Yes! I am corrupt (येस! आय अॅम करप्ट )



पुस्तक - Yes! I am corrupt (येस! आय अॅम करप्ट )
लेखक - Arun Harkare (अरुण हरकारे)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - १२४
ISBN - दिलेला नाही 

लेखक श्री. अरुण हरकारे ह्यांनी हे पुस्तक मला वाचण्यास उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. 

भ्रष्टाचार हा भारतीय समजाला जडलेला असाध्य रोग. सरकारी काम म्हणजे त्यात दिरंगाई, कामाची कमी गुणवत्ता आणि संबंधितांची पैशाची बेगमी हे कटू वास्तव. रोज वृत्तपत्रांत आणि वृत्तवाहिन्यांवर नवनवीन घोटाळे आपण वाचत असतो. अश्याच एका घरबांधणी घोटाळ्यावर आधारित ही कादंबरी/दीर्घ कथा आहे. ह्यात सरकारी गृहनिर्माण खात्यातर्फे गरीबांसाठी घरं बांधली जातात पण ती घरं अतिशय वाईट दर्जाची असतात. निकृष्ट माल वापरून कंत्राटदार पैसे कमावतो. ह्याकडे कानाडोळा करण्याचे पैसे सरकारी अधिकारी, राजकारणी, मंत्री घेतात. कोणी नियमानुसार काम करायला गेले तर त्याला ह्या व्यवस्थेत टिकून दिले जात नाही. एका प्रामाणिक कंत्राटदाराला प्रामाणिकपणाचं फळ मिळतं. खोट्यानाट्या तक्रारी दाखवून त्याच्याकडून काम काढून घेतलं जातं. जबर दंड वसूल केला जातो. बिचारा देशोधडीला लागतो. त्याचा मुलगा मोठा होऊन दुसऱ्या बिल्डर कडे नोकरीला लागतो. नाईलाजाने त्याला भ्रष्टाचारात सामील व्हावे लागते. पण ह्या व्यवस्थेची माहिती मिळवून, आपल्या वडिलांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांचा बदला घ्यायचा प्रयत्न करतो.
तो यशस्वी होतो का? आणि झाला तर ही भ्रष्ट व्यवस्था त्याला सुखासुखी जगू देईल का? हे तुम्हाला कादंबरी वाचल्यावर कळेल.

भ्रष्टाचार कसा होतो त्याचा एक प्रसंग





भ्रष्ट अधिकाऱ्याने बांधलेल्या इमारतीत अपघात होतो. ह्या प्रकरणात त्याला अडकवण्यासाठी कादंबरीचा नायक लोकांना उकसावतो





कादंबरीची कथा तशी साधी आहे. पात्रे द्विरंगी आहेत. भ्रष्टाचारी हे "निखळ भ्रष्टाचारी" आहेत. सरळ सरळ पैसे मागतात नाहीतर काम करणार नाही म्हणतात. सरळमार्गी माणसं सरळ वागतात. त्यामुळे भ्रष्टाचार लपवायच्या क्लृप्त्या, बेरकीपणा, खोटेपणा उघड करण्यासाठी करावे लागलेली शोध मोहीम; सज्जनाची अगतिकता असलं काही नाट्य किंवा चढउतार नाहीत. पात्रांची मनोभूमिका रंगवायचा प्रयत्न नाही. पुस्तकाच्या शेवटी शेवटी तर एखाद्या घटनेचे वृत्त सांगावे तसे दुसरे पात्र घटनांची जंत्री सांगते. पेपरात आलेल्या खऱ्या खऱ्या बातम्यांची यादी दिली आहे. त्यामुळे कथा-कादंबरीचा बाज पूर्णपणे निघून जातो.

परीक्षणाच्या सुरुवातीला म्हटलं तसं, भ्रष्टाचाराच्या बातम्या नेहमी वाचनात येत असतात. त्या बातम्याही सुरस-चमत्कारिक-रम्य(!) असतात(दुर्दैवाने). त्या बातम्यांच्या पलीकडे जाऊन हे पुस्तक काही सत्य खणून वाचकांसमोर मांडत नाही; संबंधितांच्या जाणिवांचा वेध घेत नाही किंवा ही समस्या सोडवण्याचा एखादा नावा मार्ग सांगत नाही. 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 

रामकथामाला (Ramkathamala)




पुस्तक - रामकथामाला (Ramkathamala)
लेखिका - दीपाली नरेंद्र पाटवदकर (Deepali Narendra Patwadkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ११२
ISBN - दिलेला नाही
प्रकाशन - विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग. फेब २०२१
छापील किंमत - रु. २००/-

ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाचे सचिव श्री. सुधीर जोगळेकर ह्यांनी मला हे पुस्तक वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो.

