पुस्तक - उत्तरकांड (Uttarkand)
लेखक - डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bahirappa)
अनुवादक - उमा कुलकर्णी (Uma Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तकाचे नाव - ಉತ್ತರಕಾಂಡ (उत्तरकांड)
मूळ पुस्तकाची भाषा - कन्नड (Kannada)
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. ऑगस्ट २०१९
छापील किंमत - रु. ३९५/-
ISBN - 9789353173104
रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीयांचा चिरंतन ठेवा. कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावी अशा गोष्टी. इतकी वैशिट्यपूर्ण पात्रे, नाट्यमय प्रसंग, नैतिक तिढे की प्रत्येक लेखकाला ती कथा आपल्या पद्धतीने, आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या विचारसरणीतून सांगावीशी वाटते. मूळ लिखित कथानकात असलेले प्रसंग कसे घडले असतील ह्याचं तपशीलवार चित्र उभं करावंसं वाटतं. मूळ लिखित कथानकात नसलेले प्रसंग, गाळलेल्या जागा किंवा प्रसंगांची सांधे जोडणी स्वतःच्या प्रतिभेने उभी करावीशी वाटते. त्या त्या प्रसंगात संबंधित पात्राच्या मनात काय विचार आले असतील, काय चलबिचल झाली असेल, आनंद, दुःख, द्वेष, मत्सर, हताशा, प्रेम, वात्सल्य हे जाणून घेण्याचं आव्हान त्यांना पेलावंसं वाटतं. त्यामुळे रामायण, महाभारत आणि त्यावर आधारित कथा, कादंबऱ्या, नाटकं, लोकनाट्य, लोकनृत्य, गौळणी, कीर्तने ह्या सगळ्या माध्यमातून हजारो वर्षे नाना रूपांत हा ठेवा आपल्या पर्यंत पोचला आहे. भारतीय सहिष्णुतेचं वैशिष्ट्य हे की ह्यातली कितीतरी कथानकं परस्परविरोधी आहेत. तरी समाजाने त्याचा खुल्या मानाने स्वीकार केला आहे. "असंही घडलं असू शकतं" ही शक्यता मांडण्याचं लेखक-कलाकाराचं स्वातंत्र्य आपण मान्य करतो. ह्याच पुनर्कथनच्या ऐतिहासिक परंपरेतलं एक पुस्तक म्हणजे भैरप्पांचं "उत्तरकांड". मूळ कन्नड भाषेतलं पुस्तक उमाताईंनी मराठीत आणून मोलाची भर मराठी साहित्यात घातली आहे.
लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती
हे रामायण आहे. त्यामुळे त्यात काय प्रसंग येतात हे कोणालाही वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला कथनाच्या मांडणीतलं वेगळेपण सांगतो. ह्या कादंबरीत रामायण सीतेच्या नजरेतून मांडलं आहे. ती इथे निवेदिका आहे. तिच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि रामाच्या जन्मापासून रामाच्या मृत्यूपर्यंत महत्त्वाचे प्रसंग त्यात आहे. त्या आधीचेही काही प्रसंग आहेत. ज्या प्रसंगात सीता उपस्थित होती ते प्रसंग ती स्वतः सांगते आहे. तर इतर प्रसंग तिला कोणीतरी गप्पागोष्टींत सांगतंय अशी निवेदनाची रचना आहे. त्यामुळे रामायणातले बरेचसे महत्त्वाचे प्रसंग त्यात येतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामायण ही दैवी कथा नसून ते हाडामासाच्या-भावभावना असणाऱ्या माणसांची गोष्ट आहे अशा पद्धतीने प्रसंग मांडले आहेत. त्यामुळे रामायणातले चमत्कार इथे नाहीत. असे प्रसंग प्रत्यक्ष घडले असू शकतील असे मांडले आहेत. म्हणजे सीता जमिनीत सापडली असं न दाखवता यज्ञासाठीच्या भूमीत एक अनाथ बालक सापडलं असं दाखवलं आहे. वानरसेना असं न दाखवता, माणसांचीच पण बलदंड आणि शरीर सौष्ठवाचे महत्त्व असणारी ती जमात होती. असं दाखवलं आहे. त्यामुळे हनुमान ह्या दैवी वानराने उड्डाण करून लंका गाठली असं नाही तर एक बलदंड ब्रह्मचारी गुप्तवेशाने तिथे आला असं वर्णन आहे. "अहिल्या शिळा राघवें उध्दरिली" असं न होता, रामाने गौतम ऋषींची समजूत काढून अहिल्येला क्षमा करायला लावलं. परित्यक्तेचं जीवन जगणाऱ्या, "शिळे सम" कठीण आयुष्य जगणाऱ्या अहिल्येला पुन्हा माणसांत आणलं असं वर्णन केलं आहे. सीतेचं अग्निदिव्य आणि सीता भूमीत गडप झाली ह्याचा लावलेला अर्थ फारच पटणारा आणि भावुक करणारा आहे.
