भयातून निर्भयाकडे... संवाद सेतू (Bhayatun nirbhayatekade... sanvad setu)



पुस्तक - भयातून निर्भयाकडे... संवाद सेतू (Bhayatun nirbhayakade...sanvad setu)
लेखिका - डॉ. सुनिता चव्हाण (Dr. Sunita Chavhan)
भाषा - मराठी
पाने - १६८
प्रकाशन - डिंपल पब्लिकेशन. प्रथमावृत्ती - मार्च २०२२
छापील किंमत - २५०/- रु.
ISBN - 978-93-92419-09-6

"डिंपल पब्लिकेशन"चे कौतुक मुळे ह्यांनी आपणहून हे पुस्तक मला वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्वप्रथ त्यांचे आभार मानतो. माझ्या हौशीने पण नियमित वाचन व परीक्षणलेखनाचे श्री. कौतुक मुळे ह्यांनी "कौतुक"च केले आहे असे मी समजतो.

डॉ. सुनिता चव्हाण यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातले अनुभव लेखांच्या रूपात सादर करून वेगवेगळ्या आरोग्य विषयक प्रश्नांवर वाचकांशी संवाद साधला आहे. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि जीवनशैली अश्या विषयांवर हे लेख आहेत. डॉक्टरांकडे एखादा पेशंट आला आहे; तो आपली समस्या सांगतो आहे आणि त्यावर डॉक्टरांचं समुपदेशन असं बहुतेक लेखांचं स्वरूप आहे. त्यातून ह्या समस्येकडे बघण्याचा सर्वसाधारण लोकांचा दृष्टीकोन, समज-गैरसमज दिसतात. तर समस्यांचा विचार कसा केला पाहिजे; त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे हे डॉक्टरांच्या संवादातून, मनोगतातून दिसतं.

अनुक्रमणिकेवर एक दृष्टीक्षेप टाकूया.

बहुतेक लेखांचे विषय त्यांच्या नावावरून कळले असतीलच.

रजोनिवृत्ती, स्तनकॅन्सर, मासिकपाळी,प्रसूतिवेदना इ. लेख फक्त स्त्रियांचीच नाहीत तर पुरुषांनीही वाचून आपल्या जाणिवेत भर टाकली पाहिजे. जेणेकरून आपल्या घरातल्या महिला सदस्य असोत की सहविद्यार्थी, सहकारी किंवा आणि कोणीही स्त्री; एक स्त्री म्हणून त्यांना काही विशेष त्रास सहन करावे लागतात आणि त्यासाठी त्यांना आपल्या सहकार्याची गरज असते हे जाणवेल.

"स्पर्श : चांगला / वाईट" ह्यातून लैंगिक शिक्षणाचे महत्त्व आणि लहानपणापासून अनोळखी लोकांच्या स्पर्शाबद्दल लहान मुलांना समजावून सतर्क करण्याबद्दल सुचवले आहे. तसेच मुलांच्या वागण्यात काही फरक पडला असेल; ते बुजत असतील; निराश असतील तर घराबाहेर त्यांना कोणी काही वाईट अनुभव तर येत नाहीत ना ह्याबद्दल घराच्या मोठ्या माणसांनी सतर्क राहावे हे सुचवले आहे.

"हस्तमैथुन एक समस्या" ह्यात गैरसमजांचं निराकरण केलं आहे. बाकी लेखांत वजनवाढ, मुलांवरचे संस्कार, मुलांवरचा अभ्यासाचा बोजा; नैराश्यातून बाहेर येण्यासाठी मानसिक व्यायाम, सासू-सून ह्यांचे नाते इ. नेहमी चर्चिले जाणारे विषयही आहेत. देहदान आणि त्याचा समाजाला होणार उपयोग ह्याविषयी प्राथमिक माहिती देणारा एक लेख आहे. "इमर्जन्सी केसेस" हाताळण्याचे त्यांचे अनुभव सुद्धा निवेदनाच्या ओघात येतात.


काही उदाहरणे बघूया

"मेनोपॉज मधील संभ्रमता"



रागीट, चिडचिडी मुले आणि त्यांचे पालक ह्यांचा संबंधांबद्दल



एका "इमर्जन्सी केस"चा अनुभव.



एक व्यक्ती म्हणून, एक समाज म्हणून सध्या आपल्यासमोर ज्या महत्त्वाचे आरोग्याविषयक प्रश्न आहेत त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक प्रश्न दिसायला सोपा असला तरी व्यक्तिगणिक त्याची कारणं, उपचार हे बदलत जाणार. त्यामुळे प्रत्येक प्रश्न सखोलपणे मांडायचा तर प्रत्येकावर एक पुस्तक होऊ शकतं. त्यामुळे प्रश्नाकडे लक्ष वेधलं जाईल, त्याबद्दल विचार तरी सुरु होईल इतपत माहिती पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे.

लेखिकेची निवेदन शैली सहज संवादी आहे. आपण समरसून वाचतो. पुस्तकाच्या वाचनातून ह्या समस्यांचं भय उत्पन्न न होता त्याबद्दल जाणीव वाढते हे विशेष. आपल्या कुटुंबियांशी, डॉक्टरांशी, तज्ज्ञांशी संवाद साधून गैरसमज दूर केले पाहिजेत हा पुस्तकाचा संदेश पोचवणारं मुखपृष्ठसुद्धा तितकंच बोलकं आहे. 

विषय किंवा माहिती पूर्णपणे नवीन आहे असं म्हणता येणार नाही, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधले, पुरवण्यांमधले लेख, ब्लॉग, फेसबुक पोस्ट इ. मधून हे विषय चर्चिले जातातच. पण जितक्यांदा ते पुढे येतील तितकं चांगलंच. प्रत्येकवेळी कोणी ना कोणी नवीन वाचक सापडेलच. ज्यांनी आधी काही वाचलं आहे त्यांनासुद्धा काहीतरी नवीन सापडेल. त्यादृष्टीने हे पुस्तक वाचनीय आहे.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

Deep state (डीप स्टेट)

पुस्तक - Deep state (डीप स्टेट) लेखक - मंदार जोगळेकर ( Mandar Joglekar) भाषा -  इंग्रजी ( English) पाने - १६० प्रकाशन - बुकगंगा पब्लिकेशन, ड...