I am no messiah (आय अॅम नो मसीहा)



पुस्तक - I am no messiah (आय अॅम नो मसीहा)
लेखक - Sonu Sood with Meena K. Iyer (सोनू सूद व मीना के. अय्यर)
भाषा - English इंग्रजी
पाने - २१५
प्रकाशक - पेंग्विन
ISBN - 978-0-143-45198-3

मार्च २०२१  कोरोनामुळे टाळेबंदी सुरु झाली. उद्योगधंदे आणि कित्येक व्यवसाय बंद पडले. या उद्योगांमध्ये काम करणारे लोक झाले. हातातला पैसा संपतोय, राहण्याचे-जेवण्याचे वांदे आणि बाहेर पडायला बंदी अश्या दुहेरी कचाट्यात सापडला. त्यामुळे. टाळेबंदीचे नियम शिथिल झाल्यावर वाटेने, जमेल त्या मार्गाने हे स्थलांतरित मजूर आपल्या मूळ गावी परतायला धडपडू लागले. प्रवासावरच्या निर्बंधांमुळे हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करायला बाहेर पडले. आपल्या कुटंबकबिल्यासकट उन्हातान्हात, अर्धपोटी अवस्थेत रस्तयावरून चालणाऱ्यांचे तांडेच्या तांडे दिसू लागले. सहृदय लोकांनी त्यांना जमेल तितकी खाण्याची, पाण्याची वगैरे सोय करून या जखमेवर फुंकर घालायचा प्रयत्न केला. पण मूळ समस्या - प्रवासाची साधनं - नाहीत ह्यावर मात्र तोड काढणं कठीण जात होतं. अश्यावेळी एक मसीहा भारतापुढे आला - सोनू सूदच्या रूपानं. त्याने या स्थलांतरितांच्या प्रवासाची सोय स्वतःच्या खर्चाने आणि स्वतःच यशस्वी सिनेतारा म्हणून असलेली पत-प्रसिद्धी वापरून करायचं ठरवलं. आणि सुरु झालं "घर भेजो" अभियान. यात त्याला त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ दिली, अनेक मदतीचे हात पुढे आले. हजारो लोक बस, रेल्वेगाडी आणि काही तर चक्क विमानाने आपल्या घरी पोचले. तर अश्या सोनू सूदने या अभियानाची, त्या आधीच्या त्याच्या आयुष्याची आणि गेल्या वर्षी केलेल्या इतर सामाजिक कामाची गोष्ट या पुस्तकात सांगितली आहे. 

अनुक्रमणिका



सिनेतारा म्हणजे झगमगाटात राहायचं. लोकांना कोरडे उपदेश करायचे असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण सोनूच्या जीवनात असा एक क्षण आला की त्याला हस्तिदंती मनोरा नकोसा वाटू लागला. आणि या दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी खाली उतारावंसं वाटलं तो क्षण. अभियानाचं बीज कसं रोवलं तो दिवस सोनू ने असा मांडला आहे.

 

तो क्षण जरी सोनूला कार्यप्रवृत्त करायला पुरेसा ठरला तरी त्यामागे त्याची वृत्ती, आईवडिलांनी केलेले संस्कार, त्याचं स्वतःची अभिनयक्षेत्रात धडपड केल्यामुळे संघर्षाची जाणीव हे सगळं होतं. पुस्तकात पुशे सोनुने त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्याचा आढावा, ठळक प्रसंग आणि "स्ट्रगल" सांगितला आहे. एका सध्या पंजाबी मध्यमवर्गीय घरातला मुलगा ते दाक्षिणात्य सिनेसृष्टीतीला लोकप्रिय खलनायक आणि मग हिंदीतला नायक असा त्याचा प्रवास वाचनीय आहे. त्याच्या उमेदवारीच्या काळातले हे प्रसंग 





मग "घर भेजो" मधले काही विशेष प्रसंग सांगितले आहेत. उदा. केरळ मधून उडिसात विमानाने पाठवलेले प्रवासी. फिलिपाइन्स, रशिया आणि छोट्या छोट्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी दूतावास, विमान कंपन्या आणि सरकारी खाती यांच्याशी समन्वय साधून हजारो लोकांना परत आणले इ. 