तिसरं म्हणजे राम, लक्ष्मण, सीता, उर्मिला, कैकयी, कौसल्या, दशरथ ह्या व्यक्तिरेखांच्या मनात काय चाललं असेल ह्याचा वेध घेतला आहे. राम म्हणजे सत्यनिष्ठ आणि न्यायप्रिय हे चित्र आपल्या डोळ्यासमोर असतं. पण सत्य काय किंवा योग्य काय हे जेव्हा परिस्थितीवर अवलंबून असेल तेव्हा रामाने जे निर्णय घेतले ते लक्ष्मणाला, सीतेला पटले असतील का? "नियमांवरवर बोट ठेवून", केवळ "शाब्दिक अर्थ घेऊन" स्वतःला त्रास करून घेणे म्हणजेच सत्यप्रियता का? हा प्रश्न पूर्ण कादंबरीभर आहे. अहिल्येला क्षमा मिळवून देणारा राम राजा झाल्यावर मात्र सीतेला न केलेल्या पापाची शिक्षा देतो. का ? तर... राजा म्हणून असा त्याग केलेला दाखवणं हे त्याच्या स्वप्रतिमामग्नतेमुळे का ? असा प्रश्न कादंबरी उभी करते. वनवासात सीता जाते पण त्यात होणार त्रास, मातृत्व न मिळण्याचं दुःख, रामाने त्याग केल्यानंतर झालेला संताप, रामाशी संबंध पूर्ण तोडण्याचा तिचा प्रवास ह्यातून एक "माणूस" म्हणून सीता आपल्यासमोर उभी राहते. हे कादंबरीचं बलस्थान. स्त्रीला देवी म्हणून पुजून तिचं माणूसपण झाकोळण्याच्या आपल्या सामाजिक सवयीला हे पुस्तक छेद देतं.
सीता आणि लक्ष्मण ह्यांच्यातील भावनिक नातं हा सुद्धा कादंबरीचा एक समांतर प्रवाह आहे. राम नियमांवर बोट ठेवून वागणारा तर लक्ष्मण सारासार विचार करून प्रॅक्टिकल वागणारा. राम हा पुस्तकी ज्ञानात जास्त रस असलेला तर लक्ष्मण हा शेती, अंगमेहनतीची कामं, कारागिरी ह्याची आवड असणारा असा दाखवला आहे. त्यामुळे सीतेला वनवासात त्याचा आधार असतो. पण "सुवर्णमृगाच्या" प्रसंगात जेव्हा तो रामाला वाचवायला जात नाही तेव्हा सीता त्याच्यावर अश्लाघ्य आरोप करते. त्यामुळे लक्षण दुखावला जातो तो कायमचा. अबोला धरतो. त्यामुळे पुढच्या कितीतरी प्रसंगांत सीता लक्ष्मणाबद्दल इतरांमार्फत कशी चौकशी करते; तिला काय अनुभव येतात असं वर्णन केलं आहे.
काही पाने उदाहरणादाखल
वनवासात सुरुवातीच्या दिवसांत त्रास सहन करताना मनात उठणारे विचारांचे वादळ
वनवासातल्या ब्रहमचर्य व्रतामुळे मातृत्वसुखापासून वंचित झालेल्या सीतेच्या वात्सल्यभावनेबद्दलचा प्रसंग
लवकुशांना घेऊन वाल्मिकी अयोध्येत येतात. सीतेलाही बोलावलं जात. तेव्हा राजसभेत सीता आपलं मन मोकळं करते तेव्हा
आधीच्या प्रसंगात दशरथ-कैकयी ह्यांच्या विवाहाबद्दल उर्मिला सीतेला सांगते
अशी एकूण निवेदनाची रचना आहे. सगळे प्रसंग माहित असले तरी वर लिहिलेल्या तीन बाजूंनी लेखकाला काय वेगळं सांगायचं आहे ह्याची उत्सुकता शेवटच्या पानापर्यंत राहते. एक निराळ्या पद्धतीचं रामायण, "मानवी रामाची कथा" वाचल्याचा साहित्यिक आनंद मिळतो. "असंही घडलं असेल" असा वेगळा दृष्टीकोन मिळतो. तो दृष्टिकोन पटेलच असं नाही पण "छद्म-सेक्युलरां"प्रमाणे लेखकाचा उद्देश राम - सीता - हनुमान ह्या पूज्य आणि धार्मिक श्रद्धास्थानांचा अपमान अथवा विडंबन नाही हे आपल्याला अगदी स्पष्ट समजतं. संवेदनशील तरीही तार्किक निवेदन हे लेखकाचं कौशल्य. उगीच नाही भैरप्पा लोकप्रिय लेखक आहेत.
