पुस्तक : The Grand Design (द ग्रॅंड डिझाईन)
लेखक : Stephen Hawking & Leonard Mlodinow स्टीफन हॉकिंग आणि लिओनार्ड म्लॉदिनोव
भाषा : इंग्रजी
पाने : २३६
ISBN : ९७८-०-५५३-८१९२२-९
शाळा-कॉलेज पूर्ण झाल्यानंतर इतके वर्षांनी पहिल्यांदाच विज्ञानावरचं पुस्तक वाचायला घेतलं. वैज्ञानिक कथा किंवा वैज्ञानिक गमतीजमती नव्हेत तर वैज्ञानिक संकल्पना-थेअरींची चर्चा करणारं पुस्तक ! प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग आणि लिओनार्ड म्लॉदिनोव यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.
या पुस्तकात या तीन मूलभूत प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
Why is there something rather than nothing ?
Why do we exist ?
Why this particular set of lows and not some other ?
पुस्तकाची अनुक्रमणिका :
माणसाला नेहमीच आपल्या अतित्वाबद्दल, आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या नैसर्गिक घटनांचे आकर्षण वाटत आलं आहे. रोमन, माया, इजिप्शियन संस्कृतीत याबद्दल काय कल्पना होत्या, हळूहळू रोमन संस्कृतीत निरिक्षणांच्या आधारे ही सृष्टी चमत्कारांची नाही तर नियमांची आहे याचा उलगडा होऊ लागला याचा संक्षिप्त इतिहास पुस्तकात दिला आहे.
विज्ञानाचे हे बीज वाढू लागल्यावर नवनवीन शोध लागू लागले, सिद्धांत पुढे येऊ लागले. काही जुनी गृहितके नव्या निरीक्षणांतून सिद्ध झाली तर काही बाद झाली. काहीवेळा जुना सिद्धांत पूर्ण खोटाही नाही आणि पूर्ण खराही नाही अशी अवस्थाही निर्माण होत असे.
उदा. प्रकाश म्हणजे फक्त लहरी असा जुना सिद्धांत. पण काही प्रयोगांत प्रकाशाचे वर्तन वेगळेच दिसले. जणू प्रकाश हा प्रकाशकणांचा बनलेला आहे. मग प्रकाशाचे दुहेरी अस्तित्व मानणारा सिद्धांत रुढ झाला.
काही वेळा एक सिद्धांत एका मर्यादेनंतर खोटा ठरू लागला. उदा मोठ्या वस्तू एका रेषेत प्रवास करतात आणि त्यांचा वेग आणि काळ यानुसार त्या वस्तूची स्थिती आपण काढू शकतो हे न्यूटनचे सिद्धांत जगन्मान्य होते. पण फेनमॅन यांच्या प्रयोगात असं दिसलं की अतिसूक्षम कणांना हे नियम लागू होत नाहीत. त्यातून नव्या शाखेचा उदय झाला - "क्वांटम फिसिक्स". त्यामुळे भौतिकशास्त्राचे प्रारूप (मॉडेल) हे एकच सिद्धांत नाही तर वेगवेगळ्या सिद्धांतांचा संच आहे ही धारणा स्वीकारावी लागली.
आपल्या आजूबाजूचं जग त्रिमिती आहे. पण जेव्हा सूक्षामातिसूक्ष्म कण किंवा कोटी प्रकाशवर्षं दूर असलेल्या आकाशगंगेचा दुसऱ्या ग्रहावर होणाऱ्या परीणाम यांचा विचार करताना; द्विमिती-त्रिमिती नाही तर चार-पाच-दहा मितींचा विचार करावा लागतो. कर्व्ड स्पेस(Curved space), कर्व्ड टाईम(Curved Time), बिग बँग, बिग बॅंगच्या वेळी काळ थंबलेला होता इ. वाचताना आपल्या विचारशक्तीला , कल्पनाशक्तीला प्रचंड ताण द्यावा लागतो. मती गुंग होते. अश्या मती गुंग करणाऱ्या खूप गोष्टी पुस्तकात वाचायला मिळतील.
जुन्या काळच्या रोमन लोकांच्या विचारापासून सध्या चालू असलेल्या संशोधनांचा मागोवा लेखकाने घेतला आहे. साहजिकच शाळा-कॉलेजमध्ये शिकलेल्या विज्ञानाच्या कितितरीपट पुढे विज्ञान गेलं आहे.आणि जितके नवनवीन शोध लागतायत तितके गूढ अजूनजूनच गडद होतंय असं वाटतंय.
