वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi)



पुस्तक - वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi)
लेखक - सदानंद दाते (Sadanand Date)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४४
प्रकाशन - समकालीन प्रकाशन. डिसेंबर २०२१
छापील किंमत - रु. २००/-
ISBN - 978-93-86622-78-5


"पोलीस" हा शब्द उच्चारल्यावर प्रत्येकाच्या मनात येणारे भाव वेगवेगळे असतील. सगळं नीट सुरु असताना अचानक "पोलीस आले" म्हणजे काहीतरी भानगड झाली असं वाटून भीती वाटेल. वादावादी झालेल्या, तक्रार झालेल्या ठिकाणी पोलीस आले की आता पापभिरू माणसाच्या मागेच नक्की लचांड लागणार; पंचनामा, साक्ष ह्यासाठी पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागणार हे मनात येऊन त्रागा केला जाईल. "आता बघा, वरून फोन आला की नाहीतर पैसे दाबले की गुन्हेगार सुटणार" असा तुच्छतादर्शक स्वर निघेल. पण दंगल, जाळपोळ चालू असताना पोलीस आले की आश्वस्त वाटेल. देशविघातक आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी लाठीमार, गोळीबार केला की "असंच सडकवलं ह्या लोकांना पाहिजे पोलिसांनी" असं म्हणून कौतुक केलं जाईल. एखाद्या अपहृत मुलाची सुटका केली, चोरटी टोळी पकडली, एन्काउंटर मध्ये गुंडाचा खात्मा केला की "भले शाब्बास, पोलिसांना आता सरळ मोकळा हात दिला पाहिजे" असं म्हणताना आश्वस्त वाटेल. तर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस जवान शहीद किंवा २६/११ च्या हल्ल्यात बलिदान देऊन अतिरेक्यांना थोपवणारे पोलीस दिसले की कृतज्ञतेने डोळे पाणावतील. पोलीस दलाबद्दल भावांनांचे हे कितीतरी रंग. प्रत्येक रंग आपापल्या जागी, आपापल्या वेळी तितकाच खरा. एका "खाकी वर्दी"मुळे आपल्याला इतके रंग दिसतात. तर ती वर्दी प्रत्यक्ष चढवल्यावर किती रंग दिसत असतील ?

खाकी वर्दीच्या आतल्या माणसाने स्वतःकडे बघितलं आणि इतरांनाही बघू दिलं तर काय दिसेल हे मांडणारं पुस्तक आहे - "वर्दीतल्या माणसाच्या नोंदी". पुस्तकाचे लेखक सदानंद दाते हे सध्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) सध्याचे प्रमुख आहेत. ते १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ते ह्या पदावर असतील. त्या आधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS)चे प्रमुख होते. मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अतुलनीय शौर्य दाखवले होते. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. सीबीआय मध्ये त्यांनी काम केले आहे. कर्त्यव्यदक्ष, कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून पोलीस दलात आणि सर्वसामान्य लोकांमध्येही त्यांनी नावलैकिक मिळवलेला आहे.

अशा सदानंद दाते ह्यांनी पोलीस दलातल्या प्रवेशापासून पुस्तक लेखनापर्यंतच्या कालावधीतल्या महत्त्वाच्या अनुभवांबद्दल ह्या पुस्तकात लिहिले आहे. पण हे त्यांचे आत्मचरित्र नाही. गुन्हे शोधांची थरारक कथामाला नाही. पोलीस दलातल्या "आतल्या" खबरा सांगणारे पुस्तक नाही. प्रसिद्ध व्यक्तींची नावे घेऊन, लफडी बाहेर काढून, गौप्यस्फोट करून सनसनाटी निर्माण करणारे पुस्तकही नाही. बराच माल-मसाला हाताशी असूनही स्वयंपाक्याने सात्त्विक थाळी रांधावी तसे पुस्तकाचे सात्विक स्वरूप आहे. सात्विक, पौष्टिक, वैचारिक खाद्य वाचकाला मिळावे हा त्यांचा उद्देश आहे. चांगले - वाईट अनुभव जसे आले तसे गोपनीयतेच्या मर्यादेत राहून त्यांनी लिहिले आहेत. पोलीस दलात प्रवेश करणारा उमेदवार ते एक सक्षम अधिकारी हे जडणघडण कशी होत गेली, व्यक्तिमत्त्व विकास कसा होत गेला हे दाखवलं आहे. स्वतःकडे, पोलिसांकडे आणि व्यवस्थेकडे बघायचा दृष्टिकोन कसा परिपक्व होत गेला हे आपल्याला समजतं.

