पुस्तक : अंधारवारी (Andharvari)
लेखक : हृषिकेश गुप्ते (Hrushikesh Gupte)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : 160
ISBN : दिलेला नाही
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
हृषिकेश गुप्ते लिखित भयकथांचा हा संग्रह आहे. अनामिक, अनाकलनीय, पाशवी शक्ती माणसांना वेगवेगळ्या प्रकारे आकर्षित करतात आणि त्यांना कधी खून तर कधी आत्महत्या करायला कश्या प्रवृत्त करतात हा कथांचा मुख्य विषय आहे. त्यामुळे एखाद्या पात्राला भास होऊ लागतात, चित्रविचित्र स्वप्ने पडतात किंवा अघोरी शक्ती अचानक त्याचा ताबा घेतात. वाचताना अंगावरून काटा भीतीचा सर्रकन जातो. गोष्टींत घडणारे प्रसंग अगदी रोजच्या आयुष्यातले असल्यामुळे नकळत पात्रांच्या जागी आपण स्वतःला ठेवतो. भीती अजूनच गडद होते आणि वाचायला मजा येते.
फक्त एकाच गोष्टीत "भुताचा जन्म" स्पष्ट केला आहे. म्हणजे पडद्यामागून कोणीतरी सूत्र हलवत असतो पण ते कारण न समजल्यामुळे गावकऱ्यांना तो सगळा भुताटकीचा प्रकार वाटतो. बाकी सर्व गोष्टींमध्ये त्या शक्ती, भुतंखेतं अस्तित्वात असतात हे गृहितक नाकारायचा प्रयत्न केलेला नाही. आपणही त्या कल्पना विश्वात चांगले रंगतो. पहिल्या दोन गोष्टी ५०-६० पानांच्या दीर्घकथा आहेत.
कथासंग्रहात प्रत्येक कथेची गोष्ट वेगळी असते त्यामुळे कादंबरीप्रमाणे पुस्तकाचा गोषवारा देता येत नाही. त्यात या भीती कथा असल्यामुळे गोष्टीबद्दल संक्षेपात संगितलं तरी रहस्यभंग आणि पर्यायाने भावी वाचकांचा रसभंग होईल म्हणून जास्त काही लिहित नाही. अंधार, भीती, थंडपणा, मृतदेह वगैरेंची विशेषणे वाचताना जी.एं.च्या "काजळमाया"ची आठवण झाली. "काळ्याकपारी", "गानूआजींची अंगाई" गोष्टी वाचताना "तुंबाड" चित्रपटासारखे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे रहतात. लेखकाच्या लेखनाची ही ताकद आहे. त्याची झलक म्हणून ही दोन पाने.
ज्यांना भीतीकथा आवडतात त्यांना हे पुस्तक नक्कीच आवडेल.
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-
भीतीकथा आवडत असतील तर : आवा ( आवर्जून वाचा )
भीती वाटत असेल तर : झेवा (झेपल्यास वाचा) जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment