अंतर्नाद - एका मासिकाचा उदयास्त (Antarnad - Eka masikacha udayast)



पुस्तक - अंतर्नाद - एका मासिकाचा उदयास्त (Antarnad - Eka masikacha udayast)
लेखक - भानू काळे (Bhanu Kale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २७२
प्रकाशन - मौज प्रकाशन. फेब्रुवारी २०२४
ISBN - 978-93-5079-073-1
छापील किंमत - रु. ५००/-

पुस्तकप्रेमी, साहित्यप्रेमी वाचकांनी "अंतर्नाद" नावाचं मासिक कधी ना कधी नक्कीच वाचलं असेल. त्याचा दिवाळी अंक वाचला असेल. बरेच जण त्याचे पूर्वी नियमित वाचकही असतील. १९९५ ते २०१९ इतका काळ हे मासिक सुरु होतं. ह्या मासिकाचे संस्थापक, संपादक आणि सर्वेसर्वा भानू काळे आहेत. त्यांनी ह्या मासिकाची जन्मकहाणी, वाढ, विस्तार, संघर्ष आणि अपरिहार्य शेवट हे सगळे टप्पे ह्या पुस्तकातून आपल्यासमोर उलगडले आहेत. त्यावेळचे अनुभव, इतर व्यक्तींचा सहभाग, मान्यवरानाचे सहकार्य व मार्गदर्शन, मासिकाने केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमागच्या प्रेरणा, मिळालेला प्रतिसाद आणि त्याचा साहित्यसृष्टीवर झालेला परिणाम हे सगळं पुस्तकात आहे. एकूणच "अंतर्नाद" मासिकाच्या आयुष्याचं हे डॉक्युमेंटेशन आहे. पण हे डॉक्युमेंटेशन आपोआपच १९९५ ते २०१९ ह्या कालावधीतल्या बदलत्या मराठी समाजाचं, बदलत्या/घसरत्या वाचन संस्कृतीचं आणि एकूणच घसरत्या संस्कृतिकतेचं डॉक्युमेंटेशनसुद्धा आहे. त्यामुळे भले तुम्ही "अंतर्नाद" चे वाचक असा नसा; ह्या अनुभवांशी तुम्ही स्वतःला जोडून घेऊ शकता.

"अंतर्नाद" मासिक सुरू झालं त्या आधीच्या काळात चांगली मराठी नियतकालिकं बंद पडत होती. तरी स्वतः लेखक असणाऱ्या आणि मुद्रण व्यवसायात असणाऱ्या भानू काळे ह्यांनी एक नवं मासिक सुरु करायचा निर्णय घेतला. मुद्रण व्यवसाय बंद करून, मुंबईहुन पुण्याला स्थलांतर करून पूर्ण वेळाचा व्यवसाय मासिकाचा म्हणून स्वीकार केला. त्यापूर्वी त्यांनी ह्या क्षेत्रातल्या अनेकांशी संपर्क साधून आपला मनोदय कळवला. हे काम आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरू शकेल, लोकांचा प्रतिसाद मिळेल की नाही ह्याबद्दल अनेकांनी त्यांना सावध केलं. तरीही स्वतःवर विश्वास ठेवून, स्वतःच्या कल्पना घेऊन त्यांनी मासिक सुरु केलं. ह्या टप्प्याबद्दल सविस्तर वर्णन पुस्तकात आलं आहे.

मासिक चालवायचं ते दर्जेदार साहित्य लोकांसमोर यावं म्हणून. तसंच नवोदितांना व्यासपीठही मिळावं म्हणून. मासिकात साहित्याची निवड कशी केली, लेखकांशी संपर्क कसा साधला, त्याचे वेगवेगळे अनुभव पुस्तकात आहेत. वैचारिक आणि दीर्घ लेख "अंतर्नाद" मध्ये प्रकाशित होत. पुढे त्यातल्या काही लेखसंग्रहांची पुस्तकं सुद्धा प्रकाशित झाली. अंतर्नाद ने आपल्या वाचकवर्गाची पसंती मिळवली होती.

लिखाणाचा दर्जा हे जसे मासिकाचे वैशिट्य होते तसेच त्याचे सादरीकरण सुद्धा सुयोग्य दर्जाचे असावे ह्यासाठी त्यांनी केलेल्या महेनतीबद्दल सुद्धा सविस्तर लिहिले आहे.

मासिकातल्या लिखाणात अचूकता यावी ह्यासाठी खास काळजी घेतली जायची. यास्मिन शेख ह्या मराठी भाषा विदुषीचे सहकार्य त्यांना लाभले. स्वतः श्री. काळे ह्यांचे मजकूर तपासणीकडे लक्ष होते. मुखपृष्ठासाठी प्रसिद्ध कलावंतांची चित्र मिळवली. "रवींद्रनाथ विशेषांक", कालिदास विशेषांक", "शेक्सपियर विशेषांक" कसे तयार झाले ते अनुभव पुस्तकात आहेत. नवीन लेखक कवी तयार व्हावेत ह्यासाठी कथालेखन स्पर्धा राबवल्या होत्या. वाचन वाढावे ह्यासाठी मासिकातल्या लेखनावर आधारित खुल्या लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. त्याची माहिती पुस्तकात आहे.

वरचे सगळे मुद्दे वाचताना फार छान छान, यशस्वी, सकारात्मक असं वाटत असेल. पण तसं नव्हतं. पूर्ण पुस्तकभर ह्या अनुभव कथनाला एक विषण्णतेचे, हतबलतेचे, संघर्षाचे पार्श्वसंगीत आहे. कारण प्रत्येक महिन्याचा अंक, प्रत्यके दिवाळी अंक, प्रत्येक उपक्रम हा एक संघर्ष होता. वर्गणीदार वाढवायचा संघर्ष. अंकासाठी जाहिराती मिळवण्यासाठी संघर्ष. "दिवाळी अंकांपेक्षा दिवाळीच्या फटाक्यांचा खप जास्त होतो. तुम्हाला जाहिराती देऊन काय फायदा" असा बाजाराचा सूर. राजकीय वाद टाळले तरी मासिकातल्या मजकुरावर होणारी नाहक टीका. डावे-उजवे-भांडवलशाहीवादी-समाजवादी अशी कुठलीही एक भूमिका घेतली नाही त्यामुळे कुठलाच "हक्काचा मतदारसंघ" तयार झाला नाही अशी स्थिती. वाढता निर्मिती खर्च. छपाईसाठी कागद मिळवणे, टपालाने अंक पाठवणे ह्या नियमित गोष्टीसुद्धा त्रासदायकच होत्या. अंक पोचला नाही तर पुन्हा पाठवा. येणी वसूल करा. देणी वेळेत द्या. एक ना दोन बारा भानगडी. पुस्तकात हे सगळं वाचताना मासिक चालवायचं म्हणजे, पुलंच्या रावसाहेबांच्या भाषेत "सोपं काम काय हो ते? पीडाच की ती !" असाच भाव माझ्या मनात आला.

श्री. काळे ही सगळी पीडा सहन करत होते ते समाजाची संस्कृतिक समृद्धी वाढावी ह्यासाठी. पण तिथेही एकूण निराशाच पदरी येत होती. खालावत जाणाऱ्या लेखनदर्जामुळे अंकाचा दर्जा कसा शाबूत ठेवायचा ह्याची काळजी वाढत होती. तरुण मुलांनी वाचावं, लिहितं व्हावं ह्यासाठी कॉलेजमध्ये चालवलेल्या उपक्रमांना मिळाला थंड प्रतिसाद. नवी पिढी इंग्रजी माध्यमाकडे वळल्यामुळे मराठी वाचनच मुळात कमी झाले. त्यात टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया, व्हॉट्सअप चे जबरदस्त आव्हान उभे राहिले होते. "संपादक संवाद" असा संपादकांचं संगठन बांधायचा प्रयत्न सुद्धा पुढे गेला नाही. प्रत्येक नियतकालिक स्वतंत्रपणे झुंजत राहिलं. ही सगळी आव्हाने पुस्तकात सविस्तरपणे मांडली आहेत. त्या विवेचनातून ही आव्हानं फक्त "अंतर्नाद"ची नाहीत तर भारतीय आणि मराठी समाजाचीच आहेत हे वास्तव अधोरेखित होतं.

