मोडी लिपीतील पहिले ईबुक आणि मोडीलिपीचा फाँट तयार करण्याचा प्रवास



मराठी भाषेतील पण मोडी लिपीतील जगातील पहिलेच ईबुक नुकतेच वाचले.  जयसिंगराव पवार लिखित "राजर्षी शाहू छत्रपती महाराज" हे पुस्तक नवीनकुमार माळी यांनी मोडी लिपीत लिप्यंतरित करून ईबुक स्वरूपात सादर केले आहे.

आधी पुस्तकातल्या मजकूराबद्दल थोडं सांगतो आणि मग "मोडीतले  पुस्तक" या त्याच्या वैशिष्ट्याबद्दल सविस्तर सांगतो.  ईपुस्तकाची शंभर पाने असली तरी छापील पुस्तक पाठपोट 50-60 पाने भरेल. या छोटेखानी पुस्तकात शाहू महाराजांच्या कार्याची थोडक्यात ओळख  करून दिली आहे. शाहू महाराजांबद्दल समजून घेण्यासाठी पाहिले पाऊल म्हणून हे पुस्तक वाचणं अगत्याचे ठरेल.

अनुक्रमणिका :




मोडी लिपीच्या प्रचारासाठी नवीनकुमार अतिशय समर्पित भावनेने आणि कल्पकतेने (dedication and innovation) काम करत आहेत. मोडी शिकवणाऱ्या त्यांच्या "मोडी लिपी शिका सरावातून (Modi Script Learn & Practice" पुस्तकाची ओळख काही दिवसांपूर्वी मी करून दिली होती ( http://kaushiklele-bookreview.blogspot.in/2017/10/modi-script-learn-practice.html ). मोडी मुळाक्षरे शिकल्यावर विद्यार्थ्याला मोडीत वाचन सराव करता यावा या उद्देशाने त्यांनी हे ईपुस्तक तयार केलं आहे. ईपुस्तक तयार करायचे तर त्यासाठी मोडीत टायपिंग करता आलं पाहिजे. टायपिंग करायचं तर त्यासाठी मोडी फॉन्ट पाहिजे. या आधी काही व्यक्तींनी असे फॉण्ट बनवायच्या प्रयत्न केला होता पण त्या फॉन्ट मध्ये काही ना काही त्रुटी होत्या. पुस्तकात खूप वेगवेगळे शब्द - लिहायला किचकट, जोडाक्षरे असणारे- असेही येतात. तसंच मोडीत 'र' हे अक्षर शब्दातील आधीच्या शब्दाला जोडून लिहायची पद्धत आहे ज्याला 'र'ची करामत म्हटले जाते . उदा.




ही "र ची करामत" आणि जोडाक्षरे फॉन्ट मध्ये आली तरच मोडी फॉन्ट लिखित मोडीच्या जवळ जाणारा ठरणार होता. त्यामुळे एका परिपूर्ण फॉन्ट ची आवश्यकता होती. नवीनकुमार यांनी स्वतःच्या वेळेची, पैशाची आणि मेहनतीची गुंतवणूक करून हे काम पूर्ण केले आणि त्यानंतर आपल्यासाठी हे ईपुस्तक सिद्ध झाले. नमुन्यादाखल त्यातलं पाहिलं पान  

हे काम वाटतं तितकं सोपं आणि पटकन होण्यासारखं नव्हतं हे मला जाणवलं म्हणून मी नवीनकुमारांना त्यांचा या प्रयासाबद्दल सविस्तरपणे लिहायला सांगितलं. माझ्या आग्रहाला मान देत त्यांनी या प्रयासाबद्दल मोकळेपणे लिहिलं आहे ते त्यांच्याच शब्दात आपण पुढे वाचा. त्यांच्या प्रयत्नांना सुज्ञ वाचक नक्कीच दाद देतील, इतरांना याबद्दल सांगून मोडी प्रसारासाठी आपला हातभार लावतील याची खात्री आहे.
---------------------------------------------------------



