जेनेटिक्स कशाशी खातात ?(Genetics Kashashi Khatat ?)




पुस्तक : जेनेटिक्स कशाशी खातात (Genetics Kashashi Khatat)
लेखिका : डॉ. उज्ज्वला दळवी (Dr. Ujjwala Dalvi)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २२८
ISBN : 978-93-80092-51-5


"क्लोनिंग" हा शब्द ऐकला नाही असा वाचक विरळाच. "डॉली" नावाच्या मेंढीची "निर्मिती" शास्त्रज्ञांनी क्लोनिंगद्वारे केली. या घटनेने तेव्हा विज्ञानविश्वातच नव्हे तर सर्वसामान्यांतही खळबळ उडवून दिली होती. आता हळूहळू माणसाचं सुद्धा क्लोनिंग होईल अशी शक्यता तयार झाली. त्याच्या बऱ्यावाईट परिणामांची चर्चा व्हायला लागली. कल्पनेच्या अवाका वाढवत लोक म्हणू लागले, आता आपल्याला हवे तशीच माणसं तयार केली जातील. व्यक्तीला नकोसे बदल केले जातील. हे तंत्रज्ञान एखाद्या हुकूमशहाच्या हाती लागलं तर काय हाहाकार माजेल इ. या तंत्रज्ञानाबद्दल ज्याप्रमाणात माहिती बातम्या किंवा वैज्ञनिक-काल्पनिक कथांमधून मिळाली असेल त्याप्रमाणात खरी, मूलभूत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचली असेलच असं नाही. त्यामुळे क्लोनिंग, डीएनए याबद्दल कोणी वाढीव बोलत असेल तर "जेनेटिक्स कशाशी खातात" हे तरी याला माहिती आहे का असा प्रश्न दुसऱ्याच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच एखाद्या तज्ज्ञाकडून ही सगळी भानगड समजून घेणं आवश्यक आहे. पण मुळातच गहन, तांत्रिक असणारा विषय त्या तज्ञाने आणखीनच किचकट करून सांगितला तर ...

या "तर..." ला उत्तर म्हणजे डॉ. उज्ज्वला दळवी यांचं हे पुस्तक आहे. "जेनेटिक्स कशाशी खातात" हे समजावून देणारं अर्थात या जनुकशास्त्राची तोंडोळख करून देणारं हे पुस्तक आहे. पुस्तक मराठीत आहे हेच त्याचं वैषिष्ट्य नव्हे; तर विषयसुद्धा मराठमोळ्या अगदी घरगुती उदाहरणांतून समजावून सांगितला आहे. त्यातून विषयाची भीती जाते, गोडी लागते, उत्सुकता-जिज्ञासा वाढते.

लेखिकेची पुस्तकात दिलेली ओळख



अनुक्रमणिका:


प्रत्येक लेखात काय आहे ते थोडक्यात सांगतो.

विश्वामित्राचे वंशज : आधुनिक विज्ञानात ज्यांनी जनुकशास्त्राची सुरुवात केली, पायाभरणी केली अश्या शास्त्रज्ञांची थोडी ओळख

जीव नांदतो जेथे : पेशींची रचना, डीएनए, आरएनए इ. संकल्पना समजावून सांगितल्या आहेत. पुढच्या प्रकरणांसाठीची ही पूर्वतयारी. मी आधी म्हटल्या प्रमाणे घरगुती वापराच्या शब्दांतून कसं छान समजावून दिलं आहे बघा.




जीव नांदतो जेथे : पेशींची रचना, डीएनए, आरएनए इ. संकल्पना समजावून सांगितल्या आहेत. पुढच्या प्रकरणांसाठीची ही पूर्वतयारी. मी आधी म्हटल्या प्रमाणे घरगुती वापराच्या शब्दांतून कसं छान समजावून दिलं आहे बघा

"जीवनाचा धर्मग्रंथ" आणि "मात्रा, वेलांट्या, काने" - डीएनए, आरएनएच्या रचना सविस्तर समजावून दिल्या आहेत.

