

पुस्तक - शिवनेत्र बहिर्जी (Shivanetra Bahirji)
लेखक - प्रेम धांडे (Prem Dhande)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २९८
प्रकाशन - रुद्र एंटरप्राईज (Rudra Enterprise)
ISBN - 978-93-92121-01-2
छापील किंमत - ३९९ /-
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना, त्यावरचे चित्रपट बघताना "बहिर्जी नाईक" हे नाव आपण नेहमी ऐकतो. महाराजांचे गुप्तहेर, हेर खात्याचे प्रमुख - बहिर्जी नाईक. वेष पालटून शुत्रूच्या गोटात शिरून खबरी काढणे; शत्रू काय योजना आखतोय ते शोधणे किंवा आपला व्यूह योग्य ठरण्यासाठी आजूबाजूच्या परिसराची खडानखडा माहिती काढणे अशी जोखमीची कामं करताना आपण त्यांना पाहिलं आहे. बहिर्जी नाईक काम करणार गुप्तपणे, निरोप कळवणार गुपतपणे; त्यामुळे त्यांच्या कामाबद्दलचे तपशील लिखित असण्याची शक्यता कमीच. ते ह्या मोहिमा कशा आखात असतील, आपले हेर कसे पेरत असतील, निरोप कसा पोचवत असतील हे सगळं आपल्याला कल्पनाशक्तीद्वारेच समजून घ्यायला लागेल. त्याला मोठी प्रतिभा पाहिजे. अशी एक प्रतिभावन व्यक्ती आहे - प्रेम धांडे. प्रेम धांडे ह्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर "शिवनेत्र बहिर्जी" ही कादंबरी लिहिली आहे. पुस्तकाच्या सुरवातीला त्यांनी स्पष्ट केलं आहे की; "ही कथा इतिहासातील मूळ कथा आणि लोककथांच्या गाभ्यावर आधारित असली तरी त्यातील प्रसंग हा लेखकाचा कल्पनाविस्तार आहे". लेखकाने ही कल्पनागम्य इमारत खूप छान उभी केली आहे. ही कादंबरी तीन खंडांत असणार आहे. हे पुस्तक पहिला भाग आहे. लेखक प्रेम धांडे ह्यांनी स्वतः मला पुस्तक वाचण्यासाठी आणि अभिप्रायासाठी पाठवलं ह्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.
पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती

कादंबरीच्या सुरुवातीला तरुण "दौलतराव"ची भेट तरुण शिवबाशी होते. जिजाऊ आणि शिवबा त्याच्या युद्धकौशल्याची पारख करतात आणि तो शिवबाचा सावंडगडी बनतो इथून कादंबरीची सुरुवात होते. कान्होजी जेधे "दौलतराव"ला गुप्तहेराच्या कामात तयार करतात. मग शिवाजी महाराज गुप्तहेर पथकाची स्थापना करतात - बहिर्जी पथक - आणि दौलतराव त्याचा प्रमुख म्हणून - "बहिर्जी नाईक". हे बहिर्जी मावळातल्या योग्य व्यक्तींना हेरतात; काही वेळा प्रसंगोपात शूर व्यक्तींशी (त्यात स्त्रियासुद्धा आहेत) गाठ पडते. त्यांना ते आपल्या पथकात समाविष्ट करतात. शौर्य, धैर्य, स्वराज्यवरील प्रेम, चतुराई, धिटाई, स्वार्थत्याग, भावनांनवर नियंत्रण असे गुणसमुच्चय ह्या हेरांमध्ये विकसित केले जातात. ह्या प्रसंगांचं मनोज्ञ वर्णन पुस्तकात आहे. हे हेर एखाद्या ठिकाणी कसे शिरत असतील; एखाद्या गावात कारागीर म्हणून, शिपाई म्हणून काम करत आपल्या मालकाचा विश्वास संपादन करून गोपनीय माहिती कशी गोळा करत असतील; सांकेतिक पद्धतीने निरोपांची देवाणघेवाण कशी करत असतील ह्याचे रोमांचक प्रसंग पुस्तकात आहेत.


काही उदाहरणे
बहिर्जी पथक गुप्तस्थळे कशी तयार करतात; नवीन हेर कसे मिळवले जातात ह्या बद्दलचा एक प्रसंग



गुप्तहेर वेषांतर करून गावात वावरतात आणि इतर खबऱ्यांकडून माहिती मिळवतात तो प्रसंग



मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी महाराज श्रीगोंदा आणि जुन्नर इथल्या पेठांच्या लुटीची मोहीम आखातात तो प्रसंग



हे वाचताना आपण त्यात गुंगून जातो. पुढे काय घडेल ह्याची उत्सुकता लागून राहते. रहस्यपट किंवा गुप्तहेरांवरच्या चित्रपटांसारखीच कहाणी आहे. त्याला ऐतिकासिक संदर्भ आहे इतकंच. हेर असो की शिवाजी महाराज; सगळे शेवटी भावना असणाऱ्या व्यक्तीच. पण स्वराज्याच्या कामासाठी मनावर दगड ठेवून, आपल्या भावनावेगाला मुरड घालत त्यांना काम करावं लागलं. ते करताना त्यांच्या मनाचा कसा कोंडमारा होत असेल ह्याबद्दलचे प्रत्यकरी प्रसंग आणि संवाद पुस्तकात आहेत.
पुस्तकाची भाषा आणि पात्रांच्या संवादाची भाषा प्रमाण मराठीच ठेवली आहे. मावळ्यांच्या तोंडी मावळी बोली, मुसलमानांची दख्खनी किंवा उर्दू; महाराजांच्या तोंडी ऐतिहासिक मराठी असा प्रकार केला नाहीये. जेणेकरून नवीन वाचकही गोंधळणार नाही. पण त्यातून निवेदनाला काही उणेपणा येत नाही.
क्वचित काही वेळा बहिर्जी किंवा त्यांचे साथी - आत्ता इथे आणि थोड्याच वेळात तिथे गेले असं दिसतं. दोन ठिकाणांमधलं अंतर लक्षात घेता चालत किंवा घोड्यावरून जायला फार वेळ लागेल. त्यातून गुप्तपणे जायचं तर आणि वेळ आणखी वाढणार. त्यामुळे ते वर्णन थोडं अतिशयोक्त वाटतं. किंवा एखादा हेर साधा सैनिक म्हणून पेरला की तो थोड्याच काळात तो आपल्या गुणांनी प्रगती करत सरदाराच्या अगदी जवळचा होतो. हे शक्य असलं तरी पदोन्नती फारच भराभर झाली ; असं वाटतं. मात्र काल्पनिक कथेतलं लेखकाचं स्वातंत्र्य म्हणून ते मान्य करून पुढे वाचत राहतो कारण पुढे वाचण्यातली गंमत आपल्याला येत असते. ही गंमत घेण्यासाठी, शिवकाळातल्या गुप्तमोहिमांचा भाग होण्यासाठी हे पुस्तक वाचा.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
No comments:
Post a Comment