इंडियाज रेल्वेमॅन (India's railwayman)




पुस्तक - इंडियाज रेल्वेमॅन (India's railwayman)
लेखक - राजेंद्र बी. आकलेकर (Rajendra B. Aklekar)
अनुवाद - अनुराधा राव (Anuradha Rao)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - India's railwayman. २०१४ मध्ये प्रकाशित
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस, मे २०२४
पाने - १९२
छापील किंमत - रु. ३२०/-
ISBN - 9789357207126

"कोकण रेल्वे" आणि "दिल्ली मेट्रो"च्या उभारणीचे नेतृत्व करून त्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या ई. श्रीधरन ह्यांचे हे चरित्र आहे. श्रीधरन ह्यांच्या बालपणाबद्दल थोडी माहिती, त्यांच्या सुरुवातीच्या नोकऱ्यांबद्दल थोडी माहिती, मग त्यांच्या कारकिर्दीतले महत्त्वाचे मानबिंदू असणारे - "पाम्बन" पुलाची दुरुस्ती, "कोकण रेल्वे" आणि "दिल्ली मेट्रो" ह्याबद्दल सविस्तर माहिती आहे. उभारणीतले प्रसंग, तांत्रिक माहिती, श्रीधरन ह्यांच्या मुलाखतीतले अंश, इतर व्यक्तींच्या टिप्पण्या अशी निवेदन शैली आहे.

श्रीधरन ह्यांचा रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पदांवर आणि भारतात नाना ठिकाणी काम करण्याचा अनुभव आपल्या पुढे येतो. रेल्वेमध्ये ३६ वर्षे नोकरी करून निवृत्त झाल्यावर त्यांनी नव्या दमाने "कोकण रेल्वे"ची धुरा सांभाळली. जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे हा प्रकल्प पुढे रेटला गेला. श्रीधरन ह्यांनी स्वतःच्या कामासाठी पूर्ण स्वायत्तता मागितली. सरकारी निधीबरोबरच भांडवली बाजारातूनही पैसा उभा केला. इतर सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणे नियम-अटींचा बागुलबुवा करणे, कागदी घोडे नाचवणे आणि स्वतःला धनलाभ कसा होईल; हे श्रीधरन ह्यांनी कधीच केलं नाही. कर्तव्यबुद्धीने आणि सचोटीने काम केलं. ही सचोटी आणि जबाबदारीची जाणीव इतर अधिकाऱ्यांमध्ये आणि कंत्राटदारांमध्ये सुद्धा येईल अशी व्यवस्था निर्माण केली. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उरलेला वेळ दाखवणारे "उलटी गणती"करणारे घड्याळ त्यांनी सर्व कार्यालयांत लावले होते. विभागीय अधिकाऱ्यांना निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य दिले होते. निर्णयातली चूक स्वीकारली जायची, पण दिरंगाई नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना अधिकार व कर्तव्य ह्या दोन्हीची पूर्ण जाणीव होती. कंत्राटदारांनादेखील वेळेत पैसे मिळतील, आवश्यक त्या सुविधा मिळतील ह्याची खात्री दिली गेली. त्यामुळे "पाट्या टाकण्याची" वृत्ती कमी झाली. जनतेचा पैसा वाचावा, काम वेळेत आणि योग्य दर्जाने पूर्ण व्हावं ह्यासाठी त्यांनी उपाययोजना केल्या. अशाच पद्धतीने त्यांनी काम "दिल्ली मेट्रो"तही केले. ह्या सगळ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती पुस्तकात आहे.

प्रकल्प प्रमुखाला दिलेली स्वायत्तता सहज वागवण्यासारखी गोष्ट नव्हती. राजकीय दबावाला झुगारणे, रेल्वे बोर्डाच्या एकाधिकारशाहीला आव्हान देणे हे सुद्धा त्यांना करावे लागले. श्रीधरन हे मनमानी काम करतात, चुकीचे निर्णय घेतात अशा टीका झाल्या. "कोकण रेल्वे"सुरु झाल्यावर दरड कोसळणे, मार्ग खचणे ह्यातून बऱ्याच वेळा वाहतुकीचा खोळंबा झाला. काही जीवितहानी झाली. पुस्तकात "हारतुरे आणि टीकाटिप्पणी" ह्या भागात वेगवेगळ्या लोकांची श्रीधरन ह्यांच्याविषयी बरीवाईट मतं मांडली आहेत. श्रीधरन ह्यांच्यावर झालेल्या टीका आणि त्याला श्रीधरन ह्यांचे उत्तर हा भाग सुद्धा पुस्तकात आला आहे. त्यातून दुसरी बाजू सुद्धा लेखकाने मांडली आहे. प्रकल्प व त्याची अंमलबजावणी ह्यांचा तांत्रिक आढावा हा पुस्तकाचा मूळ विषय नाही त्यामुळे ह्या चर्चेचा भाग थोडक्यातच आटोपला आहे. जाणकार वाचकांना अधिक वाचन व संशोधन करण्याला प्रोत्साहन मिळेल.

