका जाहीर झाल्यावर इतर खाजगी कंपन्या आणि व्यक्तींनीही अशा यंत्रांचा प्रस्तावित आराखडा आयोगाकडे पाठवला. कोणीकोणी आणि कधी आराखडा पाठवला याची माहिती पुस्तकात आहे. माझे आडनाव बंधू(किंवा आडनाव आजोबा) असणाऱ्या डी.व्ही.लेले या गुलबर्ग्याच्या व्यक्तीने सर्वप्रथम असा प्रस्ताव पाठवलेला. 



या तांत्रिक चर्चेतून यंत्रात काय सुधारणा करण्यात आला याची सविस्तर माहिती आहे. पुढेही वेळोवेळी यंत्रांत सुरक्षा आणि उपयुक्तता यांच्या दृष्टीने काय बदल केले गेले याची माहिती आहे.


यंत्र तर तयार होत होती. पण त्यांच्या वापराबद्दल उत्सुकता आणि शंका दोन्ही प्रथमपासून आहे. सगळ्या राजकीय पक्षांची बैठक घेऊन प्रत्यक्षिक कसे दाखवले गेले, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रत्यक्षिक कसे दाखवले गेले याचे "मिनिट्स ऑफ मीटिंग्स" प्रमाणे तपशीलवार माहिती दिली आहे. ईव्हीएमचे जनक ईसीआय मधील डॉ. अंबिका प्रसाद उपाध्याय यांची आणि त्या दिवसांचा अनुभव सांगणारी मुलाखत देखील आहे.

१९ मे १९८२ रोजी परूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत ५० मतदानकेंद्रात यंत्रांचा वापर सर्वप्रथम झाला आणि भारताने एका नव्या युगात प्रवेश केला. पण ईव्हीएम वरच्या खटल्यांनाही सुरुवात झाली. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम वापरायला बंदी केली नाही पण कायद्यात योग्य ती दुरुस्ती न करता ईव्हीएम वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाला फटकारले. निवडणूक रद्द केली. पुढे संसदेत आवश्यक कायदासुधार करण्यात आला व ईव्हीएमचा मार्ग प्रशस्त झाला.

तरीही खटले चालूच होते. या खटल्यांची जंत्री दिली आहे. कुठल्या कुठल्या व्यक्तीने व राजकारण्यांनी काय काय आक्षेप घेतले आणि त्याला कसे उत्तर दिले याची जंत्री आहे. राजकारण्यांच्या बदलत्या भूमिकांवर स्वतंत्र प्रकरण आहे. अडवाणींसारखे ज्येष्ठ नेते सुरुवातीच्या प्रात्यक्षिकांना उपस्थित आणि समाधानी होते. तरीही भाजपने ईव्हिएमवर शंका घेणं चालू ठेवलं. ज्या कँग्रेसच्या काळात ईव्हीएम आली त्यांनीही निवडणुका हरल्यावरच यंत्राकडे बोट दाखवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे "आमचे ईव्हीएक हॅक करून दाखवा" या आयोगाच्या आव्हानाला सामोरे जायला मात्र कुठलाही पक्ष कसा पुढे आला नाही हे तारीखवार सांगितले आहे. 

हरि के. प्रसाद या व्यक्तीने आयोगाची प्रत्यक्ष यंत्र मिळवली आणि दोन परदेशी तज्ञांच्या मदतीने त्यात छेडछाड करता येते असा व्हिडिओ बनवला होता. आपलं म्हणणं दखवण्यासाठी त्यांनी या यंत्राच्या हार्डवेअर मध्येच बदल केला होता. हार्डवेअर बदललं म्हणजे एका अर्थी दुसऱ्याच यंत्राचे दोष त्यांनी दाखवले असा अर्थ होतो. तरी असे बदल प्रत्यक्ष यंत्रात झाले तर ? याचाही ऊहापोह पुस्तकात आहे. यंत्रांची पुन्हा पुन्हा तपासणी, सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींसमोर तपासणी आणि सीलबंद करणे यामुळे असा कुठलाही बदल लगेच लक्षात येतो आणि यंत्र वापरले जात नाही. तसेच एखाद्या मतदारसंघाच्या निवडणुकीवर प्रभाव टाकायचा असेल तरी शेकडो यंत्रांमध्ये तो बदल करावा लागेल. हजारोंच्या नजरा ज्या यंत्रांवर रोखल्या असतात तिथे इतका मोठी छेडछाड शक्य आहे क? हे आणि असे अनेक मुद्दे मांडून कागदोपत्री शक्य पण प्रत्यक्ष नाही (थिअरिट्ट्कल्ल्य पोस्सिब्ले नोत प्रतिचल्ल्य) असं स्पष्ट केलं आहे. ईव्हीएम कुठल्याच यंत्राला किंवा इंटरनेटला जोडले नसल्यामुळे त्यात बाहेरून काही सॉफ्टवेअर घालताच येत नाही. अजुनही अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं वापरलं आहे याची यादी आहे. सगळा तांत्रिक भाग नीट कळला नाही तरी. आपला विश्वास भक्कम होतो हे निश्चित.



सर्वात शेवटी जगभरात कुठे कुठे इलेक्ट्रॉनिक मतपद्धती वापरल्या गेल्या आणि त्यांचं काय झालं याचा धावता आढावा घेतला आहे.

पुस्तक असं माहितीने भरलेलं आहे. पण पुस्तकाचं संपादन अजून चांगलं व्हायला हवं होतं. मुद्द्यांची, घटनांची बऱ्याच वेळा पुनरावृत्ती झाली आहे. तर काही वेळा एकच मुद्दा वेगवेगळ्या ठिकाणी तुकड्या तुकड्यात आला आहे. सध्याच्या मतदान यंत्राची रचना कशी असते याची आकृती पाहिजे होती. यंत्रावरचे आक्षेप आणि त्याला तांत्रिक उत्तर हे सगळं एकत्र करून एक मुख्य प्रकरण सुरुवातीलाच हवं होतं कारण आजच्या घडीला ईव्हीएम च्या इतिहासापेक्षा लोकांना "ईव्हीएम हॅक होत नाहीत" यात जास्त रस आहे. त्यासाठी आवश्यक तो सगळा मजकूर पुस्तकात आहे तो अजून चांगला आणि सगळ्यात आधी मांडायला हवा होता. 

मराठी अनुवाद चांगला झाला आहे. तांत्रिक इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठी प्रतिशब्द यांचा वापर आणि समतोल साधला आहे.

जागरुक मतदार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे; ईव्हीएमवर बिनबुडाची टिप्पणी टाळली पाहिजे आणि ज्याला अजूनही शंका आहे त्याने प्रत्यक्ष हॅकिंग करून सिद्ध करून दखवले पाहिजे. कारण केवळ शक्यतांचे आभासी बुडबुडे फोडण्याचं काम या पुस्तकाने केलं आहे.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...