लोक वाचत का नाहीत ? न वाचणाऱ्यांचं असं काय नुकसान झालं ? वाचनाने सुसंस्कृतपणा येतो असं म्हटलं तरी जे वाचतात ते तरी खरंच सुसंस्कृतपणे वागतात का ? लेखक, कलावंत ह्यांच्या भ्रष्ट वागण्याचे किस्से ऐकू येतातच ना ? उपयुक्ततावादाच्या जगात, पैशाच्या जगात कथा-कादंबऱ्या-ललित साहित्य ह्यांच्या वाचनाचं त्यातून मिळणाऱ्या आनंदाचं मोल पैशात कसं करायचं? मनोरंजनाच्या थिल्लरपणाला "थोडं डोकं लावायला लावणाऱ्या" सकसतेकडे कसं वळवणार? मराठी ज्ञानभाषा होण्याची लढाई आपण हरलो आहोत हे आपण मान्य करणार का ? मराठी टिकेल का? आणि टिकवायची तरी कशासाठी? असे कितीतरी प्रश्न हे पुस्तक आपल्या मनात उभे करते.
"अंतर्नाद" जात्यात तर आपण सुपात आहोत, नाही का !

"अंतर्नाद"च्या यशापयशात सामाजिक स्थितीचा भाग मोठा असला तरी काळे ह्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या स्वतःच्या गुणदोषांचा, आवडीनिवडीचा सुद्धा परिणाम निश्चितच होता. त्यादृष्टीने काळे ह्यांनी आत्मपरीक्षण सुद्धा केलं आहे. स्वतःच्या उणीवा स्पष्टपणे मांडल्या आहेत. "अंतर्नाद"ला संस्थात्मक रूप , एका टीमचं रूप देण्यात आलेलं अपयश त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं आहे. "म्हाताऱ्यांचं मासिक" अशी मासिकाची प्रतिमा तयार झाली त्याला काही अंशी स्वतःचा गंभीर स्वभाव कारणीभूत असावा हेही स्वीकारलं आहे. पुस्तकाने त्यातून समतोल साधला आहे. ह्याच काळात इतर कुठली मासिकं सुरु झाली, वाढली, बंद पडली हे पण थोडक्यात सांगितलं असतं तर नियतकालिकसृष्टीचं चित्र अजून स्पष्ट झालं असतं.

हे पुस्तक वाचतांना मला स्वतःला प्रश्न पडला की मी स्वतः अंतर्नाद किंवा नियतकालिकं किती वाचतो? तर फार क्वचित. मी पुस्तकं भरपूर वाचतो. पण वेगळे वेगळे लेख वाचण्यापेक्षा एक पुस्तक वाचणं भावतं. तसंच आठवड्याला एक लेख असं वर्षभर लेखमाला वाचण्यापेक्षा ती लेखमाला पुस्तक स्वरूपात सलग वाचायला आवडते. वाचकांमधला पण हा पोटभेद ! पुस्तक वाचनालयातून घेऊन वाचन जास्त होतं प्रत्यक्ष विकत घेऊन पुस्तक वाचन कमी होतं. म्हणजे जरी मी एक चांगला, नियमित वाचक असलो तरी नियतकालिकांच्या दृष्टीने उपयुक्त नाही !

आता काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका


मासिकासाठी साहित्य निवडीबाबत



वर्गणीदार वाढवण्याची धडपड



"पुस्तक" आणि "वाचन" ह्यांना नवीन तंत्रज्ञानाचे आव्हान ह्याबद्दल चिंतन.




मी ज्या वाचनालयाचा सभासद आहे आणि जिथून मी हे पुस्तक घेतलं आहे त्या "फ्रेंड्स लायब्ररी"च्या पै काकांच्या योगदानाचे योग्य कौतुक पुस्तकात आहे



"डॉक्युमेंटेशन"ची फार सवय नि आवड नसणाऱ्या आपल्या समाजात हे पुस्तक दस्तऐवजीकरण म्हणून वेगळं आहे.

हे पुस्तक वाचल्यावर जाणवलं की प्रतिकूलतेसमोर शरणागतीचं "पांढरं निशाण" न दाखवणारे "काळे" हे एक योद्धाच आहेत. हे युद्ध कठीण आहे. कोणाला ह्या लढाईत उतरायचं असेल तर केवळ भावनेच्या भरात न उतरता सर्व बाजूने कसा विचार करावा लागेल ह्याचं प्रामाणिक दर्शन पुस्तकातून घडेल. लेखक, प्रकाशक, सुजाण वाचक, भाषा-संस्कृती ह्यात रस असणाऱ्या प्रत्येकाला हे चिंतन आवडेल. लेखकाचे विचार सगळेच सगळ्यांना पटतीलच असे नाही किंवा मागे वळून बघताना, "अरे, तुम्ही हे का केलं नाही, ते 
का केलं" असं सुद्धा वाटू शकतं. पण तसं वाटण्याला काही अर्थ नाही. ज्याच्याकडे खरंच काही प्लॅन आहे त्याने ह्या लढाईत उतरावं आणि करून दाखवावं. 

भानू काळे ह्यांच्या कष्टाला प्रणाम !




——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

डॅडी लॉंगलेग्ज (Daddy LongLegs )





पुस्तक - डॅडी लॉंगलेग्ज (Daddy LongLegs )
लेखिका - जीन वेब्स्टर (Jean Webster)
भाषा - मराठी (Marati)
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
अनुवादिका - सरोज देशपांडे (Saroj Deshpande)
पाने - १४३
प्रकाशन - राजहंस प्रकाशन, २००८
मूळ पुस्तक प्रकाशन - १९१२
छापील किंमत - रु. १२०/-
ISBN - 978-81-7434-407-6

"डॅडी लॉंगलेग्ज" ही एक पत्ररूपात लिहिलेली कादंबरी आहे. एक अठरावर्षीय मुलगी जेरुशा तिची नायिका आहे. ती लहानपणापासून अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली आहे. आता शाळेचं वय संपलं तरी आयुष्यात पुढे काय करायचं हा प्रश्न तिच्यापुढे, अनाथाश्रमापुढे आहेच. तात्पुरते तरी आश्रमातच राहण्या-जेवण्याबदल्यात आश्रमाचीच सगळी कामं तिने करायची अशी सोय लागली आहे. ती हुशार आहे, थोडी अवखळ आहे. एके दिवशी आश्रमाची संचालिका तिला सांगते की आश्रमाच्या एका विश्वस्तांना तिने लिहिलेला निबंध-विनोदी शैलीतली कथा आवडली. तिच्यात कल्पकता आहे, बुद्धिमत्ता आहे हे त्यांना जाणवलं. कदाचित पुढे ती लेखिका होऊ शकेल असं वाटून पुढे प्रगती करण्यासाठी कॉलेजात पाठवायची तयारी त्यांनी दाखवली आहे. तिच्या कॉलेजचा खर्च तेच करतील. अट एकच तिने तिची प्रगती आणि रोजच्या साध्यासुध्या गोष्टीसुद्धा नियमित पत्रांतून कळवायच्या. जणू आईवडिलांना पत्र लिहितेय अशा. पण त्यांची खरी ओळख तिला सांगितली जाणार नाही. जेरुशा ला हा सुखद धक्काच असतो. पण आपल्याला मदत करणारा हा माणूस कोण ? त्याने आपलं खरं नाव गुप्त का ठेवलं आहे हे तिला काहीच कळत नाही. त्या विश्वस्तांना ती एकदाच दुरून पाठमोरं आणि ओझरतं पाहते. ते मध्यमवयीन आणि लंबूटांग आहेत. एवढंच तिच्या लक्षात येतं.

