प्रोपगंडा (Proaganda)



पुस्तक - प्रोपगंडा (Proaganda)
लेखक - रवि आमले (Ravi Amale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ३७६
प्रकाशन - मनोविकास प्रकाशन. प्रथमावृत्ती जाने २०२०
ISBN -978-81-943491-7-4


तुम्ही-आम्ही सगळे टीव्हीवरच्या वृत्तवाहिन्या, रोजची वर्तमानपत्रे, मासिके, रेडियो, फेसबुक-ट्विटर-व्हॉट्सअप सारखी समाजमाध्यमे अश्या वेगवेगळ्या रीतीने बातम्या आणि नवनवीन माहिती मिळवत असतो. आपल्या रोजच्या जगण्यात कसं वागावं, काय खावं, काय वाचावं इथपासून कोणाला मतदान करावं, जगात चाललेलं युद्ध चांगलं का वाईट इथपर्यंत - सगळ्याबद्दल आपल्या भूमिका ठरवत असतो. मुद्दामून चुकीच्या बातम्या आपण वाचायला जात नाही. सतत होणाऱ्या माहितीच्या भडिमारात बनावट बातम्या - फेक न्यूज - असतात हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. पण त्याही पुढे जाऊन; अगदी खऱ्या बातम्यांतून; खऱ्या मजकुरातून(कंटेन्टमधून)सुद्धा आपल्याला फसवलं जातं. घडलेल्या घटनेचा थोडाच भाग दाखवायचा, एखादा भाग प्रमाणापेक्षा जास्त मोठा करून दाखवायचा, चुकीच्या पद्धतीने किंवा मीठ-मसाला लावून दाखवायचा जेणेकरून आपलं लक्ष त्यांना हवं त्या बाबीवरच केंद्रित होईल; त्यांना हव्या त्याच पद्धतीने आपण विचार करायला लागून असं सादरीकरण केलं जातं. एखादी व्यक्ती, कंपनी, राजकीय पक्ष, देश, विचारपद्धती आणि धर्म ह्यांच्याकडे लोकांना असं खेचणं आणि विरुद्ध बाजूपासून दूर लोटणं म्हणजेच इंग्रजीत "प्रोपगंडा". यशस्वी "प्रोपगंडा"चं वैशिष्टय हे आहे की तो "प्रोपगंडा" वाटत नाही; म्हणूनच आपण त्याच्या आहारी जातो - आपल्या नकळत. आपल्या मर्जीने निर्णय घेतोय असं वाटलं तरी "प्रोपगंडा"ने आपलं काम केलेलं असतं. कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे तो आपल्याला नाचवत असतो.

अश्या "प्रोपगंडा"ची विविध रूपे आपल्यासमोर उलगडून दाखवणारं हे पुस्तक आहे. प्रोपगंडा काही आजचा विषय नाही. इतिहासापासून हे चालू आहे. ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी केलेल्या योजनेला प्रोपगंडा म्हटलं गेलं. पण आता फक्त धर्मप्रचार नाही तर कुठल्याही गोष्टीच्या प्रचारासाठी हे तंत्र वापरलं जातं. प्रोपगंडा शब्दाचा अर्थ आता नकारात्मक झाला आहे. वाढत्या तंत्रज्ञानातून त्याचा छुपेपणा अनेकपटीने वाढलाय आणि परिणामकारकतासुद्धा ! म्हणूनच "प्रोपगंडा" कडे डोळे उघडे ठेवून बघणं आवश्यक आहे. ते समजून घेणं आवश्यक आहे. म्हणूनच हे पुस्तक प्रत्येकाने वाचणं आवश्यक आहे.

