Adiyogi (आदियोगी)



पुस्तक : Adiyogi (आदियोगी )
लेखक : Sadhguru & Arundhati Subramaniam ( सद्गुरू आणि अरुंधती सुब्रमण्यम)
भाषा : English इंग्रजी 
पाने : २१९
ISBN : P 978-93-5264-392-9
E 978-93-5264-392-6

वेद, उपनिषदे, पुराणे आणि रामायण-महाभारतासारख्या ग्रंथातून भारतीय संस्कृतीचे, तत्वज्ञानाचे मार्गदर्शन आणि संवर्धन हजारो वर्षे झाले आहे. पुराणात हजारो गोष्टी आहेत, नानविध चमत्कार आहेत, रूपक कथा आहेत ज्या आपल्यापर्यंत परंपरेने कौटुंबिक वारसा म्हणून पोचतात. या कथा चमत्कार खरंच घडले का ? घडले तर कधी ? का त्या फक्त काल्पनिक कथा आहेत ? का ती फक्त रूपके आहेत ज्यामुळे केलेला उपदेश लक्षात ठेवायला सोपा जाईल? या कथांचे नाना मते मांडता येतील. असेच मत "सद्गुरू" यांनी या कथांमधल्या "महादेव शंकर" या भारतीय देवतेबद्दल मांडले आहे. त्यांच्या मते सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वी कैलासात एक प्रत्यक्ष मानव अवतरला. ज्याने ध्यान-धारणा-योग यांचा शोध लावला आणि त्याचा जगात प्रसार केला. म्हणून तो पहिला योगी "आदियोगी" गणला जातो. उदा.



पुस्तकात महादेवाच्या प्रसिद्ध असणाऱ्या कथा दिल्या आहेत. काही कथा या रूपक कथा मानून त्यांचा अर्थ दिलाय. पुराणातल्या काही कथांची सुसंगती आदियोगी माणूस होता हे गृहितक धरून लावली आहे. भारतीय तत्त्वज्ञानातली "माया", "शून्य", "शि-व"(जे नाही ते) इ. संकल्पना समजावून द्यायचा प्रयत्न केला आहे. 




पण एकूणच हे पुस्तक खूप गोंधळलेले आहे. आदियोगी हा परमेश्वर नाही तर माणूस होता हे मान्य करण्यासाठी पुरावे काय? १५ हजार वर्षेंच कशावरून ? प्रजापतीचा यज्ञ आणि सतीचे यज्ञात उडी घेणं ही कथा सांगताना, यज्ञ हे भारतात वाढणाऱ्या नव्या आर्य संस्कृतीचं प्रतीक तर शंकर हे अनार्य लोकांच दैवत असा ओझरता उल्लेख केलाय. हे कशावरून? त्याच कथेत आधी जेव्हा लोक ब्रह्मा-विष्णू या देवांची आराधना करतात ते देव आर्य की अनार्य? आणि लोकांना देव असे भेटत होते का? याचे काही उत्तर नाही. 


दक्षिणेतल्या एका मुलीचे आदियोगी वर प्रेम बसले. तिच्या बरोबर लग्नासाठी आदियोगी दक्षिणेला निघाला. त्या मुलीच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी छलकपट करून हे लग्न होऊन दिलं नाही. ती मुलगी कुमारीच राहिली. तीच देवी कन्याकुमारी. अशी आख्यायिका दिली आहे. पण इतक्या सामर्थ्यशाली आदियोग्याला हे छलकपट का समजू नये. बरं आधी नाही समजलं तरी जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याने जाऊन मुलीची समजूत का नाही काढली. घरच्यांना शिक्षा का नाही केली? एकदा "आदियोग्याला’ माणूस म्हटलं की हे माणसांसारखी वर्तणूक अपेक्षित नाही का ? पण सद्गुरूंनी त्यांच्या कल्पना सांगाव्यात आणि आपण त्या फक्त ऐकाव्यात अशी पुस्तकाची धारणा असावी.

भारतीय तत्त्वज्ञात ज्या अमूर्त संकल्पना सांगितल्या आहेत त्या हळूहळू नव्या विज्ञानालाही मान्य कराव्या लागत आहेत अशी विधाने करताना उत्क्रांतीवाद, क्वांटम फिजिक्स इ.चा मोघम संदर्भ येतो. पण त्याचीही सखोल चर्चा होत नाही.

फार माहिती आणि नवी दृष्टी न मिळाल्याने पुस्तक कंटाळवाणे होते. मी ते पूर्ण वाचू शकलो नाही. अर्धं वाचलं आणि मग चाळून पूर्ण केले.

थोडक्यात या पुस्तकात आदियोग्याचे माणूसपण, "महादेव" या देवतेच्या पुराणकथा", आणि शिव म्हणजे सर्वव्यापी चिद्‌ तत्त्व ही तात्त्विक संकल्पना यात हव्यातश्या कोलांटी उड्या मारल्या आहेत. जिथे जो सोयीस्कर तो अर्थ घेतला आहे. त्यामुळे रा.चिं.ढेरे किंवा दुर्गाबाई भागवतांच्या लेखना प्रमाणे हे ऐतिहासिक संशोधन वाटत नाही, पुराणातल्या गोड अणि बोधपर गोष्टींचं पुस्तक होत नाही, तत्त्वबोध वाटत नाही आणि आधुनिक विज्ञान व भारतीय तत्त्वज्ञान यांचा तौलनिक अभ्यासग्रंथसुद्धा नाही.




----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...