ती ही संधी मनापासून स्वीकारते. ती पहिल्यांदाच आश्रमाबाहेर खुल्या जगात एकटीने वावरु लागते. पत्र लिहू लागते. "जॉन स्मिथ" हे त्यांचं खोटं नाव तिला आवडत नाही. त्याऐवजी ती त्यांना स्वतःच नाव देते - लंबूटांग म्हणून "डॅडी लॉंगलेग्ज". ह्याच पत्रांतून उलगडतं तिचं मन, तिचा स्वभाव. अनाथाश्रमात वाढलेली, बाहेरच्या जागत वावरायला बुजणारी ती ह्या खुल्या जगाशी कशी जुळवून घेते. कशी मोठी होते हा प्रवास आपल्याला त्या पत्रांतून उलगडतो. आपला हा भूतकाळ लोकांना, मैत्रिणींना कळला तर त्या काय म्हणतील ? हसतील, नाक मुरडतील का सहानुभूतीने वागतील. असं काहीच वाट्याला येऊ नये म्हणून ती काहीतरी कामचलाऊ उत्तरं देऊन वेळ मारून नेते. मुली ज्या विषयांवर गप्पा मारतात त्यातलं काहीच आपल्याला ठाऊक नाही म्हणून अधाश्यासारखी पुस्तकं वाचून काढते. असं ती पत्रांतून कळवते.

पत्रांत दिसते तिचा निखळ स्वभाव. "डॅडी' ने आपली ओळख सांगावी किमान तिला उलट टपाली उत्तर तरी पाठवावं म्हणून ती मधून मधून विनवते, हट्ट करते. तिच्यासाठी "डॅडी' हेच आपलं एकमेव माणूस या ती त्यांना चिडून पण पत्र लिहिते. पण पुढच्या पत्रात तिची चूक दुरुस्त करते "डॅडी'ने दिलेल्या मदतीमुळे तिला नवीन अनुभव घ्यायला मिळतायत ह्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते. तर कधी मी तुमचे उपकार - पैसे तरी - परत करीन अशी प्रौढ भूमिका पण घेते. परीक्षेत नापास झाले हे मजेत सांगते; पण पुढच्यावेळी असं होणार नाही असा प्रेमळ वायदा पण करते. तिच्या कादंबरी लेखनाच्या कथा लेखनाच्या प्रयत्नाबद्दल लिहिते. आणि त्यात आलेलं अपयश, निराशा आणि झालेली रडारड हे पण सांगते. छोट्या छोट्या रेखाचित्रांतून ही पत्र अजून खुलतात. आश्रमातलं एकसुरी आयुष्य, लोकांच्या दयाळू नजरा ह्यांची आठवण जेव्हा जेव्हा होते तेव्हा ती अस्वस्थ होते. पण त्याच अभावग्रस्त आयुष्याच्या अनुभवामुळे आज तिला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं तिला महत्त्व आहे. त्यामुळे इतर मुलींपेक्षा ती जास्त समाधानी आहे, आनंदी आहे असं पण ती लिहिते.

चार वर्षांचा हा पत्रव्यवहार एका लहान मुलीचा तरुणीत होणारा बदल टिपतो. तिचं ज्ञान, अनुभव, जगण्याबद्दल जाणिवा कशा विकसित होत गेल्या ह्याचा हा प्रवास आहे. हाडामासाच्या माणसासारख्या राग, लोभ, क्रोध, आनंद, उत्सुकता, यश, अपयश, गंमत , धमाल, कंटाळा असे सगळे रंग पत्रांतून दिसतात. त्यामुळे वाचन रंजक होते. पण पुढे पुढे वाचताना असं वाटू लागतं की अशी पत्रे कधी संपणारच नाहीत. आयुष्यभर ती लिहू शकेल. ह्या पुस्तकाला काही तार्किक शेवट असेल का ? आणि असा विचार येऊ लागत असतानाच लेखिका एका अनपेक्षित पण सुंदर वळणार पुस्तकाचा शेवट करते. काय असेल हा शेवट ? "डॅडी" कोण हे तिला कळेल का ? ती लेखिका होईल का ? वयात आलेली पोर कॉलेजात कोणाच्या प्रेमात पडेल का ? अनाथ मुलीच्या आयुष्याचं पुढे काय होईल ? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचा.

असं हे पुस्तक वाचायला छान आहे. त्यातली काही पानं उदाहरणादाखल वाचा

अगदी सुरुवातीच्या काळातलं पत्र .. डॅडी शी ओळख वाढवताना ... जगाची ओळख वाढवताना



न्यू यॉर्क भेट... इतकी मोठी उडी पहिल्यांदाच



अशानिराशेचा क्षण आणि नवनव्या विचारसरणींशी ओळख




पुस्तकाबद्दल थोडं नेटवर शोधल्यावर माहिती मिळाली की Jean Webster हे लेखिकेचं टोपण नाव आहे. तिचं नाव Alice Jane Chandler Webster. है पुस्तकावर आधारित चित्रपट आणि नाटकं सुद्धा येऊन गेली आहेत. युट्युबवर एक चित्रपट मिळाला https://www.youtube.com/watch?v=xl4qYg7ONak

जेरुशा च्या रूपाने अनाथ मुलीच्या मनात डोकावताना जाणवतं की अशा एखाद्या गरजू व्यक्तीला आपण मदत करतो ही चांगलीच गोष्ट आहे. पण ती हळुवारपणे, त्याचा स्वाभिमान न दुखावता देता आली तर ते सोन्याहून पिवळं. आणि दुसरी गोष्ट अधोरेखित होतेच, ती म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याचा पूर्ण आनंद घेणं किती महत्त्वाचं आहे. दोन व्यक्तींची पत्ररूपाने वाढत जाणारी ओळख आणि शेवटचे अनपेक्षित वळण ही लेखनशैली आवडली. सरोज देशपांडे ह्यांनी अगदी ओघवता अनुवाद केला आहे. परीक्षेत "गचकले", "वाग्गंगेला पूर", "नावावर फुली मारून टाकली आहे" अशा सारख्या चपखल वाक्प्रचारांतून भाषेची खुमारी वाढली आहे. त्यामुळे जेरुशा आणि डॅडी दोघंही अमेरिकेतले मराठीच असतील असं वाटतं.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

Doongaji House (डूंगाजी हाऊस )





पुस्तक - Doongaji House (डूंगाजी हाऊस )
लेखक - Cyrus Mistry (सायरस मिस्त्री)
भाषा - English (इंग्रजी )
पाने - २४५
प्रकाशन - अलेफ बुक कंपनी, रूपा पब्लिकेशन्स इंडिया, २०२३
ISBN - 978-93-93852-73-1
छापील किंमत - रु. ५९९/-


सायरस मिस्त्री लिखित पुढील तीन नाटकांचा संग्रह आहे.
१) Doongaji House डूंगाजी हाऊस
२) A legacy of rage लिगसी ऑफ रेज 
३) A flowering disorder अ फ्लॉवरिंग डिसॉर्डर 

