राशोमोन आणि जपानी कथा (Rashomon Ani Itar Japani Katha)




पुस्तक - राशोमोन आणि इतर जपानी कथा (Rashomon Ani Itar Japani Katha)
लेखक - ऱ्युनोसुके अकुतागावा (Ryunosuke Akutagawa)
अनुवाद - निसीम बेडेकर (Nissim Bedekar)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तकाची भाषा - जपानी (Jpaanese)
पाने - १२०
प्रकाशन - मनोविकास प्रकाशन, जुलै २०१२
ISBN - 978-93-80264-98-1
छापील किंमत - रु. १२०/-

पुस्तकाच्या पाठमजकुरावर म्हटल्याप्रमाणे ऱ्युनोसुके अकुतागावा (१८९२-१९२७) यांनी आधुनिक जपानी लघुकथेचा पाया घातला. बारा वर्षांच्या अल्पशा कालावधीत त्यांनी शंभराहून अधिक कथा लिहिल्या. स्वतःचे आगळे स्थान निंर्माण केले. ह्यातील प्रसिद्ध ११ कथांचा मराठी अनुवाद निसीम बेडेकर ह्यांनी मराठी वाचकांसाठी सादर केला आहे.
लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


प्रत्येक गोष्टीबद्दल थोडक्यात सांगतो.

कोळ्याचा धागा - स्वर्गामध्ये गौतम बुद्ध आहेत. स्वर्गातल्या तळ्याच्या खाली नरक दिसतोय. नरकात तडफडणाऱ्या एका जीवाची दया येऊन ते त्याला वर काढण्यासाठी कोळ्याचा धागा खाली सोडतात. तो धागा पकडून माणूस वर येऊ लागतो. त्याला वर चढताना बघून इतर पण वर येऊ लागतात. मग काय होतं ?

राशोमोन - "राशोमोन" नावाच्या उंच, भव्य प्रवेशद्वाराजवळ घडणारी ही घटना आहे. भूकंप, वादळे, दुष्काळ ह्यामुळे शहर उद्ध्वस्त झालं आहे. चोऱ्यामाऱ्या करून लोक जगतायत. एकेकाळच्या श्रीमंत जमीनदारांची रया गेली आहे. अशाच एका जमीनदाराने नोकरीवरून काढून टाकल्यामुळे बेकार बेघर झालेला एक नोकर "राशोमोन"च्या आडोशाला उभा आहे. तिकडे त्याला दिसतंय गरीबी, भूक , मृत्यूचं नागवं सत्य. त्याच्यासारखेच असहाय कोणी. काय घडेल पुढे ?

केसा आणि मोरितोओ - कथानायक "मोरितोओ" म्हणतोय - "आज रात्री नंतर मी उरणार आहे फक्त एक खुनी. आज मला ज्याचा खून करायचाय त्याच्याबद्दल माझ्या मनात द्वेषभाव नाही." "मोरितोओ" च्या केसा" नावाच्या प्रेयसीच्या नवऱ्याचा - "वातारु"चा - त्याला काटा काढायचाय. हे त्यानं ठरवलं आहे. पण आता तो विचार करतोय; "त्याला का मारायचंय ? माझं आणि केसावर प्रेम आहे का ? तिचं माझ्यावर प्रेम आहे का ?" त्याला जुने प्रसंग आठवतायत. प्रेम - वासना - अपमान - अहंकार असं समजून घ्यायला कठीण असं काहीतरी विचित्र मिश्रण लेखकाने आपल्यासमोर उभं केलं आहे.

नेझुमी कोझो - ही त्यामानाने हलकी फुलकी कथा आहे. "नेझुमी कोझो" हा प्रख्यात दरोडेखोर आहे. श्रीमंतांना लुटणारा. पण गरीबांना मदत करणारा. प्रचंड धाडसी. त्यामुळे एकीकडे त्याची भीती आहे, कौतुक आहे आकर्षण आहे. त्याकाळात पायी प्रवास करणारे दोन प्रवासी एकेमेकांना नेझुमीबद्दल सांगतात. अनोळखी असले तरी परस्परांबद्दल विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. बढाया मारतात. तिथेच त्यांना नेझुमी भेटला तर ?

बांबूच्या वनात - जंगलाजवळच्या आडवाटेवरच्या बांबूच्या वनात एक खून झालाय. प्रेत पडलं आहे. प्रेताजवळ एक दोर, एक कंगवा पडला आहे. आजूबाजूचं गवत तुडवलेलं दिसत आहे. तो सैनिक वाटत असला तरी आजूबाजूला घोडा दिसत नाहीये. आता पोलिसांची चौकशी सुरु झाली आहे. एक लाकूडतोड्या, एक बौद्ध भिक्खू, अजून एक शिपाई, मृताची सासू, गुन्हा कबूल करणारा दरोडेखोर, मृताची पत्नी असे सगळेजण आपलं आपलं सत्य सांगतायत. पण त्यातून दोनतीन वेगवेगळ्या शक्यता निर्माण होतायत. पुन्हा एकदा नीती-अनीती, स्त्री-पुरुष संबंधांतील विश्वास-अविश्वासाची रससीखेच !

