सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास (Sapiens - Manavjaaticha anokha itihas)





पुस्तक : सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास (Sapiens - Manavjaaticha anokha itihas)
लेखक - युव्हाल नोआ हरारी (Yuval Noah Harari)
अनुवाद - वासंती फडके (Vasanti Phadke) 
भाषा - मराठी
पाने ४४५
मूळ पुस्तक - Sapiens - a brief history of mankind
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
ISBN - 978-93-86401-37-3

लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून वेगवेगळे जीव तयार झाले. माकडातून माणूस तयार झाला. आणि इतर प्राण्यांपेक्षा काहीतरी वेगळं घडलं आणि माणसाला स्वतंत्र विचार क्षमता मिळाली. आपलं आजूबाजूचं जग कसं काम करतं याचं कुतूहल निर्माण झालं. अनुभवातून, निरीक्षणांतून माणूस शिकत गेला. भाषा, लेखन यांच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान जात राहिलं त्यामुळे ज्ञानात सतत भर पडत राहिली. इतर प्राण्यांसारखे नर-मादी; आपली आपली टोळी अशी साधी सामाजिक रचना राहिली तर गावं, शहरं, समाज, धर्म, देश, वर्ग, विचारधारा अश्या नाना प्रकारे मोठं मोठे गट माणसांना एकत्र आणत गेले. यंत्राच्या विकासातून माणसाची जगण्याची शैलीच बदलून गेली. फक्त माणूसच नाहीतर त्याने आपल्या आजूबाजूचा निसर्ग सुद्धा बदलला. एका वनरापासून आजच्या माणसापर्यंतचा काही हजारो वर्षांतला प्रवास चालू आहे. या प्रवासाचा पुढचा टप्पा काय असेल; येणारी काही हजारो वर्षे कशी असतील; या पृथ्वी ग्रहाचे भविष्य कसे असेल ? खरंच, ह्या इतिहासात डोकावून बघणं रोमांचकारी आहे आणि त्यातून येणाऱ्या काळाची कल्पना कारणंही तितकंच रोमांचकारी. अश्या ह्या मानवी इतिहासाच्या भूत-भविष्य-वर्तमानाचा वेध घेणारे, त्याचा अन्वयार्थ लावणारे, त्याकडे खुल्या बुद्धीने विचार करायला लावणारे हे पुस्तक आहे.


पुस्तकाचे चार विभाग आहेत. आणि माणसाच्या प्रगतीच्या टप्प्याप्रमाणे ते गुंफलेले आहेत. अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया.





आता ह्या पुस्तकात त्या त्या कालखन्डातले महत्त्वाचे बदल मांडलेले आहेत. पण शालेय इतिहासाच्या पुस्तकाप्रमाणे सनावळ्या किंवा नावांची जंत्री असा प्रकार नाही. तर तो टप्पा माणसाच्या आयुष्यावर कसा परिणाम करून गेला; त्याचे बरे-वाईट परिणाम आज पर्यंत आपल्याला कसे दिसतायत हे अगदी सोप्या आणि रंजक शैलीत समजावून सांगितलं आहे. आपलालाही खुल्या दिलाने विचार करायला भाग पाडलं आहे.


उदा. सुरुवातीला माणूस भटक्या शिकारी होता. मग तो शेती करू लागला. भटक्या असताना त्याला अन्नासाठी वणवण करायला लागे तर शेतीमुळे अन्न मिळण्याची शक्यता वाढली. ही सुधारणा म्हणायची. तर दुसरीकडे भटक्या शिकारी मानून नानाविध कंद, फळे, प्राणी खात असे. अन्नातल्या पोषणमूल्यांची विविधता होती, शेतीमध्ये ठराविक अन्नधान्यच खाल्ली जाऊ लागली. पोषण कमी झालं. पूर्वी माणूस अर्धा वेळ भटकत असेल तर अर्धा वेळ निवांत काढत असेल. शेतीमध्ये मात्र दिवसभर काम करू लागला. एकाच जागी, छोट्या घरांत राहू लागला. तर पूर्वी टोळीमध्ये आजारी अपंग व्यक्तीला सहज मागे सोडून दिलं जायचं, प्रसंगी ठार मारलं जायचं. शेतीसमाजात लोक एका जागी राहत असल्यामुळे हा प्रकार कमी झाला असेल. असं बरंच उजवं त्यामुळे ही उत्क्रांती आहे पण म्हणून पूर्णपणे प्रगतीच आहे किंवा पूर्णपणे अधोगती असंही नाही. इतिहासाच्या टप्प्यांचे हे असे विश्लेषण हा ह्या पुस्तकाचा गाभा आहे.