हे पुस्तक छोट्या छोट्या लेखांचा संग्रह आहे. एकेक मुद्दा घेऊन त्या संबंधीचे महत्त्वाचे प्रसंग, त्यांचे आधीचे विचार, त्यात झालेला बदल, कामाची परिणामकारकता अशा प्रकारे तो मुद्दा स्पष्ट केला आहे. उदा. पोलिसांवर असणारा राजकीय दबाव हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. त्याबद्दल ते लिहितात ".. अनेकांना असं वाटतं, की पोलीस अधिकाऱ्यांना अनेक वरिष्ठांकडून किंवा राजकारण्यांकडून बेकायदा आदेश दिले जातात, आणि नोकरी टिकवण्यासाठी त्यांना ते पाळावेच लागतात. पण माझे प्रत्यक्ष अनुभव सांगतात की ते आदेश नसून विनंती असते. कारण आपण करायला सांगतोय ते बेकायदा असल्याची जाणीव त्या अधिकाऱ्यालाही असतेच. आपण सौम्यपणे 'हे शक्य नाही' असं सांगितलं तर आपल्यावर चुकीचं काम करण्याची सक्ती कोणीही करू शकत नाही. .... आपल्या शक्तीप्रमाणे आपण आपल्या आसापसाच्या गैरव्यवहारांची साखळी काही प्रमाणात तोडूही शकतो". अशाप्रकारे परिस्थितीचं वस्तुनिष्ठ स्वरूप ते लिहितात.

काही लेखांबद्दल सांगतो.
"पोलीस दलातला प्रवेश", "सुरवातीचे दिवस" - पोलीस दलात IPS अधिकारी म्हणून जॉईन झाल्यावर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करायला मिळाले. रत्नागिरीला पहिल्याच दिवशी अधिकाऱ्याने थेट भाषणच द्यायला सुरुवात केली. "मोठ्या कामावर लक्ष द्या, दारू जुगाराच्या अड्ड्यांवर धाडी टाकण्यात धन्यता मानू नका ", वगैरे. पण लोकांच्या तक्रारी त्यासंबंधीच येऊ लागल्या. म्हणून कारवाई केली तर सहाव्या दिवशीच बदली ! पुढे विदर्भात नक्षलग्रस्त भागात काम करायला लागले/मिळाले. नक्षलग्रस्त शरण यावेत ह्यासाठी आदिवासींच्या साथीने जनजागृती केली ते अनुभव आहेत. आणि पोलीस भरती करताना स्थानिक राजकारण्याचा दबाव कसा आला हे अनुभव आहेत.

कामाचा भक्कम पाया : वाचन आणि मनन - यशस्वी माणसे भरपूर वाचतात. त्यावर चिंतन करतात. गुण आणि बदल आत्मसात करतात. सदानंद दाते त्या मालिकेतील एक. लहानपणापासून असलेली वाचनाची आवड त्यांनी पोलीस दलातल्या व्यग्र दिनाचर्येतही जोपासली आहे.

विरोधाभासांच्या राजधानीत, झेड सिक्युरिटीच्या अंतरंगात, पोलिसांची परीक्षा - उत्सवी गर्दी - हे सगळे लेख विशिष्ट प्रकारच्या बंदोबस्तावर आधारित आहेत. मुंबई महानगरात ड्युटी करताना, सण उत्सव, बंद, मोर्चे ह्यांना नेहमी तोंड द्यावं लागतं. जातीय दंगली होतात. एकेकडे श्रीमंत वस्ती तर दुसरीकडे अति गरिबी. थोड्या पैशांसाठी गुन्हेगारी करणारे लोक आढळतात. परिस्थती लवकरात लवकर निवळण्यासाठी पोलीस दलाला कुशल काम करावं लागतं. मुंबई दंगल, "मुंबई बंद", झोपडपट्टीवरची कारवाई असे हातघाईचे प्रसंग पुस्तकात आहेत. तत्कालीन उपपंतप्रधान अडवाणींच्या मुंबई दौऱ्याच्या उदाहरणातून अशा VIP दौऱ्यांसाठी प्रत्येक मिनिटाचे प्लँनिंग का आणि कसे करावे लागते हे समजते.