रामायण आणि महाभारत हे ग्रंथ म्हणजे भारतीय संस्कृतीचा इतिहास. आपल्या संस्कृतीचे आदर्श कायमस्वरूपी डोळ्यासमोर ठेवणारी महाकाव्ये. साहित्य म्हणून अत्युत्कृष्ट. हजारो वर्षे झाली तरी ग्रंथांतील कथा शिळ्या तर वाटत नाहीत उलट त्यातल्या पात्रांचे, घटनांचे नवनवीन अर्थ पुढे येत असतात; त्यांच्याकडे बघण्याचे नवनवीन दृष्टिकोन पुढे येत असतात. कथाकार, कादंबरीकार, चित्रकार, गीतकार, नाटककार, शिल्पकार अश्या प्रत्येक कलावंताला आपल्या कलेतून ही कथा सांगावीशी वाटते. इतिहास संशोधकाला त्याच्यातून भारताचा इतिहास किती पुरातन आहे ते शोधावंसं वाटतं. साधू संतांना त्यातून नीतिमत्तेचा आदर्श शिकवता येतो. आदर्श राजा कसा असावा हे राजकारणी व्यक्तीला कळू शकतं. अश्या कितीतरी अंगांनी ही महाकाव्ये प्रत्येक भारतीयाच्या मनामनात आहेत; कणाकणात आहेत.

रामायण- महाभारताचं प्रेम आणि आकर्षण फक्त भारतातल्या व्यक्तीलाच नाही, तर जिथे जिथे भारतीय पोचले, भारतीय संस्कृती, धर्म, विचारधारा पोचल्या, रुजल्या त्या देशोदेशी आहे. अफगाणिस्तानापासून-ब्रह्मदेशापर्यंतचा सांस्कृतिक भारतीय उपखंड, आग्नेय आशिया(इंडोनेशिया, कमोडिया इ.), जपान, मॉरिशस असा विशाल प्रदेश ह्या प्रेमात आहे. रामायणाच्या ह्या लोकप्रियतेची साधारण कल्पना आपल्या सगळ्यांनाच आहे. पण त्याबद्दलची तथ्ये, ग्रंथांची नावे, कलाप्रकार, त्यांचा इतिहास ह्याची सविस्तर माहिती कदाचित नसेल.ती माहिती एका ठिकाणी, एका पुस्तकात गुंफून रामकथेच्या दिग्विजयाचे दस्तऐवजीकरण करण्याचं मोठं काम दीपालीजींनी ह्या पुस्तकात केलं आहे.

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

अनुक्रमणिका

प्रकारणांबद्दल थोडक्यात

- पहिल्या ५ प्रकरणांमध्ये वेद, पुराणे महाभारत ह्यांमध्ये रामकथा कशी सांगितली गेली आहे हे दाखवलं आहे.

- पूर्ण रामायण किंवा त्यातल्या काही भागांवर आधारित नाटके, काव्ये संस्कृत मध्ये आहेत. भारतातल्या अनेक संतांनी आपल्या भाषेत - आपल्या शैलीत रामायण सांगितलं आहे. अशी कुठली रामायणे वेगवेगळ्या प्रांतांत प्रसिद्ध आहेत ते सांगितलं आहे.

- जैन, बौद्ध, शीख ह्या भारतीय उपासना पद्धतीतही रामकथा ही आदर्शच मानली गेली आहे. धर्मग्रंथांत रामायणातल्या किंवा रामाच्या वंशातल्या राजांच्या गोष्टी येतात. आणि त्या त्या धर्माच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे त्यात बदलही केलेला आढळतो. म्हणजे अहिंसक राम ! घटना भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा आहेत अश्या स्वरूपातल्या जातक कथा इ.

-"विदेशातील रामायण"मध्ये कुठल्या कुठल्या देशांत कश्याप्रकारे रामायण हा एक मोलाचा सांस्कृतिक ठेवा मनाला जातो. ते सोदाहरण आणि सचित्र स्पष्ट केलं आहे.

- ही गोष्ट फक्त कथा-कादंबऱ्यांतच मर्यादित राहिली नाही. तर चित्र, शिल्प, नृत्य कलावंतांना देखील तिने मोहित केलं आहे. म्हणूनच अनेक लेण्यांमध्ये दगडांवर रामायणातले प्रसंग कोरलेले आहेत. शिल्पे आहेत. भारतात आणि भारताबाहेरही.

