पाचूचे बेट (Pachuche Bet)

 



पुस्तक - पाचूचे बेट (Pachuche Bet)
लेखक - हर्मन मेलव्हिल (Herman Melville)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तकाचे नाव - Typee (टैपी)
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English) 
अनुवाद - भानू शिरधनकर (Bhanu Shirdhankar)
पाने - १६८
ISBN - 978-89-353-17-1964





युरोपियन लोकांच्या धाडशी समुद्र सफरी ऐन भरात असण्याचा काळात इ.स. १८४१ मध्ये या पुस्तकाचा लेखक हर्मन दक्षिण अमेरिकेजवळच्या महासागरात एका समुद्र सफरीवर निघालेल्या जहाजात खलाशी होता. त्यांचे जहाज सतत सहा महिने समुद्रात फिरत होते. शेवटी एकदा त्यांना जमीन दिसली ती पॉलिनेशियन बेटांची. प्रवासाला कंटाळलेला हा खलाशी जहाजावरुन पळून जाऊन त्या बेटांवरच राहायचा बेत आखतो. बोटीवरचा अजून एक जण त्याच्या बरोबर साथ द्यायला तयार होतो. जहाजापासून दूर पळून जातात. बेटावर निसर्गाच्या सान्निध्यात फळं, कंद खात मस्त राहू अशी त्यांची कल्पना. पण कसलं काय. खडतर दिवस त्यांच्या समोर उभे राहतात. डोंगर दऱ्या ओलांडून, भुके तहानलेले राहून ते शेवटी पोचतात त्या बेटावरच्या नरभक्षक "टैपी" लोकांच्या प्रदेशात. आता आपले दिवस भरले अशी त्यांची कल्पना झाली. पण त्या आदिवासींनी त्यांना ठार मारलं नाहीच; उलट त्यांचं चांगलं स्वागत केलं, पाहुणचार केला. त्यांच्या दुखण्यावर उपचार केले. 

चार दिवस पाहुणचार घेऊन निघू असा विचार केल्यावर मात्र त्यांच्यापुढे नवंच आव्हान उभं राहिलं. ते आदिवासी त्यांना सोडायलाच तयार नव्हते. ते आदिवासी आपला प्रेमाने पाहुणचार करतायत का पुढेमागे बळी देणाऱ्याची तयारी अश्या द्विधा मनःस्थितीत दोघं तिथे राहिले. बरेच महिने राहिले. युरोपियन खलाशी आणि ख्रिश्चन धर्मोपदेशकांनीं जशी "टैपी" लोकांची प्रतिमा रंगवली होती तसे ते क्रूर नव्हते. या आदिवासिंची संस्कृती जवळून बघितली तेव्हा त्याला जाणवलं की युरोपियन लोकांपेक्षा हे लोक खूप मागास असले तरी निसर्गाशी एकरूप झालेले आहेत, त्यांचा त्यांचा दिनक्रम आनंदाने जगतायत. तथाकथित "प्रगत", "धार्मिक" जगापेक्षा त्यांची समाजव्यवस्था उलट कमी समस्यांची आहे. युरोपियन लोकांमुळेच उलट इथे रोगराई वाढते आहे असं त्याचं मत बनलं .

लेखकाला या बेटावरचं जग कसं दिसलं, टैपी लोकांचं खानपान, धार्मिक विधी, मनोरंजनाची साधनं, स्त्रीपुरुष समाजरचना
, प्राणिवैविध्य, झाडं-झुडपं असं त्याला जे जे काही दिसलं, जसं दिसलं त्याचं वर्णन त्याने या पुस्तकात केलं आहे. ललित स्वरूपात लिहिलेला एक रिपोर्टच. पुस्तकातली ही काही पानं वाचा म्हणजे कल्पना येईल 

या बेटांची आधी थोडी ओळख करून घेऊया
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)



बेटावरच्या डोंगर दऱ्यांत, जंगलात हिंडतानाचा हा भीषण साहसी अनुभव 



वनवासी लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तसा फारच कमी. पण अधूनमधून येणारी परदेशी जहाजं त्यांच्या सवयीची झाली होती. जहाज आलं की बेटावर मिळणाऱ्या गोष्टींच्या बदल्यात कापड, तंबाखू, बंदुका असं काहीबाही घ्यायला त्यांची लगबग सुरू होत असे. त्याची ही एक गंमत बघा. 



