प्लँटोन (Planton)



पुस्तक - प्लँटोन (Planton)
लेखक - डॉ. संजय ढोले (Sanjay Dhole)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ४६२
ISBN -9789392482656
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस पहिली आवृत्ती जानेवारी २०२२
छापील किंमत - ५९५

मराठीत विज्ञानकथा आणि विज्ञानकादंबऱ्या ह्यांचं लेखन इतर साहित्यप्रकारांच्या मानाने कमी होतं. त्यामुळे वाचनालयात "प्लँटोन" ही विज्ञानकादंबरी दिसल्यावर उत्सुकतेने हातात घेतली. लेखकाचा परिचय, पाठमजकूर (ब्लर्ब) वाचून खूप आश्वासक वाटली. पण प्रत्यक्ष वाचायला घेतल्यावर निराशा झाली. पहिली १०० पानं वाचली तरी त्यात विज्ञान न येता
कादंबरीचा स्थलपरिचय, पात्रपरिचय, कालपरिचय, नेपथ्यरचना ह्यापद्धतीचं लेखनच होतं.
सरकारी वन खात्यात एक अधिकारी/वनपाल बदली होऊन नंदुरबाराच्या जंगलात येतो. तिथे त्याच्या लक्षात येतं की वनखात्याचे अधिकारी, स्थानिक राजकारणी आणि बडी धेंडे ह्यांच्या भ्रष्ट यूतीतून जंगलाचा ऱ्हास होतोय. तसंच इथल्या गरिबांवर आदिवासींवरही अन्याय होतोय. कादंबरीत ही नेपथ्यरचना करण्यात शे-दीडशे पानं घालवली आहेत. तोपर्यंत वैज्ञानिक भाग तर आलाच नव्हता. म्हणून पुढे जरा भराभर वाचलं मुख्य वाक्य वाचून कथानकाचा अंदाज घेत पुढे गेलो.
बऱ्याच पानांनंतर "प्लँटोन" ह्या वैज्ञानिक चमत्काराबद्दल कथानक पुढे सरकायला लागलं होतं. पण त्यातही वैज्ञानिक किचकटपणा होता. अद्भुतरम्यता कमी होती. पुढे हा चमत्कार वापरून गुन्हेगार कसे शोधले; नायक, नायिका त्यांच्या जोड्या ह्यांनी अन्यायाला वाचा कशी फोडली असं सगळं वर्णन आहे.
टीव्ही वर खाण्यापिण्यावरच्या कार्यक्रमात पाककृती सांगताना "नमक स्वादानुसार .. / चवीपुरते मीठ .." असं सांगतात तसं इथे चिमटीभर विज्ञान पातेलंभर सामाजिक विषयात घातलंय. सामाजिक विषयातही नवखेपण नाही. निवेदन शैली रटाळ आहे. त्यामुळे ४६२ पानांपैकी उरलेली ३०० पाने (म्हणजे जवळजवळ तीन पुस्तकांचा ऐवज) सविस्तरपणे वाचावीत असं वाटलं नाही. त्यामुळे पुढची पाने वरवर चाळून संपवली.

काही पाने उदाहरणादाखल...
नवीन वनपाल त्याच्या क्षेत्रातल्या वैज्ञानिक संस्थेला भेट देतो तो प्रसंग


वनस्पतींना भावना असतात, स्मृती असते ह्याबद्दलचे संशोधन पुढे मांडले जाते तो भाग

नायक, नायिका धाडस करून गुन्हेगारांचा माग काढतात तो भाग.



पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती



तुम्ही ही कादंबरी वाचली असेल किंवा नंतर वाचलीत तर तुमचा अभिप्राय नक्की कळवा.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

Deep state (डीप स्टेट)

पुस्तक - Deep state (डीप स्टेट) लेखक - मंदार जोगळेकर ( Mandar Joglekar) भाषा -  इंग्रजी ( English) पाने - १६० प्रकाशन - बुकगंगा पब्लिकेशन, ड...