हाऊ सचिन डिस्ट्रॉईड माय लाइफ (How Sachin destroyed my life)




पुस्तक : हाऊ सचिन डिस्ट्रॉईड माय लाइफ (How Sachin destroyed my life) 
भाषा : मराठी (मूळ भाषा : इंग्रजी )
लेखक : विक्रम साठये (Vikram Sathaye)
अनुवादिका : श्वेता प्रधान (Shveta Pradhan)
पाने : २१५
ISBN : 978-81-7185-471-4


यावेळी वाचनालयात गेलो तेव्हा काहितरी वेगळं पुस्तक मिळावं असं वाटत होतं. पौराणिक, ऐतिहासिक, प्रेमकथा, चरित्र, सामाजिक, स्व-मदत फॅंटसी असं काहीच नको. काहितरी वेगळं हवं होतं. आणि अचानक हे पुस्तक दिसलं. पुस्तकाचं मुखपृष्ठ-मलपृष्ठ बघूनच ओळखलं की असंच पुस्तक हवं आहे. पुस्तक क्रिकेटवरचं आहे. मी स्वतः खूप कमी क्रिकेट खेळलो आहे, क्वचितच बघतो तरीही कुठल्याही क्षेत्रातल्या दिग्गजांबद्दल वाचायला आवडतं. त्यांचा प्रवास कसा झाला; त्यांची विचार करायची पद्धत कशी होती हे वाचायला आवडतं. आणि ते जर किस्से असतील तर काय; धमालच. म्हणून हे पुस्तक वाचायला घेतलं. 

पुस्तकाचे लेखक विक्रम साठये यांच्याबद्दल 
 


पुस्तक एकदा वाचायला सुरुवात केली की खाली ठेववत नाही. पुढचा लेख वाचून थांबू, अजून एक वाचून थांबू असं होतं. कारण एकेक लेख म्हणजे विक्रम साठ्यांचा १० मिनिटांचा स्टॅंडप शो असल्यासारखंच आहे. त्यात त्यांनी किस्से सांगितलेत, स्वतःच्या गंमतीशीर टिप्पण्या केल्यात, माहिती दिलिये. एकूण हा मसाला छान जमलाय. अनुक्रमणिका बघून आपल्याला थोडी कल्पना येईल.




उदा. सचिनच्या लेखात सचिनने सांगितलंय की "मी स्वतः बरोबर टुल किटने भरलेला कारपेंटरी बॉक्स नेहमी जवळ ठेवतो. सॅंड पेपर, सुपरग्लू, स्टील वूल इ. नेहमी जवळ ठेवतो. बॅट योग्य बॅलन्स आणि वेट डिस्ट्रिब्युशनमध्ये असल्याची खात्री होईपर्यंत तासन्‌तास खर्च करायला माझी तयारी असते..". द्रविडवरच्या लेखात त्याची एकाग्रता मिळवण्याची आणि विचार करण्याची पद्धत कशी आहे ते सविस्तर सांगितलंय. सेहवागवरच्या लेखात एक किस्सा आहे : विरूची आक्रमक शैली आहे त्यामुळे सचिनने दिलेला सबुरीचा सल्ला तो ऐकत नसे आणि नेमकं त्याच्या उलट करत असे. शेवटी सचिनने उलट सल्ला द्यायला सुरुवात केली आणि विरू त्याच्या उलट म्हणजे सचिनला हवं तसं खेळू लागला. 


या पुस्तकात फक्त क्रिकेटर्स बद्दल नाही तर क्रिकेटर्सच्या आजूबाजूच्या घटककांवरही लेख आहेत. उदा. कॉमेंटरी.  कॉमेंटरी वरच्या प्रकरणात दाखवलं आहे की समोर जे चाललंय त्याचं वर्णन, विष्लेशण करणं म्हणजेच फक्त कॉमेंटरी नव्हे. तर आता कॉमेंटरीचं स्वरूप खूप बदललंय. कॉमेंटरीसुद्धा "इन्फोटेनन्मेंट" चा भाग झालाय. प्रॉडक्शन होस्ट कॉमेंटेटरच्या कानात सांगत असतो आता हा मुद्दा घे, आता याच्यावर बोल. आयत्या वेळी ते सगळं जुळवता आलं पाहिजे, ते सहज वाटलं पाहिजे. 
समालोचन ही निवृत्त खेळाडूंची मक्तेदारी आहे. त्यात बाहेरच्या कोणी घुसायचा प्रयत्न केला की त्याला चांगला विरोध होतो, टोमणेबाजी होते, खेळाडूंच्या "अ‍ॅटिट्यूड"चा सामना करावा लागतो. साठ्येंना स्वतः त्याचे कसे चटके बसलेत हेही दिलं आहे.

