स्ट्रगलर्स (Strugglers)



पुस्तक : स्ट्रगलर्स (Strugglers)
लेखिका : मुक्ता चैतन्य (Mukta Chaitanya)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १०४
ISBN : 81-7766-701-7


एखाद्या कार्यक्रमाला "सेलिब्रिटी" येणार आहे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं चित्र येत असेल तर ते सिनेनटनट्या, मालिकांमधले कलाकार यांचं. दिसायला देखणे, उंची वेशभूषा, आकर्षक व्यक्तिमत्त्व, भरपूर पैसा, सतत प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या ह्या व्यक्ती. असं आयुष्य आपल्याही वाट्याला यावं ही इच्छा न वाटणारा विरळाच. त्यामुळेच दिसायला बरे, अभिनयाची आवड असणारे, आपलंही नशीब फळफळेल अशी आशा असणारे हजारो-लाखो तरूण तरुणी सिनेमा-दूरदर्शनच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी धडपडत असतात. या क्षेत्रात शिरकाव करण्याची धडपड, उमेदवारीचा कालखंड या प्रक्रियेला कलाक्षेत्रात विशेष नाव आहे ते म्हणजे -स्ट्रगल. आणि असे धडपडे म्हणजे "स्ट्रगलर्स" ! स्ट्रगलर्सच्या दुनियेत, त्यांच्या अनुभवविश्वात डोकावून बघणारं हे पुस्तक आहे. 

मराठी-हिंदी मधल्या सिने-मलिका विश्वात प्रवेश करू इच्छिणाऱ्या युवक युवतींसाठी आशेचं ठिकाण म्हणजे - मायानगरी मुंबई. मुंबईत "स्ट्रगल" करायला आलेल्या "स्ट्रगलर्स"शी प्रत्यक्ष संवाद साधत लेखिकेने हे अनुभव गोळा केले आहेत. या धडपडीच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल पुढील प्रकरणांत लिहिलं आहे.




या वेडाची सुरुवात बहुतेक वेळा महाविद्यालयात असताना तिथल्या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेऊन होते. मग तिथलं वातावरण कसं असतं; नवखा मुलगा सिनियर्सशी जुळवून घेत कसा चंचूप्रवेश करतो; सुरुवातीला काम नाही मिळालं तरी, "सतरंज्या उचलणे", "बॅक्स्टेज सांभाळणे" हे कसं रोमॅंटीक वाटतं वगैरे वातावरण असतं हे लेखिकेने दाखवलं आहे. या नव्या नवलाईच्या दिवसांबद्दल लेखिका लिहिते :




मुंबईत यायचा निर्णय मनाशी पक्का झाला की पहिला प्रश्न येतो तो आईबाबांच्या परवानगीचा. प्रत्येक धडपड्याच्या घरची आर्थिक, वैचारिक परिस्थिती वेगळी. "या धंद्यात पडायचं असेल तर तुझे आणि आमचे संबंध तुटले" इथपासून "मला माझ्या मुलीने या क्षेत्रात नाव कमवून दाखवलंच पाहिजे. त्यासाठी काहीही करायला तयार" अशा या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळ्या प्रतिक्रिया दिसतात. निरनिराळ्या अनुभवांचं कोलाज लेखिकेनं शब्दांतून उभं केलं आहे.

मुंबईत आल्यावर खरी सुरुवात होते. थोडेफार पैसे असतील तर ठीक नाहीतर तुटपुंज्या पैशात लहानशा खोल्यांत खूप लोकांबरोबर एकत्र राहावं लागतं. फोटोंचा पोर्टफोलिओ देणं, ऑडिशन्स देणं, स्क्रीन टेस्ट देणं, पुन्हापुन्हा जाऊन दिग्दर्शक, निर्मात्यांना भेटणं हे प्रचंड मानसिक ताणाचं आहे. काम मिळत नसल्याची निराशा, कामाबद्दल दुसऱ्या कोणाला कळलं तर आपलं काम जाईल ही असुरक्षितता, "घरी काय तोंड दाखवणार" अशी स्वतःची लाज वाटायला लावणारी परिस्थिती. इथेही जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. कोणी हे सहन करून झगडत राहतं, कोणी हे नैराश्य दारू-सिगरेट च्या नशेत विसरायचा प्रयत्न करतं तर कोणी दुभंगून, हार खाऊन या दुनियेला राम राम करतं. अनेक स्ट्रगलर्सना भेटून लेखिकेने त्याच्या मनात उठणाऱ्या वादळांचा वेध घ्यायचा प्रयत्न केला आहे. चंदेरी दुनियेतल्या ताऱ्यांमागचा हा अंधार समजून घेण्यासारखा आहे.
मुंबईत अगदी अडचणीत रहण्याबद्दल :


