बोटीवरून (botivarun)




पुस्तक : बोटीवरून (Botivarun)
लेखक : नितीन लाळे  (Nitin Lale)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २६८

जगभरात मोठी मालवाहतू जलमार्गाने होते. मोठमोठ्या जहाजांवरून समुद्र-महासागर मार्गे माल देशोदेशी पोचवला जातो. या व्यापारी कामासाठी कार्यरत करणारे दर्यावर्दी म्हणजेच मर्चंट नेव्ही मधील कर्मचारी. मर्चंट नेव्हीत अनेक वर्षं रेडिओ ऑफिसर आणि पर्सर म्हणून नितीन लाळे यांनी काम केलं. त्यांच्या नोकरीच्या दरम्यान त्यांना अनेक वेगवेगळे अनुभव आले. त्यातील काही निवडक अनुभव त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. लेखकाने फक्त स्वतःचेच नाहीत तर त्यांच्या सहकाऱ्यांना आलेले, इतरांकडून कळलेले अनुभवही सांगितले आहेत. 




अनुभव खरेच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत काही मजेशीर, काही गंभीर काही; काही जिवावर बेतलेले तर काही हृदयद्रावक. उदा. एका प्रवासात जहाज वादळात सापडले, एकदा जहाजावर मोठी आग लागली, जहाज जेव्हा विषुववृत्त ओलांडते तेव्हा असा प्रवास प्रथमच करणाऱ्या खलाश्याची "रॅगिंग" होते ती मजा, शार्क माशाची शिकार करण्याचा प्रसंग, सुवेझ कॅनोल मधून जाताना अरबी व्यापारी आणि खलाशी एकमेकांना फसवाफसवी करून कसा फायदा करून घ्यायचा प्रयत्न करतात त्याचे किस्से, जाहाजावर मृत्यू झालेल्याच्या भूताचे किस्से इ.

मालाची वाहतुक करताना अनेक दिवस सलग समुद्रातच प्रवास चालू असतो. जमीन दिसत नाही. पण म्हणून समुद्रीप्रवास एकसुरी नसतो. समुद्रावरील वातावरणात सारखा बदल होत असतो. कधी शांत समुद्र, कधी खवळलेला दो-तीन मजले उंचीच्या लाटा उसळवणारा; कधी दूरवरची ठिकाणंही सहज दिसतील इतकं स्वच्छ वातावरण तर कधी चारी बाजूला आभाळ भरून आल्याने आलेले भेसूर रूप. अशी निसर्गाची नाना रूपं लेखकाला वेळोवेळी बघायला मिळली त्यांची वर्णनंही आपल्याला वाचायला मिळतात.

लेखांमध्ये फक्त बोटिवरचे अनुभव नाहीत तर त्या त्या देशातल्या बंदरावर उतरल्यावर स्थानिक लोक कसे वागले आणि तसे का वागले याचंही वर्णन केलं आहे. उदा. कम्युनिस्ट देशात गेल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांच्या नजरा सतत संशयशील असायच्या. कुठल्याही देशात गेल्यावर तिथल्या कस्टम अधिकाऱ्यांना दारूच्या बाटल्या, सिगरेटचे खोके देणं हा अलिखित नियम. आशियायी देशांतले अधिकारी वखवखल्यासारखे मिळेल ते पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करायचे. अपवाद जपानचा. तिथे प्रत्येकजण प्रामाणिकपणे काम करतो. अशा भेटी मागणं तर सोडाच दिलेल्या भेटीही कोणी स्वीकारत नाही. उगाच नाही राखेतून उठला तो देश. 