आदिवासींचा साधासुधा, शहरी लोकांना हेवा वाटायला लावणारा निवांत दिनक्रम बघा 


हर्मन ना त्या लोकांनी मारून खाल्लं नाही तरी त्यांच्या नरभक्षकतेची झलक मात्र त्यांना बघायला मिळाली. त्यातला एक थरारक अनुभव वाचा.



पुस्तक दीडशे पानी छोटंसं आहे. तिथल्या गमती जमती मजेशीर आहेत. लेखकाची शैली फार पाल्हाळ किंवा मीठमसाला ना लावता झरझर सांगणारी आहे. भाषांतर अगदी आदर्श वाटावं असं मराठमोळं आहे.  त्यामुळे पुस्तक अगदी चटचट वाचून संपेल.

हिरव्या कंच अश्या पाचूच्या बेटावरच्या आयुष्याची झलक वाचायला आवडेल. 



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०२० (Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2020)



दिवाळी अंक : इतिहासाच्या पाऊलखुणा २०२० (Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2020)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : 65
ISBN : दिलेला नाही.
पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


पीडीएफ फाईल स्वरूपात उपलब्ध असलेल्या या दिवाळी अंकाचं हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षीच्या या अंकाची संकल्पना स्पष्ट केली होती. ती या लिंकवर वाचू शकाल (http://learnmarathiwithkaushik.com/courses/itihasachya-paulkhuna-diwali-special-edition-2019/)

अनुक्रमणिकेवर नजर टाकल्यावर लेखांचे विषय सहज लक्षात येतीलच. तसंच पीडीएफ फाईल स्वरूपात असल्यामुळे अंक लगेच चाळून बघता येईल. त्यामुळे अगदी थोडक्यात लिहितो. 


पुण्याच्या प्रसिद्ध भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष श्री. मा. भावे यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या स्मृती जागवणारा लेख "श्रीकृष्णार्पणमस्तु"

मराठी भाषा ज्यात दिसते असे कोरीव लेणे किंवा शिलालेख किंवा ताम्रपट कुठला ? कर्नाटकातील श्रवणबेळगोळ इथला, अलिबाग जवळच्या आक्षीतला स्तंभ का आणि कुठला ? या प्रश्नाचा सचित्र ऊहापोह "मराठी कोरीव लेखांच्या पाहिलेपणाचा वाद" या लेखात केला आहे.  


जुने शिलालेख ब्राह्मी लिपीत लिहिलेले आढळतात असं आपण वाचलेलं असतं. पण त्या लिपीचं "ब्राह्मी" हे नाव खरं का धम्मलिपी ? "ब्राह्मी" हे नाव विशिष्ट समाजाने ठरवलं का ? मग इतर लिपी खरोष्टी इ. चा उल्लेख सुद्धा धम्मलिपी म्हणून होतो त्याचं काय ? या मुद्द्यांचा ऊहापोह करणारा लेख 

पुढच्या लेखात मराठा साम्राज्यातल्या पत्रव्यवहारांत खगोलीय घटना उदा ग्रहणे, उल्कावर्षाव आणि हवामानाच्या घटना - वादळे, अतिवृष्टी इ. चे उल्लेख आले आहेत. त्यांची उदाहरणे दिली आहेत  

शास्त्रज्ञांच्या पैजा हा गमतीशीर लेख आहे. मोठे मोठे शास्त्रज्ञ एकमेकांशी मोठ्या मोठ्या मुद्द्यांवर अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या गमतीशीर पैजा लावतात. अगदी १ डॉलरची पैज; हरल्याने मासिकाची वर्गणी भरायची इ. अशी गमतीशीर उदाहरणे या लेखात आली आहेत. 

मुंबईचं उपनगर असलेल्या ठाण्यावरही मुसलमानी राजवटी होती. त्यावेळी धर्मप्रसारासाठी आलेल्या ख्रिस्ती धर्मोपदेशकांना मृत्युदंड सुनावण्यात आला होता. त्या घटनेची माहिती देणारा एक लेख आहे. फ्रान्समध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेची - मुस्लिम माथेफिरूने केलेल्या हत्येची - ही तेव्हाची आवृत्ती आहे.

इतिहास संशोधनात आदराचे स्थान असलेले वि.का. राजवाडे यांचे संक्षिप्त चरित्र एका लेखात आहे. 

