कॅडबरी (Cadbury)



पुस्तक - कॅडबरी (Cadbury)
लेखक - निकेतन तावडे (Niketan Tawde)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २०४
प्रकाशन - राजहंस प्रकाशन, ऑगस्ट २०२६
छापील किंमत - रु. ३८०/-
ISBN - 978-93-48736-33-8


लहान मुलांना काय खायला आवडतं ? बिस्किटं, चॉकलेट, कॅडबरी, वेफर्स, मॅगी, लेज, कुरकुरे, ओरियो ... यादी खूप मोठी आहे. पण ह्या यादीकडे आज जरा वेगळ्या नजरेने बघा. बिस्किटं, चॉकलेट आणि वेफर्स हे पदार्थ आहेत; लेज, ओरियो ही विशिष्ट नावं आहेत. तर चॉकलेटच्या कुठल्याही मोठ्या बारला आपण कॅडबरी म्हणतो. नूडल्सना आपण सर्रास मॅगी म्हणतो. प्रत्यक्षात 
ही कंपनीची नावं आहेत हे आपण विसरून जातो इतकं त्या कंपन्यांनी आपल्या जीवनात आणि मनात स्थान मिळवलं आहे. "कॅडबरी" कंपनीला हे कसं जमलं, त्यासाठी त्यांनी काय काय केलं, सुरुवात कुठून झाली हे सगळं समजून घ्यायची तुम्हाला इच्छा आहे का ? इच्छा असेल, तर एका हातात "कॅडबरी डेरी मिल्क" घेऊन दुसऱ्या हातात "कॅडबरी" पुस्तक वाचायची कल्पना कशी वाटते आहे ?

लेखक निकेतन तावडे हे स्वतः चॉकलेटच्या पदार्थांच्या निर्मितीत कार्यरत आहेत. चोकोइलेट (Chocoelate pvt ltd) ही त्यांची कंपनी चॉकलेटचे बुके आणि गिफ़्ट हॅम्पर बनवते. त्यांच्याबद्दल पुस्तकात दिलेली माहिती पुढीलप्रमाणे


"कॅडबरी" हे कंपनीचं नाव हे खरं तर आडनाव आहे. आपल्याकडे जसे चितळे, हल्दीराम, पेठे, आठवले अशा आडनावांच्या कंपन्या आहेत तसंच. कौटुंबिक व्यवसायाची पार्श्वभूमी असणाऱ्या जॉन कॅडबरी ह्यांनी १८२४ मध्ये इंग्लंडमध्ये " कॅडबरी टी अँड कॉफी" असं दुकान काढलं. तिथून पुढे त्यांचं लक्ष तेव्हा नव्याने बाजारात जोर धरू लागलेल्या "कोको बियांच्या पेयाकडे" गेलं. सुरुवातील चहाकॉफी प्रमाणेच "कोको"चे सुद्धा पेयच असायचे- "चोकोलात". इंग्लंड, स्वित्झर्लंड, अमेरिका, इतर युरोपीय देश सगळीकडे हे पेय प्रसिद्ध होत होते. उद्योगी लोक ह्यात नवनवीन प्रयोग करून बघत होते. त्यातून कंपन्या सुरु करून नशीब अजमावत होते. कॅडबरी, नेस्ले, हर्षे, क्राफ़्ट, लिंड् अशी आत्ता प्रसिद्ध असणाऱ्या कंपन्यांची सुरुवात तेव्हाची आहे. ह्या पुस्तकात लेखक आपल्याला त्या काळात घेऊन जातात. खरं म्हणजे त्याही आधी.

"कोको" ला दक्षिण/मध्य अमेरिकी देशांच्या जुन्या आदिवासी जमाती "ककाव" म्हणत. ते कडू पेय शक्तीवर्धक समजले जायचे. 
त्यांच्याकडून युरोपियन व्यापाऱ्यांमार्फत कोकोच्या बिया आणि पेय युरोपात आले. हा सगळा इतिहास वाचण्यासारखा आहे "थिओब्रोमा", "चॉकोलेट" ह्या शब्दांचा जन्म कसा झाला हे वाचणं खूप रंजक आहे.