या नोकरीदरम्यान लेखक देशोदेशी गेले. जिथे जातोय तिथला इतिहास, भूगोल जाणून घ्यायचा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी भरपूर माहितीही मिळवली. म्हणुनच लिखाणाच्या ओघात लेखकाने रशिया, उत्तर कोरिया मधील कम्यूनिस्ट राजवटीचा इतिहास सांगितला आहे. सुवेझ कालव्याचा इतिहास, भारताची गेल्या सहस्त्रकातील समुद्रीव्यापारातील प्रगती आणि ऱ्हास; साध्या ओंडक्यापासून सुरू झालेल्या जलवाहतूकीची आजवरची प्रगती या बद्दल लिहिलं आहे. समुद्री चाच्यांवर स्वतंत्र लेख आहे. आपल्या स्वार्थाला सोयिस्कर धोरण ठेवायचे युरोपियन देशांचे -विशेषतः ब्रिटनचे - धोरण समुद्री चाच्यांच्या बाबतीतही होते. स्पेन, फ्रान्सची जहाजं लुटण्यासाठी ब्रिटनने खास समुद्री चाचे पोसले होते !

पाणबुडीवरच्या प्रकरणात त्या तंत्राची प्रगती कशी झाली, त्यात काय अडचणी आल्या त्याची वैज्ञानिक माहिती साध्या सोप्या शब्दात दिली आहे. 

पुस्तकाच्या शेवटी वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांचे, समुद्राचे फोटोही आहेत. 


एक व्यावसायिक लेखक नसूनही लिखाणाची शैली सहज सोपी, गप्पा मारल्यासारखी आहे. इतिहास, तांत्रिक माहिती किंवा वैज्ञानिक माहितीही कुठेच कंटाळवाणी होत नाही तर अनुभव समजून घ्यायला, त्याची तीव्रता समजून घ्यायला आवश्यकच वाटते. एकूणच हे पुस्तक अनुभव, मनोरंजन आणि ज्ञानाचा खजिनाच आहे.



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

The Grand Design (द ग्रॅंड डिझाईन)




पुस्तक : The Grand Design (द ग्रॅंड डिझाईन)
लेखक : Stephen Hawking & Leonard Mlodinow स्टीफन हॉकिंग आणि लिओनार्ड म्लॉदिनोव
भाषा : इंग्रजी
पाने : २३६
ISBN : ९७८-०-५५३-८१९२२-९


शाळा-कॉलेज पूर्ण झाल्यानंतर इतके वर्षांनी पहिल्यांदाच विज्ञानावरचं पुस्तक वाचायला घेतलं. वैज्ञानिक कथा किंवा वैज्ञानिक गमतीजमती नव्हेत तर वैज्ञानिक संकल्पना-थेअरींची चर्चा करणारं पुस्तक ! प्रसिद्ध वैज्ञानिक  स्टीफन हॉकिंग आणि लिओनार्ड म्लॉदिनोव यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. 

या पुस्तकात या तीन मूलभूत प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
Why is there something rather than nothing ?
Why do we exist ?
Why this particular set of lows and not some other ?

पुस्तकाची अनुक्रमणिका :

माणसाला नेहमीच आपल्या अतित्वाबद्दल, आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या नैसर्गिक घटनांचे आकर्षण वाटत आलं आहे. रोमन, माया, इजिप्शियन संस्कृतीत याबद्दल काय कल्पना होत्या, हळूहळू रोमन संस्कृतीत निरिक्षणांच्या आधारे ही सृष्टी चमत्कारांची नाही तर नियमांची आहे याचा उलगडा होऊ लागला याचा संक्षिप्त इतिहास पुस्तकात दिला आहे. 

विज्ञानाचे हे बीज वाढू लागल्यावर नवनवीन शोध लागू लागले, सिद्धांत पुढे येऊ लागले. काही जुनी गृहितके नव्या निरीक्षणांतून सिद्ध झाली तर काही बाद झाली. काहीवेळा जुना सिद्धांत पूर्ण खोटाही नाही आणि पूर्ण खराही नाही अशी अवस्थाही निर्माण होत असे. 
उदा. प्रकाश म्हणजे फक्त लहरी असा जुना सिद्धांत. पण काही प्रयोगांत प्रकाशाचे वर्तन वेगळेच दिसले. जणू प्रकाश हा प्रकाशकणांचा बनलेला आहे. मग प्रकाशाचे दुहेरी अस्तित्व मानणारा सिद्धांत रुढ झाला. 