Doongaji House डूंगाजी हाऊस
पहिलं नाटक १९६० सालच्या मुंबईत घडतं. "डूंगाजी हाऊस" नावाची पारशी लोकांची इमारत आहे. इमारत जुनी जीर्ण झालेली आहे. तशीच कुटुंबही. बरेचसे म्हातारे लोकच इमारतीत राहिले राहिले आहेत. त्यातल्या एका पारशी कुटुंबात नाटक घडतंय. ह्या कुटुंबातला एक मुलगा पण परदेशी, एक दुसरीकडे आहे. प्रौढ नवरा बायको (होर्मुस आणि पिरोजा) आणि त्यांची मुलगी असे तिघे सध्या एकत्र आहेत. नाटकाच्या संवादातून लक्षात येतं की एकेकाळी धंदापाणी चांगलं असणाऱ्या होर्मुसचे सध्या मात्र हलाखीचे दिवस आहेत. त्याला कारण ठरलं ते एका जवळच्या नातेवाईकाने केलेली फसवणूक.
काय झालं होतं तेव्हा? कोणी फसवलं, का फसवलं? खरंच फसवलं का? आता जुने हिशेब, जुनी कौटुंबिक कटुता मागे सोडून पुन्हा नव्याने सुरूवात करायची का? ह्याबाद्दलचे प्रसंग अशी नाटकाची संकल्पना आहे. खूप नाट्य नाही. किंवा शेवटी खूप हाती लागलं असंही नाही. केवळ पारशी कुटुंबाचा एक अनुभव ह्या नाटकातून मिळाला एवढंच वेगळेपण.
मुंबईत झालेली पहिली दंगल हिंदू मुसलमान अशी नसून पारशी हिंदू अशी होती. त्याची एक आठवण. नाटकात वाचायला मिळते.


लिगसी ऑफ रेज A legacy of rage
हे नाटक वसईच्या "इस्ट इंडीयन" म्हणजे मराठी- ख्रिश्चन कुटुंबात घडतं. वृद्ध रॉबर्टच्या कुटुंबात त्याची सून, नातू, बहीण, बहिणीचा मुलगा आहेत. त्याचा मुलगा कित्येक वर्षांपासून कुवेतला गेला आहे तो परत येतंच नाही. सुनेला फक्त मनी ऑर्डर पाठवतो. पण स्वतःच्या बायकोमुलाला भेटायला सुद्धा येत नाही. रॉबर्टची मोठी जमीन आहे. पण सरकारी आणि न्यायालयीन लढाईत ती अडकली आहे. रॉबर्टच्या भाच्याचा त्यावर डोळा आहे. ही संपत्ती आपल्या घशात घालायचा तो कट करतो. रॉबर्टला त्याचा संशय आहे. पण मुलगा येईल आणि सगळा कारभार हातात घेईल ह्या आशेवर तो जगतोय. सगळ्या चिंता दारूच्या नशेत बुडवतोय. पुढे काय होईल? कट यशस्वी होईल? मुलगा परत येईल?

जॉर्जी (भाचा) फसवून रोबर्टच्या सह्या घेतो तो प्रसंग.


हे नाटक थोडं तरी उत्सुकता वाढवणारं होतं. नवनवे प्रसंग कथानक पुढे नेत होते.

३) A flowering disorder अ फ्लॉवरिंग डिसॉर्डर 
हे नाटक पुन्हा पारशी कुटुंबात घडतं. प्रौढ पारशी दाम्पत्य. त्यांची काही वर्षांपूर्वीच लग्न झालेली मुलगी (रुखसाना) घरी आली आहे. ती विमनस्क, अस्थिर मानसिक अवस्थेत आहे. नवऱ्याचे बाहेर लफडे आहे त्यामुळे ती तशी झाली आहे. आईवडील तिला समजवायचा काय प्रयत्न करतात. तिला बरं वाटावं म्हणून डॉक्टरकडे, मांत्रिकाकडे नेतात. कुत्रा पाळतात. तिची आई तिला वडिलांच्या चक्रमपणाचे अनुभव सांगते. पण काही फरक पडत नाही. मग एके दिवशी अचानक फरक पडतो. तिला पुन्हा आयुष्य नव्याने जगावं असं वाटतं. तिचा नवरा तिला फोन करतो आणि ती घरी जायला तयार होते. संपलं नाटक.

तद्दन रटाळ. काही घडतंच नाही. विनाकारण प्रसंग आणि संवाद घातले आहेत. त्या प्रसंगातून काही तार्किक कथानक तयार होत नाही. नायिकेला अचानक नवऱ्याचा संशय येतो; आणि काही दिवसांनी अचानक विश्वास बसतो. "संशय" हाच "डिसॉर्डर" असं लेखकाला दाखवायचं असावं. पण ह्या संकल्पनेवर जुन्या "संशयकल्लोळ" पासून आजपर्यंत किती रंजक, विनोदी नाटकसिनेमे आले असतील ह्याला गणतीच नाही. त्यामुळे हे नाटक का लिहिलं आहे. आणि ते "निवडक नाटके" प्रकरच्या पुस्तकात का समविष्ट केलं हे देव जाणे!

रुखासाना आणि तिचे शेजारी आजोबा सोहराब ह्यांच्यातला संवाद.

पारशी समजात घडणाऱ्या घटनांचे चित्रण असणारे काहीतरी नवीन अनुभव देणारे पुस्तक असेल ह्या अपेक्षेने पुस्तक वाचत राहिलो. पण तसं हाती काही लागलं नाहीच, गोष्टीची मजा पण आली नाही.

ह्या एका पुस्तकावरून पारशी-इंग्रजी भारतीय रंगभूमी बद्दल काही मत बनवणं चुकीचं आहे. पण ही नाटकं अशीच होती का ? जाणकार सुजाण वाचकांनी/प्रेक्षकांनी आपलं मत सांगावं.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

निकोला टेस्ला (Nikola Tesla)



पुस्तक - निकोला टेस्ला (Nikola Tesla)
लेखक - सुधीर फाकटकर (Sudhir Phakatkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १८६
प्रकाशन - राजहंस प्रकाशन. मे २०२३
ISBN - 978-93-91469-21-4
छापील किंमत - रु. २७०/-

भारतात सध्या निवडणुकांचे वारे सुरु आहेत. भारतातल्या निवडणुका म्हटलं की एक वाक्य नेहमी येते ते म्हणजे "बिजली सडक पानी". आधुनिक जगात अन्न-वस्त्र-निवारा इतकीच मूलभूत गरज "बिजली" अर्थात विजेची आहे. विजेची उपलब्धता ही जनतेच्या विकासासाठी अत्यावश्यक बनली आहे. हजारो वर्षांचा मानवी इतिहास बघता गेल्या दोनेकशे वर्षांमध्येच "वीज" हा ऊर्जेचा मुख्य स्रोत झाला आहे. पण हा बदल झाला कारण; मोठ्या प्रमाणावर वीज निर्मती करणं शक्य झालं. एका ठिकाणी निर्माण केलेली वीज तारांच्या माध्यमातून लांब लांब पर्यंत नेणं शक्य झालं. विजेचा ऱ्हास कमीत कमी ठेवत हे वहन शक्य झालं. घरापर्यंत वीज पोचल्यावर त्यावर चालणारी कितीतरी उपकरणं तयार झाली. जगभरातल्या मानवांना ऊर्जेचं हे वरदान मिळालं ते देशोदेशीच्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि कारखानदार-उद्योगपतींमुळे. त्यांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे "निकोला टेस्ला". सध्या आपल्या घरात जी वीज येते ती "अल्टरनेटिंग करंट" म्हणजेच "ए.सी." प्रकारची. अशा विजेचं मोठ्याप्रमाणावर उत्पादन आणि वितरण शक्य आहे हे निकोलाने आपल्या संशोधनांतून सिद्ध केलं. भंडलवालदारांची मदत घेऊन अशी वीज निर्मिती आणि वितरण करणारे प्रकल्प अमेरिकेत उभे केले. आणि मानवी आयुष्यात क्रांती घडवली.