प्रोपगंडाचा इतिहास, पहिल्या-दुसऱ्या महायुद्धात त्याच्या पैलूंचा विकास, त्यात योगदान देणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती, भयानक परिणाम हे पुस्तकाच्या पहिल्या ८०% भागात आहे. ह्यात बहुतेककरून युरोप आणि अमेरिकेचे संदर्भ आहेत. पण पुरेश्या माहितीसह ते सादर केले असल्यामुळे घटना अपरिचित राहत नाहीत. शेवटच्या २०% भागात भारतातील उदाहरणे आहेत. विशेषतः मोदी लाटेच्या निर्मितीपासून घटना त्यात आहेत.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती 

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया


महायुद्धात युरोपियन देशांना भाग घ्यायचा होता. त्यासाठी जनतेचा पाठिंबा आवश्यक होता. लोकांनी स्वतःहून सैन्य भरतीत भाग घ्यावा, युद्धात होणारा त्रास सहन करायची तयारी ठेवावी ह्यासाठी समाजमन तयार करण्यासाठी वापरला गेलेला प्रोपगंडा. त्याबद्दल पुस्तकात बरंच सविस्तर लिहिलं आहे. त्यातली काही पाने.



एखादे वृत्तपत्र स्वतःचा खप वाढवण्यासाठी सनसनाटी बातम्या देते. त्याला उत्तर म्हणून दुसरे वृत्तपत्र त्याहून भडक, सवंग बातम्या देते. त्यातून लोकभावना चेतून एखादं युद्ध सुद्धा घडवलं जाऊ शकत. माध्यमांच्या ह्या स्वार्थी प्रोपगंडाचे, "पीत पत्रकारितेचं" हे एक उदाहरण.


चित्रपटाकडे प्रामुख्याने मनोरंजनाचे साधन म्हणून बघितले जाते. मनोरंजन साधता साधता प्रबोधन करण्याची विलक्षण क्षमता चित्रपटांत आहे. थेट प्रचारकी चित्रपट त्यामुळे काढले जातातच. पण वरवर पूर्णपणे काल्पनिक, मनोरंजात्मक चित्रपटांतूनही छुपा संदेश दिला जातो. अचानक एकाच प्रकारचा छुपा संदेश देणारे चित्रपट बाहेर पडू लागतात. हा खरा "प्रोपगंडा". समोरच्याला नकळत आपल्या जाळ्यात ओढणारा. ह्या पैलूबद्दल पुस्तकात एक प्रकरण आहे. त्यातली ही उदाहरणे.


प्रोपगंडाचा वापर फक्त धर्मप्रसार, समाजकारण किंवा राजकारणासाठीच होतो असं नाही. प्रोपगंडा वापरून एखाद्या कंपनीचं नवीन उत्पादन खपवण्यासाठी त्याची "खोटी गरज" निर्माण केली जाते. एखादा आजार किती भयानक आहे ह्याबद्दल लोकांच्या मनात भीती तयार केली जाते. लोक आपसूक उपायाकडे वळतात. नवं उत्पादन विकत घ्यायला लागतात. त्याची ही काही उदाहरणे.


लोकशाहीत लोक आपले प्रतिनिधी आणि सरकार निवडत असले तरी. त्यांनी कोणाची निवड करावी ह्यावर प्रोपागंडाचा मोठा प्रभाव असतो. म्हणून जनमत बदलणारे लोक हे खरं "अदृश्य सरकार" असतं. हे पुस्तकात अनेक ठिकाणी अधोरेखित केलं आहे.

विरोधकांचे बद-नामकरण (नेम कॉलिंग), राक्षसीकरण (डेमनायझेशन) ही प्रोपगंडाचीच तंत्रे. प्रत्येक माणसात काही तरी चांगुलपणा असतोच. विरोधकांनीही काही तरी चांगले काम केलेले असतेच. पण त्याचा साधा उल्लेखही येथे करायचा नसतो. त्यांचे सतत राक्षसीकरण करायचे असते. त्यांची खिल्ली उडवायची असते. बदनाम करायचे असते. त्यांच्याबाबत विशिष्ट पर्सेप्शन - मानसचित्र - तयार करायचे असते. विरोधकांना नेस्तनाबूत करणे, हतवीर्य करणे हाच यामागील हेतू असतो. ही तंत्रे पुस्तकात उलगडून दाखवली आहेत.