संवेदनशील मनाला दुसऱ्याचं दुःख दिसतं. ते गप्प राहू शकत नाही. त्यामुळे लोकांना घरी पाठवताना त्याला जाणवलं की या गरीबांना फक्त प्रवासाचीच अडचण नाहीवैद्यकीय उपचारांसाठी पुरेसा पैसा नाही. शिक्षणासाठी पुरेसा पैसा नाही. त्यातून "इलाज इंडिया" उपक्रम सुरु झाला. देशभरातले डॉक्टर आणि गरजू व्यक्तीना मोबाईलच्या माध्यमातून एकत्र आणणं, कमी खर्चात औषधोपचाराची सोया करणं सुरु झालं. 

शिक्षणासाठी सोनुने त्याच्या आईच्या नावाने शिष्यवृत्ती सुरु केली. एकदा, सोनूला कळलं की एक गावात मुलांना झाडावर चढून शाळेत हजेरी लावावी लागत होती. कारण शाळा ऑनलाईन आणि गावात नेटवर्क नाही. यायचं ते उंच झाडांच्या शेंड्यांवर. असं ट्विट बघून व्यथित झालेल्या सोनूने त्यात लक्ष घालून मोबाईल टॉवरची सोय केली. असे कितीतरी मदतीचे वेगवेगळे प्रसंग पुस्तकात आहेत. 


गरिबीची चं मूळ कारण रोजगाराची हमी नाही हे आहे. त्या मुळावर घाव घालण्यासाठी त्याने "प्रवासी रोजगार" नावाच्या मोबईल सेवेची सुरुवात केली. कुशल-अकुशल कामगार यातून जॉब शोधू शकतील तर उद्योग नोकऱ्यांच्या जाहिराती देतील. काही लोकांना ट्रेनिंग देता येईल. असं त्याचं स्वरूप आहे. त्याची सुरुवात कशी झाली हे पुस्तकात दिलं आहे. 





समाजसेवेमुळे सहकलाकारांचा आदरभाव कसा वाढला, जणू भक्तिभावच निर्माण झाला याचे किस्से सांगितले आहेत. आता त्याला "खलनायक" म्हणून पडद्यावर लोक स्वीकारणार नाहीत असं दिग्दर्शकाचं मत बनतंय. सोनूच्या मागे राजकरणी आहेत का ? तो राजकारणात येणार का या मुद्द्याचा सुद्धा थोडक्यात निपटारा केला आहे.


पुस्तकात शेवटी त्याच्या महत्त्वाच्या सहकाऱ्यांची एकेक परिच्छेदात ओळख करून दिली आहे,

पुस्तकाची भाषा सहज सोपी आहे. सहलेखिकेने जागोजागी थोरामोठ्यांची अवतरणं दिली आहेत. त्यामुळे पुस्तक अश्या सु-वचनांचा संग्रहच झाला आहे. 

ह्या सगळ्या कामातून सोनूला मिळणारं आत्मिक समाधान आणि त्यातून पुढे जायला मिळणारी ऊर्जा हा मुद्दा पुन्हा पुन्हा येतो. सुरुवातीच्या एक दोन प्रकरणातून सोनूच्या महान कामाशी आपली ओळख होते आणि त्याबद्दल आपल्या मनातही आदरभाव जागृत होतोच. त्यामुळे हा मुद्द्याची पुनरावृत्ती टाळायला हवी होती. त्याऐवजी "घर भेजो" ची व्यवस्था करताना प्रत्यक्ष काय घडलं हे सविस्तर सांगायला हवं होतं. उदा. सगळीकडे बंदी असताना त्याने लोकांसाठी विमान प्रवास उपलब्ध केला. त्यासाठी कोणाकोणाशी बोलावं लागलं; स्वतःचं वजन/पैसे कसे खर्ची घालावे लागले; कोणी साथ दिली कोणी नाही हे सांगायला हवं होतं. नाहीतर असं वाटतं की "सोनू बोले दळ हाले" असं ते सोपं होतं. ते तसं नव्हतं ह्याची जाणनेव आपल्याला आहेच. पण म्हणूनच ती प्रक्रिया समजून घेता यायला हवी होती.  

एकूणच हे पुस्तक खूप छान आहे. माहितीपूर्ण आहे. आपल्या डोळ्यासमोर एक माणूस इतकं मोठं काम करतो आहे. ते वाचलंच पाहिजे,. सोनूचं काम आजही चालूच आहे. अजून वर्षभरात पुस्तकाचा पुढचा भाग येईल अशी अपेक्षा. हे कोरोनासंकट लवकर टळावं आणि सोनू सिनेमात व लोक आपापल्या कामात हे आनंदाचे दिवस परत यावेत ही प्रार्थना. 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-





No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...