पुस्तक - वन डे मॅरेज (one day marriage)
लेखक - दयानंद निवृत्ती लोणे (Dayanad Nivrutti Lone)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १०४
ISBN - 978-93-89834-81-9
दयानंद लोणे ह्यांची ही पहिलीच कादंबरी. त्यांनी स्वतः भेटून मला ही अभिप्रायार्थ दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
ही ग्रामीण प्रेमकथा आहे. एक तरुण तरुणी कॉलेजमध्ये एकमेकांच्या संपर्कात येतात आणि प्रेमात पडतात. पुन्हा पुन्हा भेटत त्यांचं प्रेम फुलत राहतं. पण मुलाला नोकरी नाही म्हणून मुलीच्या घरचे लग्नाला नकार देतात. आपलं प्रेम सफल व्हावं म्हणून मुलगा जीव तोडून नोकरी मिळवायचा प्रयत्न करतो.
त्याला नोकरी मिळेल का? तो पर्यंत ती मुलगी, तिच्या घरचे थांबतील का? मुलाच्या घरच्यांना हा अपमान वाटला तर? ते पळून गेले तर? पळण्यात यशस्वी होतील का? एकमेकांना विसरायचा प्रयत्न केला तर?... हे समजण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल; ते सांगून तुमचा रसभंग करत नाही.
पुस्तकातले एकदोन प्रसंग उदाहरणादाखल.
दोन्ही घराच्या लोकांचा वादाचा प्रसंग -
पळून जाऊन लग्न करण्याचा प्रसंग
प्रेम, प्रेमाला विरोध आणि त्याचा बरा वाईट शेवट हा असंख्य चित्रपटांचा, पुस्तकांचा घासून गुळगुळीत झालेला विषय. त्यादृष्टीने कथानकात काही नावीन्य नाही. त्यामुळे तेच कथानक आकर्षक पद्धतीने मंडता आलं तरच अश्या कादंबरी वाचनीय ठरतात. त्या बाबतीत ही कादंबरी कमी पडते.
ह्यातले प्रसंग "माहितीपर" वाटतात. ते व्यवस्थित पूर्ण खुलले नाहीत, खिळवून ठेवत नाहीत. अनेक प्रसंग असे आहेत की त्यात मुला मुलीची जाहीर सलगी इतकी दिसते की नक्की ह्यांच्या लग्नाला विरोध आहे की नाही असा प्रश्न पडतो.
निवेदन प्रथमपुरुषी असल्यामुळे इतर व्यक्तींच्या मनाचा वेध घेता येत नाही. त्यामुळे ती पात्रं ठसत नाहीत.
प्रमाणलेखनात खूप चुका आहेत. मध्येच "मी म्हणालो" च्या ऐवजी "दया म्हणाला" असे उल्लेख येतात. ते खटकतात. थोडक्यात पुस्तकाचं मुद्रितशोधन नीट झालं नाहीये.
पुस्तकाच्या सुरुवातीला नायकाला बरेच वर्षांनी नायिका संपर्क साधते असा प्रसंग आहे. फ्लॅशबॅक मध्ये प्रसंग घडतात. पण पुस्तकाच्या शेवटी ह्या पहिल्या प्रसंगाची तड लागत नाही. शीर्षकाला "वन डे मॅरेज" का म्हटलं असेल कळत नाही.
प्रस्तावनेत लेखक म्हणतो "नायकाचं आणि सागरचं प्रेम".. सागर हे मुलाचं नाव असल्यामुळे मला वाटलं समलैंगिकतेवर आधारित कादंबरी आहे की काय. पण पुढे वाचताना कळलं की ह्यात "सागर" हे मुलीचं नाव आहे आणि "दया" हे मुलाचं; अशी गंमत.
असो, दयानंद ह्यांनी एक कादंबरी लिहून आपला लेखन प्रवास जोमाने सुरू केला आहे. त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !!
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
No comments:
Post a Comment