माणसांच्या गोष्टी (Manasanchya Goshti)



पुस्तक - माणसांच्या गोष्टी (Manasanchya Goshti)
लेखिका - छाया महाजन (Chhaya Mahajan)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४३
प्रकाशन - रोहन प्रकाशन, जाने २०२४
छापील किंमत - रु. २००/-
ISBN - 978-93-89458-67-1

छाया महाजन लिखित हा कथासंग्रह आहे. ह्या पुस्तकाचे प्रकाशन आमच्या "पुस्तकप्रेमी समूहाच्या" मे २०२४ मध्ये लोणावळा इथे झालेल्या स्नेहसंमेलनात झाले होते. लेखिका छाया महाजन आणि ज्यांच्या हस्ते प्रकाशन झाले ते कवी अरुण म्हात्रे दोघेही आमच्या समूहाचे सदस्य. त्यामुळे ह्या प्रकाशनाला मी उपस्थित होतो. दोन्ही मान्यवरांशी छान गप्पा मारण्याची संधी मिळाली होती.


लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती 

पुस्तकाचे शीर्षक "माणसांच्या गोष्टी" हेच खरं म्हणजे पुरेसं बोलक आहे. पुस्तकात काय आहे हे अगदी सहज सांगून जातं. पण आपल्याला पुढचे प्रश्न पडतील की, कुठल्या माणसांच्या गोष्टी ? कुठे राहणाऱ्या, काय करणाऱ्या माणसांच्या गोष्टी? त्यांच्या गोष्टींमध्ये असं काय वैशिष्ट्य आहे? म्हणूनच हा परिचयाचा थोडा प्रयत्न.

या गोष्टीतली मध्यवर्ती पात्र आहेत मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय किंवा फार गरीब अशी. गोष्टीमध्ये फार क्वचितच स्थळाचं नाव आलेलं आहे. पण साधारण शहरात किंवा एखाद्या मध्यमवस्तीच्या गावात या घटना घडतायत. गोष्टी मराठी आहेत त्यामुळे त्या महाराष्ट्रातल्या गावात घडत आहेत असं आपण समजू शकतो पण त्या इतर राज्यात किंवा अगदी परदेशातही थोड्याफार फरकाने अशाच घडू शकतात. त्या अर्थाने ह्या वैश्विक गोष्टी आहेत. गोष्टींमध्ये प्रसंगही आपल्यासाठी अनोळखी अजिबात नाहीत. तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या, घडू शकणाऱ्या अशाच या घटना आहेत. त्यामुळे या गोष्टी वाचताना वाचकाची एखादी आठवण ताजी होऊ शकते. आपल्या कुटुंबीयांपैकी परिचितांपैकी एखाद्या व्यक्तीचीच ही गोष्ट असावी असंही वाटून जाऊ शकतं.

पुस्तकात १५ गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. पण या सगळ्या गोष्टी एका पुस्तकात एका कथासंग्रहात आहेत म्हणून त्यामागे काही समान धागा आहे का हेच शोधण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू. पुस्तकाच्या पाठमजकुरावर(ब्लर्बवर)च वाक्य आहे "आयुष्याच्या लढाईत आपापल्या परीने सामोरे जाणारे हे चेहरे". हे या कथासंग्रहाचे सूत्र आहे. प्रत्येक प्रमुख पात्र आयुष्याने उभ्या केलेल्या आव्हानाशी आपापल्या परीने तोंड देत आहे. काही वेळा ते आव्हान एका प्रसंगापुरते आहे तर काही पूर्ण आयुष्यच आव्हानात्मक आहे. मात्र ह्या गोष्टी ह्या संघर्षावर मात करून यशाचा झेंडा रोवणाऱ्या महामानवांच्या गोष्टी नाहीत तर आयुष्याशी जमेल तितके दोन हात करणाऱ्यांच्या गोष्टी आहेत. काही पात्र उमेदीने सामोरी जातात, तर काही खचतात. काही निमूटपणे भोगत राहतात तर काही पूर्णपणे अमुलाग्र बदलतात.

अनुक्रमणिका    


काही गोष्टींबद्दल थोडक्यात सांगतो.

सायंकाळी- कथा नायिका अमांडा . दिसायला खास नाही म्हणून बिपिनला ती आवडत नाही. तरुणपणाकडून म्हातारपणाकडे गाडी पोचली तरी ती नावड तशीच आहे. बिपीनच्या रुपाने आयुष्याने उभं केलेल्या तिरस्काराच्या आव्हानाला तिचा प्रतिसाद कसा?

