१९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav)





पुस्तक - १९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav)
लेखक - रांगा दाते (Ranga Date)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १०४
प्रकाशक - भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni)
ISBN - दिलेला नाही

काही दिवसांपूर्वी "काश्मीर फाईल्स" हा सिनेमा आला होता. ९०च्या दशकात कशमीर मधल्या पंडितांचा वंशविच्छेद कसा करण्यात आला होता हे त्यात दाखवलं होतं. पंडितांवर झालेले अत्याचार आणि क्रूर प्रसंगांची आठवण समस्त भारतीय समाजाला ह्या चित्रपटाने करून दिली. अन्यथा फार थोड्याप्रमाणावर लोकांना ह्याबद्दल माहिती होतं. माहिती असलेल्यांनाही त्याची तीव्रता पूर्णपणे माहिती असेलच असं नाही. कारण इतके वर्षात सरकार, समाज आणि माध्यमांनी एकूणच ह्या प्रकार "विसरून जाण्यातच" धन्यता मानली होती. असाच एक वंशविच्छेद जो सरकार, समाज आणि माध्यमांनी "विसरून जाण्यातच" यश मिळवलं आहे तो म्हणजे १९४८ च्या ब्राह्मण विरोधी दंगली. "१९४८ चं अग्नितांडव" हे पुस्तक ह्या विषयाला हात घालते.

३० जाने १९४८ रोजी नथुराम गोडसे ह्याने गांधीजींची हत्या केली. त्यातून देश हादरला, सुन्न झाला. पण काही जण पिसाळले. नथुराम गोडसे हा चित्पावन ब्राह्मण जातीचा म्हणून गोडसेच्या कृत्याची शिक्षा सगळ्या ब्राह्मण जातीला द्यायला ते पुढे आले. अहिंसक गांधींचा कार्यकर्ता म्हणवणारा, हिंदू-मुस्लिम दंगली गांधींनी थांबवल्या असा प्रचार करणारा हा कार्यकर्ता हिंसक झाला, दंगली घडवायला तयार झाला. पण ह्या दंगली नव्हत्या कारण ह्यात दोन्हीकडून प्रहार प्रतिप्रहार नव्हते. होता तो एकतर्फी ब्राह्मणवंशविच्छेदाचा प्रयत्न.

थोड्याच दिवसांत महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत, गावांत हे लोण पसरले. गावातल्या ब्राह्मण कुटुंबाना घराबाहेर काढून घरं, दुकानं, व्यवसाय लुटले गेले. जाळले गेले. जळत्या आगीत स्त्रीपुरुषांना ढकलून जिवंत जाळण्यात आलं. अमानुष मारहाण करून ठार मारण्यात आलं. मुलींची, स्त्रियांची अब्रू लुटण्यात आली.

गांधी हत्येशी दुरान्वयेही संबंध नसणारे ब्राह्मण इतकेच काय गांधीवादी, खादीधारी, काँग्रेस कार्यकर्ते असणारे ब्राह्मण सुद्धा ह्यातून सुटले नाहीत. तर मग गावाशी एकोप्याने राहणाऱ्या गरीब ब्राह्मण कुटुंबांची काय कहाणी. ते देशोधडीला लागले. नेसत्या कपड्यांनिशी परगावी, शहरी आपल्या नातेवाईकांच्या आधारे राहू लागले.

आज हे वाचताना खरे वाटणार नाही इतक्या सफाईदारपणे ही घटना भारताच्या इतिहासातून गाळली गेली आहे. मी माझ्या आजीकडून ह्याबद्दल ऐकलं होतं. ह.मो. मराठे ह्यांचं पुस्तक, उपेंद्र साठे ह्यांचे "चौऱ्याऐंशी पावलं" ह्या पुस्तकांत त्यांनी अनुभवलेले, प्रत्यक्षदर्शीनी सांगितलेले प्रसंग वाचले होते. त्यामुळे त्याची धग थोडी जाणवली होती.

ह्या पुस्तकाच्या लेखकाने ब्राह्मणविरोधी दंगलींचे अनुभव, माहिती लोकांकडून मागवली होती. ह्या माहितीचे, प्रसंगांचे संकलन असे हे पुस्तक आहे. 
पुस्तकात लेखकाबद्दल दिलेली माहिती.