निकोला आयुष्यभर संशोधन करत राहिला, प्रयोग करत राहिला. त्याने नवनवीन तंत्रज्ञान तयार केलं. मोठया मोठ्या भांडवलदारांची मदत घेऊन त्या उपकरणांची मोठ्या प्रमाणावर (लार्ज-स्केल) उत्पादनही केलं. त्याने लावलेल्या शोधांची यादी तुम्ही नेटवर बघितलीत तर मुख्य नावे दिसतील
AC Power (alternating current)
Tesla Coil
Magnifying Transmitter
Tesla Turbine
Shadowgraph
Radio
Neon Lamp
Hydroelectric Power
Induction Motor
Radio Controlled Boat
काही वेळा त्याच्या संशोधनावर आधारित किंवा ते अजून पुढे नेत इतर संशोधकांनी ह्यात प्रगती केली उदा. रिमोट कंट्रोल, बिनतारी संदेशवहन, रेडियो, क्षकिरण, रडार इ.
अशा "निकोला टेस्ला"चं चरित्र श्री. सुधीर फाकटकर ह्यांनी आपल्यासमोर मराठी पुस्तकस्वरूपात आणलं आहे. निकोलाच्या जन्मापासून मृत्यपर्यंत पूर्ण आयुष्य ह्यात समाविष्ट आहे.

निकोलाच्या बालपणापासून त्याच्या शोधक वृत्तीची झलक आपल्याला दिसते. बऱ्याच वेळा अशा संशोधकांमध्ये आढळून येणारा एककल्लीपणा त्याच्यातही दिसतो. असे लोक एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतात आणि तो ध्यास चुकीच्या गोष्टीचा लागला तर सोन्यासारख्या आयुष्याची माती होते. निकोलला सुद्धा तरुणपणी जुगाराचा नाद लागला. त्यात तो वाहवत चालला होता. पण कुटुंबाने त्याला सावरलं आणि तो पुन्हा अभ्यासाकडे वळला. हे आपल्याला पुस्तकातून कळतं.

त्याची बुद्धिमत्ता आणि "वीज" ह्याविषयातला रस बघून प्रख्यात शास्त्रज्ञ एडिसन ह्यांना भेटण्याची संधी मिळाली. एडिसन ह्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला होता. डायरेक्ट करंट अर्थात DC वीज प्रवाहाद्वारे ते दिवे पेटवत होते. DC वीज निर्मिती, वितरण ह्यामध्ये एडिसनची कंपनी काम करत होती. अमेरिकेत विजेचा प्रसार होऊ लागला होता. तिथे निकोलाने काम केलं. पण निकोलाच्या डोक्यात AC प्रकारची वीज घोळत होती. एडिसनला ते पटलं नाही. आणि पुढे कामाच्या मोबदल्यावरून निकोलाने कंपनी सोडली. आपली कल्पना राबवण्यासाठी भांडवालदार शोधले. एडिसन विरुद्ध निकोला ह्यांचा व्यावसायिक संघर्ष सुद्धा सुरु झाला. त्यात पुढे अनेक चढउतार येत गेले. ते सगळं वर्णन पुस्तकात आहे.

निकोलाच्या जे शोध लावत होता त्याची "पेटंट" घेत होता. त्या शोधाचा व्यावसायिक वापर करून जेव्हा उद्योग सुरु होई. तेव्हा निकोलाला स्वामित्त्वहक्काचे शुल्क - रॉयल्टी - मिळत असे. त्यातून निकोला श्रीमंत सुद्धा झाला. राहणीमान सुद्धा उंची हॉटेलांमध्ये असे. तो तरुण असताना त्याची आई त्याच्या लग्नाच्या मागे लागली होती. पण निकोलाचं प्रेम विज्ञानच होतं. पुढील आयुष्यात पण त्याच्यावर भाळलेल्या स्त्रिया भेटल्या पण निकोला मात्र अविविवाहित राहून त्याचं संशोधन-उद्योगातच रममाण राहिला. निकोलाच्या ह्या वैयक्तिक आयुष्याचं दर्शन पण पुस्तकात घडतं. भारतीयांसाठी खास बाब म्हणजे स्वामी विवेकानंद ह्यांच्याशी निकोलाची झालेली भेट. विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचारांचा निकोलावर प्रभाव पडला. तो प्रसंग पुस्तकात आहे.

निकोलाचं आयुष्य मात्र कायम यशस्वी सुखकर राहिलं असं नाही. त्याच्या काही कल्पना काळाच्या पुढे होत्या. त्यासंशोधनासाठी, मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आवश्यक भांडवल मिळालं नाही. काही प्रयोग अर्धवट सोडावे लागले. काही व्यवहार आतबट्ट्याचे ठरले. आग लागून चालू प्रकल्प भस्मसात झाले. तर पहिले महायुद्ध आणि मंदी ह्यामुळे उद्योग दिवाळखोरीत काढावे लागले. पैसा-प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या निकोलाला, राहत्या जागेचं भाडं भरलं नाही म्हणून कितीतरी वेळा हॉटेलांनी बाहेर काढलं. इतकंच काय नोबेल पारितोषिक सुद्धा त्याला जाहीर झालं आणि रद्द झालं. एडिसन, मार्कोनी सारख्या शास्त्रज्ञांशी स्पर्धा, पेटंट च्या दाव्यांविषयी न्यायालयीन लढाईमध्ये सुद्धा अपयश आलं. एका जग बदलून टाकणाऱ्या संशोधकाची ही परिस्थिती बघून आपल्याला वाईट वाटतं.

काही पाने उदाहरणादाखल
लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती


निकोला आणि एडिसनची भेट



निकोलाच्या तंत्रावर आधारित जलविद्युत प्रकल्प नायगरा धबधब्यावर तयार करण्यात आला. पण ते काम सुरु असताना त्याच्या प्रयोगशाळेला आग लागून नुकसान झालं. तरी त्यातून सावरून प्रकल्प पूर्ण झाला. एक संशोधन करता करता दुसरं एक मोठं संशोधन आपोआप घडत होतं. क्ष-किरणांची जाणीव कशी झाली त्याबद्दल.
 



एक तांत्रिक वर्णन. भविष्यवेधी निकोला


असा निकोलाच्या आयुष्याचा बहुअंगी वेध घेण्याचा प्रयत्न पुस्तकात आहे. निकोलाने काय शोध लावला, तंत्र पुढे आणलं हे प्रसंगोपात येतं. पण ते तांत्रिक शब्द फारच जड वाटले. मी एक इंजिनियर असून आणि मराठी माध्यमात शिकलेला असूनही ती वर्णनं फार डोक्यात शिरली नाहीत. आकृत्या काढून अजून स्पष्टीकरण दिलं असतं तर समजलं असतं. पण मग ते विज्ञानाचं पाठ्यपुस्तक झालं असतं. एक ललित चरित्र झालं नसतं. आणि इतर वाचकांना ते कंटाळवाणं झालं असतं. म्हणून कदाचित लेखकाने तांत्रिक विवरण मर्यादित ठेवलं असावं. पुस्तकाच्या शेवटी काही पाने "index" सारखी जोडून जर त्यात हे विस्ताराने टिपले तर पुस्तक आणखीन माहितीपूर्ण होईल.