- लोकगीते, लोकनृत्ये, म्हणी, वाक्प्रचार ह्यातही रामायण आहे. त्याचा थोडा मागोवा एका प्रकरणात आहे.

- हनुमान उड्डाण करून लंकेत सीताशोधाला गेला. तिथे त्याने सीतेला रामाचा निरोप सांगितला. "वायुमार्गे जाणारा निरोप्या", "ओळखीची खूण सांगून स्वतःची ओळख सांगणारा निरोप्या" ह्या संकल्पनेतून प्रेरित होऊन अनेक काव्यांमध्ये तो प्रकार नाना रूपांत वापरला आहे असे लेखिकेचे निरीक्षण आहे. ते सोदाहरण पटवून दिलं आहे.

- रामायणात लिहिलेली ठिकाणे शोधायला गेलं तर ती प्रत्यक्षात अस्तित्त्वात आहेत. काही ठिकाणी उत्खननातून जुने अवशेष सापडले आहेत. ह्या सगळ्या ठिकाणांचा शोध घेऊन, त्यांचा विकास केल्यास मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी उपलब्ध होईल.

- रामायणावरच्या महत्त्वाच्या ग्रंथांची कालानुक्रमे सूची

- ह्या पुस्तकासाठीच्या पुस्तकांची संदर्भ सूची

हे पुस्तक कॉफीटेबल बुक आकारातील रंगीत आणि देखणे पुस्तक आहे. काही पाने नमुन्यादाखल

रामरक्षा हे वेदांतील मंत्रांचे संकलन आहे. त्यात रामकथा कशी अनोख्या पद्धतीने सांगितली आहे ते पहा. अजून एका मंत्रात थोडक्यात रामकथा कशी सांगितली आहे ते बघा.

विदेशातील रामायण
इतर पंथांमध्ये रामायणकथा
देशी विदेशी नृत्यांतून रामायण

रामायणातील स्थळे आणि आज त्यांचा मग काढला तर ...

रामायणाच्या महत्त्वाचे, व्याप्तीचे थोडक्यात आणि आकर्षक पद्धतीने दस्तऐवजीकरणाचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. इतिहास, संस्कृती, भाषा, कला ह्यातल्या एकात जरी रस असेल तरी त्या अंगाने रामायणाचा विचार तुम्हाला वाचायला आवडेल. पुस्तकाची भाषा आणि स्वरूप बोजड शोधनिबंधासारखे ना ठेवता सर्वसामान्य वाचकाला ते वाचावंसं वाटेल, हाताळायला आवडेल असं साधं सचित्र आणि छोट्या छोट्या प्रकरणाचं आहे. त्यातून मुद्द्याची व्याप्ती लक्षात येते आणि आपण पुढे वाचत राहतो. त्यामुळे हे वाचनीय आणि संग्राह्य पुस्तक आहे.

पुस्तक कुठे मिळेल ?
  • पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक
  • आपल्या शहरातल्या विवेकानंद केंद्राच्या शाखेशी संपर्क साधा 
  • अथवा पुढे दिलेल्या चित्रातल्या तळाशी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 

सोन्याच्या धुराचे ठसके (sonyachya dhurache thasake)

पुस्तक - सोन्याच्या धुराचे ठसके (sonyachya dhurache thasake)
लेखिका - डॉ. उज्ज्वला दळवी (Dr. Ujjwala Dalvi)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २७२
ISBN - दिलेला नाही
प्रकाशन - ग्रंथाली प्रकाशन. जानेवारी २०१०

लेखिका उज्ज्वला दळवी आणि त्यांचे पती हेली दळवी दोघेही डॉक्टर. १९८५ साली नोकरीसाठी म्हणून सौदी अरबेरीयाला गेले. "उम्म खद्रा" नावाच्या एका छोट्या खेड्यातल्या सरकारी रुग्णालयात कामावर रुजू झाले. हवामान, भाषा, धर्म, संस्कृती, सामाजिक स्वातंत्र्य ह्या सगळ्याच बाबतीत भारतापेक्षा फारच वेगळ्या असणाऱ्या ह्या देशात राहू लागले. त्या वास्तव्याच्या २५ वर्षांच्या अनुभवाचे हे वर्णन आहे.

पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती 


डॉक्टर म्हणून काम करताना त्यांना वेगवेगळ्या कुटुंबातल्या लोकांशी भेटण्याबोलण्याची संधी मिळाली. त्यातून स्थानिकांशी ओळखी झाल्या. मैत्रीही झाली. स्थानिकांच्या वेगवेगळ्या वृत्ती बघायला मिळाल्या. कुणी स्थानिक त्यांच्याकडे - आपल्या देशात आपल्या सेवेसाठी आलेले परदेशी लोक - अश्या स्वरूपात बघत; तर कोणी स्थानिक - पाहुणे लोक म्हणून -आगतस्वागताने गुदमरून टाकत. तिथल्या कट्टर इस्लामी, असहिष्णू आणि बंदिस्त वातावरणात राहणं सोपं नव्हतं. महिलांनी पूर्णपणे अंगभर बुरख्यातच(अबाया) राहिलं पाहिजे ही सक्ती. ते जर नाही झालं; तर भर रस्त्यातही धार्मिक पोलीस - मुतव्वा - बायकांना फटके देतात हे पाहायला मिळालं. बायका म्हणजे मुलं जन्माला घालणारं यंत्र ही मानसिकता पुरुषांचीच नाही तर स्त्रियांची सुद्धा. म्हणून कितीही बाळंतपणं झाली तरी आता "दिवस जात नाहीत" अशी तक्रार 
डॉक्टरीणबाईंकडे करणाऱ्या बायका त्यांना भेटल्या. दिवसभर घरकाम आणि रांधा-वाढा-उष्टी काढा ह्यात पिचलेल्या गृहिणी दिसल्या. घरकामासाठी ठेवलेल्या परदेशी नोकर-नोकरणीला वेठबिगारासारखं वागवणारे मालक दिसले.

नियम भरपूर, शिस्त कडक, चुकल्यास शिक्षा जबर. पण ह्या सगळ्याचा जाच परदेशी लोकांना, गरीबाला किंवा स्थानिक असूनही शिया मुसलमांना. छोट्या छोट्या चुकीसाठी थेट कारावास. तुरुंगातून कधी सुटणार, अजून काय शिक्षा मिळेल ह्याची शाश्वती नाही. लेखिकेच्या पतीलाही खोट्या कारणासाठी एक रात्र तुरुंगात राहण्याचा अनुभव आला. पण जर तुम्ही 
सौदी स्थानिक असाल, जरा वशिला असेल तर तुम्हाला काही काळजी नाही. तुम्ही मोकाट ! त्यामुळेच स्थनिक तरुणांची, प्रौढांची बेदाराकर वृत्ती, परदेशी लोकांना तुच्छ नोकर म्हणून बघण्याची वृत्ती लेखिकेला बघायला मिळाली.

असं असूनही भारत, पाकिस्तान, बांग्लादेश इतर गरीब आफ्रिकन आणि आशियाई देश इथून लोक पैसे कमवण्याच्या उद्देशाने येताच राहतात. काटकसर करून, गरिबीत राहून पै-पै गोळा करून आपापल्या मायदेशी पाठवतात. "व्यक्ती तितक्या प्रकृती" ह्या न्यायाने सौदीतल्या वास्तव्याचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी लोक काय क्लृप्त्या वापरत; त्यामुळे अडचणीत सापडत ह्याचे अनुभव देखील पुस्तकात आहेत. दुर्दैवाने ज्यांना तिथे मरण आलं अशांच्या नातेवाईकांचे काय हाल झाले ते सांगितलं आहे. हे वाचून "सोन्याच्या धुराचे ठसके" हे पुस्तकाचं शीर्षक किती सार्थ आहे हे पटतं.

तेलाच्या पैशाने अरेबिया श्रीमंत झाला. त्या पैशातून जनतेवरही बरीच खैरात झाली. त्यामुळे शिक्षण, आरोग्यासारख्या सेवा फुकट मिळाल्या. गाड्या, घरं, इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे घेण्याचं सुख त्यांना मिळालं. लोकांनी आरामात राहावं पण राजकरणात जास्त लुडबुड करू नये; विनाकारण प्रश्न विचारू नयेत असा एकूण माहोल. त्यामुळे शिक्षण, दळणवळण, बाहेरच्या जगाशी संपर्क हे सगळं मर्यादेतच राहील ह्याची खात्री मात्र सत्ताधीशांनी घेतली आहे. धर्माचं आणि राजकीय नियंत्रणाचं जोखड लोकांवर त्यामुळेच घातलेलं आहे. ह्या बद्दलचं सामाजिक निरीक्षणही लेखिकेने आपल्या अनुभवातून मांडलं आहे.

