संवादु-अनुवादु (Sanvadu-Anuvadu)








पुस्तक : संवादु-अनुवादु (Sanvadu-Anuvadu)
लेखिका : उमा वि. कुलकर्णी (Uma V. Kulkarni)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ४२६
ISBN (P book): 978938688754
ISBN (E book): 978938688757

कन्नड भाषेतील उत्तम साहित्य मराठीत भाषांतरित करून मराठी साहित्य विश्व समृद्ध करणाऱ्या प्रसिद्ध अनुवादिका उमा कुलकर्णी यांचं हे आत्मकथन आहे. वाचनप्रेमी मराठी मंडळींना उमा कुलकर्णी हे नाव माहीत नाही असं होणं शक्य नाही तरीही त्यांच्याबद्दल आधी थोडी माहिती सांगतो. 1982 मध्ये शिवराम कारंथ यांचे “तनामनाच्या भोवर्‍यात” हे त्यांचे पहिले अनुवादित पुस्तक प्रकाशित झाले. प्रसिद्ध कन्नड लेखक डॉक्टर एस एल भैरप्पा यांचे “वंशवृक्ष”, ‘पर्व’, ‘मंद्र’, ‘जा ओलांडुनी’, ‘काठ’, ‘परीशोध’, “तंतू’; गिरीश कार्नाड यांचे ‘नागमंडल’, ‘तेलदंड’ इत्यादी साहित्य अनुवादित केले आहे. साहित्य अकादमीचा पहिला अनुवाद पुरस्कार; ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’, महाराष्ट्र फाउंडेशनचा विशेष पुरस्कार इ. पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. मराठी व कन्नड समाजातले साहित्यिक सामाजिक बंधुत्व वाढवण्यास हातभार लावल्याबद्दल त्यांना ‘वरदराज आद्य पुरस्कार’ मिळाला आहे.

पुस्तकात दिलेली अजून माहिती
फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा




अश्या उमा कुलकर्णी यांनी त्यांच्या लहानपणापासून आज पर्यंत घडलेल्या प्रसंगांतून त्यांचा जीवनपट आपल्या समोर उभा केला आहे. त्यांचे लहानपण बेळगावात गेल्यामुळे कानडी भाषा त्यांच्या कानावर पडत होती. तरी त्यांना ती जुजबीच येत होती. कॉलेजमध्ये असतानाच वडिलांनी त्यांचे लग्न ठरवले. सासर एक कानडी मध्यमवर्गीय कुटुंब होतं. लग्नानंतर पुण्याला आल्यावर. पतीच्या आग्रहाखातर हळूहळू कानडी बोलायला शिकल्या. त्यादरम्यान शिवराम कारंथ यांच्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. कादंबरी कन्नड असल्यामुळे त्यांच्या पतीने उमाताईंना ती वाचून दाखवली. ती ऐकत असताना तिचा अर्थ मराठीत लिहून ठेवायला सुरुवात केली. हा मराठी अनुवाद जरी त्यांनी स्वतःच्या आनंदा साठी केला असला तरी यातून त्यांच्या अनुवादाच्या प्रवासाला नकळत सुरुवात झाली. आपल्याला अनुवाद करणं जमतंय, आवडतंय हे बघून त्यांनी दुसऱ्या एका कादंबरीच्या अनुवादासाठी शिवराम कारंथ यांची रीतसर परवानगी मगितली. कारंथांनी काही प्रकरणांचा नमुना अनुवाद मागितला. उमाताईंनी केलेला अनुवाद त्यांना आवडला; कारंथांकडून परवानगी मिळाली व पहिला अनुवाद प्रकाशित झाला. पुढे त्यांच्या पतीने कानडी कादंबऱ्या वाचून दाखवायच्या आणि त्यांनी त्या मराठीत अनुवादित करायच्या हा प्रघात पडला. अनुवादाच्या प्रवासात त्यांचे पती विरुपाक्ष सुद्धा उतरले. उमाताईंच्या सहकार्याने त्यांनी मराठीतील पुस्तके, लेख इ. कन्नड मध्ये अनुवादित करायला सुरुवात केली. त्यामुळे हे पुस्तक उमाताईंच्या लेखन प्रवासाबरोबर त्यांच्या पतीचा लेखनप्रवास संगणारे, त्या दोघांचे अनोखे सहजीवन दाखवणारे आहे.