मराठीत चरित्र भरपूर येत असतील तरी वैज्ञानिकांची चरित्र कमी दिसतात. त्यात "मसाला" कमी असतो आणि तांत्रिक किचकटपणा जास्त असतो. त्यामुळे वाचक सुद्धा जरा तिकडे कमी वळतात. तरी लेखक आणि प्रकाशकांनी हे धाडस केलं ह्याबद्दल दोघांचे आभार. वाचकांनी सुद्धा स्वतःला प्रगल्भ करण्यासाठी अशी पुस्तकं जमतील तेव्हा वाचली पाहिजेत.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara)



पुस्तक - सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara)
लेखक - बेन्यामिन (Benyamin)
अनुवादक - ए आर नायर , जे ए थेरगावकर (A.R.Nair, J.A. Thergaonkar)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तकाची भाषा - मल्याळम (Malayalam)
मूळ पुस्तकाचे नाव - मुल्लपू निरमुल्ल पकलुगल (Mullappoo Niramulla Pakalukal )
इंग्रजी अनुवादाचे नाव Jasmine Days (जस्मिन डेज )
इंग्रजी अनुवादकाचे नाव - शहनाज हबीब (Shahnaz Habib)
पाने - 208
प्रकाशन - अनघा प्रकाशन. एप्रिल २०२१
ISBN - दिलेला नाही
छापील किंमत - २७५/-

ह्या पुस्तकाचे अनुवादक श्री. थेरगावकर ह्यांचं "मस्रा" पुस्तकाचं परीक्षण मी लिहिलं होतं. (https://learnmarathiwithkaushik.com/courses/masra-aadujeevitham-goat-days/) 
त्यांनंतर माझी आणि त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. तेव्हा त्यांनी मला हे पुस्तक भेट दिलं. वाचनीय पुस्तकाची ही भेट दिल्याबद्दल ह्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो.


उत्तर आफ्रिकन देश ट्युनिशियामध्ये २०१०-११ साली खूप मोठं जनआंदोलन झालं. देशावर सुमारे 25 वर्ष राज्य करणाऱ्या हुकूमशाच्या विरुद्ध लोकशाहीवादी असे हे आंदोलन होतं . सर्वसामान्य लोकांनी केलेलं संप, बंद, मोर्चे, आत्मदहन अशा घटनांनी यांनी देशव्यापी स्वरूप घेतलं. शेवटी तिथल्या राष्ट्राध्यक्षाला पायउतार व्हावं लागलं. ट्युनिशियाचं राष्ट्रीय फूल असलेल्या मोगरा अर्थात इंग्लिश मध्ये "जस्मिन" यावरून या क्रांतीला "जस्मिन रिव्होल्यूशन" असं म्हटलं गेलं ट्युनिशियाच्या आंदोलनाचं लोण आजूबाजूच्या अरब देशांमध्येही पसरलं. तिथेही सत्ताधाऱ्याविरोधात मोठी मोठी आंदोलन झाली. बऱ्याच देशातल्या सत्ताधीशांना, हुकूमशहांना पायउतार व्हावं लागलं. देश सोडून पलायन करावं लागलं. हा पूर्ण घटनाक्रम "अरब स्प्रिंग" नावाने ओळखले जातो. वरवर पाहता सर्वसामान्य लोक विरुद्ध हुकूमशहा असा हा लढा दिसतो. पण त्यात खोलात जाऊन बघितलं एकाच धर्मातल्या दोन पंथियांमधली घृणा, स्थानिक विरुद्ध उपरे, लोकशाहीवादी विरुद्ध इस्लामशाहीवादी, स्थानिक सत्ताधीश विरुद्ध बाहेरच्या देशांचे हस्तक असे वेगवेगळे ताणेबाणे आपल्याला दिसतील. ज्या देशात अशा क्रांती घडल्या तिथे सत्तांतर झालं तरी अपेक्षित शांतता व स्थैर्य आलेलं नाही. उलट बरेच देश हुकूमशाहीपेक्षा वाईट अवस्थेतल्या यादवी युद्धात ढकलले गेले. जे लोक हुकूमशाविरुद्ध एकत्र आले तेच नंतर एकमेकांचा गळा घोटण्यासाठी उद्युक्त झाले. क्रांती अर्धवट राहिली किंवा भरकटली. या सगळ्या घटनांचा राजकीय, सामाजिक, भूराजकीय आर्थिक अशा वेगवेगळ्या अंगांनी विचार केला जाऊ शकतो. तशा डॉक्युमेंटरी व लेख सुद्धा उपलब्ध असतील. पण या घटना घडत असताना त्या देशात राहणारा एक सर्वसामान्य माणूस काय अवस्थेतून जात असेल; कसा विचार करत असेल; हा सुद्धा एक महत्त्वाचा पैलू आहे. लेखक बेन्यामिन यांनी या मानवी पैलूतून अरब स्प्रिंग कडे बघितलं आहे.

इंटरनेटवर मिळालेल्या माहितीनुसार बेन्यामिन हे भारतीय मल्याळम असून. बरेच वर्ष आखाती देशात राहिले आहेत. त्यामुळे तिथल्या अनुभवांवर आधारित पुस्तक त्यांची प्रसिद्ध झाली आहे याआधी मी वाचलेलं "मस्रा" हे पुस्तक सुद्धा सौदी अरेबिया मधले वर्णन असणारे चित्तथरारक पुस्तक होतं. "सुगंध गमावलेला मोगरा"चं कथानक अशाच एका अरब देशात घडत आहे. देश आणि शहर लेखकाने निनावी ठेवलं आहे. कथेची नायिका आहे एक पाकिस्तानी तरुणी जी रेडिओ आरजे/निवेदिका म्हणून काम करते आहे. तिचे वडील आणि बरेच चुलते अनेक वर्षांपासून या देशात काम करतायत. काही काकू आणि बरीच चुलत भावंडं असा गोतावळा तिकडे आहे. मोठी झाल्यावर ती सुद्धा नोकरीच्या निमित्ताने या देशात आली आहे. आखाती देशांमध्ये भारतीय लोक सुद्धा कामाला आहेत त्यातही मल्याळी लोकांचा भरणा जास्त, हे आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे समीरा काम करत असलेल्या रेडिओ स्टेशन मध्ये "मल्याळी सेवा" आणि "हिंदी सेवा" आहे. 
पाकिस्तानी समीराला थेट हिंदुस्थानी व्यक्तींबरोबर काम करताना सुरुवातील जड जातं. पण हळूहळू सगळं सुरळीत होतं. तरीही त्यातून मल्याळी ग्रुप आणि इतरांचा ग्रुप ह्यात सुप्त चढाओढ असतेच. ह्याचं रंजक वर्णन पुस्तकात आहे.

पाकिस्तानातून येथे आल्यावर नवीन शहराशी नवीन वातावरणाशी ती स्वतःला जुळवून घ्यायचा प्रयत्न करते आहे. नवीन मित्र जोडते आहे नवीन ओळखी करून घेते आहे. मुलींनी अनोळखी पुरुषांशी बोलण्याला गप्पा मारण्याला तिच्या घरच्यांची अडकाठी आहे. तरी घरच्यांना थोडं फसवून चकवून तिने एक म्युझिक क्लब जॉईन केला आहे ज्यात स्थानिक आहेत आणि स्थलांतरित पण आहेत. त्यातून तिला इथल्या समाजाच्या वैविध्याची जाणीव होते आहे.