रजनी - इतर गोष्टींपेक्षा ही गोष्ट जरा मोठी आहे आणि त्यात रजनी या नायिकेचे पूर्ण दुःखी जीवन आहे. गरीबी व त्यातून येणारा मिंधेपणा. नव्याने येणारी कौटुंबिक संकटे यातून गेलेले रजनीचे आयुष्य. जणू खडकाळ पात्रातून वाहणाऱ्या नदीचा प्रवास.

कोप - नदीच्या पुरामुळे गावात झालेला उत्पात आणि एका क्षणात रावाचा रंक होण्याची घटना

कमी माणसांचं घर - मुलं प्रदेशात गेल्यावर भारतात एकटे पडलेल्या सुखवस्तू जोडप्याची व्यथा

अनुत्तरीत - मध्यमवयीन स्त्रियांना आपल्या बोलण्याने वागण्याने घोळात घेणारा तो आणि त्याच घोळ समजूनही शरीरमनाच्या आसक्ती पोटी त्यात पुन्हा पुन्हा सापडणाऱ्या स्त्रीमनांची ही गोष्ट

म्हातार झालेलं घर - नोकरीधंद्यानिमित्त शहरात राहणारा भाऊ आणि गावाकडेच राहून वडिलोपार्जित घर, शेतीभाती सांभाळणारा भाऊ यांच्यातले प्रसंग. गावाकडे फक्त पैसे पाठवून काम होत नाही तर माणूस बळही लागतं. तिथे खपावंच लागतं. याची जाणीव करून देणारी गोष्ट.

नाही पळभर - महिलांच्या भिशी ग्रूप मधली एक सदस्य अचानक स्वर्गवासी झाली. काय काय असतील ह्या महिलांच्या प्रतिक्रिया. त्यात जर "गेलेली" मुळे भिशीचे हिशेब अर्धवट राहत असतील तर??

"उमज" आणि "नव्या दिशा" या दोन थोड्या वेगळ्या आहेत. कारण त्या तितक्या दुःखी नाहीत. उमज मध्ये एक नवकथा लेखिका आपलं मनोगत सांगते. "नव्या दिशा" मध्ये मोबाईल कॉम्प्युटरच्या जमान्यात नवतंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आई-वडिलांना आपल्या मुलांचं विद्यार्थी व्हावे लागतं तो सहज प्रसंग आहे.

तीन कथांमधील काही पाने बघा म्हणजे शैलीची कल्पना येईल.

कोप - गावातल्या पुराचा प्रसंग

लज्जा - मूल चोरल्याचा आरोपावरून मंदाला पोलीस पकडतात तेव्हा


नव्या दिशा - मुलांना शिकवणारे आईबाबा मोबाईल शिकण्यासाठी मात्र मुलांवर अवलंबून.



छाया ताईंनी शैली नेमकी आणि प्रसंग वेगवान ठेवणारी आहे. पात्रांचं, प्रसंगाचं वर्णन थोडक्यात केलं आहे. रेंगाळलं नाहीये. त्यामुळे दुःखी प्रसंग असूनही पुस्तक रडकं होत नाही. अन्वर हुसेन ह्यांचं तैलचित्र असणारं मुखपृष्ठ पण समर्पक आहे.
प्रत्येक माणसागणिक प्रसंगाला प्रतिसाद देण्याचा प्रकार वेगळा असतो म्हणूनच आपल्याला आजूबाजूला लोकांची, प्रसंगांची इतकी विविधता दिसते. तीच सगळी या पुस्तकात सामावली आहे. अशा ललित लेखनातून माणूस समजून घेण्याची आपली क्षमता वाढते. अशा घटना आपल्यासमोर घडतात तेव्हा खऱ्या व्यक्ती आणि त्या पात्रांची सहज तुलना मनात होते. त्यातून इतरांकडे थोडं सह-भावनेने बघू शकतो हे अशा ललितलेखनाचं कथा वाचण्याचं मला आवडणार कारण आहे.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

माणसांच्या गोष्टी (Manasanchya Goshti)

पुस्तक - माणसांच्या गोष्टी (Manasanchya Goshti) लेखिका - छाया महाजन (Chhaya Mahajan) भाषा - मराठी (Marathi) पाने - १४३ प्रकाशन - रोहन प्रका...