खनिज तेलाचा उद्योग वाढला तसा त्यावर तेलावर प्रक्रिया करणारे मोठमोठाले कारखाने उभे राहिले. मालाची ने-आण करण्यासाठी बंदरे विकसित झाली. जुन्या गावांचं रूप पालटून शहरीकरण झालं. मोठ्या संख्येने परदेशी तंत्रज्ञ तिथे कामावर आले. त्यातून देशोदेशीच्या लोकांच्या आपल्या वसाहती तयार झाल्या. पण ज्याप्रमाणे लेखिकेला पूर्वी स्थानिकांमध्ये मिसळता आलं तसं ह्या नव्या परदेशी लोकांचं झालं नाही. शहरांत राहणारे अरबी तरुण सुद्धा परदेशी शिकून इकडे काम करू लागले. त्यांच्यातही पाश्चत्त्य जीवनशैली रुजू लागली आहे. सौदी अरेबियातली शहरं तरी बदलतायत काही चांगल्या कारणाने तर काही वाईट कारणांनी. सौदी च्या ह्या स्थित्यंतराचा वेढा सुद्धा लेखिकेने घेतला आहे. 
ही काही पाने वाचून बघा (फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)
अनुक्रमामणिका 

कसं होतं "उम्म खद्रा" गाव ... 

सौदी अगत्य,खाद्यप्रकारातलं वैविध्य आणि उष्टंमाष्टं खाण्यातलं वैचित्र्य  
तिकडे इतके कडक कायदे का बरं असावेत आणि आज ते कायदे इथल्या कामकरी लोकांना कसे त्रासदायक होतायत त्याबद्दल
पैसा आला तरी रक्तातलं वाळवंटी भटकेपण, उन्मुक्तपणा, अरेरावी गेली नाही.  





सौदी अरेबियाचा थोडा इतिहास, जरासा भूगोल आपल्याला पुस्तकातून कळतो. समाजव्यवस्थेचं चित्र बऱ्यापैकी डोळ्यासमोर उभं राहतं. त्यामुळे पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचनीय आहेच. हे पुस्तक दुप्पट वाचनीय बनवलं आहे ते लेखिकेच्या लेखन शैलीने. मराठीतले वाक्प्रचार, म्हणी, विविधार्थी शब्द आणि शब्दांचे खेळ ह्यातून पुस्तकाचं प्रत्येक वाक्य रंजक बनवलं आहे. लेखिका अनुभव सांगते आहे पण सांगता सांगता शब्दांशी खेळते आहे. जणू काही अरबस्तानात राहताना मराठी लिहिण्याबोलण्याची झालेली कसर भरून काढते आहे !! आपण उत्सुकतेने आणि मजा घेत घेत पुढे वाचत राहतो. किती पानं झाली हे बघावंसं वाटत नाही. माझा पूर्वीचा अनुभव असा आहे की; परदेशाचे अनुभव वाचताना त्यात उल्लेख असलेल्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ नेटवर लगेच शोधावेसे वाटतात. पण हे पुस्तक वाचताना स्थलवर्णन इतकं छान आहे की डोळ्यासामोर कल्पनाचित्र उभी राहिली. पुस्तक सोडून नेट वर शोधायची इच्छा झाली नाही. तरी, पुस्तकातच त्यांचे जुने फोटो टाकता आले असते तर मजा आली असती.

दळवी दांपत्याचा हात धरून ९०च्या दशकातल्या सौदीचा फेरफटका मारायला उंटावर बसायला तयार रहा. ह्या पुस्तकाचा पुढचा भाग लेखिका लवकरच लिहितील, अशी इच्छा आहे. तो फेरफटका मारण्यासाठी वाचक आलिशान गाडीत बसायला तयारच असतील.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 


प्लँटोन (Planton)



पुस्तक - प्लँटोन (Planton)
लेखक - डॉ. संजय ढोले (Sanjay Dhole)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ४६२
ISBN -9789392482656
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस पहिली आवृत्ती जानेवारी २०२२
छापील किंमत - ५९५

