समर्थांची लेक (Samarthanchi lek)



पुस्तक - समर्थांची लेक (Samarthanchi lek)
लेखिका - सारिका कंदलगांवकर (Sarika Kandalgaonkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १९९
प्रकाशन - संवेदना प्रकाशन, एप्रिल २०२४
ISBN - 978-81-1973783-3
छापील किंमत - रु. ३००/-

हे पुस्तक मला वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम लेखिका सारिका कंदलगांवकर ह्यांचे मी आभार मानतो !

गीतरामायणाल्या "दैवजात दुःखे भरता" गाण्यात ओळ आहे "मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा". मृत्यू म्हणजे काय? मृत्यूनंतर काय होते? हे कोणी स्वानुभवाच्या आधारे जाणून घेऊ शकत, म्हणून "तर्क" थांबतो...पण माणूस त्याबद्दल विचार करणं, कल्पना करणं थांबवत नाही. म्हणूनच या गीताच्या ओळीचा व्यत्यास असा की "मरणकल्पनेशी रंगे खेळ कल्पनांचा ". वेगवेगळ्या धर्मात, पंथात मृत्यूनंतरचं जीवन ह्याबद्दल वेगवेगळ्या कल्पना आहेत; आपापली एक विचारपद्धती आहे. त्यातलीच एक आहे की मृत्यूनंतर आत्मा राहतो. जर माणसाच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर तो आत्मा भटकत राहतो. इच्छा पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करतो. जर अन्याय-अत्याचार-फसवणूक ह्यामुळे मरण आलं असेल तर तो आत्मा सूड घ्यायचा प्रयत्न करतो. तंत्र-मंत्र विद्येतून अशा आत्म्यांना वश करून घेता येतं. आत्म्याच्या अचाट शक्तीचा वापर करून घेऊन गुप्तधन मिळवणे, इतरांवर हुकूमत गाजवणे असे सुद्धा जमू शकते. तर इतर पूजापाठ, मंत्र-तंत्र वापरून ह्या भटकणाऱ्या आत्म्यांना मुक्ती मिळू शकते. त्यामुळे आत्मा, भूत, अतृप्त आत्मा, मांत्रिक, जादूटोणा, वशीकरण हे सगळे आपल्या परिचयाचे शब्द. भयपट, भयकथा ह्यांमधले परवलीचे शब्द. ह्याच शब्दांशी, त्यातून तयार होणाऱ्या अद्भुत कथानकाची गुंफण म्हणजे "समर्थांची लेक" ही कादंबरी.

ह्या कादंबरीची नायिका आहे एक युवती - अक्षता. तिच्या घराण्यात दत्तप्रभू, नाथसंप्रदाय ह्याची उपासना चालत आली आहे. त्यातून ह्या घराण्यातल्या व्यक्तींना सिद्धी प्राप्त झाली आहे की ते अतृप्त आत्म्यांना बघू शकतात. मंत्र, भस्म, गंगाजल वगैरे विधींचा वापर करून ते ह्या आत्म्यांना कायमची मुक्ती देऊ शकतात. तरुण अक्षता सुद्धा तिच्या सिद्धींचा वापर चांगल्यासाठी करते आहे. एखाद्या ठिकाणी अनाकलनीय घटना घडत असतील, माणसं अचानक मरत असतील किंवा एखादी जागा भुताने झपाटलेली असं कळलं की कोणाच्या नकळत तिकडे जाते. मग ते भटकणारे - सूडाने पेटलेले आत्मे तिच्यावर हल्ला करायचा कसा प्रयत्न करतात आणि ती त्यातून सहीसलामत कशी सुटते आणि आत्म्यांनाही मुक्ती देते ह्याचे अद्भुतरम्य प्रसंग पुस्तकात आहेत.