काही वेळा एक सिद्धांत एका मर्यादेनंतर खोटा ठरू लागला. उदा मोठ्या वस्तू एका रेषेत प्रवास करतात आणि त्यांचा वेग आणि काळ यानुसार त्या वस्तूची स्थिती आपण काढू शकतो हे न्यूटनचे सिद्धांत जगन्मान्य होते. पण फेनमॅन यांच्या प्रयोगात असं दिसलं की अतिसूक्षम कणांना हे नियम लागू होत नाहीत. त्यातून नव्या शाखेचा उदय झाला - "क्वांटम फिसिक्स". त्यामुळे भौतिकशास्त्राचे प्रारूप (मॉडेल) हे एकच सिद्धांत नाही तर वेगवेगळ्या सिद्धांतांचा संच आहे ही धारणा स्वीकारावी लागली. 

आपल्या आजूबाजूचं जग त्रिमिती आहे. पण जेव्हा सूक्षामातिसूक्ष्म कण किंवा कोटी प्रकाशवर्षं दूर असलेल्या  आकाशगंगेचा दुसऱ्या ग्रहावर होणाऱ्या परीणाम यांचा विचार करताना; द्विमिती-त्रिमिती नाही तर चार-पाच-दहा मितींचा विचार करावा लागतो. कर्व्ड स्पेस(Curved space), कर्व्ड टाईम(Curved Time), बिग बँग, बिग बॅंगच्या वेळी काळ थंबलेला होता इ. वाचताना आपल्या विचाक्तीला , कल्पनाशक्तीला प्रचंड ताण द्यावा लागतो. मती गुंग होते. अश्या मती गुंग करणाऱ्या खूप गोष्टी पुस्तकात वाचायला मिळतील. 

जुन्या काळच्या रोमन लोकांच्या विचारापासून सध्या चालू असलेल्या संशोधनांचा मागोवा लेखकाने घेतला आहे. साहजिकच शाळा-कॉलेजमध्ये शिकलेल्या विज्ञानाच्या कितितरीपट पुढे विज्ञान गेलं आहे.आणि जितके नवनवीन शोध लागतायत तितके गूढ अजूनजूनच गडद होतंय असं वाटतंय. 

देव आहे का? जे घडतंय किंवा घडलंय ते देवाने घडवलं का? याची चर्चा पुस्तकात वेळोवेळी आहे. त्याचं थेट हो किंवा नाही असं उत्तर दिलेलं नाही. पण जे घडतंय किंवा घडलं त्यासाठी देवाची आवश्यकता नाही तर ते निसर्गाच्या नियामांनीच घडलं; ते का आणि कसं ते शोधून काढता येईल असा युक्तीवाद आहे आणि सप्रमाण सिद्ध केलं आहे. पण खरंच जर तुम्ही देव मानणारे असाल, सश्रद्ध असाल तर या विश्वाचं गूढ आणि अगदी छोट्या कणात असलेली अमर्याद ऊर्जा, नवीन विश्व घडवायची ताकद बघून, "त्या" शक्तीबद्दल तुमची श्रद्धा अजूनच वाढेल. आणि तुम्ही नास्तिक असाल तर आता रहस्यभेद हाताशी आला आहे त्यासाठी देवाचं अस्तित्व मानायची गरज नाही असा आत्मविश्वास दुणावेल. दोन्ही मतांच्या भावना न दुखावता विज्ञानशोध अतिशय रंजक पद्धतीने मांडले आहेत. मजकूरपूरक रंगीत चित्रे आहेत. काही ठिकाणी हळुवार विनोद आणि व्यंगचित्रे ही आहेत. 