जुळवून घेता घेता तिच्या लक्षात येतंय की वरवर शांत दिसणारा देश आतून खदखदतो आहे. वरवर एकसंध दिसणारा समाज आतून दुभंगलेला आहे. इस्लामी देश असला तरी सुन्नीपंथीयांची इथे राजवट आहे. शिया समाजाला दुय्यम, काफीर, तुच्छ लेखले जाते. तिच्या शिया मित्रांच्या ओळखीतून तिला कळतं की हा देश एकेकाळी शियांचा होता. पण सुन्नी राजवट आल्यानंतर शियांवर दडपशाही होते आहे. शिया त्याविरुद्ध आंदोलनाच्या तयारीत आहेत. एकूणच सत्ताधीश हा हुकूमशहा आहे, भ्रष्टाचारी आहे, माजलेला आहे; लोकांना विकासाच्या संधी कमी आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे हुकूमशाही विरुद्ध लोकशाही, भ्रष्टाचारी शासन विरुद्ध सुशासन. असाही दुभंग आहे. भारत, पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेश आणि इतर अनेक देशांतून लोक इथे कामाला आलेले आहेत. पोलिसात आहेत. स्थानिक लोकांवर सरकारचा विश्वास थोडा कमी आहे त्यामुळे परकीय भाडोत्री लोकांच्या आधारावर हा हुकूमशा आपलं राज्य चालवतो आहे. परदेशी लोक इथे येऊन खूप कमावतायत. त्यातून देशी विरुद्ध परदेशी अशी दरी निर्माण झालीये. नायिकेच्या -समीराच्या - नजरेतून जसं आपण बघत जातो तसतशी आपल्याला क्रांतीची बीजे आपल्याला दिसू लागतात.

पुस्तकाच्या पुढच्या टप्प्यात लोकांची आंदोलने सुरू होतात. दंगेधोपे होतात. रोजचं जगणं, कामावर जाणं चालू ठेवायचं चालू ठेवायचं म्हणजे संकटांचा सामनाच. दंगलखोर कधी गाड्या अडवतील, हुकूमशहाला मदत करणाऱ्या परदेशी व्यक्ती म्हणून कधी घातपात होईल सांगता यायचं नाही. शिया-सुन्नी वाद सुद्धा त्यांच्या ऑफिसपर्यंत मित्रमंडळीच्या टोळीपर्यंत येऊन पोहोचतो. रेडियोच्या कामामध्ये सेन्सॉरशिप लादली जाते. क्रांतीचे चटके तिला थेट समीराला बसायला लागतात. शिया मित्रांशी बोलल्यावर तिला त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या अत्याचाराच्या हृदयद्रावक कहाण्या समजतात. कोण चूक? कोण बरोबर? आपण परदेशी नागरिक म्हणून यात पडायचं का? अन्यायाला विरोध करण्यात सामील व्हायचं का व्यवस्थेला साथ देऊन आपला नोकरीधंदा टिकवायचा ? असे कितीतरी द्विधा अवस्थेत टाकणारे प्रसंग तिच्यासमोर येतात. कादंबरीच्या पुढच्या टप्प्यावर क्रांतीही पुढचा टप्पा गाठते. आंदोलनाचे स्वरूप हिंसक होतं तसं हुकूमशाचं उत्तरही हिंसक होतं. या सगळ्याचा थेट परिणाम तिच्या कुटुंबीयांवर होतो. तिला एका दुर्दैवी परिस्थितीला सामोरं जावं लागतं.

या प्रसंगात तिला आपल्या घरातल्या दुभंगाची सुद्धा जाणीव होते. या देशातच जन्माला आलेल्या चुलत भावंडांचे आणि तिचे विचार वेगळे आहेत. बरीच वर्षे इथे राहिलेल्या इथल्या पगाराला सरावलेल्या आपल्या काकवा आणि पाकिस्तानात राहणारी आपली आई यांच्यात फरक आहे. इथे मरमर कष्ट करून पै पै जमवणारे वडील आणि त्याच पैशांवर पाकिस्तानात आपल्या गावी मजेत राहणारी तरी वर वडिलांचाच दुस्वास करणारी आई यांच्यातही किती फरक आहे.

अशा असंख्य ताण्याबाण्यांची वीण लेखकाने अगदी कमी पानांत आपल्यासमोर उभी केली आहे. त्यातून समीरा स्वतःला सावरेल का? कोण चूक, कोण बरोबर हे ती ठरवू शकेल का? एकाची बाजू घेऊ शकेल का? हे समजून घेण्यासाठी तुम्ही ही कादंबरी अवश्य वाचा. पुस्तक वाचता वाचता आपसूकच समीरच्या जागी स्वतःला ठेवून आपणही निर्णय घेण्याचा प्रयत्न करत राहतो. हे कादंबरीचं बलस्थान आहे.

काही पाने उदाहरणादाखल

परदेशात राहायला आल्यावर आपले वडील इथे कसे काटकसरीने जगत होते याची झालेली जाणीव


ऑफिसमध्ये समीरची ओळख अलीशी होते. आणि त्यातून शियासुन्नीवादाची झालेली तोंड ओळख




दंगलीला तोंड फुटल्यावर स्थानिक विरुद्ध परके अशा वादाची बसलेली झळ



पुस्तकात मुद्रितशोधनाच्या बऱ्याच चुका राहिल्या आहेत. अनुवाद पण अजून थोडा नैसर्गिक करता आला असं वाटतं. पण कादंबरीतल्या प्रसंगांच्या वेगामुळे आपण त्या चुकांमध्ये फार अडकून पडत नाही. कादंबरीतला प्रत्येक प्रसंग महत्वाचा आणि कथानक पुढे नेणारा आहे. विनाकारण वर्णनांचा फापटपसारा नाही. एक भारतीय मल्याळी लेखक, अरबी देशांवर आधारित कथानक, पाकिस्तानी व्यक्ती आणि त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद असं हे विलक्षण मिश्रण ह्या पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर आलं आहे.
 पुस्तक मल्याळममध्ये आणि इंग्रजीमध्ये खूप गाजलं आहे नायर-थेरगावकर या द्वयीने आपल्यासाठी हे पुस्तक मराठीत आणलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. मराठी वाचकांमध्ये सुद्धा हे पुस्तक प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्हायला हवं असं मला मनापासून वाटतं.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अधर्मकांड (adharmakand)




पुस्तक - अधर्मकांड (adharmakand)
लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre)
अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - व्हडलें घर (vhodlem ghar)
मूळ पुस्तकाची भाषा - कोंकणी (Konkani)
पाने - १६०
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस, फेब्रुवारी २०२४
ISBN - 9789357204057
छापील किंमत - रु. २७०/-

गोव्यावरती पोर्तुगीजांची सत्ता असताना व्यापाराबरोबरच धर्मप्रसार हा देखील त्यांचा मुख्य उद्देश होता. स्थानिक हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. देवळे पाडण्यात आली. "येशूचा प्रेमाचा संदेश" बळजबरी, हत्या आणि तलवारीच्या टोकावर पसरला. पैसा, जमिनी आणि समाजात अधिकार ह्यांचं प्रलोभन दाखवून काहींना भुलवण्यात आलं. तर कुणाच्या असहाय्य परिस्थितीचा फायदा घेत मदतीच्या बहाण्याने ख्रिश्चन करण्यात आलं. हे बाटणे टाळण्यासाठी अनेक कुटुंबे गोवा सोडून परागंदा झाली. बरोबर ते घेऊन गेले...आपल्या देवांच्या मूर्ती, टाक, पूजासाहित्य आणि रम्य गोव्याच्या उद्ध्वस्त आठवणी. जे राहिले, बाटले तेही सुखाने नांदले असे नाही. कारण दुसरी आपत्ती त्यांच्यासमोर उभी ठाकली, ती म्हणजे - इन्क्विझिशन. बाटलेले हिंदू खरंच ख्रिश्चन धर्माप्रमाणे आचरण करतायत ना, त्यात टाळाटाळ करत नाहीयेत ना, जुना धर्म रूढीपरंपरा पाळत नाहीयेत ना; ह्यावर नजर ठेवली जाऊ लागली. नव्या धर्माच्या "प्रेमाची दहशत" बसली पाहिजे म्हणून कुचराई करणाऱ्यांना "इन्क्विझिशन" म्हणजे चौकशीला तोंड द्यावं लागलं. चूक आढळली की घरादारावर जप्ती, जाचक कैद, अमानुष छळ आणि कधीकधी देहांत प्रायश्चित्त - जिवंत जाळून मारण्याचं. सत्ता पोर्तुगीजांची, नियम त्यांचे, धर्म त्यांचा, तपासणी त्यांची आणि निकालही त्यांचाच. मग "इन्क्विझिशन"च्या नावाखाली नकोश्या माणसाचा काटा काढायचा; एखाद्या श्रीमंतांची मालमत्ता हडप करायची; तर कधी केवळ आपली मुजोरी दाखवण्यासाठी एखाद्याचा छळ करायचा. सुमारे अडीचशे वर्ष गोवा "इन्क्विझिशन"खाली असा भरडला गेला.