हे प्रसंग घडताना "पूर्वदृश्य" तंत्राचा वापर करून एक समांतर कथानक आपल्यासमोर उभं राहतं की ; तिचे आजोबा, वडील सुद्धा अशा प्रसंगांना कसे सामोरे जात होते. त्यांचे गुरु त्यांना दृष्टांत देत, तर कधी मंत्राची शक्ती. कधी दोन जादूगारांच्या लढाईप्रमाणे आत्म्याबरोबर लढाई, दोन मांत्रिकांची लढाई वगैरे. आपल्या शक्तीचा चांगल्यासाठी वापर करणारे अक्षताचे घराणे. तर त्यांना स्पर्धक म्हणजे ह्या शक्तीचा कपाटासाठी, ऐहिक स्वार्थासाठी वापर करणारी दुसरी टोळी. सुष्ट-दुष्टांच्या ह्या लढाईत हत्यारं आहेत - आत्मे, मंत्रतंत्र, अद्भुत शक्ती. ह्या लढाईत काय प्रसंग घडतील, कोण कोणाला कसा शह देईल, शक्तींची लढाई कशी होईल ह्या सगळ्या वर्णनातून साकार झाली आहे "समर्थांची लेक".


काही प्रसंग वाचा म्हणजे लेखिकेच्या शैलीची कल्पना येईल.

एका बाईचं बाळ तिच्यापासून हिरावून घेतलं होतं. त्या बाईचं भूत आता इतर लोकांना त्रास देत होतं. त्याबद्दलचा एक प्रसंग.




भुताखेतांवर ताबा मिळवण्याची अद्भुत शक्ती गुरु आपल्या शिष्यांना देत. अमर नावाच्या एका पात्राच्या शिक्षणावेळचा एक अद्भुत प्रसंग.





ज्यांना भयपट किंवा अशा पद्धतीच्या कादंबऱ्या आवडतात त्यांना ही कादंबरी आवडेल. मला ही अद्भुतता विशेष रंजक वाटत नाही. सुरुवातीला म्हटलं तसं "तर्क थांबवूनच" मृत्युपश्चातच्या जीवनाची कल्पना करावी लागते. त्यामुळे असे लेखन म्हणजे लेखिकेने स्वतः उभारलेले विश्व. ती म्हणेल ते नियम. त्यामुळे काही वेळा अचाट शक्ती असणारी पात्र आजूबाजूचं जग स्तब्ध करतात, अंतर्ज्ञानाने सगळं जाणतात, मेलेल्याला जिवंत करतात पण तीच पात्र मध्येच हतबल होतात, "जे होणार आहे ते होणारच" असं म्हणतात; "आपण कोणाचा जन्म आणि मृत्यू बदलू शकत नाही" असं म्हणतात. ते मला सुसंगत वाटत नाही. काही वेळा, पुढे काय होणार आहे हे त्यांना दिसतं आणि काही वेळा ते भविष्यच बदलायचा प्रयत्न करतात. काही वेळा आत्म्याची शक्ती येते; काही वेळा जाते. असं खूप गोंधळात टाकणारं चित्रण आहे. ह्या कादंबरीतच नाही पण एकूणच भयपट, भुताच्या गोष्टी किंवा "सुपर ह्युमन फँटसी" प्रकारचे हॉलिवूड चित्रपट ह्यामध्ये पण गोंधळ नेहमी दिसतो. त्यामुळे थोडे प्रसंग वाचायला मजा येते पण पुढेपुढे ते एकसुरी आणि न जुळणारे वाटतात. ही कादंबरी पण त्याला अपवाद नाही. त्यामुळे मी खूप आनंद घेऊ शकलो नाही.

तुम्हाला भुताच्या गोष्टी मनापासून आवडत असतील तर कादंबरी वाचून बघा.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

The housemaid (द हाऊसमेड)





पुस्तक - The housemaid (द हाऊसमेड)
लेखिका - Freida McFadden (फ्रीडा मॅकफॅडन)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - ३०६
प्रकाशन - पेंग्विन रँडम हाऊस. २०२२
ISBN - 978-0-143-46115-9
छापील किंमत - रु. ४९९/-

