बोटीवरून (botivarun)




पुस्तक : बोटीवरून (Botivarun)
लेखक : नितीन लाळे  (Nitin Lale)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २६८

जगभरात मोठी मालवाहतू जलमार्गाने होते. मोठमोठ्या जहाजांवरून समुद्र-महासागर मार्गे माल देशोदेशी पोचवला जातो. या व्यापारी कामासाठी कार्यरत करणारे दर्यावर्दी म्हणजेच मर्चंट नेव्ही मधील कर्मचारी. मर्चंट नेव्हीत अनेक वर्षं रेडिओ ऑफिसर आणि पर्सर म्हणून नितीन लाळे यांनी काम केलं. त्यांच्या नोकरीच्या दरम्यान त्यांना अनेक वेगवेगळे अनुभव आले. त्यातील काही निवडक अनुभव त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. लेखकाने फक्त स्वतःचेच नाहीत तर त्यांच्या सहकाऱ्यांना आलेले, इतरांकडून कळलेले अनुभवही सांगितले आहेत. 




अनुभव खरेच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत काही मजेशीर, काही गंभीर काही; काही जिवावर बेतलेले तर काही हृदयद्रावक. उदा. एका प्रवासात जहाज वादळात सापडले, एकदा जहाजावर मोठी आग लागली, जहाज जेव्हा विषुववृत्त ओलांडते तेव्हा असा प्रवास प्रथमच करणाऱ्या खलाश्याची "रॅगिंग" होते ती मजा, शार्क माशाची शिकार करण्याचा प्रसंग, सुवेझ कॅनोल मधून जाताना अरबी व्यापारी आणि खलाशी एकमेकांना फसवाफसवी करून कसा फायदा करून घ्यायचा प्रयत्न करतात त्याचे किस्से, जाहाजावर मृत्यू झालेल्याच्या भूताचे किस्से इ.

मालाची वाहतुक करताना अनेक दिवस सलग समुद्रातच प्रवास चालू असतो. जमीन दिसत नाही. पण म्हणून समुद्रीप्रवास एकसुरी नसतो. समुद्रावरील वातावरणात सारखा बदल होत असतो. कधी शांत समुद्र, कधी खवळलेला दो-तीन मजले उंचीच्या लाटा उसळवणारा; कधी दूरवरची ठिकाणंही सहज दिसतील इतकं स्वच्छ वातावरण तर कधी चारी बाजूला आभाळ भरून आल्याने आलेले भेसूर रूप. अशी निसर्गाची नाना रूपं लेखकाला वेळोवेळी बघायला मिळली त्यांची वर्णनंही आपल्याला वाचायला मिळतात.

लेखांमध्ये फक्त बोटिवरचे अनुभव नाहीत तर त्या त्या देशातल्या बंदरावर उतरल्यावर स्थानिक लोक कसे वागले आणि तसे का वागले याचंही वर्णन केलं आहे. उदा. कम्युनिस्ट देशात गेल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांच्या नजरा सतत संशयशील असायच्या. कुठल्याही देशात गेल्यावर तिथल्या कस्टम अधिकाऱ्यांना दारूच्या बाटल्या, सिगरेटचे खोके देणं हा अलिखित नियम. आशियायी देशांतले अधिकारी वखवखल्यासारखे मिळेल ते पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करायचे. अपवाद जपानचा. तिथे प्रत्येकजण प्रामाणिकपणे काम करतो. अशा भेटी मागणं तर सोडाच दिलेल्या भेटीही कोणी स्वीकारत नाही. उगाच नाही राखेतून उठला तो देश. 

या नोकरीदरम्यान लेखक देशोदेशी गेले. जिथे जातोय तिथला इतिहास, भूगोल जाणून घ्यायचा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी भरपूर माहितीही मिळवली. म्हणुनच लिखाणाच्या ओघात लेखकाने रशिया, उत्तर कोरिया मधील कम्यूनिस्ट राजवटीचा इतिहास सांगितला आहे. सुवेझ कालव्याचा इतिहास, भारताची गेल्या सहस्त्रकातील समुद्रीव्यापारातील प्रगती आणि ऱ्हास; साध्या ओंडक्यापासून सुरू झालेल्या जलवाहतूकीची आजवरची प्रगती या बद्दल लिहिलं आहे. समुद्री चाच्यांवर स्वतंत्र लेख आहे. आपल्या स्वार्थाला सोयिस्कर धोरण ठेवायचे युरोपियन देशांचे -विशेषतः ब्रिटनचे - धोरण समुद्री चाच्यांच्या बाबतीतही होते. स्पेन, फ्रान्सची जहाजं लुटण्यासाठी ब्रिटनने खास समुद्री चाचे पोसले होते !

पाणबुडीवरच्या प्रकरणात त्या तंत्राची प्रगती कशी झाली, त्यात काय अडचणी आल्या त्याची वैज्ञानिक माहिती साध्या सोप्या शब्दात दिली आहे. 

पुस्तकाच्या शेवटी वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांचे, समुद्राचे फोटोही आहेत. 


एक व्यावसायिक लेखक नसूनही लिखाणाची शैली सहज सोपी, गप्पा मारल्यासारखी आहे. इतिहास, तांत्रिक माहिती किंवा वैज्ञानिक माहितीही कुठेच कंटाळवाणी होत नाही तर अनुभव समजून घ्यायला, त्याची तीव्रता समजून घ्यायला आवश्यकच वाटते. एकूणच हे पुस्तक अनुभव, मनोरंजन आणि ज्ञानाचा खजिनाच आहे.



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...