मुळातच हा ज्वलंत विषय. त्यात सध्याच्या काळ टोकदार जातीय अस्मितांचा. त्यामुळे विषय मांडायचा पण नवीन वाद निर्माण न करता, अशी लेखकाची भूमिका असावी असे मला वाटले. ब्राह्मण कुटुंबाशी जवळीक असणाऱ्या ब्राह्मणेतर शेजाऱ्यापाजाऱ्यांनी त्यांना सावध करायचा प्रयत्न केला, पळून जायला मदत केली काहीवेळा ह्यातून सावरायला हात दिला. हे सुद्धा स्पष्टपणे दिसते आहे. काही प्रसंग बघूया

फलटण मधला पूर्ण नियोजित कट




गांधीवादी समाजसेवक कार्यकर्ता असला म्हणून काय झालं ... ब्राह्मण होता ना? मग जाळपोळीतून तो ही सुटला नाही.



फक्त लूटमार, हत्या नाहीत तर महिलांवर बलात्कारसुद्धा




असे कितीतरी भयंकर प्रसंग पुस्तकात आहेत. मुंबई पुण्यातले सुद्धा असे प्रसंग घडले. अनुक्रमणिकेवरून गावांची नवे कळतील.



असे प्रसंग अजून कोणाला माहिती असतील तर त्यांची माहिती लेखकाला कळवावी असे आवाहन पुस्तकात केले आहे. त्यासाठी त्यांचा ईमेल आयडी आणि फोन नंबर दिलेला आहे. तो पुढीलप्रमाणे 
९८५०८०२१२१
rangadate@hotmail.com 

हे पुस्तक थोडे ललित शैलीत लिहिले गेले आहे. पण ह्या घटनांचे, बातम्यांचे, पोलीस रिपोर्ट, सरकारी अहवाल ह्यांचं दस्तऐवजीकरण झालं पाहिजे. "पुरोगामी" म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आणि त्यातही विशेषकरून पश्चिम महाराष्ट्रात हे का घडले ह्याचे विश्लेषण संकलित झाले पाहिजे. ह्या घटनांचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रात झाले आहेत. खेडेगावांतून ब्राह्मण संख्या घटली, महाराष्ट्राच्या राजकारणातून व समाजकारणातून मराठी ब्राह्मण दूर फेकला गेला. दुसरीकडे शेती आणि पारंपरिक व्यवसायांपासून दूर ढकलला गेला. तरीही त्याला तोंड देत, चिकाटीने काम करत ब्राह्मण उद्योजक तयार झाले. ह्या पैलूचेही संकलन झाले पाहिजे. असे संकलन झालेले असेल तर जाणकार वाचकांनी त्याबद्दल सांगावे. 

हे पुस्तक महत्त्वाच्या विषयाला परिणामकारकपणे वाचा फोडते. आजही राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद महाराष्ट्रात पेटवण्याचा प्रयत्न होतो आहे. त्याचे धोके ओळखण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. समाज कुठलाही असो गरिबी, निरक्षरता, सामाजिक असहाय्यता ह्या समस्या सगळीकडे सारख्या आहेत. दुसऱ्या समाजाला "बळीचा बकरा" बनवून दोषारोप करून समस्या सुटणार नाहीत; त्यासाठी एकत्र येऊनच प्रयत्न करावे लागतील. पुढाऱ्यांच्या क्षुद्र राजकारणासाठी सामाजिक घडी पुन्हा पुन्हा विस्कटू न देणे ह्यासाठी सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागतील. 

हे पुस्तक ऑनलाईन विक्रीत उपलब्ध आहे. मी बुकगंगा वरून घेतले


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

निकोला टेस्ला (Nikola Tesla)

पुस्तक - निकोला टेस्ला (Nikola Tesla) लेखक - सुधीर फाकटकर (Sudhir Phakatkar) भाषा - मराठी (Marathi) पाने - १८६ प्रकाशन - राजहंस प्रकाशन. मे ...