फ्रीडा मॅकफॅडन लिखित ही एक रहस्यमय कादंबरी आहे. पुस्तकाची सुरवात होते की एका घरातल्या वरच्या मजल्यावर एक मृतदेह सापडला आहे. पोलीस येऊन चौकशी करतायत. त्या प्रसंगातल्या बाईला वाटतंय की पोलीस आता आपल्याला पकडणार. दोन पानांत ही घटना आहे. पण ती बाई कोण, मृतदेह कोणाचा हे लेखिका सांगत नाही. पुढे एकदम तीन महिन्यांपूर्वीच्या घटनांनी कादंबरीच्या कथनाची खरी सुरुवात होते. "मिली" नावाची एक बाई "नीना" नावाच्या बाईकडे घरकामासाठी - हाऊसमेड म्हणून - कामाला आली आहे. मोठं श्रीमंत घर. नीना, तिचा नवरा अँड्र्यू आणि लहान मुलगी "सिसी" असं कुटुंब. एवढ्या मोट्ठ्या बंगल्यात श्रीमंतांकडे चांगल्या पगाराची नोकरी मिळणार म्हणून मिली खुश आहे. सध्या ती बेघर आहे. एक जुनाट कार हेच तिचं घर. जुन्या कामावरून काढून टाकलेले. त्याहून महत्त्वाचे म्हणजे तिचा भूतकाळ... तुरुंगातून राहून सध्या ती "पॅरोल" वर. नीनाला हे बहुतेक माहित नसावं, म्हणूनच तिने नोकरीवर ठेवलं असावं.

नोकरी लागल्यावर तिला जाणवतं नीना चक्रम सारखी वागतेय. स्वतःच घरभर पसारा करते आणि मिलीला ओरडते. आधी एक काम सांगते आणि नंतर ते काम केल्याबद्दल मिनीलाच झापते, "तू हे का केलंस, मी तर असं सांगितलंच नव्हतं". तिचा नवरा अँड्र्यू मात्र तिचे हे सगळे रुसवे सहन करतोय. अगदी चांगला नवऱ्यासारखा वागतोय. पण पुढे पुढे मिलीला कळतं की वरवर चांगलं दिसत असलं तरी काहीतरी कुरबुरी आहेत. काहीतरी गडबड आहे.

मिलीला राहायला दिलेली खोली पोटमाळ्यावरची. कोंदट. एखादा बेड, छोटं कपाट, छोटा फ्रीज अशी. खास म्हणजे दारालाही फक्त बाहेरून कुलूप लावता येईल अशी खोली. असं का बरं असावं ? हीच खोली मिलीला का दिली असावी ? निनाच्या चक्रमपणामागे काही तब्येतीचं कारण असेल का स्वभावच तसा? अँड्र्यू सगळं इतक्या शांतपणे सगळं कसं घेतो ? निनाला कंटाळून मिलीबद्दल त्याला आकर्षण वाटलं तर ? त्यांना मिलीच्या भूतकाळाबद्दल कळलं तर ? किंवा मिलीला ह्या दोघांच्या भूतकाळाबद्दल कळलं तर ? का ह्या खोलीचा काही भूतकाळ असेल ? तुरुंगातून आलेली मिली काही गुन्हा करेल का ? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर कादंबरी नक्की वाचा.

कादंबरीच्या पहिल्या भागात मिली निवेदक आहे, दुसऱ्या भागात नीना. पुन्हा मिली आणि शेवटी पुन्हा नीना. अशा शैलीत दोन्ही कडच्या वेगळ्या वेगळ्या वेळी घडणाऱ्या घटना दाखवल्या आहेत. त्यातून हळूहळू पूर्ण कथानक आकाराला येतं. निवेदनाचा भर प्रसंगाच्या महत्त्वाच्या भागावर आहे. नेपथ्यरचनेची फापटपसारा वर्णनं नाहीत. त्यामुळे प्रत्येक पान वेगवान आहे. उत्कंठावर्धक आहे. कथानक अनपेक्षित वळणं घेते पण ती अतर्क्य नाहीत. कादंबरीत एका क्षणी एक पात्र खलनायक आणि एक नायक असं स्पष्ट चित्र उभं राहतं. खलनायकाचा हलकटपणा बघून त्याला आता कसा धडा शिकवला जातो हे बघायला आपणही उतावीळ होतो.

ही रहस्य कथा असल्यामुळे दोन तीन पानांचे फोटो देऊन काही उपयोग नाही. त्या प्रसंगाचा संदर्भ नसेल तर त्यात काही विशेष वाटणार नाही. जास्त पानांचे फोटो दिले तर कथेचा अंदाज येऊन भावी वाचकांचा रसभंग होईल. म्हणून ह्या परीक्षणात फोटो देत नाही.