एक गोष्ट खटकली ती म्हणजे जुन्या संस्कृतींच्या उल्लेखात कुठेही भारतीत संस्कृतीचा उल्लेख नाही. वैदिक ग्रंथसंपदेमध्ये खगोलशास्त्र, विश्वाचे रहस्य याबद्दल बरेच शास्त्रीय ज्ञान आहे असे आपण मानतो. पृथ्वीचे परिभ्रमण तर आपल्या पूर्वजांना रोमनांच्या आधीपासूनच ठाऊक होतं. शास्त्रीय ज्ञान सोडाच रोजच्या जगण्यातही आपण अनादी-अनंत विश्वाची कल्पना; ओंकार अर्थात लहरींचे सामर्थ्य; प्रत्येक कणाकणात देव (अपरिमित ऊर्जा) आहे या धारणा बाळगतो. या धारणा जितक्या धार्मिक तितक्याच विज्ञानसुसंगत आहेत. स्टिफन हॉकिंगना याची माहितीच नाही, का माहिती असूनही त्यांनी त्यावर संशोधक नजरेने बघितलेलं नाही? जुन्या संस्कृतीचं सोडाच पण अधुनिक भारतीय वैज्ञानिक जयंत नारळीकर यांचाही उल्लेख नाही. नारळीकर-हॉईल सिद्धांत तर स्टिफन हॉकिंग यांच्या संशोधनाशी अगदीच निगडीत. ते तर त्यांना माहीत असणारच. तरीही हॉईल यांचा उल्लेख आहे पण नारळीकर यांचा नाही. हे हॉकिंग यांचं भारतीयांविषयी अज्ञान हे का वर्णवर्चस्ववाद ? कळायला मार्ग नाही !

तर असं हे पुस्तक वाचल्यावर त्यात आलेल्या सगळ्याच संकल्पना, संज्ञा मला कळल्या असं नाही, सगळंच लक्षात राहील असंही नाही पण पूर्वी शिकलेल्या विज्ञानामध्ये थोडीफार भर नक्कीच पडली. ज्या गोष्टी नीट कळल्या नाहीत त्याबद्दल इंटरनेटवर अजून वाचावं, व्हिडिओ बघावं असं वाटतंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रज्ञ किती जबरदस्त संशोधन करतायत, कल्पनाशक्तीची आणि आकडेमोडीची किती पराकाष्ठा करतायत हे बघून वैज्ञानिकांबद्दल मनात अपार कृतज्ञता वाटते. 

तुम्हीही हे पुस्तक वाचून बौद्धिक व्यायाम करा आणि ज्ञानात भर घाला

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

हाऊ सचिन डिस्ट्रॉईड माय लाइफ (How Sachin destroyed my life)




पुस्तक : हाऊ सचिन डिस्ट्रॉईड माय लाइफ (How Sachin destroyed my life) 
भाषा : मराठी (मूळ भाषा : इंग्रजी )
लेखक : विक्रम साठये (Vikram Sathaye)
अनुवादिका : श्वेता प्रधान (Shveta Pradhan)
पाने : २१५
ISBN : 978-81-7185-471-4


यावेळी वाचनालयात गेलो तेव्हा काहितरी वेगळं पुस्तक मिळावं असं वाटत होतं. पौराणिक, ऐतिहासिक, प्रेमकथा, चरित्र, सामाजिक, स्व-मदत फॅंटसी असं काहीच नको. काहितरी वेगळं हवं होतं. आणि अचानक हे पुस्तक दिसलं. पुस्तकाचं मुखपृष्ठ-मलपृष्ठ बघूनच ओळखलं की असंच पुस्तक हवं आहे. पुस्तक क्रिकेटवरचं आहे. मी स्वतः खूप कमी क्रिकेट खेळलो आहे, क्वचितच बघतो तरीही कुठल्याही क्षेत्रातल्या दिग्गजांबद्दल वाचायला आवडतं. त्यांचा प्रवास कसा झाला; त्यांची विचार करायची पद्धत कशी होती हे वाचायला आवडतं. आणि ते जर किस्से असतील तर काय; धमालच. म्हणून हे पुस्तक वाचायला घेतलं. 