आज आपण हवामान बदल आणि नामशेष होणाऱ्या प्रजातींची चर्चा करतो. यंत्र आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणसाने निसर्गाची वाट लावली असं आपण म्हणतो. आपले पूर्वज कसे निसर्गाला धरून राहायचे असं आपण म्हणतो. पण लेखक म्हणतो माणूस हजारो वर्षांपासून ह्या निसर्गाला धोका बनून राहिला आहे. अगदी भटका आदी मानव सुद्धा ज्या ज्या भूभागांवर, बेटांवर पोचला तिथल्या परिसंस्था उद्ध्वस्त करतच गेला. ही दोन पानं वाचून बघा ७८-८०





ह्या पुस्तकातली एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे "पुराकथा" किंवा "कल्पित कथांचा" माणसाने केलेला वापर. लेखक म्हणतो इतर प्राणी छोट्या टोळ्याकरून राहतात. माणसं देखील सुरुवातीला असेच टोळ्या करून राहत होते. एकमेकांच्या आधाराने राहत होते. एक टोळी दुसऱ्या टोळीकडे परके शत्रू म्हणूनच बघत असे. साधारण १५० सदस्यांपेक्षा जास्त सदस्य असणाऱ्या टोळ्या व्यवस्थापन करणं कठीण जातं. माणसाने शहरं, गावं, देश, धर्म यांच्याद्वारे रचना निर्माण केल्या. अनोळखी व्यक्ती एकेमेकांना सहकार्य करणाऱ्या रचनेच्या भाग बनल्या. कारण त्या सगळ्या एका "पुराकथा" किंवा "कल्पित कथा" ह्यावर विश्वास ठेवतात. "पुराकथा" म्हणजे अंधश्रद्धा ह्या अर्थी नव्हे तर अशी गोष्ट जिचं भौतिक अस्तित्त्व नाही. पण तरी ते आहे असं मानणं. सगळे मानतात म्हणून एखादा धर्म आहे. सगळे मानतात म्हणून एखादा देश आहे. सगळे तसं मानतात म्हणून तो कायदा आहे. अगदी पैसा सुद्धा. पैशाची नोट खरं म्हणजे कागदाचा तुकडा आहे. पण सगळे त्या कागदाला पैसा मानतात आणि व्यवहार करतात म्हणून तो पैसा आहे. माणसातले भेदभाव, उच्चनीचता हे जसे अनैसर्गिक तसेच "सगळे मानव समान" हे तत्त्व सुद्धा एक कल्पित कथाच आहे. असं मांडून लेखक आपल्या तर्कशुद्धतेला आणि वाचकाला वेगळयाच वैचारिक पातळीवर उंचावतो. ही एकदोन पानं वाचा.
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)








ह्याच न्यायाने न्याय-अन्याय असं निसर्गात काही नसतं. इतिहासात न्यायाला थारा नाही. त्या सगळ्या बदलत्या मानवी मूल्यांप्रमाणे ठरतात असं लेखक म्हणतो.

पुढे धर्म, राजकीय साम्राज्य आणि पैसा ह्यामुळे दूरदूरची माणसं एका व्यवस्थेचा भाग कशी बनली ह्याचा रोचक ऊहापोह आहे. सगळीच साम्राज्ये दुष्ट होती का ? एखाद्या साम्राज्याने नवीन भाग जिंकला की त्या भागातल्या लोकांना दुय्यम वागणूक मिळायची पण काही पिढ्यांनंतर तिथले लोक साम्राज्याच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायचे. पूर्वीचे लोक आणि हे लोक आता मुख्य समाज मिळून नवीन भाग पादाक्रांत करायचे. ही साखळी पुन्हा सुरू राहायची. लेखक म्हणतो आज ज्या संस्कृतीचे, इतिहासाचे तुम्ही गोडवे गात आहात त्या संस्कृतीचा, धर्माचा, साम्राज्याचा कडवा विरोध एकेकाळी तुमच्या पूर्वजांनी केला होता. त्यामुळे मूळचे लोक कोण ? मूळ संस्कृती काय ? हे प्रश्न तितके सोपे नाहीत. साम्राज्यांच्या विस्ताराचं कारण, परिणाम ह्यावर वेगवेगळ्या पैलूंनी केलेला विचार हे आपल्याला प्रगल्भ करून जातं.