पात्रांच्या तशा वागण्यामागे एक मनोवैज्ञानिक सूत्र आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा खोलवर प्रभाव कसा पडतो, त्यातून मनोविकृती कशा रुजतात हा कथानकाचा अंतःप्रवाह आहे. त्यातून कथानकाचं वैचारिक वजन वाढलं आहे. रहस्यकथा, गुन्हेगारी कथा म्हटलं की, हे असं कसं घडू शकतं; इतक्या गुप्तपणे कसं घडेल, सगळेच कसे सामील होऊ शकतील .. असे प्रश्न पडतात. ह्या पुस्तकातल्या प्रसंगांची चिरफाड केली तर असे "loose ends" सापडतीलही. पण वाचन थांबवावं असं काही लक्षात येत नाही. प्रसंगांचा झपाटा असा आहे की असे प्रश्न चट्कन उभे राहत नाहीत, किंवा मनात आले तरी आपण तात्पुरतं "असं झालं असेल" हे गृहीत धरून पुढे जातो. हे लेखिकेचं सामर्थ्य.

म्हणून ही कादंबरी मला आवडली. मी सहसा गूढकथा वाचत नाही. एक काल्पनिक खून आणि त्या खुनाचा शोध हे वाचायचा मला कंटाळा येतो. पण इथे तसं नव्हतं. नेहमीच्या ललित कादंबरी सारखे प्रसंग होते. आणि त्यातून रहस्य तयार होत होतं. ते वाचायला मजा आली. रंजक कादंबरी तुम्हालाही आवडेल.



——————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

निसर्गपुत्र (Nisargaputra)



पुस्तक - निसर्गपुत्र (Nisargaputra)
लेखक - लायल वॉटसन (Lyall Watson)
अनुवाद - निरंजन घाटे (Niranjan Ghate)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४६
मूळ पुस्तक - The Lightning Bird (द लायटनिंग बर्ड)
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब्रुवारी १९८९
ISBN - 9789357209465


हे पुस्तक अ‍ॅड्रियन बोशियर (Adrian Boshier) ह्या इंग्लिश तरुणाची विलक्षण सत्यकथा आहे. सोळाव्या वर्षी हा तरुण आफ्रिकेत आला. आपलं पाश्चात्त्य पद्धतीचं शहरी जीवन त्याला आवडत नव्हतं. त्याला आवड होती फिरायची, जंगलात भटकायची. तसा तो फिरला. दक्षिण आफ्रिकेच्या रानावनांत एकटा फिरला. डिस्कव्हरी चॅनल वर "मॅन वर्सेस वाईल्ड" दाखवतात तसं. पण पूर्णपणे खरं. ह्या मालिकेपेक्षाही त्यापेक्षाही कठीण. कारण त्याच्याकडे असायचं फक्त एक चाकू आणि थोडं मीठ. जंगलात राहायचं. मिळेल तिथे झोपायचं. जमेल त्या प्राण्याची, पक्ष्याची, किड्याची शिकार करून खायचं. जणू तो जंगलाशी एकरूप झाला होता. आदिमानव झाला होता. त्यामुळेच जेव्हा त्याचा आफ्रिकेतल्या आदिवासी लोकांशी संबंध आला तेव्हा "गोरा असूनही काळ्यांसारखाच" वागणारा माणूस आदिवासींना जाणवला. त्यांना आश्चर्य वाटलं. मात्र त्या लोकांनी त्याला आपल्यात सामावून घेतलं. त्यातून तो ह्या आदिवासींच्या भाषा शिकला, चालीरीती शिकला. त्यांच्या समजुती, श्रद्धा जाणून घेतल्या. हे सगळं त्याचं स्वान्त:सुखाय चालू होतं. जंगलात हिंडायचं आणि मध्येच शहरात यायचं अशी त्याने वर्षानुवर्षे काढली. एकदा त्याची भेट प्राध्यापक रेमंड डार्ट ह्यांच्याशी झाली. प्रागैतिहासिक आफ्रिका ह्या विषयाचे ते अभ्यासक. अ‍ॅड्रियनने आपले अनुभव सांगितल्यावर किती महत्त्वाची माहिती, पुरावे ह्यातून आपोआप गोळा होतायत हे त्यांना जाणवलं. त्यांनी अ‍ॅड्रियनला मार्गदर्शन करून माहिती गोळा करण्याला दिशा दिली. त्याने जमवलेली माहिती आणि वस्तू हे संग्रहालयात उपयोगी ठरेल ह्या हिशेबाने त्याला आर्थिक मानधनाची सुद्धा तरतूद केली. ह्यातून आपल्या समोर आलं आदिवासीचं भन्नाट जग ! आदिमानवाशी नातं सांगणाऱ्या वस्तू, प्रथा, गुहाचित्रं ह्यांचा खजिना. ह्या सगळ्याचा अर्थ लावण्याचा नवा दृष्टिकोन.