मोडीलिपीचा फाँट तयार करण्याचा माझा प्रवास : नवीनकुमार माळी 

मोडी ही भारताची वैभवशाली लिपी आहे, ही जवळपास ६००-७०० वर्षे हस्तलिखीत होती, सदरच्या मोडी लिपीचे ऐकविसाव्या शतकात फाँट उपलब्ध झाले आहेत, पण काही मोडी तज्ञांचे मत होते की सध्या उपलब्ध असलेल्या फाँटमध्ये काही त्रुटी आहेत, त्यामध्ये मोडीचे खास वैशिष्ट्ये असलेली ’’र’’ च्या करामतीची अक्षरे खुप कमी आहेत, त्यात अजुन वाढ होण्याची गरज आहे. मोडीला नव्या फाँटची गरज आहे असे कळल्यावर मी कामाला लागलो. मॉड्युलर इन्फोटेक प्रा. लि(श्री लिपी) पुणे, यांच्या कार्यालयात पोहचलो. भारतातील बहुसंख्य भाषेचे फाँट श्री लिपीने तयार केलेले आहेत, त्यांनीही काही वर्षापूर्वी मोडी लिपीचा फाँट तयार करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना त्यामध्ये यश प्राप्त झाले नव्हते.
            
मी स्वत: हा विचार त्यांच्याकडे घेऊन गेल्यामुळे, श्री. निशिकांत आपटे सरांना आनंद झाला, कारण त्यांनी अर्ध्यावर सोडलेला मोडी लिपीच्या फाँट निर्मितीचे  काम परत सुरु होणार होते. श्री लिपी बरोबर सर्व व्यवहारीक बाबींचे बोलणे संपवून आम्ही फाँट निर्मीतीचे काम सुरु केले. श्री लिपीने पहिली मुळाक्षरे एका महिन्यात तयार केली. फाँटचा पहिला टाईप तयार झाल्यावर, मी मोडी तज्ञांना दाखविला. प्रत्येक मोडी तज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे योग्य बदल करुन परत एक टाईप तयार केला. पण परत काही तज्ञांच्याकडून सूचना आल्या की सदरच्या फाँटमध्ये ‘‘र‘‘ च्या करामतीची अजुन जास्त अक्षरे असतील तर अजुन चांगले होईल, मग परत तशी अक्षरे त्यामध्ये वाढवलीत. मोडी हस्तलेखनात ’’र’’ ची करामत वापरुन लिहिणे हे सहज शक्य आहे, पण तेच ज्यावेळी फाँटमध्ये वापरासाठी लिहावे लागते त्यावेळी त्याच्यापाठीमागे खूप मोठे इंजिनिरींग असते. जर एखाद्या अक्षरामध्ये बदल वा वाढ करायची असेल तर तीन–तीन विभागात काम करावे लागत असे. एका अक्षरावर तीन विभागात काम करणे अवघड नाही पण तीन विभागातील लोकांशी गोड बोलून त्यांना त्याच अक्षरावर परत कार्य करण्याची मानसिकता तयार करणे, तसेच त्या कामाची व्यवहारीक बाजूही बघणे हे महत्वाचं काम मला करावे लागे.
            
संपूर्ण फाँट तयार झाल्यावर परत सर्व तज्ञांना दाखवून घेतला. तरीही त्यामध्ये खूप चुका राहिल्या होत्या, कारण मोडीलिपीची अक्षरे ही हस्तलिखीत असल्याने बरेच वळणप्रकार अस्तित्वात होते, तसेच वेगवेगळ्या लेखणशैली मोडीलिपीत प्रचलित होत्या. तसेच मोडीचा वापर हा ६००–७०० वर्षापासून होत असलेने त्यामध्ये प्रत्येक कालखंडाप्रमाणे अक्षरांच्या लेखन पद्धतीमध्ये बदल झालेला आढळतो. मोडी लिपीचा वापर यादव कालखंडापासून सुरु झाला, पुढे शिवकाळातही मोडीचा वापर खूप झाला, पेशवेकाळात मोडीला बहर आला. एखादे अक्षर एका कालखंडात जसे लिहिले जाते त्यामध्ये पुढील कालखंडात थोडा वा जास्त बदल झालेला आढळतो. असे बदल काही अक्षराबाबतीत कमी जास्त प्रमाणात पाहण्यास मिळतात. मग नेमका कोणत्या कालखंडातील अक्षरांचा फाँट तयार करायचा हा यक्ष प्रश्न उभा राहिला होता.
            
