अ-मृत पंथाचा यात्री (Amrut panthacha yatri )



पुस्तक - अ-मृत पंथाचा यात्री (A-mrut panthacha yatri)
लेखक - दिनकर जोशी (Dinakar Joshi)
अनुवादक - डॉ. सुषमा करोगल (Dr. Shushma Karogal)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - અ-મૃત પંથનો યાત્રી (अमृत पंथनो यात्री A-mrut panthano yatri)
मूळ पुस्तकाची भाषा - गुजराथी (Gujarati)
पाने - १९८
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस, ऑक्टोबर २०११
ISBN - 978-81-8498-291-4
छापील किंमत - रु. १८०/-

गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर ह्यांच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. त्यांच्या लहानपणापासून निधनापर्यंत पूर्ण जीवनपट आहे. कथनाचा भर त्यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यात पुन्हा पुन्हा होणारे आप्तजनांचे मृत्यू, परदेशांत भेटलेले खास चाहते व्यक्ती ह्यावर आहे. त्यामुळे रवींद्रनाथ - एक माणूस - म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली असेल ह्याचा अंदाज येतो. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका आणि कार्य ह्यांचे चित्रण मनाला भिडत नाही. एका चांगल्या, बऱ्यापैकी नावाजलेल्या लेखक-कवीचे चरित्र वाचतोय असं वाटत राहतं. शांतिनिकेतनाची त्यांनी सुरुवात केली हे कळते पण नक्की काय प्रयोग केले. ते त्यांना कसे सुचले असतील. त्याचे अनुभव कसे असतील हा भाग काहीच येत नाही. रवींद्र संगीत हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा भाग आहे. तो प्रभावीपणे येत नाही. गांधीजी आणि त्यांच्या भेटी, जालियनवाला हत्याकांडाच्या वेळी त्यांनी घेतलेली भूमिका असे काही राजकीय प्रसंग येतात. पण एकूणच चार भेटी गाठी, थोडी पत्रकबाजी ह्यापेक्षा जास्त काही घडल्याचं दिसत नाही. मात्र प्रसंगांच्या वर्णनात त्यांचे लाखो चाहते, समाजावर प्रभाव असे उल्लेख येतात. त्यामुळे ताळमेळ लागत नाही.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


ठाकूर खानदान म्हणजे जुन्या जमीदारी कुटुंबाचे. त्यात वाढणाऱ्या रवींद्रला जरा पाश्चात्य जीवनशैलीची ओळख व्हावी, लंडनला जायची पूर्वतयारी व्हावी अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांना लहानपणी मुंबईला तर्खडकरांच्या घरी काही महिने राहायला पाठवलं होतं. त्यांच्या मुलीशी त्यांचे स्नेहसंबंध जमले. पण घरच्यांनी त्याला पसंती दिली नाही. त्या वास्तव्यातला एक प्रसंग




गांधी-ठाकूर भेटीचा प्रसंग




आज आपण त्यांना मोठे साहित्यिक म्हणून ओळखतो. त्या काळीही ते लोकप्रिय होतेच. पण समीक्षक आणि अभिजन वर्ग मात्र काही प्रमाणात त्यांची हेटाळणी करत होता त्याबद्दलचा एक प्रसंग.



परदेशात त्यांना भेटणारे चाहते अनेक होते. त्यातले काही
तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होत. महिला जणू एकतर्फी प्रेमात पडत. असं ह्या पुस्तकातून जाणवतं. वृद्ध ठाकूरांच्या परदेश प्रवासात त्यांची पूर्ण बडदास्त ठेवणारी परदेशी चाहती होती. संगीत, संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी परदेशी लोकसुद्धा शांतिनिकेतन मध्ये राहत होते. अशांपैकी एलिझाबेथ बद्दलचा एक प्रसंग





मी ठाकूरांचे एक पुस्तक वाचले आहे. आणि त्यांच्याबद्दल जुजबी सामान्य ज्ञान आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर वाचावं अशी इच्छा होती. मला माहीत असलेले पैलू सुद्धा पुस्तकात स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे अपरिचित पैलू तर बरेच सुटले असतील असं वाटतं. इतक्या मोठ्या आणि विविधांगी प्रतिभेच्या धनी असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला २०० पानांत बांधण्याचं काम कठीण आहे. ह्या पुस्तकाने ते समर्थपणे पेललं आहे असं वाटत नाही. पुस्तकाचे निवेदन मध्येच ललित शैलीत संवादपर होते, मध्येच एखाद्या निबंधाप्रमाणे माहितीपर होते. त्यामुळे मी कथनात रममाण झालो नाही. अनुवाद चांगला झाला आहे.

पुस्तक वाचून समाधान झालं नाही. रवींद्रनाथांवर अजून चांगलं पुस्तक असेल तर नक्की सुचवा.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...