त्यांच्या घरातल्या मराठी-कानडी संगमाचा हा एक गमतीदार प्रसंग


अनुवादाच्या निमित्ताने लेखकांशी संपर्क, पत्रव्यवहार करावाच लागे. काही मोठे लेखक हे उमद्या व्यक्तिमत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्याशी या दांपत्याचे घरोब्याचे संबंध निर्माण झाले. कन्नड लेखक शिवराम कारंत, भैरप्पा हे पुण्यात आल्यावर त्यांच्या कडेच उतरत. उमाताई कर्नाटकात गेल्यावर त्यांच्या घरी जात, त्यांच्या बरोबर कार्यक्रमांना जायची संधी मिळे. अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड यांच्याशीही भेटी झाल्या. अशा भेटींचे, रंगलेल्या गप्पांचे कितीतरी प्रसंग या पुस्तकात आहेत.

कारंथ त्यांच्या घरी सर्वप्रथम आले तो दिवस:



साहित्य क्षेत्रात मुशाफिरी सुरू झाल्यामुळे मराठी साहित्य सृष्टीतल्या दिग्गजांशी ही यानिमित्ताने ओळखी झाल्या अगदी घरगुती नाती तयार झाली. उदाहरणार्थ पुण्यात राहणारे अनिल अवचट, कमल पाध्ये हे लेखिकेच्या घरी नेहमी येत. त्यांच्या साहित्य आणि इतर सामाजिक विषयांवर गप्पा चालत. पुल आणि सुनीताबाईंचंही येणं जाणं असे. कन्नड-मराठी सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी त्यांनी इतर साहित्यिकांच्या सहकार्यातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले . या सगळ्या प्रसंगांतून मोठ्या लेखकांचे एकमेकांशी संबंध कसे असतात; लेखनाशिवाय च्या खाजगी आयुष्यात ते कसे वागतात यात डोकावण्याची संधी आपल्याला मिळते. अनुवादासाठी त्यांना पुरस्कार मिळाले ते समारंभ, त्या उपस्थित होत्या अश्या साहित्य संमेलनातले महत्त्वाचे प्रसंग, वक्त्यांनी मांडलेले महत्त्वपूर्ण मुद्दे हे देखील पुस्तकाच्या ओघात आपसूकच येतं.

कन्नड-मराठी या भाषा भगिनींच्या साहित्य क्षेत्रातल्या देवाण-घेवाण याबद्दलही आपल्याला बरीच जाणीव यातून होते. दोन शेजारची राज्य असली तरी दोन्ही भाषांमध्ये एकमेकांच्या साहित्याची, मोठ्या साहित्यिकांची तितकी ओळख नाही असेच अनुभव लेखिकेला आले. सुनीताबाई देशपांडे यांच्या ‘आहे मनोहर तरी’ या आत्मचरित्राचा अनुवाद त्यांचे पती विरुपाक्ष यांनी कन्नडमध्ये केला तेव्हा त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रकाशक शोधणे हे मोठे जिकिरीचे काम झाले कर्नाटकातल्या मंडळींचं असं म्हणणं होतं की जर कर्नाटकातल्या मंडळींना पु.ल. देशपांडे च फार माहीत नाहीत तर त्यांची पत्नी असणाऱ्या सुनीताबाईंचे चरित्र कोण वाचणार?

अनुवादाला साहित्यक्षेत्रात दुय्यम स्थान दिलं जातं याचे अनुभवही त्यांनी अगदी शांतपणे मांडले आहेत. अनुवादक असूनही मुखपृष्ठावर नाव न येणे, योग्य मानधन न मिळणे असे अनुभव घेत आहे. पुस्तकांच्या अनुवादाबरोबरच त्यांनी दूरदर्शन वरच्या मलिकांचे अनुवाद, संवाद पटकथा लेखन सुद्धा केलं आहे. कानडी मालिका मराठीत आणताना फक्त भाषांतरच नाही तर ती मराठमोळ्या स्वरूपात तिचं रूपांतर करणं सुद्धा आवश्यक होतं. हे काम आणि त्यातली आव्हानं पूर्णपणे वेगळी होती. चित्रीकरणाच्या निमित्ताने सुमित्रा भावेंसारख्या दिग्गज दिग्दर्शिकेचं काम जवळून बघण्याची संधी त्यांना मिळाली. सुमित्रा भावेंच्या काम करण्याच्या शैलीबद्दल, इतर व्यावसायिक दिग्दर्शकांच्या अनुभवाबबद्दल त्यांनी सविस्तर लिहिलं आहे.



लेखिका, अनुवादिका उमा कुलकर्णी यांच्या बरोबर एक मध्यमवर्गीय गृहिणी, सून असणारी उमा, मुलगी असणारी सुषमा(त्यांचे माहेरचे नाव) हे कथानकही पुस्तकभर समांतर चालते. त्यांचे बेळगावातले लहानपण, नातेवाईक, आजारपणं, बरेवाईट प्रसंगं याबद्दलही खूपच सविस्तर लिहिलं आहे. उदा पुस्तकाची पहिली दोन प्रकरणं ८४ पानं हाच वैयक्तिक मजकूर आहे. त्यामुळे त्यांच्या अनुवादाबद्दल वाचयला मिळणार की नाही अशी धकधूक वाटत होती.