मराठीत विज्ञानकथा आणि विज्ञानकादंबऱ्या ह्यांचं लेखन इतर साहित्यप्रकारांच्या मानाने कमी होतं. त्यामुळे वाचनालयात "प्लँटोन" ही विज्ञानकादंबरी दिसल्यावर उत्सुकतेने हातात घेतली. लेखकाचा परिचय, पाठमजकूर (ब्लर्ब) वाचून खूप आश्वासक वाटली. पण प्रत्यक्ष वाचायला घेतल्यावर निराशा झाली. पहिली १०० पानं वाचली तरी त्यात विज्ञान न येता
कादंबरीचा स्थलपरिचय, पात्रपरिचय, कालपरिचय, नेपथ्यरचना ह्यापद्धतीचं लेखनच होतं.
सरकारी वन खात्यात एक अधिकारी/वनपाल बदली होऊन नंदुरबाराच्या जंगलात येतो. तिथे त्याच्या लक्षात येतं की वनखात्याचे अधिकारी, स्थानिक राजकारणी आणि बडी धेंडे ह्यांच्या भ्रष्ट यूतीतून जंगलाचा ऱ्हास होतोय. तसंच इथल्या गरिबांवर आदिवासींवरही अन्याय होतोय. कादंबरीत ही नेपथ्यरचना करण्यात शे-दीडशे पानं घालवली आहेत. तोपर्यंत वैज्ञानिक भाग तर आलाच नव्हता. म्हणून पुढे जरा भराभर वाचलं मुख्य वाक्य वाचून कथानकाचा अंदाज घेत पुढे गेलो.
बऱ्याच पानांनंतर "प्लँटोन" ह्या वैज्ञानिक चमत्काराबद्दल कथानक पुढे सरकायला लागलं होतं. पण त्यातही वैज्ञानिक किचकटपणा होता. अद्भुतरम्यता कमी होती. पुढे हा चमत्कार वापरून गुन्हेगार कसे शोधले; नायक, नायिका त्यांच्या जोड्या ह्यांनी अन्यायाला वाचा कशी फोडली असं सगळं वर्णन आहे.
टीव्ही वर खाण्यापिण्यावरच्या कार्यक्रमात पाककृती सांगताना "नमक स्वादानुसार .. / चवीपुरते मीठ .." असं सांगतात तसं इथे चिमटीभर विज्ञान पातेलंभर सामाजिक विषयात घातलंय. सामाजिक विषयातही नवखेपण नाही. निवेदन शैली रटाळ आहे. त्यामुळे ४६२ पानांपैकी उरलेली ३०० पाने (म्हणजे जवळजवळ तीन पुस्तकांचा ऐवज) सविस्तरपणे वाचावीत असं वाटलं नाही. त्यामुळे पुढची पाने वरवर चाळून संपवली.

काही पाने उदाहरणादाखल...
नवीन वनपाल त्याच्या क्षेत्रातल्या वैज्ञानिक संस्थेला भेट देतो तो प्रसंग


वनस्पतींना भावना असतात, स्मृती असते ह्याबद्दलचे संशोधन पुढे मांडले जाते तो भाग

नायक, नायिका धाडस करून गुन्हेगारांचा माग काढतात तो भाग.



पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती



तुम्ही ही कादंबरी वाचली असेल किंवा नंतर वाचलीत तर तुमचा अभिप्राय नक्की कळवा.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

माझी कॉर्पोरेट दिंडी (majhi corporate dindi)


पुस्तक - माझी कॉर्पोरेट दिंडी (majhi corporate dindi)
लेखक - माधव जोशी (Madhav Joshi)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २५६
ISBN - 978-93-91784-61-4
प्रकाशक - ग्रंथाली
छापील किंमत - ३००

भारतामध्ये सेलेब्रिटी म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात ते चित्रपट तारे-तारका, क्रिकेटपटु आणि राजकारणी. त्यांच्या बातम्या, मुलाखती, त्यांच्या आठवणी, किस्से हे सतत कानावर पडत असतात; वाचनात येत असतात. पण देशातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, दूरसंपर्क ह्या मूलभूत गरजा भागवणारे शेतकरी, उद्योगाकरी, वैज्ञानिक, तंत्रज्ञ हे मात्र ह्या "सेलेब्रिटी"स्टेटस पासून खूप दूर राहतात. त्यामुळे देशात खरी संपत्ती निर्माण करणारे हात आणि इतर हातांना रोजगार देणारे 
हात; त्यामागची नियोजन करणारी मनं ह्यांच्याशी संवाद फारच कमी होतो. हे लोकही तसे आपण बरं आणि आपलं काम बरं अश्या वृत्तीचे असतात. प्रसिद्धीपराङ्मुख असतात किंवा काही अगदी पेज-थ्री वाले. ह्याच्या मध्ये राहून आपलं कर्तृत्त्व आणि आपले अनुभव समाजासमोर मांडणाऱ्या, त्यातल्या कटुगोड आठवणी सांगून कॉर्पोरेट विश्वाच्या बाहेरच्या लोकांना त्या जगाची ओळख करून देणाऱ्या व्यक्त्ती कमीच. म्हणूनच अश्या व्यक्तीचं आत्मनिवेदन, सिंहावलोकन हे सर्वसामान्य वाचकांसाठी वैचारिक मेजवानीच !!

