रेत समाधी (Ret Samadhi)




पुस्तक - रेत समाधी (Ret Samadhi)
लेखिका - गीतांजली श्री (Geetanjali Shree)
अनुवादक - सरिता आठवले (Sarita Athavale)
भाषा - मराठी 
पाने - ४१४
मूळ पुस्तक - रेत समाधी
भाषा - हिंदी
प्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन, फेब्रुवारी २०२३
ISBN - 978-81-959784-3-4
छापील किंमत - रु. ४९९/-

वाचनालयात नवीन पुस्तक, "बुकर पारितोषिक" विजेते पुस्तक दिसल्यावर उत्सुकतेने हातात घेतलं. पाठमजकूर (ब्लर्ब) सुद्धा इंटरेस्टिंग वाटला. "ऐंशी वर्षाची एक वृद्धा पतिनिधनांनंतर घरात निराश बसली आहे. तिला पुन्हा माणसात आणण्यासाठी कुटुंबीय प्रयत्न करतायत. पण तिला हे काही नकोय आणि अचानक तिला काहीतरी नवीन आयुष्य हवंय. ती मुक्त स्वच्छंद होते .. " असं लिहिलं होतं(वरच्या फोटोत ते तुम्ही पूर्ण वाचू शकाल). त्यामुळे उत्सुकतेने पुस्तक वाचायला घेतलं. मात्र पहिली कितीतरी पानं वाचली तरी गोष्ट काही पुढेच सरकेना. घरातले लोक तिच्याशी बोलायचा प्रत्यन करतायत हे कळलं. पण ते काही खास करतायत असं दिसत नव्हतं. ज्या नेपथ्याकडे फक्त अंगुलीनिर्देश पुरेसा आहे त्या नेपथ्याचं, घरातल्या साध्या साध्या गोष्टींचं वर्णन करण्यात कितीतरी परिच्छेद. मग मी पानं झरझर वाचून मूळ कथानक कुठे सुरु होतंय ते बघतोय; तर नाहीच. वर्णनं, "रँडम" प्रसंग, कोणाचे कल्पनाविलास, काही स्वप्न, असंबद्ध बडबड.

कदाचित ह्या वेळी लेखिकेची शैली मला पटत नसेल; जरा ताजेतवाने असताना वाचूया म्हणून वेगळ्या वेळी वाचलं, दोन दिवसांनी वाचलं. पण काहीच अर्थबोध झाला नाही. पुस्तकाने पकड घेतली नाहीच. चाळून संपवून टाकलं.

नुसता शाब्दिक अतिसार ! बाहेर बरंच येतंय पण उपयोगाचं काहीच नाही ! त्यामुळे ते वाचण्यात वेळ घालवला नाही. 

तुम्ही सुद्धा ही थोडी पानं वाचून काही अंदाज येतोय का बघा. काही प्रसंगांची उदाहरणं खाली दिली आहेत. ते प्रसंग काय आहेत आणि का आहेत, हे मला कळलं नाही त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी सांगू शकत नाही.

प्रसंग १




प्रसंग २




प्रसंग ३




"आंतरराष्ट्रीय पारितोषिक" प्राप्त पुस्तकांचा/लेखकांचा हा धडकी भरणारा अनुभव नवा नाही. "White tiger ", "God of small things", नेमाडे यांचे हिंदू, सलमान रश्दींचे “Shalimar the clown” अशीच कंटाळवाणी. 
"God of small things" मध्ये सुद्धा कसं भरताड वर्णन आहे हे मी लिहिलेल्या परीक्षणात वाचू शकाल
http://learnmarathiwithkaushik.com/courses/the-god-of-small-thing/
"हिंदू.. " पण तसंच
http://learnmarathiwithkaushik.com/courses/hindu-jaganyachi-sammruddh-adagal/


लेखक, संपादक, प्रकाशक, "सुजाण वाचक", पुरस्कार समिती, अनुवादक, अनुवादाचा संपादक,आणि अनुवादाचा प्रकाशक इतक्या चाळण्यांतून सुद्धा असा मजकूर बाहेर येतो आणि तो गौरवला जातो! काही वेगळ्याच मुशीतून ही माणसं घडवली असावी. 

हिंदीतल्या "रेत"ला मराठीत वाळू किंवा रेती म्हणतो. "रेत" चा मराठी अर्थ वीर्य, शुक्राणू असा आहे. भाषांतर करताना नाव बदलायला पाहिजे होते. हा सुद्धा एक विचित्रपणा आहे.

खरं म्हणजे हे परीक्षण लिहिण्यात सुद्धा वेळ घालवणार नव्हतो. पण कदाचित माझं परीक्षण वाचून वाचकांना कल्पना येईल आणि हे पुस्तक घेताना ते सावध होतील. आणि ज्यांना पुस्तक आवडलं असेल ते मला त्यांचं मत सांगतील. म्हणून परीक्षण लिहायचं ठरवलं. त्यामुळे तुम्ही पुस्तक वाचायचं धाडस केलं असेल तर अनुभव सांगा. 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...