संत्री - एक छोटी भावनिक गोष्ट आहे. रेल्वे प्रवासात एक गरीब मुलगी पाहिल्यावर्गाच्या डब्यात हातात संत्री घेऊन बसली आहे. तिचे निरीक्षण, वर्णन निवेदकाने केले आहे.

ढकलगाडी - डोंगराळ भागात रेल्वे रूळ टाकायचं काम सुरु आहे. तिथे सामानाची ने-आण करण्यासाठी रुळांवरून चालणारी ढकलगाडी आहे. मजूर त्यातून सामान वाहून नेतायत. डोंगरावरून वरखाली जाणारी ही गाडी बघून एका लहान मुलाला तो खेळच वाटतो. आपणही गाडी ढकलावी, उतारावर तिच्यात बसून वेगानं खाली यावं असं त्याला वाटायला लागतं. त्याची गंमत ह्या गोष्टीत आहे.

पांढऱ्या - पांढऱ्या रंगाच्या आणि त्याच नावाच्या कुत्र्याच्या पिल्लाची ही गोष्ट. तो आहे पाळीव कुत्रा. पण घरापासून दूर भटकत गेलाय. कुत्रे पकडायला आलेली गाडी पाहून घाबरून पळाला. आणि "फँटसी" अशी की तो अचानक काळाठिक्कर पडलाय. त्याला घरी कोणी ओळखत नाही. घरात घेत नाही. म्हणून तो बेवारशासारखा भटकतोय. पण पुढे तो समाजोपयोगी - लोकांना मदत करणारा कुत्रा झालाय. कसा काय ? आणि खरंच का ?

जादूची विद्या - ह्यात एक भारतीय व्यक्ती मुख्य पात्र आहे. ती जादूगार आहे. तिच्याकडे जादू शिकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला तो जादू दाखवतो आणि त्या व्यक्तीची पात्रता ठरवण्यासाठी परीक्षा घेतो. त्याची गंमत आहे.

नानकिंगचा ख्रिस्त - एक ख्रिस्ती धर्माची सश्रद्ध वेश्या आहे. ती आजारी पडते. पण ख्रिस्ताला प्रार्थना करते. आणि नशीब तिला कसं साथ देतं; ह्याची चमत्कार म्हणावा - फँटसी म्हणावी अशी गोष्ट.

अग्निदेव - इथेही एक भारतीय बाई जादूगार आहे. तिला भविष्य कळतं. तिचं घर म्हणजे लोकांसाठी गूढ जागा. तिच्या घरी एक चिनी मुलगी बंदी आहे. भारतीय बाई मंत्रतंत्र करते तेव्हा ह्या चिनी मुलीच्या अंगात "अग्निदेव" प्रकटतो आणि भविष्य सांगतो. पण ह्या मुलीला मात्र इथून सुटका हवी आहे. कशी होईल तिची सुटका ?

दोन गोष्टींतली पाने उदाहरणादाखल
जादूची विद्या



केसा आणि मोरितोओ



कथांचे विषय वेगवेगळे आहेत. कधी त्यात एक प्रत्यक्ष घडू शकेल असं काहीतरी घडतं. तर काही गोष्टीत कल्पनारंजन - फँटसी सुद्धा आहे. पण बहुतेक कथांमधले वातावरण गूढ-गंभीर, अंधारी, पावसाळी, उदासवाणे असे आहे. त्या अंधाऱ्या वातावरणात जे प्रसंग घडतायत त्यातून माणसाच्या मनातील अंधारे कोपरे पण "दिसू लागतायत". पात्रांच्या मनात नीती-अनीती चा झगडा होतोय, स्वार्थ बळावतोय, वासना उफाळून येतायत, कुणाला धोका द्यावं, फसवावं असं वाटतंय. कधी ते स्पष्ट दिसतंय तर "पांढऱ्या", "ख्रिस्त", "ढकलगाडी" वगैरे गोष्टींमध्ये प्रतिमांचा वापर करून अप्रत्यक्ष पद्धतीने ते मांडलं आहे.

गोष्टी खूप मनोरंजक, खूप उत्कंठावर्धक नाहीत तरी नेपथ्यरचना, निवेदनशैली, व्यक्तींमधले ताणे-बाणे ह्यामुळे आपण सहज पुढेपुढे वाचत राहतो. जपानमध्ये प्रसिद्ध पण आपल्याला अपरिचित अशा लेखकाची शैली, गोष्टी आपल्याला अनुभवता येताहेत. त्या उत्सुकतेसाठी हे पुस्तक वाचायला छान आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला मूळ लेखकाच्या आयुष्याबद्दल, त्याच्या लिखाणाबद्दल थोडक्यात सांगितलं आहे. त्या संदर्भाचा उपयोग पुढे वाचताना होतो. जपानी लेखकाचं लेखन मराठीत वाचणं शक्य झालं ते निसीम बेडेकर ह्यांनी केलेल्या अनुवादामुळे. ह्या आधी बेडेकरांचा  "शिंझेन किस" हा अनुवाद वाचला होता. दोन्ही अनुवाद सहज, रसाळ आणि मराठमोळे आहेत. म्हणून ह्या अनुवादासाठी निसीम बेडेकर आणि प्रकाशकांचे आभार.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi)

पुस्तक - गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi) लेखक - सुरेश देशपांडे (Suresh Deshpande) भाषा - मर...