सिने-मालिका हे अभिनयाचं क्षेत्र आहे त्याहून जास्त ते दिसण्याचं आहे. आकर्षक दिसण्याचं आणि आकर्षक अंग दाखवण्याचं क्षेत्र आहे. आणि फक्त पडद्यावरच नव्हे तर पडद्यावर झळकण्याची संधी मिळवण्यासाठी सुद्धा शरीरच वापरलं जातं - शब्दशः. काम मिळवून देण्याच्या मोबदल्यात काहीवेळा निर्माते, दिग्दर्शक, मधल्या व्यक्ती आडून आडून शरीरसुखाच्या मागण्या करतात. मुलींकडे आणि मुलांकडेही. ही असली मागणी धुडकवायची का स्वीकारायची हा पुन्हा प्रत्येकाच्या स्वभावाचा, परिस्थितीचा प्रश्न. कोणी नईलाजाने स्वीकारतं, कोणी बेफिकिरीने तर कोणी नफ्यातोट्याचं गणित करून. या एकाच पैलूकडे स्ट्रगलर्स मुली कशा वेगवेगळ्या नजरेने बघतात हे पुस्तकात दिलं आहे.

फक्त कलाकारच नाही तर दिग्दर्शनातले धडपडे, वेशभूषा करणारे, "घोस्ट" म्हणून काम करणारे, लेखक यांनाही स्ट्रगल असतोच. त्याबद्दलही एका प्रकरणात थोडी थोडी कल्पना आहे. सहाय्यक दिग्दर्शनाबद्दलचं पुस्तकातलं एक पान.




स्ट्रगलर्सना पुन्हा पुन्हा खेटे घालून काम मिळवावं लागतं तसंच निर्माते, दिग्दर्शक, मॅनेजर यांनाही सतत या स्ट्रगलर्सच्या माऱ्याला तोंड द्यावं लागतं. अनुभव, दिसणं, अभिनय या बाबतीत हाताशी काही नसणाऱ्यांनाही भेटावं, बोलावं लागतं. त्यांचीही चिडचिड आणि दुर्लक्ष होणंही स्वभाविक आहे. स्ट्रगलची दुसरी बाजू समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न पुस्तकात अहे. 

पुस्तक २००६ साली प्रकाशित झाले असले तरी १३ वर्षांत परिस्थिती खूप वेगळी झाली असेल असे नाही. आभासी सुंदर जगामागची करूप आणि जीवघेणी स्पर्धा आपल्याला भिडते. या क्षेत्रातील होतकरू तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे. त्यातून त्यांना या क्षेत्रातल्या आव्हानांची कल्पना येईल, मानसिक तयारी करता येईल. बाकिच्यांनाही हे पुस्तक वाचायला, ही सगळी प्रक्रिया समजून घ्यायला आवडेल. "मी गेलो/ले असतो/ते सिनेमात तर मोठा/ठी स्टार झाले असते" असं कोणाला वाटत असेल तर हे सगळं आपल्याला झेपलं असतं का हा प्रश्न त्या/तिच्या मनात नक्की उभा राहील.

लेखिकेची शैली आवडली. पण मुद्द्यांची आणि निष्कर्षांची पुनरावृत्ती फार वेळा झाली आहे. ती टाळायला हवी होती. सध्याच्या नामवंत कलाकारंच्या "स्ट्रगलिंग पिरेड" बद्दल नावानिशी लिहिलं असतं तर पुस्तकाला अजून वजन प्राप्त झालं असतं. अभिनयेतर कामांच्या स्ट्रगल बद्दल आणि निर्माते-दिग्दर्शक इ.च्या बाजूबद्दल सुद्धा अजून लिहिलं असतं तर जास्त परिपूर्ण वाटलं असतं. पुस्तकात एकूणच नकारात्मक किंवा त्रासदायक पैलूंवरच भर आहे. पण या धडपडीत येणारे सुखद अनुभव, पहिले काम मिळाल्याचा आनंद, अनपेक्षित जुळून आलेल्या गोष्टी, कष्टाचं झालेलं चीज हे सगळं येत नाही. ते सुद्धा असायला हवं होतं.

हे पुस्तक वाचताना सुधीर फडके यांच्या आत्मचरित्राची- "जगाच्या पाठीवरची"- आठवण झाली. (http://kaushiklele-bookreview.blogspot.com/2018/08/jagachya-pathivar.html) त्यांचे अनुभव तर याहून जीवघेणे. तरीही स्वतःचे स्वत्त्व आणि तत्त्व टिकवत त्यांनी संघर्ष केला. मुंबईच्या स्ट्रगल ला कंटाळालेल्या स्ट्रगलर्सनी हे पुस्तक वाचलं तर आपण त्यामानाने बरेच सुखात आहोत असं त्यांना वाटेल. आणि परिस्थितीशी झगडण्याची त्यांची उमेद वाढेल.






----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...