गिर्यारोहण, ट्रेकिंग याची आवड तरुण पिढीत वाढत आहे. हौशे, नवशे, गौशे आता डोंगरदऱ्यांत जाऊ लागल्यामुळे काही अपघातसुद्धा घडू लागले आहेत. त्याबद्दल शासनाने काही नियम बनवले आहेत का याबद्दलचा एक लेखच आहे. 

पुराण काळापासून भारतीय समाजात माणसाळवलेला, सैन्यात वापरला जाणारा प्राणी - हत्ती. त्याबद्दल प्राचीन पुस्तकांमध्ये काय उल्लेख आहेत याचा थोडक्यात वेध घेणारा एक लेख आहे . 

अकबर बादशहाच्या स्वभावातले परस्परविरोधी पैलू आणि काही त्याने केलेले राजहट्ट यावरचा लेख आहे. 

शेवटचे काही लेख इंग्रजीत आहेत. मुघल जनान्यातल्या राजवैभवात आणि तरीही एका अर्थी घुसमटीत ज्या स्त्रियांनी आपलं काही स्वतंत्र अस्तित्व दाखवायचा प्रयत्न केला त्यांचा थोडक्यात वेध घेणारा एक लेख आहे. 

अमेरिकेतल्या एका भीषण तुरुंगाची व्यवस्था कशी होती, कैद्यांचे हाल कसे केले जायचे, तुरुंगाचं व्यवस्थापन याबद्दल महती एका लेखात आहे. 

शेवटचा लेख रोचक आहे. इतिहासाचा आणि जो इतिहास आपण घडवतो आहोत त्याचा. फास्ट फूड चा इतिहास. मॅक डोनाल्ड या लोकप्रिय उपहारगृहा साखळीची सुरुवात कशी झाली ती कशी पसरली हा इतिहास सांगितला आहे. 


असे विविध विषय या दिवाळी अंकात समाविष्ट आहेत. इतिहासात खास रुची असणाऱ्यांना आवडेलच. त्यात खूप गती नसलेल्याना सुद्धा यातले बरेचसे लेख सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी वाचनीय आहेत. 

पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

लोक माझे सांगाती (Lok maze sangatee)

 



पुस्तक - लोक माझे सांगाती (Lok maze sangatee)
लेखक - शरद पवार  (Sharad Pawar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - 354
ISBN 978-81-7434-937-8

माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (आणि आजी सुद्धा ?? 😛) शरद पवार यांचं हे आत्मचरित्र आहे. हे पुस्तक 2015 साली प्रकाशित झाले आहे. त्यांच्या लहानपणापासून 2014-15 पर्यंतच्या घटना यात आहेत.


शरद पवार यांचे राजकीय जीवन मोठमोठ्या घडामोडींनी भरलेलं आहे तरुण वयात राजकारणात प्रवेश, युवक काँग्रेसची जबाबदारी, यशवंतराव चव्हाण यांना सोडून काँग्रेस पक्षातून बाहेर जाणं, पुन्हा काँग्रेस प्रवेश, मुख्यमंत्री पद, सोनिया गांधींना विरोध करून राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना, तरी युपीएत सामील होणं, कृषीमंत्री पद अश्या महत्त्वाच्या सर्व घडामोडींचा यात समावेश आहे. काही प्रसंगात पडद्यामागे काय घडलं हे सांगितलं आहे.  इंदिरा गांधींचे यशवंतरावांशी वाकडं;  स्वतः काँग्रेस पक्षाध्यक्ष राजीव गांधींनी पवारांविरुद्ध त्यांच्याच मंत्र्यांचा उठाव उठाव घडवून आणला; कोणीही कणखर नेता केंद्रात नको म्हणून दुबळ्या समजल्या गेलेल्या नरसिंह रावांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ कशी पडली इत्यादी कितीतरी प्रसंग आहेत. 

इंदिरा गांधींचे शरद पवारांना गर्भित धमकीवजा आमंत्रण बघा.