देव आहे का? जे घडतंय किंवा घडलंय ते देवाने घडवलं का? याची चर्चा पुस्तकात वेळोवेळी आहे. त्याचं थेट हो किंवा नाही असं उत्तर दिलेलं नाही. पण जे घडतंय किंवा घडलं त्यासाठी देवाची आवश्यकता नाही तर ते निसर्गाच्या नियामांनीच घडलं; ते का आणि कसं ते शोधून काढता येईल असा युक्तीवाद आहे आणि सप्रमाण सिद्ध केलं आहे. पण खरंच जर तुम्ही देव मानणारे असाल, सश्रद्ध असाल तर या विश्वाचं गूढ आणि अगदी छोट्या कणात असलेली अमर्याद ऊर्जा, नवीन विश्व घडवायची ताकद बघून, "त्या" शक्तीबद्दल तुमची श्रद्धा अजूनच वाढेल. आणि तुम्ही नास्तिक असाल तर आता रहस्यभेद हाताशी आला आहे त्यासाठी देवाचं अस्तित्व मानायची गरज नाही असा आत्मविश्वास दुणावेल. दोन्ही मतांच्या भावना न दुखावता विज्ञानशोध अतिशय रंजक पद्धतीने मांडले आहेत. मजकूरपूरक रंगीत चित्रे आहेत. काही ठिकाणी हळुवार विनोद आणि व्यंगचित्रे ही आहेत.
एक गोष्ट खटकली ती म्हणजे जुन्या संस्कृतींच्या उल्लेखात कुठेही भारतीत संस्कृतीचा उल्लेख नाही. वैदिक ग्रंथसंपदेमध्ये खगोलशास्त्र, विश्वाचे रहस्य याबद्दल बरेच शास्त्रीय ज्ञान आहे असे आपण मानतो. पृथ्वीचे परिभ्रमण तर आपल्या पूर्वजांना रोमनांच्या आधीपासूनच ठाऊक होतं. शास्त्रीय ज्ञान सोडाच रोजच्या जगण्यातही आपण अनादी-अनंत विश्वाची कल्पना; ओंकार अर्थात लहरींचे सामर्थ्य; प्रत्येक कणाकणात देव (अपरिमित ऊर्जा) आहे या धारणा बाळगतो. या धारणा जितक्या धार्मिक तितक्याच विज्ञानसुसंगत आहेत. स्टिफन हॉकिंगना याची माहितीच नाही, का माहिती असूनही त्यांनी त्यावर संशोधक नजरेने बघितलेलं नाही? जुन्या संस्कृतीचं सोडाच पण अधुनिक भारतीय वैज्ञानिक जयंत नारळीकर यांचाही उल्लेख नाही. नारळीकर-हॉईल सिद्धांत तर स्टिफन हॉकिंग यांच्या संशोधनाशी अगदीच निगडीत. ते तर त्यांना माहीत असणारच. तरीही हॉईल यांचा उल्लेख आहे पण नारळीकर यांचा नाही. हे हॉकिंग यांचं भारतीयांविषयी अज्ञान आहे का वर्णवर्चस्ववाद ? कळायला मार्ग नाही !
तर असं हे पुस्तक वाचल्यावर त्यात आलेल्या सगळ्याच संकल्पना, संज्ञा मला कळल्या असं नाही, सगळंच लक्षात राहील असंही नाही पण पूर्वी शिकलेल्या विज्ञानामध्ये थोडीफार भर नक्कीच पडली. ज्या गोष्टी नीट कळल्या नाहीत त्याबद्दल इंटरनेटवर अजून वाचावं, व्हिडिओ बघावं असं वाटतंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रज्ञ किती जबरदस्त संशोधन करतायत, कल्पनाशक्तीची आणि आकडेमोडीची किती पराकाष्ठा करतायत हे बघून वैज्ञानिकांबद्दल मनात अपार कृतज्ञता वाटते.
तुम्हीही हे पुस्तक वाचून बौद्धिक व्यायाम करा आणि ज्ञानात भर घाला
------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------
छान सरळ सोप्प्या भाषेत परीक्षण!
ReplyDeleteप्रतिक्रियेसाठी धन्यवाद. आपले नाव कळू शकेल काय ?
Delete