एकूण पुस्तकाची कल्पना आपल्याला आली असेलच. पुस्तकाची शैली तशी सहज संवादी आहे. उमाताईंचा स्वभाव शांत, समंजस, परिस्थिती स्वीकारत पुढे जाणारा असल्याचं जाणवतं. त्यामुळे पुस्तकात कुठेही नाट्यमय प्रसंग नाहीत; खूप मोठा संघर्ष किंवा अटीतटीचे प्रसंग नाहीत. पुस्तक एका संथ लयीत जात राहते. कंटाळवाणे झाले नाही तरी खूप उत्कंठावर्धकही होत नाही.

वैयक्तिक, कौटुंबिक प्रसंग - अगदी धुणी भांड्याला घरी बाई कशी वागायची, नात्यात कोण आजारी पडलं, घरमालकांशी झालेल्या वादातून कोर्टकचेऱ्या - इ. बारीकसारिक तपशील बरेच आहेत. हे म्हणजे एखाद्याचा घरगुती फोटोअल्बम बघितल्यासारखं आहे. प्रत्येकाच्या घरात, किमान मनात तरी असा अल्बम असतोच. त्यामुळे, महत्त्वाचे प्रसंग सोडल्यास इतर प्रसंग वाचण्यात लेखिकेच्या जवळच्या नातेवाईक नसलेल्या त्रयस्थ वाचकांना 
फार रस वाटणार नाही. अशा प्रसंगांना कात्री लावून पुस्तक थोडं लहान आणि जास्त वेगवान करता आलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे, या शब्दिक अल्बममध्ये एकही फोटो नाही. अश्या प्रकारच्या पुस्तकांत बहुतेक वेळा लेखकाच्या लहानपणची छायाचित्रे तसेच कुटुंबाचे, लग्नातले, पुरस्कार मिळतानाचे, महत्त्वाच्या भेटीगाठींची छायाचित्रे असतात. या पुस्तकात एकही नाही. ते असायला हवे होते.

उमाताईंनी इतके प्रसंग लिहिले आहेत तरीही प्रत्यक्ष अनुवादाच्या अनुभवाविषयी फार त्रोटक लिहिलं आहे असं मला वाटलं. अनुवाद करताना 
शब्दकोश वापरणे, कादंबरीतले कथानक घडते त्या स्थळांना भेटी देणे, जिथे अडेल तिथे मूळ लेखकाची मदत घेणे इ. गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत. तरीही पर्व, आवरण इ. सारख्या महत्त्वाच्या कादंबऱ्यांचा अनुवाद कसा आकारत गेला गेला हे सविस्तर वाचायला मिळेल अशी मला अपेक्षा होती. पण ती पूर्ण होत नाही. उदा. "पर्व" बद्दल त्या लिहितात-“‘पर्व’चा अनुवाद मला अतिशय आनंद देऊन गेला अनुवाद पुरा होईपर्यंत मी त्या वातावरणात घुमत राहिले यातील प्रज्ञा प्रवाहात शिरून त्या पात्रांच्या मनातले विचार व्यक्त करताना मी ते पात्र होऊन जात होते. विशेषतः कुंती आणि द्रौपदीच्या मनात भैरप्पा इतक्या समर्थपणे शिरले आहेत की मला तेवढ्या भागापुरती कारंथ यांची ‘तनमनाच्या भोवऱ्यात’ आठवली.” बास संपलं! कदाचित अनुवाद त्यांच्यासाठी इतकी सहज प्रक्रिया झाली आहे की त्यात विशेष काही सांगावं असं त्यांना वाटलं नसेल. अनुवादाच्या आधीचे आणि नंतरचे सोपस्कारच कठीण वाटल्यामुळे त्यांचा भर त्यासंबंधित प्रसंगांवर असावा.

कन्नडशी इतका संबंध येऊन, प्रयत्नपूर्वक बोलायला शिकूनही त्या कन्नड वाचयला का शिकल्या नाहीत; अजूनही त्यांना वाचून का दाखवावं लागतं या प्रश्नाचा कीडापण या पुस्तकाने डोक्यात सोडला आहे. :) :)

असो. उमाताईंच्या अनुवादाच्या प्रवासाचा, दिग्गजांशी झालेल्या गप्पागोष्टींचा अनुभव घ्यायला वाचनप्रेमींना नक्कीच आवडेल.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...