(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा )





राजकीय उतार-चढावांबरोबरच सतत काहीना काही आरोप आणि वाद हेसुद्धा पवारांच्या कारकीर्दीचा अविभाज्य भाग. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा वाद, एनरॉन प्रकरण, लवासा प्रकरण, गुन्हेगारी जगताशी संबंधांचा आरोप याचाही मागोवा पुस्तकात घेतला आहे.  पवारांनी बाजू स्वतःची बाजू थोडक्यात मांडली आहे उदा. एनरॉन प्रकरणात त्यांचा उद्देश विकासाचा होता. स्वस्त दरात वीज निर्मिती करण्याचा होता. परंतु राजकीय स्वार्थापोटी विरोधकांनी या कामात खीळ घातली. असं त्यांचं म्हणणं आहे. बाकीच्या प्रकरणातही केवळ विरोधासाठी विरोध झाला आणि आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत नाहीत असं त्यांचं प्रतिपादन आहे. मुद्रांक घोटाळा (तेलगीचा), शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जलसिंचन घोटाळा सहकारी बँका बुडणे अशा बऱ्याच प्रकरणांचा उल्लेख यात नाही. पण उल्लेख असता तरी साधारण काय सूर लागला असता याचा अंदाज आपल्याला येतो.

अफाट लोकसंग्रह हे पवारांचे वैशिष्ट्य. सर्व राजकीय पक्षातल्याच नव्हे तर कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक कार्य, उद्योगजगत अशा नाना क्षेत्रातल्या लहान-मोठ्या कर्तुत्ववान व्यक्तींशी व्यक्तींशी पवारांचे अगदी जवळचे संबंध आहेत.  पुस्तकांच्या ओघात अशी कितीतरी नावं येतात. पुस्तक वाचताना तर प्रत्येक वेळी आश्चर्याने तोंडात बोट जातं की "अरे हे तर पवारांचे मित्र आहेत; ही व्यक्ती पण! आणि ह्यांच्याशी सुद्धा घरोबा !!".  ह्या व्यक्तींशी त्यांची ओळख कशी झाली आणि संबंध कसे दृढ झाले झाले हे आपल्याला समजतं. पवारांवर इतके आरोप होत असतात पण कुठलंही प्रकरण धसास लावलं जात नाही. कोणीही त्याचा पाठपुरावा करून एकदाचं खरं खोटं करत नाही. आरोप होतात; त्याचा काहीतरी राजकीय लाभ मिळतो न मिळतो आणि ते प्रकरण मागे पडतं. कदाचित सगळीकडेच पवारांचे मित्र असल्यामुळे कोणाला त्यांच्याविषयी टोकाची कारवाई करावीशी वाटत नाही; हे त्यामागचं कारण नसेल ना; असा विचार पुस्तक वाचताना मनात येतो .

पवारांच्या या सर्वव्यापी संबंधांमुळे अडचणीच्या प्रसंगी संवादकाची भूमिका त्यांच्याकडे दिली जायची. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर अकाली दलाच्या नेत्यांशी बोलणी करण्याची जबाबदारी राजीव गांधींनी पवारांवर टाकली त्याबद्दल हे वाचा.





पवारांच्या यशामागे, त्यांच्या दबदब्या मागे त्यांची प्रचंड अभ्यासू वृत्ती आणि अपार मेहनत घ्यायची तयारी आहे हे वादातीत. राज्यात किंवा केंद्रात वेगवेगळी पदे भूषवताना त्या त्या विभागाचा खोलात जाऊन अभ्यास त्यांनी कसा केला याचीही काही उदाहरणं पुस्तकाच्या ओघात येतात. किल्लारी ला झालेल्या भूकंपानंतर त्यांनी ज्या तत्परतेने हालचाली केल्या प्रशासकीय कामांना दिशा दिली ते खरंच वाचण्यासारखं आहे आणि वाखाणण्यासारखं आहे. 12 मार्च 1993 ला मुंबई साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यावेळी मुख्यमंत्री पवारांनी केलेली कृती वाचून पहा.