असाच विचार धर्मांचा केलेला आहे. लेखक म्हणतो उदारमतवाद , मानवतावाद सुद्धा धर्मच आहेत. ते ईश्वराची पूजा करत नाहीत तर माणसाची (होमो सेपियन्स ची) पूजा करतात त्याच्या सुखासाठी काम करतात.











पूर्वी कामासाठी माणूस स्वतःच्या आणि प्राण्यांच्या ताकदीवर अवलंबून होता. म्हणजे सूर्याच्या ऊर्जेतून - वनस्पती आणि तिथून माणसांची किंवा प्राण्यांची स्नायूशक्ती असं ऊर्जेचं रूपांतर होत होतं. तर यंत्र म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा ह्यात कोंडलेल्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत करणं आणि हवं ती कामं करून घेणं. एका अर्थाने ऊर्जा परिवर्तनाची ही क्रांती आहे. हा लेखकाचा विचार मला अभिनव वाटला. 

वैज्ञानिक क्रांतीच्या प्रकरणात विज्ञानाचा विचार आणि त्या आधीच्या माणसाचा विचार ह्यातच मुख्य फरक कसा आहे हे छान सांगितलं आहे. "आमच्या धर्मात सगळं सांगितलेलं आहे" आणि काही नसेल सांगितलं तर ते जाणून घेण्याच्या लायकीचं नाही असा धार्मिक विचार झाला. पण वैज्ञानिक विचार म्हणतो. मी अज्ञानी आहे, मला माहिती नाही, मी शोधलं पाहिजे, आज जे माहिती आहे के कदाचित चूक असू शकतं.

विज्ञानातून जेव्हा नवीन वाहनं नवीन तंत्र काही शे वर्षांपूर्वी तेव्हा युरोपाने नवनवीन भूमी पादाक्रांत करायला सुरुवात केली. साम्राज्याच्या साथीने विज्ञान फोफावलं तर विज्ञानाच्या साथीने साम्राज्य. भरपूर साधनसंपत्ती असूनही स्थितिवादी आशियन साम्राज्यांवर युरोपियन लोक भारी पडले. ते ह्या वृत्तीत पडलेल्या फरकामुळे.

हे वाचताना मला असं वाटत होतं की भारत-चीन सारख्या जुन्या संस्कृतीचं हे सगळं फार पूर्वीच करून झालं होतं का ? आणि ह्या सगळ्यात काही राम नाही हे कळल्यामुळे त्या शांतीवादी, स्थितीवादी झाल्या होत्या ? कारण; यांत्रिकीकरण, जागतिकीकरण, निसर्गात हस्तक्षेप याचे वाईट परिणाम आता दिसू लागले आहेत. लोक पुन्हा एकदा "स्थानिक" खाद्यपदार्थ खा, प्रक्रिया ना केलेलं खा, वाहनं ना वापरता चाला, खोट्या स्पर्धेत ना अडकता स्वतःच्या आतला आनंद शोधा वगैरे गोष्टी सुरू झाल्या आहेत. त्यातून अजून काहीशे वर्षांनी युरोप स्थितिवादी दिसेल तर चीन चा साम्राज्यवाद तेव्हा भरात असेल. आणि पुन्हा तेच चक्र !!

धर्म, राज्य ह्यांच्यापेक्षा वेगळाच घटक आता माणसाचं जग घडवतोय. तो म्हणजे "भांडवलशाही". सगळं जग एक मोठी बाजारपेठ आहे. म्हणून उत्पादन वाढवा, उत्पादन खर्च कमी करा, नवीन बाजारपेठ शोधा, नवनवीन संशोधन करा की त्यातून गुंतवलेला पैसा वाढणार आहे. मग वाढलेला पैसा पुन्हा गुंतवा, पुन्हा वाढवा, पुन्हा गुंतवा .. असं साधारण ह्याचं स्वरूप. माणूस हजारो वर्षांपासून पैसा वापरतो आहे. पण भविष्यातल्या संधींवर पैसा "लावण्याची", कर्जाऊ देण्याची जी व्यवस्था तयार झाली ती मोठी क्रांती होती. पूर्वीची अर्थव्यवस्था आणि नवी ह्यातला फरक अगदी सोप्या भाषेत लेखकाने समजावून सांगितला आहे. भांडवलशाही ची आपली बलस्थानं आणि मर्मस्थानं कुठली हे अगदी सहज ओघवत्या शैलीत स्पष्ट केलं आहे. वेगवेगळ्या कोनांतून त्याचा विचार केला आहे. उदा. ३५१-३५३