२६/११, फोर्स वनची जडणघडण - २६/११च्या हल्ल्याच्या वेळी दाते स्वतः कामा हॉस्पिटल मध्ये होते. तुटपुंज्या शास्त्रास्त्रांनिशी कसाब आणि इतर अतिरेक्यांना बराच काळ रोखून धरण्याची कामगिरी बजावली. तो प्रसंग त्यांच्या शब्दांतच वाचण्यासारखा आहे. ह्या हल्ल्यानंतर अशा प्रसंगाला तोंड देण्यासाठी विशेष पथक तयार केले गेले. त्यात सामील झालेल्या सदस्यांसाठी ध्येयधोरणे कशी ठरवली, ट्रेनिंग कसे दिले, गुणवत्ता कशी राखली याचे अनुभव सांगितले आहेत.

पुढच्या काही प्रकरणांत पोलीस दलातले चांगले अधिकारी कसे काम करत; त्यांचे वागणे बघून लेखकाने काय शिकवण घेतली हे सांगितले आहे. पोलीस दलातला भ्रष्टाचार त्यांनी नाकारला नाहीये. स्वतःच्या परीने भ्रष्टाचाराचा मुकाबला कसा केला, स्वच्छ वागणे कसे राखले, त्यासाठी कधी वरिष्ठांची नाराजी किंवा बदलीची शिक्षा मिळाली हे अनुभव लिहिले आहेत.

पोलिसांचे काम समाजापर्यंत पोचण्यासाठी पत्रकार, वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्यांची मदत होते. तर सनसनाटी बातम्या, पेरलेल्या बातम्या, खऱ्या घटनेला चुकीचा रंग देणे ह्याचा त्रासही पोलिसांना होतो. दात्यांनी केलेल्या पोलीस भरतीला असा चुकीचा रंग देऊन बातम्या प्रसारित केल्यावर ते अस्वस्थ झाले. पण ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर ह्यांच्या सल्ल्याने ह्या बातम्यांना किती महत्व द्यायचं ह्याचं तारतम्य वाढलं.

भ्रष्टाचार भारतीय समाजात अंतर्बाह्य मुरलेला आहे. राजकारणी आणि पोलीस हे त्याच समाजातून येतात म्हणून भ्रष्ट असतात. अशा सामाजिक परिस्थितीत बदल होण्यासाठी काय करावं लागेल; ते किती मोठं कार्य आहे; ह्याबद्दल त्यांचं चिंतन आहे. असा आदर्श समाज निर्माण व्हायला खूप वेळ लागेल. ह्या सामाजिक सत्याचा स्वीकार केला तरच किमान आपल्या हातातल्या गोष्टींमध्ये बदल घडवू शकू असे त्यांचे प्रतिपादन आहे. अशी परिपक्वता येण्यासाठी विपश्यनेचाही उपयोग झाल्याचा उल्लेख आहे. त्यांनी अमेरीकेत जाऊन वर्षभर अभ्यास केला, मग पी.एच.डी . मिळवली. ह्या अभ्यासातून त्यांनी पोलीस व्यवस्थेचे जागतिक भान मिळवले. हे सगळे अनुभव वाचताना कळते की नेहमीच्या पोलीस अधिकारी प्रतिमेपेक्षा ते का आणि कसे वेगळे ठरतायत.

काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका


मुंबईतील झोपडपट्टी कारवाई वेळच्या बंदोबस्ताचा अनुभव



वरिष्ठांचा अहंकार दुखावल्यामुळे दिला जाणारा त्रास



पोलीस व्यवस्थेच्या दुरवस्थेबद्दल चिंतन



पोलीस खात्यातल्या स्वतःच्या प्रगतीसह स्वतःच्या मानसिक प्रगतीचा आणि पुढे सामाजिक प्रगतीचा आलेख मांडत हे पुस्तक पूर्ण होते. त्यामुळे हे पुस्तक फक्त वैयक्तिक अनुभवांच्या नोंदी न राहता एकूणच सध्याचा भारतीय समाजाबद्दलच्या नोंदी आहेत. नक्कीच वाचनीय आणि चिंतनीय आहेत. विशेष म्हणजे भाषा अतिशय प्रवाही आहे. प्रत्येक मुद्दा, प्रसंग थोडक्यात पण परिस्थितीची कल्पना येईल इतक्या तपशीलासह मांडला आहे. त्यामुळे कमी पानांतही मोठा आशय आहे.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar)

पुस्तक - छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar) लेखक - गजानन भास्कर मेहंदळे (Gajanan Bhaskar Meha...