एक गोष्ट जाणवली की भ्रष्टाचाराचा, आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप झालेला दिसत नाही. उलट पुस्तकातून एक धक्कादायक किस्सा कळला. "कोकण रेल्वे"चे प्रमुख म्हणून काम करताना सरकारने ठरवलेला पगार सुद्धा त्यांना पूर्ण दिला जात नव्हता. ते रेल्वेचे निवृत्तीवेतन धारक आहेत म्हणून, ती रक्कम वजा करून फक्त उर्वरित रक्कम - काही हजार रुपये- इतकेच त्यांना मिळत असे. म्हणजे प्रकल्पाचा प्रमुख.. दिवसरात्र मेहनत करणार.. सर्वस्व पणाला लावून काम करणार आणि त्याचा पगार हाताखालच्या लोकांपेक्षाही कमी.. का ? कारकुनी करिष्मा ! रेल्वेशी पत्रव्यवहार आणि नंतर न्यायालयीन लढाई करून त्यांनी हा अन्याय दूर करून घेतला. न्यायालयाने सर्व थकबाकी सव्याज द्यायला लावली. आपण खरंच अशा परिस्थितीत काम केलं असतं का ? पहिल्या महिन्यात चुकीचा पगार दिसल्या दिसल्या नोकरी सोडली असती. नाहीतर नाव- ओळख ह्यांचा वापर करून लोकांना वठणीवर आणलं असतं. पण श्रीधरन सरळ मार्गाने न्यायालयीन लढत राहिले कित्येक वर्ष. विशेष म्हणजे ही मोठी रक्कम मिळाल्यावर ती त्यांनी समाजकार्यासाठी वापरली. काय वेगळंच पाणी आहे हे !

अशी निस्पृहता आणि कर्तव्यनिष्ठा असण्यामागे मूळ अध्यात्मिक वृत्ती, वाचन , सत्संग कसा कारणीभूत आहे हे पुस्तकात उलगडून दाखवलं आहे. श्रीधरन ह्यांचे अध्यामिक गुरु श्री भूमानंदतीर्थ ह्यांनी केलेले व्यक्तिचित्रण पुस्तकात आहे. श्रीधरन ह्यांच्या पत्नीचं मनोगत पुस्तकात असायला हवं होतं. "रेल्वे मॅन" श्रीधरन असे पूर्णवेळ कामाला वाहून घेतलेले, जागोजागी बदल्या होणारे, निस्पृहतेने काम करणारे असल्यामुळे संसाराकडे, कौटुंबिक जाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध वेळ, घरात उपस्थिती कमीच असणार. त्यांच्या पत्नीने चार मुलांचा संसार नेटाने सांभाळला म्हणूनच हे शक्य झालं. यशस्वी पुरुषामागच्या ह्या भक्कम आधाराची जास्त दखल घ्यायला हवीच.

पुस्तकातील काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका



नोकरीच्या सुरुवातीच्या वर्षांत "पाम्बन" पुलाच्या पुनर्निर्माणाचे काम विक्रमी वेळात पूर्ण केले त्याबद्दल



कोकण रेल्वे आणि राजकीय इच्छशक्ती जागवण्याची कसरत



दिल्ली मेट्रो यशस्वी होण्यासाठी केलेले नियोजन




पुस्तकाचा मराठी अनुवाद छान झाला आहे. तांत्रिक शब्दांमध्ये इंग्रजी आणि मराठी असा चांगला मेळ साधल्यामुळे पुस्तक सुबोध झाले आहे. हे पुस्तक मराठीत आणल्याबद्दल अनुवादिका अनुराधा राव ह्यांचे आभार !

निवृत्ती नंतर पंधरा वर्ष दोन मोठे प्रकल्प हाताळून श्रीधरन आता पुन्हा निवृत्त झाले असले तरी रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक दळणवण ह्या विषयाशी संबंधित कितीतरी प्रकल्पांचे ते सलागार आहेत, समित्यांवर सदस्य आहेत त्याची माहिती पुस्तकात आहे . आजही दिवसाचे कितीतरी तास ते ह्यासाठी देतात. कार्यप्रवणतेचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे.

सरकारी नोकरीच्या मर्यादा आणि त्यातलं राजकारण, भ्रष्टाचार ह्यांना आपण नावं ठेवणं अगदी स्वाभाविक आहे. पण ह्या काटेरी वाटेवरही देशहिताची फुलबाग फुलवता येते; हवी फक्त श्रीधरन ह्यांच्यासारखी निस्पृहता, कामावरचं प्रेम आणि कार्यक्षेत्राचं उत्तम ज्ञान ! व्हायला हवे शरीर-मन-बुद्धीने कर्मयोगी !


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...