पुस्तकाचे लेखक विक्रम साठये यांच्याबद्दल 
 


पुस्तक एकदा वाचायला सुरुवात केली की खाली ठेववत नाही. पुढचा लेख वाचून थांबू, अजून एक वाचून थांबू असं होतं. कारण एकेक लेख म्हणजे विक्रम साठ्यांचा १० मिनिटांचा स्टॅंडप शो असल्यासारखंच आहे. त्यात त्यांनी किस्से सांगितलेत, स्वतःच्या गंमतीशीर टिप्पण्या केल्यात, माहिती दिलिये. एकूण हा मसाला छान जमलाय. अनुक्रमणिका बघून आपल्याला थोडी कल्पना येईल.




उदा. सचिनच्या लेखात सचिनने सांगितलंय की "मी स्वतः बरोबर टुल किटने भरलेला कारपेंटरी बॉक्स नेहमी जवळ ठेवतो. सॅंड पेपर, सुपरग्लू, स्टील वूल इ. नेहमी जवळ ठेवतो. बॅट योग्य बॅलन्स आणि वेट डिस्ट्रिब्युशनमध्ये असल्याची खात्री होईपर्यंत तासन्‌तास खर्च करायला माझी तयारी असते..". द्रविडवरच्या लेखात त्याची एकाग्रता मिळवण्याची आणि विचार करण्याची पद्धत कशी आहे ते सविस्तर सांगितलंय. सेहवागवरच्या लेखात एक किस्सा आहे : विरूची आक्रमक शैली आहे त्यामुळे सचिनने दिलेला सबुरीचा सल्ला तो ऐकत नसे आणि नेमकं त्याच्या उलट करत असे. शेवटी सचिनने उलट सल्ला द्यायला सुरुवात केली आणि विरू त्याच्या उलट म्हणजे सचिनला हवं तसं खेळू लागला. 


या पुस्तकात फक्त क्रिकेटर्स बद्दल नाही तर क्रिकेटर्सच्या आजूबाजूच्या घटककांवरही लेख आहेत. उदा. कॉमेंटरी.  कॉमेंटरी वरच्या प्रकरणात दाखवलं आहे की समोर जे चाललंय त्याचं वर्णन, विष्लेशण करणं म्हणजेच फक्त कॉमेंटरी नव्हे. तर आता कॉमेंटरीचं स्वरूप खूप बदललंय. कॉमेंटरीसुद्धा "इन्फोटेनन्मेंट" चा भाग झालाय. प्रॉडक्शन होस्ट कॉमेंटेटरच्या कानात सांगत असतो आता हा मुद्दा घे, आता याच्यावर बोल. आयत्या वेळी ते सगळं जुळवता आलं पाहिजे, ते सहज वाटलं पाहिजे. 
समालोचन ही निवृत्त खेळाडूंची मक्तेदारी आहे. त्यात बाहेरच्या कोणी घुसायचा प्रयत्न केला की त्याला चांगला विरोध होतो, टोमणेबाजी होते, खेळाडूंच्या "अ‍ॅटिट्यूड"चा सामना करावा लागतो. साठ्येंना स्वतः त्याचे कसे चटके बसलेत हेही दिलं आहे.

आयपिएलच्या टीमचे मालक आणि कर्णधार यांच्यावरून त्या टीमचंही एव व्यक्तिमत्त्व कसं बनतं याचं मजेशीर वर्णन आहे. प्रेक्षकांचे पण कसे वेगवेगळे प्रकार आहेत - कुणी सकारात्मक, कुणी नकारात्मक, कुणी भक्त - याची पण गंमत आहे. 

आपल्या टीमचे मॅसर - अर्थात जे खेळाडूंना मसाज, अ‍ॅक्युप्रेशर देतात - अश्या मानेकाकांबद्दल लेख आहे. 

