इन्स्टॉलेशन्स(Installations)




पुस्तक - इन्स्टॉलेशन्स (Installations)
लेखक - गणेश मतकरी (Ganesh Matkari)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १६८
ISBN - दिलेला नाही 
प्रकाशन - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस. प्रथमावृत्ती ऑगस्ट २०१६
छापील किंमत - २२०

मुंबई सारख्या महानगरात सुस्थितीतील मध्यमवर्गीय व्यक्तींच्या आयुष्यात घडणाऱ्या ह्या कथा आहेत. ह्यात नायक/नायिकेच्या आसपास काहीतरी घटना घडतात आणि त्याचं प्रतिबिंब नायक/नायिकेच्या मनात कसं पडतं हे ह्या कथांचं मुख्य सूत्र आहे असं मला जाणवलं. दुसऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात अकाली मृत्यू, अपघात, नोकरी जाणं, भास होणं, आजारी पडणं इ. घडतं. एक कथेत मुंबई च्या ९२ च्या दंगलींचा संदर्भ देखील आला आहे.

प्रत्येक गोष्टीच्या विषयाबद्दल एका वाक्यात सांगतो

"इन्स्टॉलेशन्स" - ह्यात एका व्यक्तीला असं वाटत राहतं की बिल्डिंगच्या जिन्यामध्ये कुणीतरी रोज अडगळ किंवा भंगार वस्तू आणून ठेवतं आणि त्या वस्तूंच्या रचनेतून(इन्स्टॉलेशनमधून) काहीतरी सांगायचा प्रयत्न केलाय. तो असे निरनिराळे आपले अनुभव नायकाला सांगतो. आणि कथानायक ह्या सांगण्याला प्रतिसाद देतो.


"शूट" - चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने एका इस्पितळात आल्यावर बऱ्याच वर्षांपूर्वी त्याच इस्पितळात आल्याची आठवण जागी होते.

"गेम" - ह्यात एका शाळकरी मुलाची आई घर सोडून निघून जाते आणि त्याच वेळी शाळेत त्याच्याच वर्गातल्या विद्यार्थ्यांचं बरं वाईट होतं. ह्या सगळ्याला हा मुलगा कसा प्रतिसाद देतो.

"घाई" - रस्त्यावर गाडी चालवताना इतरांनी ओव्हरटेक करायचा केलेला प्रयत्न, रस्त्यावर दिसणारे अपघात आणि स्वतःच्या आयुष्यातली वादळं ह्यांचा संमिश्र परिणाम

"क्रांती" - हॉटेल मालकाचा शाळकरी मुलगा त्या हॉटेलात काम करणाऱ्या नोकराच्या आयुष्यात आलेलं मोठं संकट पाहतो. आणि त्याबद्दल काहीतरी करावं असं वाटतं.

"पास्ट" - पुन्हा एकदा एका स्मरणरंजन .. एका आठवणीतून दुसरी आठवण , दुसरीतून तिसरी ..

"फोटो" - एका फोटो स्टुडिओला त्याने काढलेल्या फोटोंपैकी एका दिवंगत व्यक्तीच्या जुन्या फोटोची मागणी होते. पण त्याच्याकडे तसा नेमका फोटो नसतो. पण हयात व्यक्तीचाच फोटो घेऊन तो वापरण्याचं ठरतं.


"रिमाइंडर" - पुन्हा एकदा एक अपघात, अकाली मृत्यू आणि त्या व्यक्तीशी संबंधितांच्या मनावर वेगवेगळे परिणाम

"वाट" - कथा नायकाच्या सहकाऱ्याला स्मृतिभ्रंश होतो. त्याला बघायला नायक जात असताना. आपल्याला सुद्धा असं काही झालं नाही ना असं वाटायला लागणारे प्रसंग त्याच्या आयुष्यात घडतात.

"ट्रॉमा" - ९२ सालच्या मुंबईतल्या दंगलीत दंगलखोरांकडून कोणाची हत्या होताना बघणं; नंतरचे १२ मार्चच्या साखळी बॉम्बस्फोटाचा अनुभव घेणं

ह्या कथांमधून लेखकाला निश्चित असं काही सांगायचं नाहीये तर वर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे पडसाद कथेतल्या लोकांच्या मनात कसे उमटले; कधी भीती वाटले; कधी जुनं आठवलं; कधी "मन चिंती ते वैरी ना चिंती" झालं इ. त्यामुळे गोष्टींमध्ये वर्तमानात आणि भूतकाळात खूप प्रसंग घडतात. मन त्यातून निश्चित असं काही हाती लागत नाही. नुसतीच प्रसंगबंबाळ वर्णनं. बऱ्याच वेळा त्या प्रसंगाच्या नेपथ्याचे विनाकारण तपशील आहेत. काढे कथा गूढ कथा होते आहे असं वाटतं पण पुढे तसं काही घडत नाहीत. कधी "माणसाचं मन" ह्यावर चिंतन करणारी गोष्ट आहे असं वाटतं पण तेही धड नाही. तर कधी गोष्टीतून काही एक तत्त्वज्ञान पुढे आणायचं असेल असं वाटतं पण तसंही काही होत नाही.

लिहलंय भरपूर; सुटे सुटे परिच्छेद, किंवा वाक्य छान वाटतील पण शेवटी गोष्ट वाचताना ; "अरे भाई, कहना क्या चाहते हो !!" असं म्हणावसं वाटतं.

पुस्तकाची भाषा आंग्लप्रचुर मराठी आहे. मुंबईच्या श्रीमंत मध्यमवर्गीयांची, उच्च मध्यमवर्गीयांची वाटावी म्हणून लेखकाने तसं केलं असेल असं वाटतं. पात्रांच्या तोंडची भाषा तशी असायला हरकत नव्हती पण त्रयस्थ निवेदकाचीही तीच शैली आहे. त्यामुळे जरा अतिरेकच झाला आहे. 

असो; एकूण मला काही हे पुस्तक आवडलं नाही. तुम्ही जर चुकून वाचलंत तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi)

पुस्तक - गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi) लेखक - सुरेश देशपांडे (Suresh Deshpande) भाषा - मर...