पुढचा भाग आत्तापर्यंतच्या चर्चेला एका वेगळ्याच दिशेला घेऊन जातो. आत्तापर्यंत विचार होता इतिहासात घडलेल्या घटनांचा आणि त्याच्या दृश्य स्वरूपाचा. आता विचार आहे "हे सगळं कशासाठी ?" माणूस ह्यातून खरंच सुखी झाला का ? पण सुख म्हणजे तरी नक्की काय ? माणूस आनंदी कशाने होतो ? शरीरात काही रसायनं स्रवली तर माणसाला आनंदाची अनुभूती होते, दुःखाची वेदनेची अनुभूती होते. हे आता समजू लागलंय. मग साम्राज्य, पैसा ह्याच्या भानगडीत माणूस का पडला ? एखाद्याला जे चांगलं वाटतं ते दुसऱ्याला नाही. दुधाव्यवसाय आणि मांसव्यवसाय ह्यासाठी लाखो जनावरांना कोंडवाड्यासारख्या अवस्थेत राहावं लागतं आणि क्रूर पद्धतीने वागवलं जातं. त्यांच्या सुखाचं काय ? असे दोन्ही बाजूंचे विचार लेखकाने आपल्या समोर ठेवले आहेत. आपल्याला विचार प्रवृत्त केलं आहे. हे वाचून बघा ४१९-४२१





शेवटच्या प्रकरणात एखाद्या अमेरिकन विज्ञानचित्रपटात दिसेल त्याप्रमाणे तंत्रप्रगतीच्या शक्यता, कल्पना मांडून आपल्या कल्पनाशक्तीला चालना दिली आहे. माणूस स्वतःला प्रगत करत करत स्वतःतूनच एक अतिप्रगत जीव निर्माण करेल का ? होमो सेपियन्स चा पुढचा टप्पा गाठून ह्या सुपरह्युमन "होमो सेपियन्स" ना गुलाम करेल का संपवेल ? येत्या हजार, लाख वर्षांत काय बरं घडेल ?

लाख वर्षांची ही यात्रा घडवून लेखक आपल्याला पुढच्या प्रवासासाठी अलगद पुढे पाठवतो. साडे चारशे पानांचं पुस्तक आपण वाचून संपवल्याचं आपल्याला कळतही नाही. आपण भानावर येतो तेव्हा आपण विलक्षण वैचारिक अनुभव घेतल्याचं आपल्या लक्षात येत. लेखक लिहायचं का थांबला; त्याने अजून लिहावं अजून आपल्याला सांगावं असं वाटत राहतं.

पुस्तक वाचनातून आपल्याला बरंच काही नव्याने कळलं, बरंच काही अजून समजून घेतलं पाहिजे हे समजलं. गुरुपौर्णिमा नुकतीच झाल्यामुळे, युव्हाल "गुरु" वाटले. विषय गहन असेल तरी असा गुरु किती सोप्या शब्दांत सांगू शकतो त्यामुळे योग्य गुरूचा, योग्य पुस्तकाचा शोध घेतला पाहिजे आणि आपल्या आपल्या क्षेत्रात आपण असं काही लिखाण करून ही गुरु-शिष्य परंपरा समृद्ध केली पाहिजे.

पुस्तकाचं भाषांतर करून मराठी ज्ञान खजिन्यात मोठी भर टाकल्याबद्दल श्री. वासंती फडके यांचे मनःपूर्वक आभार. भाषांतर अतिशय सहज, सोपं झालंय. मराठी आणि इंग्रजी तांत्रिक संज्ञांचा योग्य वापर केल्यामुळे कुठेही कळलं नाही असं होत नाही.

हे पुस्तक बरेच दिवस वाचनालयात बघत होतो. पण गंभीर विषय आणि साडे चारशे पानं बघून बरेचदा हातात घेऊन पुन्हा खाली ठेवलं. तुम्ही सुद्धा असं करत असाल तर तसं करू नका. कारण विषय गंभीर असला तरी शैली हलकीफुलकी आहे. साडे चारशे पानं सुद्धा कमी वाटतील. त्यामुळे पुस्तक वाचाच.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...