क्रीडापत्रकारांना सतत काहितरी ब्रेकिंग न्यूज हवी असते. त्यासाठी ते नेहमी खेळाडूंच्या मागे लागत असतात. हॉटेलच्या लॉबिमध्ये उभं राहणं, त्यांना कॉफीला घेऊन जाणं, पार्ट्यांमध्ये सलगी साधणं, अनौपचारिक संवाद साधणं असे नाना प्रकार. खेळाडूही कधी त्यांच्याशी बोलतात कधी कंटाळतात तर कधी टाळतात. याच्याही गमतीजमती पुस्तकात वाचायला मिळतात.

आपल्याकडे क्रिकेट मुख्यत्वे बॅटींगचा खेळ समजला जातो. त्यामुळे बॉलर असेल आणि त्यातही तो स्पिनर असेल प्रतिष्ठा अजूनही कमी असायची. अशावेळी शेन वॉर्न, मुरलीधरन यांनी कशी प्रतिष्ठा मिळवून दिली याचं रोचक वर्णन आहे

क्रिकेट खेळण्यासाठी फक्त क्रिकेटचे तंत्र आणि शारिरिक ताकदच नाही तर मानसिक ताकदीचीही गरज आहे हे प्रकर्षाने लक्षात येतं. सचिन, राहुल द्रविड आणि इतर अनेक खेळाडू आपलं लक्ष फक्त बॅटींगवर किंवा बॉलवर कसं राहील; आजुबाजूचे आवाज, प्रेक्षकांचे दडपण, आधी झालेले वादविवाद याचा परिणाम तो बॉल खेळताना कसा होणार नाही यासाठी काय प्रयत्न करतात याची कल्पना येते. स्लेजिंगचा वापर दुसऱ्याची एकाग्रता भंग करण्यासाठी कसा करतात, सचिननेही स्लेजिंगचा वापर क्वचितच पण कसा प्रभावी पद्धतीने केला याचे किस्से वाचण्यासारखे आहेत. 

टीव्हीवर मॅच बघताना आपल्याला वेगवेगळे स्कोर्स, विक्रम बघायला मिळतात. हे काम असतं संख्याशास्त्रज्ञाचं. हे काम करणारे मोहनदास मेनन आणि त्यांची पत्नी वाल्सा यांच्या कामाचं स्वरूप, त्यातली आव्हानं यावरही एक लेख आहे.

पुस्तकाच अनुवादही अगदी सरस झालाय. पुस्तक मूळ मराठीतूनच लिहिले असेल असं वाटावं इतका सहज अनुवाद आहे.

लेखांत वेळोवेळी व्हिज्युअलायझेशन तंत्राचा उल्लेख आहे. ज्येष्ठ क्रीडामानसशास्त्र तज्ञ भीषमराज बाम यांच्या मुलाखतीतही त्यांनी या तंत्राचा वापर आणि त्याचे परिणाम याबद्दल संगितलं होतं ते मला आठवलं. या तंत्राबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकताही मला लागली आहे.  

लेखकाने हे एक पुस्तक लिहून थांबू नये. या प्रकारची अजून पुस्तकं किंवा नियतकालिकात असं नेहमी चालणारे सदर ते नक्कीच लिहू शकतील.

बरं! थोडं लिहिता लिहिता मीही बरंच लिहिलं. माझ्यासारख्या क्रिकेटशी फार संबंध नसलेल्या मला ही पुस्तक आवडलं. क्रिकेटप्रेमी असाल तर हे पुस्तक नक्कीच आवडेल.  क्रिकेट क्षेत्राशी संबंधित इतके वेगवेगळे मार्ग बघून तुमच्यातला क्रिकेटप्रेमी जागा होईल. आणि आता खेळाडू म्हणून नाही तरी दुसरं काहितरी बनून या खेळशी जवळून जोडलेले राहू असं तुम्हाला वाटू लागेल. 


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------




खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...