असं माहितीने आणि उदाहरणांनी भरलेलं हे पुस्तक आहे. रवि आमले ह्यांनी हा महत्त्वाचा, थोडा किचकट विषय अतिशय रंजक पद्धतीने हाताळला आहे. पूर्वी लोकांना ह्या "प्रोपगंडा"ने कसं गंडवलं ह्याच्या गमती जमती वाचता वाचता मनातल्या मनात आजच्या परिस्थितीशी तुलना करतो. आपल्याला सुद्धा कसं गंडवलं गेलं होतं/असतं हे पण आपल्याला जाणवतं.

काही पुस्तकं अशी असतात की ती आपल्याला नवी दृष्टी देतात, आपल्यात कायमस्वरूपी बदल घडवतात. हे पुस्तक मला तसंच वाटलं. हे पुस्तक वाचून झाल्यावर तुमच्यासमोर येणारी बातमी, माहिती, चित्रपट, जाहिरात ह्याकडे तुम्ही वेगळ्या दृष्टीने नक्की बघाल. त्यात वृत्तपत्राचा, बातमीदाराचा, कंपनीचा, चित्रपट दिग्दर्शकाचा, लेखकाचा, प्रकाशकाचा छुपा हेतू काय असेल; कुठल्या "मोठ्या योजनेतलं" हे एक "छोटं अदृश्य पाऊल" असेल हा विचार तुम्ही नक्की कराल.
गंमत म्हणजे - पुस्तकात युद्धखोर सरकारे व हिटलर ह्यांच्या प्रचारतंत्राची माहिती व उदाहरणाने देताना त्यांचं आणि नरेंद्र मोदींच्या प्रचारशैलीचं साधर्म्य नकळत अधोरेखित केलं गेलं आहे असं वाटतं. म्हणजे हे पुस्तक वरवर बघता जनरल प्रोपगंडावरचं असलं तरी ह्यातून "मोदी कसं लोकांना प्रचाराच्या जाळ्यात ओढतायत बघा, पूर्वी पण लोकांना असंच मूर्ख बनवलं गेलं होतं हे लक्षात घ्या" हा छुपा संदेश तर नाही ना. नेमकं आत्ताच बरं प्रोपगंडाबद्दल लिहावंसं वाटलं! मोदीविरोधी बुद्धिवंतांच्या व्यापक योजनेचा भाग तर नाही ना असा संशय येतो. 😆😆😆
पण असा संशय आला तरी लेखकाचा "उघडा डोळे, बघा नीट" हा संदेश सफल झाला हे म्हणायला हरकत नाही. लेखकाला त्यात आनंदच वाटेल; अशी माझी भावना आहे.

पुस्तकात इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठी प्रतिशब्द सुद्धा वापरले आहेत. पण "प्रोपगंडा"ला पर्यायी शब्द वापरला नाहीये. मला "प्रचारजाल" (लोकांना जाळ्यात अडकवणे), "प्रचारयुद्ध"(प्रतिस्पर्ध्याशी सामना), "प्रचारगंडा"(गंडा घालून फसवणूक), "प्रचारव्यूह' असे शब्द सुचले. पण असा "प्रचारव्यूह" जास्त आवडला. ज्यात प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करता करणे; लोकांना जाळ्यात ओढणे, फसवणे असे सगळे अर्थ त्यातून प्रतीत होतात.

ह्या पुस्तकातला बराचसा भाग हा युरोप-अमेरिकेतल्या उदाहरणांनी भरलेला आहे. म्हणून लेखकाने ह्या पुस्तकाचा पुढचा भाग लेखकाने लिहावा जो पूर्णपणे भारतावर आधारित असेल. भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींचं ह्या चष्म्यातून विश्लेषण उद्बोधक ठरेल.

म्हणून हे पुस्तक आवर्जून वाचा, त्यावर विचार करा आणि इतरांना वाचायला सांगा.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

निकोला टेस्ला (Nikola Tesla)

पुस्तक - निकोला टेस्ला (Nikola Tesla) लेखक - सुधीर फाकटकर (Sudhir Phakatkar) भाषा - मराठी (Marathi) पाने - १८६ प्रकाशन - राजहंस प्रकाशन. मे ...