Serve to win (सर्व टू विन )




पुस्तक : Serve to win   (सर्व टू विन )
लेखक : Novak Djokovic  (नोवाक जोकोविच)
भाषा : English (इंग्रजी )
पाने : १६१
ISBN : 978-0-552-17053-6

यशस्वी आणि महान टेनिस खेळाडूंपैकी एक गणला जाणाऱ्या नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने आपल्या यशामधील आहाराच्या भूमिकेबद्दल हे पुस्तक लिहिलं आहे. जोकोविच एक व्यावसायिक खेळाडू म्हणून आवश्यक तो आहार, व्यायाम, सराव सर्व काही करत होता. तरीही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये अटीततीच्या प्रसंगी गळून जाणं, डोळ्यापुढे अंधारी येणं, एकाग्रता पूर्णपणे गमावणं या समस्यांमुळे सर्वोच्च श्रेणीतील यश त्याला नेहमी हुलकावणी देत होतं.

अशा वेळी एका सर्बियन डॉक्टरने त्याला आहारात बदल करायचा सल्ला दिला. "ग्लुटेन" टाळायचा सल्ला दिला. "ग्लुटेन" अर्थात गव्हामधील ते प्रोटीन ज्यामुळे गव्हाच्या पदार्थांना घट्टपणा येतो. मराठीत ज्याला आपण "पिठाची विरी" म्हणतो त्याचं कारण "ग्लुटेन" असावं. तर हे ग्लुटेन टाळण्याचा बदल केल्याने त्याला चमत्कार वाटावा असा फरक दिसला. आणि १८ महिन्यांच्या आत विंबल्डन मध्ये नडालला हरवत अजिंक्यपद मिळवलं.

गहू हा सगळ्यांच्याच आहारातला मुख्य घटक त्यामुळे ग्लुटेन सगळ्यांच्या आहारात मोठ्या प्रमाणावर आढळते. म्हणूनच वाढते वजन, अस्वस्थता, एकाग्रतेचा आभाव, चपळतेचा अभाव इ. दिसून येते असा त्याचा (आणि त्याविषयीच्या संशोधकांचा ) दावा आहे.  ग्लुटेन सारख्या आहारातल्या कितितरी ज्ञात ज्ञात घटकांचं आणि आपल्या प्रकृतीचं वावडं असू शकतं. रक्त चाचणीतून ते नक्की करता आलं की ते घटक टाळणारा आहार घेतला की प्रचंड फरक पडतो असा विचार पुस्तका मांडला आहे.

ग्लुटेन टाळायचं म्हणजे आहारातला हा मुख्य घटकच टाळायचा. असं करणं शक्य आहे का? जोकोविचचं म्हणणं आहे "हो, हे शक्य आहे". ग्लुटेन विरहित आहारासाठी त्याने काय केलं हे सविस्तर सांगितलं पुस्तकात आहे. ग्लुटेन विरहिततेबरोबरच कॅलरीजवर नियंत्रण, सर्व जीवनसत्त्वांचा समावेश या पैलूंवरही प्रकाश टाक्ला आहे. आठवडाभराचे पूर्ण आहारपत्रक आणि कितितरी पदार्थांची कृतीपण दिली आहे.


आहाराला जोडीने वार्म-अप आणि स्ट्रेचिंग व्यायामप्रकार, झोपेचं-विश्रांतीचं महत्त्व, मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग आणि ध्यानाचे महत्त्व, यशामध्ये कुटुंबिय, प्रशिक्षक यांचा वाटा याबद्दलही छान माहिती दिली आहे. जेवणापूर्वी प्रार्थना म्हणने, झोपण्यापूर्वी मन शांत करणे, सेंद्रिय-रसायनविरहित अन्न खाणे, मुक्त वातावरणात वाढलेल्या प्राण्यांचे मांस खाणे इ. नेहमीचे सल्ले ही आहेत.

अनुक्रमणिका :



आहार-विहार-विचार-व्यायाम-विश्रांती ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे ही "थेअरी" आपल्या सगळ्यांना माहिती असते. पण ... कळतं पण वळत नाही. या पुस्तकाच्या वाचनातून त्या थेअरीची उजळणी होईल. "ग्लुटेन फ्री" ही नवी संकल्पना कळेल. जोकोविचचं म्हणणं आहे की "तुही १४ दिवस हे करून बघा. तेवढा निग्रह ठेवा. तुमच्या वजनात, चपळतेत, उत्साहात तुम्हालाच इतका बदल जाणवेल की पुढे त्याचं नक्कीच पालन कराल".

आहाराबद्दल तुम्ही आधी काही वाचलं नसेल तर तुम्हाला या पुस्तकातून आहाराकडे बघण्याची नवी दृष्टी लाभेल. आहाराबद्दल बरंच वाचलं असेल तर कदाचित "ग्लुटेन-फ्री" एवढीच नवीन संकल्पना यातून समजेल. जोकोविचच्या थाळीत डोकावायची संधी मिळाळ्याने नवनवीन आरोग्यदायी पदार्थ कळतील. एक यशस्वी खेळाडू किती मेहनत घेतो, किती काटेकोरपणे प्रत्येक गोष्ट करतो याचीही उजळणी होईल. स्वतःतही शारिरिक, मानसिक बदल घडवण्यासाठी प्रेरणा मिळेल.


(ता.क. : १४ दिवसांनंतर माझं वजन किती कमी झालं विचारू नका :p :p :p )

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...