कसा असेल तो काळ ? कसे वागत असतील पोर्तुगीज उमराव ? काय प्रसंगांना तोंड दिलं असेल तिथल्या हिंदू जनतेनं ? आपला धर्म सोडताना, गाव सोडताना काय कल्पांत झाला असेल ? ह्या सगळ्याचे चित्रण करणारी "अधर्मकांड" ही कादंबरी आहे. पाठमजकूर(ब्लर्ब) मध्ये म्हटलं आहे तसं - "कायतान" नावाचा जमीनदार आता बाटला आहे. पण कोणीतरी कागाळी केली की त्याने ख्रिश्चन धर्म नीट पळाला नाहीये. त्याबरोबर त्याला तुरुंगात डांबलं गेलं. साक्षी-पुरावे-समोरासमोर जबानी उलटतपासणी काही नाही. तुरुंगात त्याला पुन्हा पुन्हा एकच सांगणं "तू गुन्हा केला आहेस, कबूल कर". कितीतरी दिवस तुरुंगात खितपत पडलेल्या कायतानचं आत काय झालं हे सुद्धा बाहेर कोणाला समजू शकत नाही. कुटुंबाची वाताहत होते. शेवटी निवाड्याचा दिवस येतो. गुन्हा कायताननं केला आहे हे आधीपासूनच ठरवलेलं फक्त जाहीर होतं आणि त्याला शिक्षा होते जिवंत जाळण्याची. त्याने काय गुन्हा केला; तुरुंगात काय झालं हे कोणाला काही कळत नाही. गुन्हेगारांची धिंड काढली गेली आणि शेवटी जाळून त्याची राख झाली एवढंच त्याच्या दूरवरच्या नातेवाईकाला कळतं.

अशी ही अस्वस्थ करणारी कादंबरी. आपल्याला १५८० च्या काळातल्या गोव्यात घेऊन जाणारी. काही पाने उदाहरणादाखल वाचा.

हिंदूंवर जाचक अटी



परचक्राची चाहूल... देव सोडावा की देश



धिंड काढायची तयारी



सुमारे दीडशे पानांच्या कादंबरीत प्रसंग वेगाने घडतात. त्यामुळे आपण उत्सुकतेने पुढे वाचत राहतो. पण वर्णनशैली सारखी बदलत राहते. कायतान ला तुरुंगात नेतायत इथून कादंबरीची सुरुवात होते आणि त्याला काही प्रसंग आठवतायत यातून सामाजिक पार्श्वभूमी दिसते. मध्येच त्रयस्थ निवेदक कायताच्या कुटुंबात घडणारे प्रसंग, त्यांचं भावविश्व मांडतो. तर मध्येच वर्णन मध्येच एखाद्या डॉक्युमेंटरी सारखे होते - facts and figures सांगणारे होते; पोर्तुगीज उमरावांचं गैरवर्तन, बाहेरख्यालीपणा; ख्रिश्चन झाल्यावरही गोऱ्या-काळ्यांमधला भेदभाव असे प्रसंग येतात. ह्या सगळ्यातून एकूण परिस्थितीची जाणीव आपल्याला होते. पण ते तुकडे नीट जुळत नाहीत. एक ललित कादंबरी म्हणून त्या भावविश्वात आपण गुंगून जात नाही. लेखकच आपल्याला भानावर आणत राहतो. त्यादृष्टीने महाबळेश्वर सैल ह्यांची ह्याच विषयावरची "तांडव" कादंबरी खूपच परिणामकारक आहे.

पुस्तकाच्या निवेदनात पात्रांची, गावांची नावं येतात, पोर्तुगीज शब्द येतात. मूळ कोकणी कादंबरीच्या वाचकांना ती नावे परिचयाची असल्यामुळे अडचण येणार नाही. पण मराठी वाचकाला ती माहिती नसल्यामुळे अर्थ चट्कन कळत नाही. उदा. कायतान आणि अल्काईद हे शब्द पुन्हा पुन्हा येत होते. ही माणसांची नावं का हुद्द्यांची नावं हा गोंधळ माझ्या मनात कितीतरी पाने चालू राहिला. पुढे पुढे बरीच नवनवीन पात्रे येतात. त्यांचे परस्पर संबंध कळायला जरा त्रास होतो. त्यातूनही परिणामकारकता कमी झाली आहे.

प्रस्तावनेत इन्क्विझिशन, त्यात होणारे अत्याचार, त्यांचा लेखकाने केलेला अभ्यास ह्यावर सविस्तर लिहिलं आहे. त्यातून मला असं वाटलं की इन्क्विझिशन हा कादंबरीचा गाभा असेल. तुरुंगातलं वास्तव्य, छळ, त्याला विरोध, ते कसं अमलात आणलं गेलं ह्याबद्दलचे प्रसंग मुख्य असतील अशी माझी अपेक्षा झाली. त्याबद्दलचे प्रसंग नक्की आहेत पण मुख्य निवेदन हे धर्मांतरण आणि त्याला लोकांचा विविधांगी प्रतिसाद ह्याभोवती आहे.

अनुवाद चांगलाच झाला आहे. मूळ मराठीच वाटतं. उलट, मध्ये मध्ये थोडी कोंकणी वाक्ये, उद्गार ठेवले असते तर गोव्याच्या वातावरण निर्मितीत हातभार हातभार लागला असता का असं वाटलं. 

ह्या विषयावर तुम्ही आधी काहीच वाचले नसेल तर हे पुस्तक नक्की वाचा. "सुशेगाद गोवा", "बीचेस आणि दारू", "रशियन ललना", "मोठ्ठाली चर्चेस" , "सेंट(?) झेवियर चं मढं" ह्याहून वेगळ्या गोव्याची सैर तुम्हाला घडेल. ह्या विषयावर आधी पुस्तक वाचलं असेल तरी एक उजळणी म्हणून, वेगळी मांडणी म्हणून वाचायला हरकत नाही. ज्यापणाने नाझिंनी ज्यूंच्या केलेल्या छळवणुकीची गोष्ट हॉलीवूडच्या चित्रपटांतून पुन्हा पुन्हा सांगितली जाते. तसाच हा विषयही आहे. प्रत्येक लिखाणातून नवीन काही समजेल. धर्मांधतेचा धोका तेव्हा होता, आजही आहे ह्या भीषण वास्तवाची जाणीव भारतीय समाजाला होत राहील.

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
ह्या विषयावर आधी वाचले नसेल तर जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

मर्चंट ऑफ व्हेनिस (Merchant of Venice) , मॅकबेथ (Macbeth)

१) पुस्तक - मर्चंट ऑफ व्हेनिस (Merchant of Venice) लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare) अनुवादक - शिरीष सहस्रबुद्धे (Shirish Shasra...