अशी मेजवानी मला घरबसल्या मिळाली ती म्हणजे माधव जोशी लिखित "माझी कॉर्पोरेट दिंडी" ह्या पुस्तकाच्या रूपाने. माझी पुस्तकपरीक्षणे त्यांनी वाचली होती. डोंबिवलीच्या लोकप्रिय "पै'ज फ्रेंड्स लायब्ररी"चे पुंडलिक पै काका ह्यांनीही त्यांना माझं नाव सांगितलं होतं. त्यामुळे माझ्या कौतुकाच्या रूपात माधवजींनी त्यांचं नवं पुस्तक मला भेट दिलं. ह्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला आमंत्रित केलं. आपलं परीक्षण इतक्या मोठ्या माणसाला आवडतंय हे बघून माझी कॉलर टाईट !! म्हणूनच इथे सुद्धा पुस्तक परीक्षणाआधी त्याबद्दल सांगायचा मोह आवरला नाही. तुम्ही सुद्धा सगळे माझं वेडं-वाकडं लेखन कौतुकानेच वाचता म्हणून हक्काने सांगितलं. :)

असो ! आता पुस्तकाबद्दल लिहितो. माधव जोशी हे नाव सुजाण डोंबिवलीकरांना परिचित आहे. कंपनी सेक्रेटरी, टाटा च्या कंपन्यांमध्ये उचचपदस्थ ,सल्लागार, कायदा व व्यवस्थापन तज्ज्ञ आणि डोंबिवलीच्या सांस्कृतिक विश्वात सक्रिय असे माधव जोशी. त्यांनी आपल्या लहानपणापासून आत्तापर्यंतच्या करियर मधल्या महत्वाच्या घटना, किस्से, आठवणी ह्या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत.

कोकणातल्या लहान गावातून ते शिक्षणासाठी डोंबिवलीत आले. बी कॉम चं शिक्षण पूर्ण करता करता नोकरी करू लागले. पुढे कंपनी सेक्रेटरी आणि कायदेतज्ज्ञ झाले. बेयर ("बेगॉन" स्प्रे वाली" बायर), विंडसर, कादंबरी अश्या बहुराष्ट्रीय कंपन्यांत त्यांनी मोठ्या हुद्द्यांवर काम केलं. त्यांची प्रगती होत होत ते टाटा टेली चे प्रेसिडेंट आणि अनेक कंपन्यांचे संचालक, सल्लगार झाले. रतन टाटांसाखे उद्योगमहर्षीबरोबर प्रत्यक्ष काम करता आलं. कंपन्यांच्या नव्या प्रेजेक्टची स्थापना, विस्तार व त्यासाठी स्थानिक राजकारण्यांपासून वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांना चर्चेत सहभागी व्हावं लागायचं. सतत परदेश वाऱ्या होत.  कंपनीवर इतरांनी केलेल्या ठोकलेल्या कायदेशीर दाव्यांसाठी उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटले लढवण्याचा अनुभव आला. जेठमलानी, चिदंबरम, सिब्बल अश्या राजकारणी-वकिलांबरोबर चर्चा आणि गप्पा झाल्या. मोठमोठ्या कंपन्यांचे विलीनीकरणाचे प्रकल्प त्यांनी हाताळले. कंपनी शेअर बाजारात उतरण्याचे अनुभव घेतले. सुरुवातीला कामगार युनियनचे कामही केले. मोबाईल ऑपरेटर्स च्या संघटनेचे अध्यक्ष होते. एकूणच कॉर्पोरेट क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करत त्यांनी आपली मुद्रा उमटवली आहे. हे काम करत असताना त्यांनी माणसंही जोडली. अनेक सामाजिक संथांमध्ये काम केलं किंवा त्या कामांना आपल्या मार्गदर्शनाचा लाभ करून दिला.

असं हे चतुरस्त्र, कर्तृत्ववान आणि तरीही नम्र व्यक्तिमत्त्व स्वतःहून आपले अनुभव सांगायला पुढे येतंय म्हटल्यावर - गीत रामायणातील - "आपल्या सर्व शक्ती कानांच्या ठायी एकवटून"- ह्या निवेदना प्रमाणे "आपल्या सर्व शक्ती नेत्रांच्या ठायी एकवटून" वाचक वाचायला तयार होतील ह्यात काही नवल नाही.

