आत्म्याचे नाव अविनाश (Aatmyache Nav Avinash)


.




पुस्तक : आत्म्याचे नाव अविनाश (Aatmyache Nav Avinash)
लेखिका : डॉ. चित्रलेखा पुरंदरे (Dr. Chitralekha Purandare)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २५४
ISBN : 978-93-89624-11-3
प्रकाश : विश्वकर्मा प्रकाशन

अविनाश धर्माधिकारी हे नाव महाराष्ट्राला परिचित आहे. धर्माधिकारी हे आयएएस अधिकारी होते. सरकारी सेवेत दहा वर्षे पूर्ण झाल्यावर स्वतःहून राजीनामा देऊन ते बाहेर पडले. स्वतःला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात पूर्णवेळ झोकून दिलं. "चाणक्य मंडल परिवार" या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ते स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. वेगवेगळ्या विषयांवरची त्यांची व्याख्याने, चर्चा-परिसंवाद यातला सहभाग यांमध्ये त्या त्या विषयावरचे अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकण्यासारखे असते. अश्या धर्माधिकारी सरांच्या जडणघडणीचा आणि त्यांच्या कामाचा मागोवा घेणार हे पुस्तक आहे. सरांच्या लहानपणापासून च्या आठवणी यात आहेत. 


लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती


बाल अविनाशचं शाळा कॉलेजमध्ये असताना अतिशय खोडकर, व्रात्य होते. आयुष्यभर गुंडगिरीच करेल की काय असं वाटायला लागेल असं त्यांचं वागणं होतं. पण दुसरीकडे वक्तृत्व, क्रीडा, अभ्यास या क्षेत्रातही चांगलं यश संपादन करत होते. पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या माध्यमातून तरुण वयात सामाजिक काम, मुक्त पत्रकारिता आणि त्यावेळी अशांत असलेल्या पंजाब, आसाम अशा भारताच्या विविध भागात अभ्यास दौरे त्यांनी केले. नोकरी सोडल्यावर सक्रीय राजकारणात घेण्याचाही प्रयत्न केला. पुढे "चाणक्य .." ची स्थापना झाली.  अशा टप्प्यांची माहिती  लेखिकेने दिली आहे.  

लहानपणीचा अविनाश बघा कसा होता.

त्या त्या वेळी अविनाश सरांबरोबर काम केलेल्या त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना च्या  आठवणी पुस्तकात आहेत. आप्तजनांच्या आठवणी आहेत. थोडं लेखिकेचं निवेदन आणि थोड्या इतरांच्या आठवणी असं जोडीजोडीने चालत पुस्तकाचा प्रवास होतो.

उदा. सरांच्या पत्नी पूर्णाताईंनी त्यांची ओळख, पुढे प्रेमविवाह आणि संसारातले चढउतार, नवऱ्याच्या वागण्यातला कडूगोड गोष्टी याबद्दल मनमोकळेपणे बोलल्या आहेत. त्याला काही अंश 


"चाणक्य मंडल" हा फक्त शिकवणीवर्ग / क्लास नाही. तर अधिकारी "कसं व्हावं" आणि "कसं अधिकारी" व्हावं हे दोन्ही शिकवणारी, संस्कार करणारी शिक्षणसंस्था आहे.  तिची ही एक झलक

आता अधिकारी म्हणून काम करणारे; चाणक्य मंडल परिवारात मार्गदर्शन लाभलेले असे माजी विद्यार्थी पुस्तकात आपलं मनोगत व्यक्त करतात. सरांशी कसे ऋणानुबंध आहेत; सरांच्या मार्गदर्शनाचा व व्यक्तिमत्त्वाचा आयुष्यावर कसा खोलवर परिणाम झाला आहे हृद्य प्रसंग ते सांगतात.



पुस्तक चरित्रात्मक असलं तरी सलग कथानक स्वरूपात नाहीये.  प्रत्येक प्रकरणात आयुष्याचा पुढचा टप्पा येतो आणि त्यावेळी घेतलेल्या माणसांच्या आठवणीतून त्या दिवसापासून आज पर्यंत आजपर्यंतच्या अनेक आठवणी आणि प्रसंग नजरेसमोर येतात. त्यामुळे एक घटन, त्यातून fast forward 
आणि पुढच्या प्रकरणात पुन्हा मागे असा पुस्तकाची रचना आहे. 

या प्रकारामुळे पुस्तकात तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा येतात पण त्या मुद्द्यांच्या खोलात पुस्तक जात नाही. उदाहरणार्थ अविनाश सरांनी राजकारणात प्रवेश करायचा प्रयत्न केला. निवडणुका लढवल्या पण ते हरले. हा मुद्दा अनेकांच्या मनोगतात येतो पण त्या मुद्द्याच्या खोलात पुस्तक शिरत नाही. म्हणजे निवडणुका कधी लढवल्या; त्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते; त्यांना किती मते मिळाली; ते का हरले; कारणमीमांसा स्वतः कशी केली; त्यातून काय धडा शिकले इ. काहीच माहिती नाही. 
तरुण वयात त्यांनी पंजाब आणि आसाम इत्यादी भागांचे दौरे केले आणि लोकांच्या भेटीगाठी घेतल्या हा संदर्भ पुन्हा पुन्हा येतो. पण त्या दौर्‍याचे फलित काय ? त्यातून त्यांना काही उपाय सुचले का? उपायांच्या अंमलबजावणीवर त्यांनी काही काम केलं का? हे काहीच समजत नाही.
आय ए एस अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी होती. परंतु त्यांची कामगिरी पुस्तकात तितक्या भक्कमपणे येत नाही. उदा. निवडणूक ओळखपत्रे देण्याची मोहीम कशी धडाडीने राबवली होती हे एका व्याख्यानात (युट्युब वर व्हिडीओ आहे) अविनाश सरांनी सविस्तर सांगितलं आहे. त्यातून त्यांचा वेगळेपणा, निष्ठा, कामावरची पकड दिसते. पुस्तकात हे उदाहरण येतं पण तपशील दिलेला नाही. कुठल्याही एखाद्या कार्यक्षम अधिकाऱ्याने काम केलं असतं असं वाटायला लावणारं निवेदन आहे. कामाची "अविनाशी" मुद्रा दिसत नाही. 

"चाणक्य"चा विस्तार हा भागही कमीच आहे.

पुस्तक वाचताना सतत असं वाटत राहतं की एका मोठ्या कर्तृत्ववान व्यक्ती बद्दल आपण वाचतो आहोत; त्याच्यातली कर्तृत्वाची खूण आपल्याला दिसते आहे पण त्याचा नक्की अदमास लागत नाहीये. हे पुस्तक वाचल्यावर "तरीही उरे काही उणे" असं वाटून आपल्याला पडणाऱ्या "तू पूर्तता होशील का ?" या प्रश्नाचं उत्तर कुठलं पुस्तक देतंय बघूया !

 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...