१९७८ मध्ये वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी अ‍ॅड्रियनचं निधन झालं. पण त्याने लिहून ठेवलेल्या नोंदी, रोजनिशी, त्याच्या मित्रांच्या मुलाखती ह्यावर आधारित "द लायटनिंग बर्ड" पुस्तक लायल वॉटसन ह्यांनी लिहिलं. त्याचाच हा मराठी अनुवाद. अ‍ॅड्रियन बोशियर चा हात धरून आपण जंगलात फिरतो. कठीण डोंगर चढतो. गुहेत राहतो. सापांशी खेळतो. आदिवासींच्या गावात राहतो. त्यांच्या परंपरा - जादूटोणा शिकतो. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण "आत्मे" करतात हा त्यांचा दृष्टिकोन समजून घेतो. कधीच न अनुभवलेलं जग आपण ह्या पुस्तकात अनुभवतो.

पुस्तकात बरीच प्रकरणे आहेत. त्यातल्या निवडक प्रकरणात काय आहे हे थोडक्यात सांगतो.

१) हाडे - आफ्रिकेतल्या मांत्रिकाला "डिंगाका" म्हणतात. त्याच्याकडे वेगवेगळ्या प्राण्यांच्या हाडांपासून तयार केलेले फासे असतात. त्यावर नक्षी असते. असे फासे फेकले की त्यांची जी रचना होते. त्यातून ते भविष्य सांगतात.

२) "लिकोमेंग - गूढ कुजबुज" - भटकंती दरम्यान बोशीयरने हाडाची सुरी वापरली होती. अजूनही आदिवासी ती वापरतात. बोशीयरला त्याचं नवल वाटत नव्हतं. पण प्राध्यापकांच्या भेटीनंतर अशी सुरी हा किती महत्त्वाचा ठेवा आहे हे त्याला उमगलं. त्याचे अजून अनुभव आणि प्राध्यापकांशी भेट ह्याबद्दल हे प्रकरण आहे.

३) खडक - गोल गरगरीत दगड हे सुद्धा आदिमानवांचे आयुध. हे दगड वापरून इतर दगडांना आकार दिला जातो. त्याचा अनुभव.

४) "मोरूतिवा - विद्यार्थी" - जंगलात कसं राहायचं, तगायचं हे शिकण्याचे अनुभव. जंगलात झोपायचं कसं ? तर पोटावर, पाय ना मुडपता. कारण माहितीये? अंग मुडपून झोपलं तर उबेला प्राणी, साप आश्रयाला येतात. एकदा तो सकाळी उठला तर "पफ अ‍ॅडर" नावाचा विषारी साप ! असे शिकारीचे, साप पकडण्याचे रोमहर्षक अनुभव ह्यात आहेत.

५) "पितला - नागाचा जन्म" - विषारी साप, अजगर पकडण्याचे अनुभव. त्यात तो इतका माहीर झाला की आदिवासी त्याला म्हणू लागले "राडिनोगा" - म्हणजे सापांचा बाप.

६) "रक्त" - अफ्रीकनांची "मोया" ही संकल्पना. एखादी गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे असं वाटलं की त्यात मोया आहे असं म्हणतात. जीवनझरा किंवा आत्मिकबल असं त्याचं स्वैर भाषांतर करता येईल.