पुस्तकात वेगवेगळ्या प्रकारचे किस्से आहेत. नेहमीच्या कामातल्या गमतीजमती; एखादं मोठं प्रोजेक्ट उभं राहणायमागे कसे कष्ट घ्यावे लागले ह्याचा अनुभव, प्रोजेक्ट गुंडाळावा लागला ह्याचे अनुभव; न्यायालयात खटल्याचा अनुभव इ. पण ह्या सगळ्या अनुभवांच्या केंद्रस्थानी "तांत्रिक तपशील" नाहीत तर तेव्हा भेटलेली माणसे त्यांची वागण्याची पद्धत, त्यातून मिळालेली कलाटणी; नाना स्वभाव किंवा आपापल्या संस्कृतीचा प्रभाव ! त्यामुळे हे पुस्तक सर्वसामान्य वाचकाला परिस्थितीचं गांभीर्य योग्यपणे दाखवतं पण गंभीर करून ठेवत नाही. लेखकाकडे सांगण्यासारखं खूप असल्यामुळे प्रसंग कितीही महत्त्वाचा असला तरी त्यात अडकून ना पडता गोषवारा देऊन लेखक पुढे जातो. आणि कथानक वेगाने पुढे सरकतं. काही परिच्छेदांमध्येच इतक्या मोठ्यामोठ्या व्यक्तींची, संस्थांची नावं येऊन जातात की मीच जरा थबकून पुन्हा वाचून, पचवून पुढे जात राहिलो.

अनुक्रमणिका 



ब्रिटिश वल्ली पीटर विंडसर 


"बेयर" आणि "ABS प्लास्टिक्स" ह्या दोन कंपन्यांचा करार होताना "घडलंय-बिघडलंय-घडलंय" चा अनुभव 

राजकीय हस्तक्षेप आणि त्या हाताचं सहकार्यात रूपांतर 

"टाटा" म्हणजे विश्वास ! ह्या उक्तीसाठी टाटा ग्रुप बाळगत असलेली मूल्यनिष्ठा   




निवेदनाचा वेग व त्यातला नर्मविनोद, अहंकाराचा पूर्ण अभाव, दुसऱ्यावर टीका करण्याचा किंवा कमी लेखण्याचा अजिबात प्रयत्न नाही, जे आवडलं नव्हतं किंवा मनासारखं नाही झालं त्याबद्दल कटुता/बदला घेण्याची भाषा नाही; किंवा जुन्या घटनेमागच्या कारणाचा गौप्यस्फोट करायचा उद्देश नाही..ह्या सगळ्या गुणांमुळे वाचन सुखकरही होतं. कोणी त्यावर टीका करेल; स्पष्टपणे सांगितलं नाही खऱ्या गोष्टी उघड केल्या नाहीत असंही म्हणेल. पण व्यवसायातल्या गोपनीयतेच्या अटी शर्ती पाळून लेखकाला हे बंधन पाळावं लागलं असेल हे उघडंच आहे. आणि लेखनाचा उद्देश शोधापत्रिकारितेसारखा नाही. त्यामुळे सर्वसाधारण वाचकाला, ह्या क्षेत्रात नव्याने शिरू इच्छिणाऱ्याला ही बोच तितकी जाणवणार नाही.

त्यांच्या सामाजिक कामांबद्दल आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना साथ देणाऱ्या अनेकांचे उल्लेख त्यांनी प्रेमाने, आदराने, कौतुकाने केले आहेत. आई-वडिलांपासून स्वतःच्या ड्रयव्हर पर्यंत, शिक्षकांपासून सहकाऱ्यांपर्यंत, वरिष्ठांपासून मित्रांपर्यंत ... माणूस जोडण्याचं हे अफाट कौशल्य हेवा वाटण्यासारखं आहे. इतक्या सगळ्या गोष्टी करायला त्यांना वेळ आणि ताकद कशी मिळते ह्याबद्दल त्यांनी एक पुस्तक आता लिहिलं पाहिजे. २५० पानी पुस्तकांत बऱ्याच आठवणी आपल्या तरी कितीतरी राहून गेल्याच असतील. ज्याप्रमाणे पंढरपूरची दिंडी वर्षातून दोनदा असते त्याप्रमाणे पुस्तकाचा दुसरा भाग आला पाहिजे. आणि हो, वारी दरवर्षी दोनदा असते. त्याप्रमाणे दरवर्षी त्यांनी लिहिले तर वाचक वाचायला तयार असतीलच ही खात्री वाटते.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...