"दृष्टी श्रुती" दिवाळी अंक २०१९ Drushti Shruti Diwali Special Edition 2019



दिवाळी अंक - दृष्टी श्रुती (२०१९) Drushti Shruti Diwali Special Edition 2019
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २८९
ISBN - दिलेला नाही.

PDF स्वरूपात उपलब्ध. डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

दोन दिवसांपूर्वी व्हॉट्सपवर एक पीडीएफ (PDF file) आली. तिच्या चित्रावरून आणि फाईलच्या नावावरून ती एका दिवाळी अंकाची पीडीएफ आहे हे कळत होतं. पुस्तकांच्या बेकायदेशीर पीडीएफ प्रमाणे कोणीतरी या दिवाळी अंकाची फाईल बनवलेली दिसते आहे असा विचार मनात आला. कुठल्या लेखक-प्रकाशकाच्या पोटावर/लेखणीवर पाय आणलाय हे बघायला फाईल उघडून वाचायला लागलो. मंगला गोडबोले हे प्रथितयश नाव संपादिका म्हणून दिसलं. आणि त्यांच्या मनोगतातला हा परिच्छेद वाचून हा काहितरी वेगळा प्रकार आहे हे जाणवलं.

"... आता आम्ही दृष्टी श्रुतीवाले म्हणजे कोण तर माध्यमांशी जवळून दुरून संबंध असलेल्या सुमारे पन्नास सजग-तरल-संवेदनाक्षम-हाडाच्या रसिक खेळाडूंचा एक व्हाट्सअप ग्रुप... यांच्यामध्ये वयोमान, आकारमान, जीवनमान, सांस्कृतिक भान वगैरेंमध्ये साम्य असो नसो; सर्वांच्या दृष्टीच्या श्रुतींच्या, अन्यही सर्व संवेदनांच्या अँटेना उंच उंच उभारलेल्या आहेत. नव्वदच्या दशकाचे कोणते सिग्नल त्यांनी पकडले, कोणते स्मरले, गौरवले, स्वीकारले, नाकारले त्याचा लेखाजोखा म्हणजे हा दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक"

दुसरं नाव दिसलं - "संकल्पना - श्रीपाद ब्रह्मे". त्यांचं फेसबुक पेज आहे का हे बघितलं. त्यांच्या फेसबुक वॉलवर या अंकाच्या प्रकाशनाच्या आणि त्यात सहभागी झालेल्या टीमचा फोटो आणि अशी पोस्ट होती.
"दृष्टी श्रुती या आमच्या WhatsApp group चा डिजिटल दिवाळी अंक प्रकाशित झाला....
या group मध्ये अनेक क्षेत्रातले जाणकार आहेत. आपापले नोकरी-व्यवसाय सांभाळून इतर अनेक सर्जनशील गोष्टी करत आहेत. आवड आणि passion म्हणून अनेक छंद जोपासत आहेत. हा group तयार झाल्यावर आम्ही अनेकदा भेटतो. एकमेकांच्या कार्यक्रमांना, उपक्रमांना आवर्जून जातो. Get togethers ना अनेक विषयांवर चर्चा होतात. मनसोक्त गप्पा रंगतात...
."
कमेंट मध्ये दिसत होतं कि ते लोकांना ते पीडीएफ व्हॉट्सपवर पाठवत होते. त्यामुळे हा बेकायदेशीर प्रकार नाहीये याची खात्री पटली आणि व्हॉट्सपवर एकत्र येऊन मग प्रत्यक्ष एकत्र येऊन तयार केलेला कदाचित पहिलाच दिवाळी अंक असलेल्या या अंकाबद्दल उत्सुकता आणखी वाढली.

नव्वदी अर्थात 90 चे दशक ही या अंकाची मुख्य संकल्पना आहे नव्वदच्या दशकात झालेले आर्थिक उदारीकरण, त्यानंतर भारतात आलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या, नवमध्यमवर्गाचाचा उदय, नवीन सुखसोयी इत्यादी अनेक गोष्टींमुळे या दशकात खूप मोठी स्थित्यंतरे घडली. या स्थित्यंतराचा वेध घेणारे लेख या अंकात आहेत.

अनुक्रमणिका.
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)



सामाजिक स्थित्यंतराची आठवण करून देणारे लेख आहेत; तसेच काही विशिष्ट पैलूंच्या आठवणी जागवणारे लेखही आहेत. उदाहरणार्थ
"नव्वदीतील लता" मध्ये या दशकात लता मंगेशकर यांनी गायलेली प्रमुख गाणी हा विषय आहे. "नव्वदीतील रशिया" मध्ये सोवियत युनियन कोसळल्यावर रशिया केलेल्या प्रवासाची माहिती आहे. त्यावेळी जे टीनेजर्स होते त्यांच्याबद्दलचा "९०’ज किड्स" लेख आहे.


नव्या पेटंट कायद्यामुळे औषधनिर्मिती व्यवसायामध्ये झालेल्या बदलाची "औषधांच्या पेटंटची कडू-गोड कहाणीआहे.
अहमदनगर, सातारा, सोलापूर या लहान शहरांमध्ये बदल कसा जाणवला, या शहरांतून पुण्या-मुंबईत आल्यावर काय फरक अनुभवायला मिळाला त्याबद्दल लेख आहेत.
इ.


या मूळ संकल्पनेव्यतिरिक्त लेख आहेत, ९०शिवायच्या जुन्या आठवणी आहेत. 
ऋषीकेश जोशी याच्या "संचित" या लेखात त्याने आपल्या कलागुरु - निभा जोशी -यांच्या आठवणी, त्यांची शिकवण्याची पद्धत, त्याचा आयुष्यभर पुरणारा प्रभाव याबद्दल कथन केले आहे. 
"सातासमुद्रा पलीकडून" लेखात सुनीला गोंधळेकर यांनी परदेशी विद्यार्थ्यांना मराठी शिकवतानाचे अनुभव शेअर केले आहेत.
"पुकारनारी बाई" मध्ये स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालिका किंवा निवेदिका म्हणून आलेल्या गमतीदार अनुभवांचे वर्णन केले आहे.
इ.
माधवी वैद्य यांच्या दोन कथा आहेत.



प्रत्येक वाचकाला ९०च्या दशकाचा अनुभव त्याच्या त्याच्या वयाप्रमाणे वेगळा आला असेल. या अंकातले लेख वाचताना आपले ते दिवस, आपल्या गावचे ते दिवस आठवून स्मृती रंजनाचा आनंद घेता येईल. त्यामुळे हा अंक वाचायला छानसा, हलकाफुलका आहे. दिसायला साधा तरी देखणा आहे. त्याहून विशेष म्हणजे मराठीमध्ये असा उपक्रम करणाऱ्या या चमूचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांच्या कामावर अभिप्राय देण्यासाठी हा दिवाळी अंक वाचा.

PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...