७) "फोकोलो - आजार" - बोशीयरला अपस्माराचा त्रास होता. "फिट" यायच्या. पण आफ्रिकन लोकांच्या मते असा आजार म्हणजे उलट दैवी शक्ती. बोशीयरच्या "अंगात येत होतं". त्याला मान मिळत होता.

८) "लेडी बोगो - पाण उतार" आणि "मोहालासना - झुडूप". जंगलात गुहांमध्ये , खडकांच्या निवासस्थानांत बरीच चित्र काढलेली रंगवलेली दिसतात. युरोपियन लोकांनी त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. पण मूळ आफ्रिकन परंपरांची जाणीव नसल्यामुळे काही वेळा चुकीचे अर्थ लावले गेले. बोशीयरला थेट आदिवासींकडून खरे अर्थ कळले. उदा. एका गावाच्या तटावर एक चेहरा, त्याभोवती लंबवर्तुळाकार नक्षीकाम होतं. मुलाच्या जन्माचं हे चित्र आहे. आणि त्याचा अर्थ या गावात सुईण आहे. अशा वेगवेगळ्या आकृत्यांबद्दल ह्या प्रकरणांत आहे.

९) "मोरारा - महान वेल" - आदिवासींना औषधी वनस्पतीचे ज्ञान असते. त्यांचे मांत्रिक करत असलेले असलेले विधी हे थोडे वैज्ञानिक थोडे मनाला उभारी देणारे तर काही खरंच श्रद्धेच्या बळावर सभोवताल समजून घेण्याचे असतात. सरसकट "थोतांड" किंवा अंधश्रद्धा म्हणून त्याची बोळवण करता येणार नाही. हा अनुभव बोशीयरने स्वतः घेतला. त्याने स्वतः मांत्रिकाची दीक्षा घेतली. विधी शिकला. दुसऱ्या मांत्रिकाने केलेली जादू सुद्धा त्याने उलटवून दाखवली.

१०) पुढची प्रकरणे - फिरता फिरता एका गुहेत लपवलेले पारंपरिक नागरे त्याला दिसले. गावकऱ्यांना त्यांनी त्याची माहिती दिली. त्यातून जुन्या परंपरांना उजाळा मिळाला. ह्या नगाऱ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे विधी, ते वाजवून पावसाची आळवणी करण्याचे विधी हे प्रसंग त्यात आहेत.

काही पाने उदाहरणादाखल वाचा. फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा. 

"रासेबे" नावाची मांत्रिक बोशीयरला मांत्रिक दीक्षा देते, त्याचा अभ्यास शिकवते त्यातला एक प्रसंग 
 


विषारी नागाशी - "मांबा"शी - झटापट
गुहाचित्रांचा अर्थ 

वरची पाने वाचताना लक्षात आलं असेल की मराठी अनुवाद फर्मास जमला आहे. मराठमोळे शब्द वापरले आहेत. त्यांचे विधी किंवा त्यामागचे तत्वज्ञान सांगताना भारतीय संस्कृतीतले शब्द वापरले आहेत. त्यातून नेमका आशय वाचकापर्यंत पोचतो. ह्याबद्दल अनुवादक निरंजन घाटे ह्यांचे मनापासून आभार. 
भारतातही आदिवासी आहेत पण आधुनिक जगाशी ते बऱ्यापैकी जोडले गेले आहेत. त्या तुलनेत आफ्रिकन आदिवासी जास्त पारंपरिक जीवन जगतायत ते मागासलेले आहेत असं आपण म्हणू शकत नाही हेच ह्या पुस्तकाच्या वाचनातून जाणवतं. निसर्गाचे सान्निध्य, त्याची ओळख आणि पूरक जीवनशैली ते जगतायत. निसर्गाचे सौंदर्य आणि क्रौर्य दोन्ही अनुभवत त्यातून शिकत, पंचमहाभूतांची भीती बाळगत ते जगतायत. आधुनिक शहरे, खेडी, पदे, वस्ती, आदिवासी आणि आदिमानव ह्या मानवी सामाजिक बदलाची महत्त्वाची कडी ते आहेत. बोशीयरच्या लिखाणातून ह्या पुस्तकातून ती घरबसल्या अनुभवायची संधी आपल्याला मिळते. चोखंदळ वाचक ती हातची घालवणार नाही.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...