અંબાજી એક્સપ્રેસ (अंबाजी एक्प्रेस Ambaji Express)




पुस्तक - અંબાજી એક્સપ્રેસ अंबाजी एक्प्रेस (Ambaji Express)
भाषा - ગુજરાતી गुजराथी Gujarati
लेखिका - અર્ચના દેસાઈ अर्चना देसाई Archana Desai 
पाने - ?  (स्टोरीटेल वर ऐकायला दोन तास)
ISBN - दिलेला नाही

हे गुजराती पुस्तक मी "स्टोरीटेल"वर ऐकलं. एक छान कौटुंबिक आणि प्रेम कहाणी आहे. अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीय कुटुंबात आई आणि मुलगी अशा दोघीच आहे. आई टिपिकल गुजराती पण आता न्यूयॉर्कमध्ये भारतीय जेवणाचं छोटं रेस्टोरंट चालवते आहे. तिच्या श्रद्धाळू स्वभावाला अनुसरून ती देवीला नवस बोलते की, "माझी मुलगी - जागृती - डॉक्टर झाली तर जागृती चालत तुझ्या दर्शनाला येईल". ते ही मुलीला ना विचारता; ना सांगता. जागृती डॉक्टर होते आणि रिझल्ट लागल्या लागल्या ह्या नवसाचा बॉम्ब तिच्या डोक्यावर पडतो. मग आई-मुलीचा थोडा वाद होतो. पण आई, मावशी वगैरे घरची मंडळी तिला असं काही करू देत नाहीत.

तेवढ्यात तिचा अमेरिकन बॉयफ्रेंड पण तिच्याबरोबर चालत यात्रा करायला तयार होतो. त्याला हे सगळं - कुटुंबाचं प्रेम, ही आस्था वगैरे सगळं खूप क्युट वाटत असतं.

जागृतीची मैत्रीण तिला युक्ती सुचवते की तू आईला सांग कि तुझा अमेरिकन बॉयफ्रेंड तिला चालणार असेल तरच ती हे करेल. आई कशीबशी त्याला तयार होते आणि हे दोघे भारतात मावशीकडे येतात.

मग पुढे काय काय होतं .. जुने मित्र, कुटुंबातले दुरावलेले नातेवाईक भेटतात, चालत जाताना त्रास होतो. तिच्या आणि आसपासच्या सगळ्या पात्रांत त्यातून एक नवीन विचारसंगती तयार होते. लग्न, प्रेम, नातेसंबंध, श्रद्धा ह्या सगळ्याबद्दल आपापली मतं नव्याने चाचपून बघतात. जुना मित्र भेटतो. तो बॉयफ्रेंड असेल का ? प्रेमाचा त्रिकोण तयार होईल का नाही ? हे मी सांगत नाही.

एकूण सुखांत शेवट आहे. पण पुढे काय घडू शकेल ह्याबद्दल वेगवेगळे पर्याय खुले ठेवत कथा संपते. गोष्टीत बरेच कच्चे दुवेही आहेत. काही पात्रं पूर्वी तशी का वागली हे काळत नाही. आणि अचानक वागण्यात बदल कसा झाला ते कळत नाही.

पण एक हलकीफुलकी मनोरंजक कथा. ऐकायला चांगली आहे. स्टोरीटेल वरच्या सगळ्या अभिवाचकांचं सादरीकरण, पार्श्वसंगीत अतिशय योग्य आणि आकर्षक. त्यामुळे ऐकायला मजा येते 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

निकोला टेस्ला (Nikola Tesla)

पुस्तक - निकोला टेस्ला (Nikola Tesla) लेखक - सुधीर फाकटकर (Sudhir Phakatkar) भाषा - मराठी (Marathi) पाने - १८६ प्रकाशन - राजहंस प्रकाशन. मे ...