आयपिएलच्या टीमचे मालक आणि कर्णधार यांच्यावरून त्या टीमचंही एव व्यक्तिमत्त्व कसं बनतं याचं मजेशीर वर्णन आहे. प्रेक्षकांचे पण कसे वेगवेगळे प्रकार आहेत - कुणी सकारात्मक, कुणी नकारात्मक, कुणी भक्त - याची पण गंमत आहे. 

आपल्या टीमचे मॅसर - अर्थात जे खेळाडूंना मसाज, अ‍ॅक्युप्रेशर देतात - अश्या मानेकाकांबद्दल लेख आहे. 

क्रीडापत्रकारांना सतत काहितरी ब्रेकिंग न्यूज हवी असते. त्यासाठी ते नेहमी खेळाडूंच्या मागे लागत असतात. हॉटेलच्या लॉबिमध्ये उभं राहणं, त्यांना कॉफीला घेऊन जाणं, पार्ट्यांमध्ये सलगी साधणं, अनौपचारिक संवाद साधणं असे नाना प्रकार. खेळाडूही कधी त्यांच्याशी बोलतात कधी कंटाळतात तर कधी टाळतात. याच्याही गमतीजमती पुस्तकात वाचायला मिळतात.

आपल्याकडे क्रिकेट मुख्यत्वे बॅटींगचा खेळ समजला जातो. त्यामुळे बॉलर असेल आणि त्यातही तो स्पिनर असेल प्रतिष्ठा अजूनही कमी असायची. अशावेळी शेन वॉर्न, मुरलीधरन यांनी कशी प्रतिष्ठा मिळवून दिली याचं रोचक वर्णन आहे

क्रिकेट खेळण्यासाठी फक्त क्रिकेटचे तंत्र आणि शारिरिक ताकदच नाही तर मानसिक ताकदीचीही गरज आहे हे प्रकर्षाने लक्षात येतं. सचिन, राहुल द्रविड आणि इतर अनेक खेळाडू आपलं लक्ष फक्त बॅटींगवर किंवा बॉलवर कसं राहील; आजुबाजूचे आवाज, प्रेक्षकांचे दडपण, आधी झालेले वादविवाद याचा परिणाम तो बॉल खेळताना कसा होणार नाही यासाठी काय प्रयत्न करतात याची कल्पना येते. स्लेजिंगचा वापर दुसऱ्याची एकाग्रता भंग करण्यासाठी कसा करतात, सचिननेही स्लेजिंगचा वापर क्वचितच पण कसा प्रभावी पद्धतीने केला याचे किस्से वाचण्यासारखे आहेत. 

टीव्हीवर मॅच बघताना आपल्याला वेगवेगळे स्कोर्स, विक्रम बघायला मिळतात. हे काम असतं संख्याशास्त्रज्ञाचं. हे काम करणारे मोहनदास मेनन आणि त्यांची पत्नी वाल्सा यांच्या कामाचं स्वरूप, त्यातली आव्हानं यावरही एक लेख आहे.

पुस्तकाच अनुवादही अगदी सरस झालाय. पुस्तक मूळ मराठीतूनच लिहिले असेल असं वाटावं इतका सहज अनुवाद आहे.

लेखांत वेळोवेळी व्हिज्युअलायझेशन तंत्राचा उल्लेख आहे. ज्येष्ठ क्रीडामानसशास्त्र तज्ञ भीषमराज बाम यांच्या मुलाखतीतही त्यांनी या तंत्राचा वापर आणि त्याचे परिणाम याबद्दल संगितलं होतं ते मला आठवलं. या तंत्राबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकताही मला लागली आहे.  

लेखकाने हे एक पुस्तक लिहून थांबू नये. या प्रकारची अजून पुस्तकं किंवा नियतकालिकात असं नेहमी चालणारे सदर ते नक्कीच लिहू शकतील.

बरं! थोडं लिहिता लिहिता मीही बरंच लिहिलं. माझ्यासारख्या क्रिकेटशी फार संबंध नसलेल्या मला ही पुस्तक आवडलं. क्रिकेटप्रेमी असाल तर हे पुस्तक नक्कीच आवडेल.  क्रिकेट क्षेत्राशी संबंधित इतके वेगवेगळे मार्ग बघून तुमच्यातला क्रिकेटप्रेमी जागा होईल. आणि आता खेळाडू म्हणून नाही तरी दुसरं काहितरी बनून या खेळशी जवळून जोडलेले राहू असं तुम्हाला वाटू लागेल. 


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------




4 comments:

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...