पेशींचं कूळ आणि मूळ - "स्टेमसेल्स" म्हणजे काय आणि गर्भात त्यापासून नाना प्रकारच्या विशेषपेशी कश्या बनतात.

इस्टेटीची वाटणी - पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत पुढच्या पिढीकडे जनुकांचं वाटप कसं होतं.

पेशींचा कारखाना - डीएनए मधल्या माहितीतून प्रथिनांची निर्मिती कशी होते

टेलरमेड जीन्स - जनुकामध्ये हवा तो बदल कसा केला जातो.




"आत्म"ज्ञान - अनुवंशिक आजाराला जनुके कशी कारणीभूत होतात

काली ते डॉली - क्लोनिंग ची प्रक्रिया

घोंगडीवाला बागुलबुवा - विषाणू (व्हायरस) हे एकपेशीय जीवाणू(बॅक्टेरिया) पेक्षा कसे वेगळे असतात, त्यांचा फैलाव कसा होतो.

वादाचं तेल वांग्यावर - बीटी कापूस, बीटी वांगं म्हणजे काय, त्यावर वाद का झाले? जनुकपरिवर्तित (जीएम) बियाण्यांचे फायदे-तोटे

जनुकठशांचा मागोवा - गुन्ह्याच्या तपासामध्ये जनुकशास्त्राची मोलाची भर. गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेल्या पुराव्यातून संशयिताचे डीएनए मिळवून गुन्ह्याची सिद्धता कशी करतात; दोन व्यक्तींमध्ये आई-मुलगा/वडील-मुलगा नातं आहे का ते कसं ठरवतात
रामबाण इलाज - व्यक्ती तितक्या प्रकृती; कारण प्रत्येकाची जनुके वेगळी. मग एकच औषध प्रत्येकाला कसं चालेल ? भविष्यात जनुकांच्या अनुसार औषधे कशी तयार केली जातील, दिली जातील.

एकाच आदिमायेची लेकरे - आफ्रिकेत मानवाची सुरूवात झाली आणि तो मानवीवंश कसा पसरला. या प्रसाराचे जनुकशास्त्रीय पुरावे.

च्यवन"पा"श - दीर्घायुष्यात जनुकांची भूमिका. जनुके व्यक्त होण्यावर, त्यांचे बऱ्यावाईट परिणाम दिसण्यावर आपल्या जीवनशैलीचा कसा प्रभाव पडतो.

कर्क-वृत्त - कर्करोग आणि जीन्स

जनुक-रंजन - जेनेटिक्सची खूप प्रगती झाली तर माणसाचं भविष्य, पृथ्वीचं भविष्य कसं असेल याबद्दल "जे न देखे रवि ते देखे कवी" या उक्तीनुसार कथा, कादंबऱ्या, सिनेमांमध्ये काय दिसतं

इति जनुकाख्यानम। - समारोप

"संदर्भसूची", "संदर्भग्रंथ" - संदर्भग्रंथ आणी वेबसाईट्सची यादी. मराठी वैचारिक पुस्तकांमध्ये अशी माहिती कमी दिसते. त्याबद्दल लेखिकेचे विशेष आभार.

शब्दावली - इंग्रजी पारिभाषिक/तांत्रिक शब्दांचे अर्थ सोप्या मराठीत समजावून दिले आहेत.

असं माहितीपूर्ण, रसप्रद रंजक पुस्तक सुजाण वाचक वाचतीलच, हे वेगळं सांगयला नकोच. 
हा विषय मराठीत मराठमोळ्यापद्धतीने आणून मराठी ज्ञानभाषा करण्यात मोलाची भर टाकल्याबद्दल आपण लेखिकेचे आभारी असलं पाहिजे.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi)

पुस्तक - गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi) लेखक - सुरेश देशपांडे (Suresh Deshpande) भाषा - मर...