कृषीमंत्रिपदी असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी काय निर्णय घेतले, संस्थात्मक पातळीवर बदल कसे केले गेले, वैज्ञानिकांना उत्तेजन देण्यासाठी प्रकल्प राबवले हे एका प्रकरणात सविस्तर सांगितलेलं आहे. ते वाचताना एक जाणवलं की आपण एखाद्या मंत्र्याच्या किंवा मुख्यमंत्र्याच्या किंवा पंतप्रधानांच्या कारकीर्दीचे मूल्यमापन किती वर वर करतो. आपल्याला बातम्यांमधून जे वाचायला मिळतं आणि ढोबळमानाने जे निकाल समोर येतात; उदाहरणार्थ - शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या/कमी झाल्या; शेतकऱ्यांची कर्जमाफी किती कोटी झाली वगैरे - त्यावर आपलं मत अवलंबून असतं. त्यापलीकडे जाऊन विषयाचा सखोल अभ्यास आपण सर्वसामान्य लोक करत नाही. कृषिमंत्री म्हणून पवारांचं  काम वाचताना जाणवतं की त्यांनी बरीच दीर्घ पल्ल्याची कामं सुरू केली आहेत. त्याचा परिणाम दिसायला कदाचित अजून काही वर्षे लागतील. त्यामुळे फक्त शरद पवारच नव्हे तर नरेंद्र मोदी असतील किंवा इतर कुठलेही पंतप्रधान किंवा मंत्री असोत; त्यांच्या कामाची शहानिशा करताना ढोबळ आकडेवारीपेक्षा असं खोलात जाऊन जाऊन विश्लेषण केलं नाही तर आपलं मत किती चुकीचं ठरू शकेल. नाही का! दुर्दैवाने राजकारणी वर्गालाही असे ढोबळ विचार करणारे, भावनिक विचार करणारे मतदारच हवे आहेत.

कृषी क्षेत्रातल्या या कामाबद्दलच्या लेखातली काही पाने





पवार आणि बारामती हे अतूट नातं आहे. बारामतीचा पवारांनी केलेला विकास बारामती पॅटर्न म्हणून देशात प्रसिद्ध झाला, चर्चेचा विषय झाला, आणि इतर भागातल्या लोकांच्या हेव्याचा (आणि दाव्यांचा) विषय राहिला आहे. लोकसहभाग, वैयक्तिक ओळखी यातून त्यांनी जलसंधारणाची कामे केली नवनवे उद्योग तिथे आणले. शैक्षणिक संस्थानं सुरू केली. त्याबद्दलही एका प्रकरणात सविस्तर लिहिलेले आहे. ते वाचताना सुद्धा जाणवतं की एखादा राजकारणी दीर्घदृष्टीने विचार करु लागला तर काही वर्षातच कसा कायापालट करू शकतो. पवारांनी आपल्या सत्तेच्या बळावर बारामतीसाठी काही लाभ कदाचित मिळवले असतील. पण इतर राजकारण्यांनी असा अधिकाराचा वापर करून आपल्या विभागाचा इतका प्रचंड कायापालट केला आहे? आपल्या भागातल्या लोकांना अडाणी, गरीब ठेवून; समस्या झुलवत ठेवून निवडून येण्यापेक्षा आपल्या लोकांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि त्यातून त्यांचा स्नेहभाव, बांधिलकी कायमस्वरूपी मिळवणं हा win-win situation चा बारामती पॅटर्न बरा वाटतो. 

बारामती काय काय उद्योग सुरू झालेत बघा.




वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, बिजू पटनायक, बाळासाहेब ठाकरे अश्या काही निवडक व्यक्तिंबद्दल थोडक्यात एक एक पान एक पान लिहिलं आहे विशेष म्हणजे त्यात पवारांच्या गाडीचे चालक गामा यांचाही समावेश आहे. इतकी वर्ष लामाने कशी प्रामाणिकपणे सेवा दिली आहे त्यांची कशी काळजी घेतो हे आवर्जून नमूद केलं आहे. माणसांची जाणीव अशी ठेवली जात असेल तर "लोक यांचे सांगाती होतात" याचं नवल वाटत नाही.      

हे आत्मचरित्र असलं तरी यात "आत्म" चा भाग अजून जास्त असायला हवा होता असं मला वाटतं. म्हणजे असं की; त्यांच्या आयुष्यात घडलेल्या या राजकीय घडामोडी या तर वर्षानुवर्ष वृत्तपत्रांत, नियतकालिकांत छापून आलेल्या आहेत. याबद्दल कोणीही चरित्रकार किंवा एखाद्या संशोधक पत्रकार लिहू शकला असता. स्वतः पवारांना लिहायची गरज नव्हती. या घडामोडींच्या वेळी पडद्यामागे काय घडलं, पवारांनी काय विचार केला, पवारांचे डावपेच कसे होते याबद्दल वाचणं जास्त औत्सुक्याचं आहे. काही उदाहरण वगळता तो भाग पुस्तकात हवा तितका येत नाही. कदाचित त्यावर एक स्वतंत्र पुस्तक त्यांनी लिहिलं पाहिजे (जर त्यांनी लिहिले असेल तर असेल तर कृपया वाचकांनी मला सांगा)

