Heart bones (हार्ट बोन्स )



पुस्तक - Heart bones (हार्ट बोन्स )
लेखिका - Colleen Hoover (कॉलीन हूवर)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - ३२४
प्रकाशन - २०२०
ISBN - 9798671981742

"बेया" आणि "सॅमसन" अशा दोन तरुणांची ही प्रेमकहाणी आहे. बेया एक कॉलेज तरुणी तिच्या आईबरोबर राहते आहे. तिचे वडील परराज्यात राहतात. आईवडील एकत्र राहत नाहीयेत. बेयाची आई तरुण असताना घडलेल्या शरीरसंबंधातून - वन नाईट स्टॅन्ड मुळे - झालेली ही संतती. पण त्या तरुणाने आपली जबाबदारी पूर्णपणे स्वीकारलीही नाही आणि पूर्णपणे टाकलीही नाही. वर्षांतून काही वेळा तो मुलीला फोन करतो. वर्षातून एकदा दोन आठवडे स्वतःच्या घरी नेतो. पण मुलीचा आणि वडिलांचा प्रेमाचा धागा जुळला गेला नाहीये. तिची आई अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेलेली आहे. किडूकमिडूक कामं करून कधी पुरुषांशी सलगी करून ती पैसे मिळवते. पण एकूण मुलीकडे दुर्लक्षच. बेया कशीबशी काम करून पैसे मिळवते आहे. शिक्षण थोडंफार चालू आहे.

एकेदिवशी अमली पदार्थाच्या अतिसेवनाने बेयाची आई मरण पावते. बेया निराधार होते. घराचं भाडं थकलेलं असल्यामुळे घरमालक सुद्धा तिला घर सोडायला सांगतो. मनाचा हिय्या करून ती वडिलांना फोन करते. काय झालं आहे हे न सांगता फक्त त्यांच्याबरोबर थोडे दिवस राहायचं आहे असं सांगते.

वडिलांचं लग्न एका घटस्फोटितेशी झालं आहे. वडील, त्यांची बायको आणि तिची पहिल्या लग्नाची मुलगी असे ते एकत्र राहतायत. हे तिघे बेयाचं चांगलं स्वागत करतात. वडील प्रेमाने वागत असले तरी त्यांनी तिचा वडिलांवर रागच असतो. तिची सावत्र बहीण आपल्या मित्रांशी ओळख करून देते. त्यातल्या "सॅमसन"ला बॉयफ्रेंड बनव म्हणून मागे लागते. बेयाला ह्या कशातही रस नसतो. आपलं उद्ध्वस्त आयुष्य कसं सावरायचं ह्याची तिला चिंता सतावत असते. प्रत्येक वेळी तिची आणि सॅमसन ची भेट होते तेव्हा काहीतरी गैरसमजच होतात. दुसरीकडे सॅमसन सुद्धा घुमा, आपलं आपलं काम करणारा, पण श्रीमंत, तरी मुलींशी संबंध ठेवणारा आणि बेयात रस न घेणारा असा.

आपल्याला एकमेकांत काही रस नाहीये हे एकमेकांना सुचवत असतात. सांगत असतात. पण त्यातूनच "असं का" अशी उत्सुकता पण निर्माण होते. ते बोलू लागतात. पुढे त्यातून प्रेमकहाणी कशी फुलते, सॅमसन चं एक गुपित अचानक कसं बाहेर येतं; आणि त्या गुपितामुळे प्रेम पुन्हा कोमेजतं का? हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला कादंबरी वाचावी लागेल.

काही पाने उदाहरणादाखल

बेयाचे वडील तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतानाचा संवाद



बेया आणि सॅमसन चा संवाद .. एकमेकांपासून थोडं लपवत, थोडं सांगत, थोडं विचारत चालणारं बोलणं




"ते दोघे भेटले, एकमेकांशी ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं" अशीच ही टिपिकल प्रेम कहाणी असली तरी भारतीय वाचकांसाठी थोडी वेगळी वाटेल. ह्याचं कारण ह्या कादंबरीत घडणाऱ्या घटना भारतीय समाजव्यवस्थेत आणि कुटुंब व्यवस्थेत इतक्या सहजपणे घडणं शक्य नाही. लग्नाआधी होणारं मूल वाढवणं; ते पण लग्न न करता त्या पुरुषाकडून बालसंगोपनाचे पैसे घेऊन... एखादी बाई मेल्यावर तिच्या पोरक्या मुलीची चौकशी करायला नातेवाईक, शेजारीपाजारी, समाजसेवी संस्था कोणी येत नाही. किती भयाण एकटेपण आहे ह्या समाजात. एक महिना सुट्टीवर गेलेल्या मुलीला तिची बहीण लगेच "बॉयफ्रेंड" बनवायला सांगते; "महिनाभर तर महिनाभर कर की एन्जॉय !!". मुलींची आई त्यांना स्पष्टपणे विचारते; "तुम्ही गर्भनिरोधनाचे उपचार केले आहेत ना .. म्हणजे तुम्ही काही करायला मोकळ्या". ज्याला बॉयफ्रेंड "करायचं" आहे तो दुसऱ्या मुलीशी लगट करतोय; पण काही हरकत नाही कारण दुसरी मुलगी दोन दिवसांनी बाहेरगावीच जाणार आहे. मग तो "अव्हेलेबल"च आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. ह्याच लेखिकेच्या "इट एन्ड्स विथ अस" कादंबरीत सुद्धा असेच अमेरिकन कुटुंब व्यवस्थेच्या थोड्या वेगळ्या समस्येचं दर्शन घडलं होतं. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मूळ कथेपेक्षा ही सामाजिक निरीक्षणं वाचायला मला जास्त उत्सुकता वाटली.

पुस्तक वाचताना खूप उत्सुकता लागून राहत नाही. अर्धं पुस्तक "बेया" च्या निराधारपणाचे व त्यातून स्वभावात आलेल्या काडवटपणाचे कंगोरे रंगवण्यात गेलं आहे. तो भाग जरा जास्तच ताणला गेलाय. त्यामानाने सॅमसन चं गुपित तितकं ठोसपणे पटण्यासारखं मांडलं नाहीये. तो भाग मी पटापट वाचून उरकला.

तुम्हाला प्रेमकथा आवडत असतील तर वाचून बघा.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

इंडियाज रेल्वेमॅन (India's railwayman)

पुस्तक - इंडियाज रेल्वेमॅन (India's railwayman) लेखक - राजेंद्र बी. आकलेकर (Rajendra B. Aklekar) अनुवाद - अनुराधा राव (Anuradha Rao) भा...