पेशवेकाळात मोडीला बहर आलेला होता व बरीच अक्षरे कशी लिहिली पाहिजेत यासाठी काही पद्धती ठरल्या होत्या. तसेच पेशवेकाळातील मोडी अक्षरलेखन हे कोरीव, आणि सहज वाचता येईल असे होते. मग असे ठरले की पेशवे काळात वापरात असलेल्या लेखन पद्धतीचा व अक्षरांचा वापर करुन फाँट तयार करावा. मग परत सगळा तयार झालेला फाँट बदलून घेतला. त्यात ’’र’’ ची करामत वापरुन तयार केलेली अक्षरे वाढवली. मोडी लिपीचा SHREE_MODI_2100  हा फाँटमध्ये अचुक बदल करण्यासाठी श्री.राजेश खिलारी (जागतीक मोडी लिपी प्रसार समिती, मुंबई) यांनी पुण्याला प्रत्यक्ष श्री लिपी कार्यालयाला भेट देऊन मार्गदर्शन केले होते.
            
सदरचा फाँट पूर्ण होण्यास जवळपास सहा–सात महिन्याचा कालावधी लागला, व या दरम्यान मी कोल्हापूर–पुणे–कोल्हापूर असे कमीत कमी २० ते २५ वेळा ये–जा केली आहे. सदरचे कार्य करताना अनेक अनुभव आले, प्रत्येकांच्या सूचना समजून घेणे, त्याप्रमाणे फाँट मध्ये बदल करुन घेणे व त्यासाठी लागणारी व्यवहारीक बाजूची काळजी घेणे यासाठी सगळे कौशल्य पणाला लागले होते. मोडीमध्ये एकाच अक्षरांचे विविध लेखनप्रकार असतात. सगळेच सगळ्यांनाच माहित असतील असे नसते. तशा स्वरुपाच्या दस्तऐवजांचे वाचन जर त्या अभ्यासकाकडून झाले असेल तरच ते अक्षर त्यांना माहित असते, पण एखाद्या अभ्यासकच्या वाचनात जर ते अक्षर आले नसेल तर ते अस्तित्वातच नव्हते असे नसते. अशा बाबी माझ्यापेक्षा अनुभवी अभ्यासकांनी नजरेस आणून दिल्यावर त्यांना सदरचे संदर्भ द्यावे लागत असत. तसेच मी मोडीचा अभ्यासक आहे म्हणजे मलाही सगळ्याच बाबी माहितच आहेत असे नाही. म्हणूनच मी महाराष्ट्रातील मोडी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच फाँट तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.  
           
‘‘मोडी लिपी-शिका सरावातून‘‘ या पुस्तकात मी लिहलेल्या वर्णमालेतील अर्धस्वरांची चूक मला जवळपास सगळ्यांनीच दाखविली. मला माझ्या चुका दाखविल्याबद्दल मला किचिंतही राग नाही, उलट एखादी व्यक्ती ज्यावेळी आपल्याला आपली चूक दाखवते वा सूचना सांगत असते त्यावेळी आपल्या कार्यातच सुधारणा होणार असते. पण मराठी वर्णमालेतील अर्ध स्वरा बाबत बोलायचे झाले तर चूक कोणाची हेच नेमकं समजत नाही. महाराष्ट्रात नव्याने प्रकाशीत झालेल्या ९८% मराठी वर्णमालेत अर्धस्वर चूकीच्या पद्धतीने लिहिलेले असतात. मूळ स्वरातूनच त्यांचे अर्धस्वर उत्पन झाले, त्यांचा क्रमही मुळ स्वराप्रमाणेच असतो हे व्याकरण सांगते. जुन्या संदर्भ पुस्तकात ही गोष्ट पाहण्यास मिळते. मूळ स्वर इ–ई, उ–ऊ, ॠ, लृ यांचे अर्धस्वर म्हणून य, व, र, ल वापरतात. पण अलिकडे महाराष्ट्रात प्रकाशित झालेल्या बहुतांश पुस्तकात अर्धस्वर हे य, र, ल, व असे चुकीचे लिहिलेले असतात. असे का असते, वा कोणत्या वर्षी व कोणत्या पुस्तकापासून ही पद्धत सुरु झाली हा एक संशोधनाचा विषय आहे. पण बहुधा पाठांतर करताना सोपे म्हणून य, र, ल, व असा चूकीचा क्रम झाला असावा असे वाटते. पण लिहिताना वा छापताना तरी योग्य क्रम पाहिजे होता, पण असे झालेले आढळत नाही.