पुलोद सरकार आणि पवार मुख्यमंत्री होते त्या कालावधीत महाराष्ट्रात घडलेल्या घटना पुस्तकात येतात. पण त्यानंतरच्या त्यानंतरच्या घटना उदाहरणार्थ सेना-भाजपा युतीचे सरकार, राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रातील वाटचाल, पुढची दहा वर्षे आघाडी सरकार याबद्दल पुस्तकात काही नाही. गंमत म्हणजे पवारांच्या राजकीय जीवनातल्या नाट्यमय घडामोडी अजून संपलेल्या नाहीत. मागच्या वर्षी शिवसेनेला भाजपापासून फोडून सरकार बनवलं त्यावेळी काय काय घडलं असेल ते खरंच एकदा वाचायला मिळाले पाहिजे. नवीन पुस्तकाचा पुढचा भाग आणि पवारनीती वरचं पुस्तक वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे. तो पर्यंत हे पॉवरफुल पुस्तक वाचाच.




———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-


“दृष्टी श्रुती” दिवाळी अंक २०२० Drushti Shruti Diwali Special Edition 2020




दिवाळी अंक – दृष्टी श्रुती (२०२०) Drushti Shruti Diwali Special Edition 2020
भाषा – मराठी (Marathi)
पाने – ३५३
ISBN – दिलेला नाही.
PDF स्वरूपात उपलब्ध. डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


दृष्टी-श्रुती या पीडीएफ स्वरुपातल्या दिवाळी अंकाची सुरुवात मागच्या वर्षी झाली. त्यावेळी अंकात ह्या उपक्रमाची संकल्पना स्पष्ट केली होती. त्याबद्दल पुढील लिंकवर थोडं वाचा म्हणजे या उपक्रमाचं वेगळेपण लक्षात येईल. (http://learnmarathiwithkaushik.com/courses/drushti-shruti-diwali-special-edition-2019

ह्या वर्षीचा दिवाळी अंक "तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी कलाकृती" या संकल्पनेवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या, तिथे आपली छाप सोडणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्यावर प्रभाव टाकणारे पुस्तक, नाटक, चित्रपट यांच्याबद्दल लिहिलं आहे. हलकेफुलके चित्रपट, गंभीर नाटक, उपनिषद, कादंबऱ्या, स्वमदत पुस्तकं असे विविध विषय असल्यामुळे प्रत्येक लेख वेगळा आहे. 

अनुक्रमणिका :



एकाअर्थी हा या कलाकृतींच्या रसग्रहणात्मक लेखांचा संग्रह आहे. पण तेवढ्यापुरते लेख मर्यादित नाहीत. कुणाला कलाकाराबद्दल अजून लिहावंसं वाटलंय, कुणाला ज्या परिस्थितीत ते पुस्तक वाचलं गेलं त्याचा प्रभाव लिहावासा वाटलाय, कोणी त्यावेळी घडलेले गमतीदार किस्से सांगितलेत तर कोणी त्या जुन्या काळात पुन्हा गुंगून गेलंय.

या वाचनातून व्यक्तीला काय दिलं, काय परिणाम साधला हे सुद्धा कळतं. "मी का वाचतो किंवा मी का कलाकृती बघतो, ऐकतो" याचं उत्तर प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळं येईल. अशीच वेगवेगळी उत्तरं आपल्याला या लेखांमध्ये दिसतील. त्यातली काही आपल्याशी जुळतील काही नवी कळतील.

दिलीप प्रभावळकर यांनी "चौकट राजा", "हसावा फसवी" इ. मधले अनुभव सांगितले आहेत . तर करुणेचा कोशंट लेखात मंदार कुलकर्णी "चौकट राजा" त्यांच्या मनाला  कसा भिडला हे सांगतात. प्रभावळकरांच्या लेखातली दोन पानं.



गणेश मतकरींच्या लेखानुसार तर "दिलवाले दुल्हनिया .." बघून त्याबद्दल लिहावंसं वाटलं; यातून चित्रपट समीक्षा लेखनाच्या कारकिर्दीचे बीज रोवले गेले आणि मुराकामी यांचा कथासंग्रह वाचनातून कथा लेखनाची सुरुवात झाली. 