इतर पात्रांमधले संवाद आणि प्रसंग वाचताना मात्र "सास-बहू" मालिका बघत असल्याचा भास मला झाला. म्हणजे कैकयीचं दशरथाशी लग्न झाल्यावर तिने म्हणे कौसल्या-सुमित्रा ह्यांना मिळणाऱ्या सुविधांवर कात्री लावली. त्यांची अगदी हालाखीची परिस्थिती झाली असं वर्णन आहे. रामाने धनुष्य मोडल्यावर लग्न ठरतं. दशरथ मिथिलेला येतात. पण "मुलगी दत्तक आहे, आम्हाला चालणार नाही" असं व्याही म्हणतात. मग पळापळ होते. असं वर्णन आहे. दशरथाचं निधन झालं तेव्हा राम वनवासात नुकताच गेला होता. पण "भारतभेटी"च्या प्रसंगात त्याला दशरथाच्या निधनाची बातमी सांगताना मंत्री सांगतात - सीमा भागात गुंडागर्दी सुरु आहे, स्त्रियांना घराबाहेर पडणं अवघड झालंय, तिजोरीत कर भरणा होत नाहीये. हे असं ! दहा पंधरा दिवसांत !! आपण नेहमी म्हणतो की राम-लक्ष्मण-भरत-शत्रुघ्न हे सगळेच गुणी. गीतरामायणातलं वर्णन राम म्हणजे "हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी". पण इथे लेखक असं लिहितो की भरत म्हणजे आळशी. राज्यकारभाराची जाण नसलेला. राम वनवासातून परत आले तेव्हा पूर्ण राज्याची वाट लागली होती. ते फार अतिशयोक्त वाटलं. असे बरेच छोटे छोटे प्रसंग आणि संवाद सांगता येतील.
रामायणातले चमत्कार टाळण्याचा प्रकार सुद्धा काही वेळा तितकासा पटत नाही. "सीताहरण" म्हणजे रावणाचे सैनिक सीतेला बांधून घेऊन गेले असं वर्णन आहे. जर ते चालत गेले तर पंचवटी ते लंका किती वेळ लागेल. किती गावं, शहरं वाटेत लागतील. कोणालाच अपहरण झाल्याचं लक्षात येणार नाही का? रावणाने काहीतरी चमत्कार करून तो तिला वायुमार्गाने घेऊन गेला हेच जास्त सयुक्तिक वाटतं. जटायूचा उल्लेख टाळण्यासाठी, शबरीने रामाला अंतर्ज्ञानाने लंकेबद्दल सांगितलं असा थोडा कमी प्रतीचा चमत्कार घेतला आहे. युद्ध चाललं आहे त्याचा आवाज, बाणांचा आवाज सीतेला ऐकू येत होता असं लिहिलं आहे. युद्ध लंकेच्या वेशीवर झालं असेल की गावात ? रावण सीतेला वश करायचा प्रयत्न करतो , बळजबरी करत नाही. असं का ? ह्याचं पौराणिक उत्तर रावणाला मिळालेला शाप असं आहे. पण पुस्तकात तार्किक उत्तर नाही.
वनवासात किंवा नंतरही सीता रामाशी कधीच मोकळेपणाने बोलली नसेल का? सीतेच्या शुद्धतेबद्दल चर्चा होते आहे हे तिला समजलं नसेल का ? त्याबद्दल तिने रामाशी सल्लामसलत केली नसेल का? कादंबरीत संपूर्ण रामायणातले प्रसंग सांगण्यापेक्षा सीतेच्या भावनांवरचे प्रसंग अजून जास्त घेता आले असते का ? असे पण प्रश्न मनात आले.
ही अनुवादित कादंबरी आहे. उमाताई म्हणजे अनुवादाचा मापदंड. अनुवादाच्या दर्जाबद्दल मी लिहिणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणं होईल. भैरप्पा-उमाताई ही जोडी प्रसिद्धच आहे. रामाला सेतू बांधून सीतेपर्यंत नेण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या हनुमानाप्रमाणे भैरप्पांना अनुवादसेतू बांधून देऊन मराठी वाचकांपर्यंत पोचवण्याचं काम करणाऱ्या उमाताई. म्हणून गमतीने माझ्या डोक्यात असं आलं की हनुमान म्हणजे "रामचंद्र के काज सवांरे" तसं, भैरप्पांच्या साहित्यिक कामाबद्दल उमाताई म्हणजे "भैरप्पा के काज सवांरे" !!
मानवी रामायण, सीतेच्या दृष्टीने रामायण वाचण्यासाठी हे पुस्तक वाचा. विचारला नक्की खाद्य मिळेल. "हरी अनंत हरिकथा अनंत"चा अनुभव घ्या.
——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

No comments:
Post a Comment