पुस्तकात सरावासाठी अक्षर गिरवण्याची दिशा दाखवावी अशी सुचना आली, जी मलाही योग्य वाटली व सदरचा बदल तसेच अशाच योग्य सूचनांप्रमाणे दूसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होईल. हस्तलेखनाला कोणत्याही मर्यादा नसतात, ते आपण कसेही लिहू शकतो; पण फाँटला मर्यादा पडतात कारण एका अक्षराच्या बदलामूळे संपूर्ण फाँटमध्ये पुढील बरेच बदल होत असतात. त्यामुळे आजही काही अभ्यासकांना असे वाटत असेल की एखाद्या अक्षराचा आकार वा उकार असा नसून तसा पाहिजे होता पण काही तांत्रिक बाबीमुळे मोडी फाँटला काही मर्यादा पडतात. तरीही जास्तीतजास्त तज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच सदरचा अचुक फाँट तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजुनही यामध्ये सुधारणेला वाव आहे, व फाँटच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये हे बदल केले जातील. हे लगेचच शक्य करण्यास व्यावहारीक बाब महत्वाची ठरते. त्यात कालबाह्य झालेल्या या मोडी लिपीमधुन केलेल्या गुंतवणुकीचा परतावा कधी मिळेल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून यात जास्त लोक गुंतवणीकीसाठी तयार होत नाहीत. मी हे धाडस केले पण माझ्या एकाही जवळच्या मित्रांनी मला या गोष्टीला मानसिक पाठींबा दिला नाही. उलट ते मला सांगत होते की असे काही करण्यात आजीबात वेळ व पैसा वाया घालवू नकोस. पण मी मला जे योग्य वाटले व जसे ठरविले तसेच मी केले. मी केलेल्या कामाचे पूर्ण समाधान मला आहे.


’’राजर्षी शाहू छत्रपती महाराज ’’ हे पुस्तक प्रथम ई-पुस्तक प्रकाशित करावे असे वाटले होते. याचे कारण आज प्रत्येकजण मोबाईल व इंटरनेटशी जोडलेला आहे. परत पुस्तक स्वरुपात जर एखादे पुस्तक वितरीत करायचे असलेस त्यास खुप मोठी वितरण व्यवस्था पाहिजे असते. काही वितरण व्यवस्था महाराष्ट्रात आहेत पण त्या संस्था मोडी पुस्तकाला किती स्थान देतील हे सांगता येण्यासारखे नव्हते. कारण माझ्या पहिल्या ’’मोडी लिपी–शिका सरावातून‘‘ या पुस्तकातून मला याचा अनुभव आलेला होता. वितरणाअभावी पुस्तक जास्तीत लोकांपर्यत पोहचत नाही, म्हणुन मी ई–पुस्तकाचा मार्ग निवडला. कोणालाही सदरचे ई–पुस्तक आपल्या मोबाईलवर कधीही, कोठेही मोफत डाऊनलोड करता येऊ शकते.  


या पुस्तकाचे लिप्यंतर करताना जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लागला, देववनागरी ते मोडी लिपी असे लिप्यंतर करताना मोडीच्या वेगवेगळ्या शैलीप्रमाणे टंकीत करावे लागे. टंकन झाल्यावर परत ’र’ च्या करामती करणे व मोडी अक्षरांच्या टंकनातील चुका दुरुस्त करणे असे सर्व सोपस्कार करावे लागत. अजुनही काही तांत्रिक गोष्टीमुळे झालेल्या चुका ई–पुस्तकामध्ये आहेत. पण ई–पुस्तकाचा एक फायदा असाही आहे की पुस्तकात सुधारलेल्या गोष्टी, वाचकांनी त्यांचे ॲप अपडेट केल्यावर अगोदर डाऊनलोड केलेल्या पुस्तकातही सुधारणा होते.