गंभीर चित्रपटांपेक्षा विनोदी चित्रपट जरा हलक्या दर्जाचे असा दृष्टिकोन काही जणांचा असू शकतो. पण परिस्थितीनुसार कलाकृती बघण्याचा हा भाव सुद्धा बदलू शकतो. कोरोनाकाळातला हा अनुभव सांगितलाय मृणाल कुलकर्णी यांनी 




गद्धेपंचविशी, चौघीजणी, रारंगढांग, अल्केमिस्ट इ. प्रसिद्ध पुस्तकलांवर लेख आहेत.
लेखामधलं पुस्तक, नाटक आपल्याला पण भावलं असेल तर , "अरे व्वा, मी पण हेच म्हणालो होतो" असं मनात म्हणालो. तर बरीच नवीन नावं कळली वाचायला.

"जिंदगी ना मिलेगी दोबारा" चित्रपटातून मृदुला बेळे यांना "खऱ्या जगण्याचा मूलमंत्र" सापडला तो असा 



मासिकातल्या सगळ्या व्यक्ती मुळातल्याच संवेदनशील, भावनेचा ओलावा असणाऱ्या आहेत. त्यामुळे एक दोन वैज्ञानिक पुस्तकांचे उल्लेख सोडले तर भावांनाना साद घालणाऱ्या, दुसऱ्याला अजून चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला शिकवणाऱ्या कलाकृतीच सगळ्यांना आवडल्या आहेत. त्यामुळे त्यातून मिळालेली शिकवण, वाढलेली प्रगल्भता हा मुद्द्यांचा लसावि आहे. त्यामुळे थोडा तोचतोचपणा लेखांमध्ये येतो.

थेट कलाकृतींवर नाहीत पण शिकवून जाणाऱ्या आयुष्यातला अनुभवावरचे
 काही लेख आहेत. 
उदा.नंदुरबार मधल्या आदीवासी, गरीब वस्त्यांमधलं जगणं याबद्दल आदिती जोगळेकरचा लेख आहे. 
मित्राला झालेल्या अपघाताबद्दल हृषीकेश जोशी यांनी लिहिलं आहे.

"लिंडाऊ नोबेल सभा" या भन्नाट परिषदेची माहिती एका लेखात झाली. दर वर्षी जर्मनीतल्या लिंडाऊ मध्ये ३०-४० नोबेल पुरस्कार विजेते नवोदित वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांना भेटतात. त्या परिषदेला डॉ. दीप्ती सिधये उपस्थित होत्या. तो अनुभव त्यांनी सांगितला आहे.




रसिकांनी रसिकांसाठी तयार केलेला हा दिवाळी अंक आहे.. दिसायला साधा तरी देखणा आहे. त्याहून विशेष म्हणजे मराठीमध्ये असा उपक्रम करणाऱ्या या चमूचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांच्या कामावर अभिप्राय देण्यासाठी हा दिवाळी अंक वाचा.

PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

पैसा (Paisa)






पुस्तक : पैसा  (Paisa)
लेखक : अतुल कहाते (Atul Kahate)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३६९
ISBN : ९७८-९३-८६११८-२४-०

पैसा, चलन, नाणी, नोटा, बँक इ. चा इतिहास सांगणारं हे पुस्तक आहे. अनुक्रमणिकेवर नजर टाकली की मुद्दे लक्षात येतील.




मानवी इतिहासात अगदी सुरुवातीला वस्तूंची देवाण घेवाण होत असे. मग तांबे, सोने, चांदी इ. धातूंचे तुकडे वापरायला लागले. पुढे त्याचा आकार, वजन निश्चित असतील अशी नाणी तयार झाली.