मोडीलिपीचे ई–पुस्तक तयार करत असतान सगळ्यात मोठा गोंधळ झाला तो मोडीच्या फाँटला कोणतेही ई–पुस्तक संकेतस्थळ सपोर्ट करत नव्हते, सुरुवातीला अमॅझानवर सदरचे ई–पुस्तक प्रकाशित केले पण फाँटला सपोर्ट मिळाला नाही. तो सपोर्ट अमॅझान या संकेतस्थळाने अजुनही दिलेला नाही. अमॅझानवर मराठी-देवनागरी फाँट उपलब्ध आहेत, याला सपोर्ट मिळतो पण मोडीसाठी एक वर्ष पाठपुरावा करुन पण अजूनही यश मिळाले नाही. पण श्री लिपीने गुगलसाठी बरेच फाँट तयार करुन दिले आहेत, त्यामुळे त्यांच्या सहकार्याने मला मोडी लिपीतील जगातील पहिले ई–पुस्तक गुगलच्या प्ले बुक्सवर प्रकाशित करण्यात यश आले. गुगल या संकेतस्थळच्या नियमावलीप्रमाणे "ई–पब" फाईल श्री लिपी यांनी तयार करुन दिली. गुगलने त्यांच्या संकेतस्थळावर नव्या प्रकाशकांची नोंदणी बंद केलेली आहे, मग परत गुगल संकेतस्थळावरील प्रकाशक शोधण्याची सुरुवात केली, खुप शोधाशोध करुन ब्रोनॅटो.कॉम (bronato.com) या संकेतस्थळाची माहिती मिळाली. त्यांच्याशी संपर्क झाला. सदरच्या ई–पुस्तकाला प्रकाशक म्हणून ब्रोनॅटो.कॉमचे संचालक श्री. शैलेश खडतरे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.


आज मितीला ’’राजर्षी शाहू छत्रपती महाराज ’’ या  ई-पुस्तकाच्या तीन हजार प्रती, भारताबरोबर, अमेरिका, इंडोनिशिया, मलेशिया, रशीया, टर्की, इटली, हाँगकाँग, इ. देशात डाऊनलोड झालेल्या आहेत. मी तयार करुन घेतलेला मोडी लिपी फाँट SHREE_MODI_2100 सर्वांसाठी उपलब्ध आहे. हा फाँट युनिकोड आहे. सदरचा फाँट मॉड्युलर इन्फोटेक प्रा. लि. पुणे यांच्या कार्यालयातून प्रत्येकाला परवान्यासहीत विकत घेता येणे शक्य आहे. अजून वेगवेगळ्या विषयावरील मोडी लिपी पुस्तकांचे कार्य सुरु आहे, ’’स्वामी विवेकानंदांची बोधवचने’’(मोडीलिपी) हे पुस्तक मागील महिन्यात मुंबई येथे प्रकाशित झालेले आहे. आता सदरच्या पुस्तकाचे ई–पुस्तकाचे काम सुरु आहे, सदरचे ई–पुस्तकही वाचकांना लवकरच मोफत उपलब्ध होईल. याचबरोबर ’’सावित्रीबाई फुले’’ यांच्या जीवन चरीत्रा वरील मोडी पुस्तकाचे कार्य सुरु आहे. असाच मोडीच्या प्रचाराचा सुरु केलेला प्रवास अखंडपणे चालू ठेवण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

---------------------------------------------------------

आपली मोफत प्रत डाऊनलोड करण्यासाठी https://goo.gl/WXKck2 किंवा Google Play Books वर "rajarshi shahu" शोधा.
'             
नवीनकुमार माळी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी 
www.navinmali.com
https://www.facebook.com/navinmali.page/
https://twitter.com/navinmali


हे पुस्तक नव्या जुन्याचा सुंदर मिलाप आहे. 

मोडी लिपी जुनी पण फॉन्ट तंत्र नवे. 
राजा जुना पण त्याचे विचार आजच्या काळापेक्षाही नवे
म्हणून हे ईपुस्तक तुम्ही आवर्जून वाचायलाच हवे 


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

----------------------------------------------------------------------------------


2 comments:

  1. कीबोर्ड अॅप तयार करावा ज्याने हे लिपी सगळे लिहु शकणार

    ReplyDelete

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...