रोमन साम्राज्यात सोने वापरलं जायचं, सोनं मिळवण्यासाठी स्वाऱ्या आणि दुसऱ्या देशांची लुटालूट केली जायची, सोन्याच्या खाणी असलेल्या प्रदेशांवर ताबा मिळवायचा आणि तिथल्या लोकांना गुलाम करून खाणीत काम करायला लावून पिळवणूक केली जायची. त्याचा सविस्तर इतिहास मांडला आहे.
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)












नाणी वितळवून धातू मिळवायचा प्रयत्न व्हायचा. किंवा नाणी खरवडून थोड्या थोड्या सोन्या, चांदीची चोरी व्ह्यायची. त्यातून नाणी रद्द करावी लागायची. तसंच नाणी तयार केली म्हणजे सगळीकडे तीच वापरली जायची असं नाही. देश बदलला, राजा बदलला इतकंच काय देशाची आर्थिक परिस्थिती बदलली की जुनी नाणी रद्द करायची आणि नवीन जाहीर केली जायची. मग सावळा गोंधळ व्हायचा. त्याचाही इतिहास, किस्से सांगितले आहेत.





मग पुढे पैसे जमवणे, कर्ज देणे इ गोष्टींसाठी बँकेची सुरुवात झाली. भारतात ब्रिटिश काळात बँकांची सुरुवात झाली आहे. तो सुरुवातीचा काळ मांडला आहे.









पुढे आधुनिक काळात युरोप मध्ये अनेक देशांचं एक चलन असा प्रयोग झाला. अर्थात युरो हे चलन. स्थानिक चलनांशी विनिमयाचा दार ठरवणे, त्याचे फायदे-तोटे, गरीब-श्रीमंत देशांमधला फरक यामुळे हा बदल फारच कठीण होता. त्याची ही झलक.








असे वेगवेगळ्या पैलुंवरचे लेख आहेत. पण पुस्तकाची शैली मला आवडली नाही. एकापाठोपाठ एक प्रसंग दिले आहेत. अनेक व्यक्तींची नावं, ठिकाणं, सनावळ्या येतात. पण हे सगळं लक्षात राहणं कठीण आहे. शाळेच्या अभ्यासाच्या पुस्तकाप्रमाणे आपण काही पाठांतर करणार नाही. मग पुस्तक वाचण्याचं फलित काय ?
तर आपल्याला त्या घटनांमागचं सूत्र समजणं पुरेसं आहे. पण ह्या माहितीच्या गलबल्यातून असे ज्ञानाचे कण फारच थोडे लागतात. 

बऱ्याच वेळा या काळातून त्या काळात, या प्रदेशातून त्या प्रदेशात अश्या उड्या मारल्या आहेत. त्यामुळे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभं राहत नाही. म्हणजे इ.स. पूर्व १००० वर्षे युरोपात ही पद्धत होती, भारतात ही पद्धत तर चीन-जपान मध्ये हा प्रकार असं मांडायला हवं होतं. म्हणजे तौलनिक चित्र समजलं असतं. किंवा एकाच एक प्रदेश घेऊन त्याची पूर्वीपासून आजपर्यंत अशी प्रगती मांडायला हवी होती. पण तसं न झाल्यामुळे पुस्तक कंटाळवाणं झालं. विकिपीडिया वरच्या पेजेसचं मराठी भाषांतर वाचतोय असं वाटलं. एक पुस्तक म्हणून त्याची गुंफण अजून प्रभावशाली करता आली असती.

बिटकॉइन, भारतातील नोटबंदी याबद्दल लेख आहेत. पण केवळ पुस्तकाला पूर्णता यावी यादृष्टीने मुद्द्यांचा समावेश या पलीकडे त्या लेखांमध्ये सखोलता नाही.

आणखी एक महत्त्चाचा आक्षेप म्हणजे भारताकडे झालेलं दुर्लक्ष. "सोने कि चिडिया" असणारा आपला देश, देशोदेशी व्यापार चालणार देश, चाणक्याच्या अर्थशास्त्रासाठी प्रसिद्ध असलेला देश, शेकडो राजवटी असणारा देश. मग ब्रिटिश काळात झालेल्या बँकांच्या सुरुवाती आधी भारतात काय होतं ? लेखक भारतीय असूनही त्याला हे सविस्तर लिहावंसं वाटलं नाही ? अतुल कहातेंच्या "’च’ची भाषा" पुस्तकाच्या वेळीसुद्धा मी हाच आक्षेप नोंदवलेला होता. 
चीन चा उल्लेखही थोडा थोडाच येतो. त्यामुळे हे पुस्तक युरोप-अमेरिकेतल्या चलनाच्या इतिहासावर युरोपियनांनी लिहिलेल्या लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर वाटतं.

जरा अपेक्षाभंगच झाला. 


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...