"कोको"चे पेय प्रसिद्ध झाले. त्याचा कडवटपणा घालवण्यासाठी पुढे त्यात साखर, दूध, घालणं, ते घट्ट बनवणं असे प्रयोग सुरु केले. असे प्रयोग यशस्वी झाले की बाजारात त्या कंपनीचा दबदबा वाढे. मग इतर कंपन्यांना नवं काहीतरी करण्याची गरज पडे. त्यातून "कॅडबरी" आणि इतर कंपन्यांची "डेअरी मिल्क", "किटकॅट", "टॉब्लेरॉन" अशी गाजलेली उत्पादने तयार झाली. त्यामुळे पुस्तक वाचताना फक्त "कॅडबरी" कंपनीच नाही तर एकूण चॉकलेट उद्योगाचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. व्यावसायिक स्पर्धा अनिवार्यच पण दोन महायुद्धांच्या झळाही कंपनीला बसल्या. वैयक्तिक, कौटुंबिक धक्के पचवावे लागले. त्यातून तावून सुलाखून बाहेर पाडण्यासाठी "कॅडबरी कुटुंबियांच्या चार पिढ्यांनी" कसे कसे योगदान दिले ह्याची सविस्तर माहिती पुस्तकात येते.

"कॅडबरी" कुटुंबीयांकडे व्यावसायिक हुशारी बरोबर, नीतिमत्ता आणि सामाजिक दायित्वाची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी मोठी जागा विकत घेऊन तिथे कंपनी आणि कर्मचाऱ्यांची वसाहत "बोर्नव्हिल" वसवले. अजून बरीच समाजोपयोगी कामे केली त्याचीही माहिती पुस्तकात प्रसंगोपात येते. "कॅडबरी"च्या गोडव्याला असलेला माणुसकीचा गोडवा लोभस वाटतो.

पुस्तकाच्या शेवटच्या भागात अमेरिकन "क्राफ़्ट" कंपनीने "कॅडबरी" कंपनीचे अधिग्रहण कसे केले, त्यासाठी भांडवली बाजारात अधिकाधिक समभाग (शेअर्स) विकत घेणे, डिव्हीडंड देणे वगैरे आर्थिक डावपेचांचा तांत्रिक भागही आला आहे. कुटुंबाचे अधिपत्य जाऊन ती दुसऱ्यांच्या मालकीची झाली आणि कंपनीचा नवा प्रवास सुरु झाला.

कॅडबरी कंपनीचा भारतात प्रवेश, उद्योगविस्तार ह्याबद्दल शेवटचे प्रकरण आहे.

कंपनीचे नेतृत्व करणारे शेवटचे "कॅडबरी" बंधू एकमेकांशी गप्पा मारतायत असे पुस्तकाचे स्वरूप आहे. कंपनीवर आता कुटुंबीयांचा ताबा राहणार नाही ह्या भावनेतून ते भूतकाळाला उजाळा देतायत अशा प्रकारे प्रकरणांची सुरुवात आणि शेवट संवादाने होते. मध्ये त्रयस्थ निवेदक माहिती देतो अशा प्रकारे लेखनशैली आहे.

आपण दुकानातून विकत आणतो ती कॅडबरी म्हणजे गोड पदार्थ. गोड खायला मुलांना आणि मोठ्या माणसांनाही आवडतंच. त्यामुळे गोड पदार्थ तयार करणं आणि विकणं हे तर सोपं काम, त्यामुळे कंपनी प्रसिद्ध झाली, भरपूर पैसे कमावले असं आपल्याला वाटलं तर नवल नाही. पण हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला लक्षात येतं की कोको बियांपासून चॉकलेट हा प्रवास आणि एका छोट्या चॉकलेट बनवणाऱ्या व्यक्तीपासून बहुराष्ट्रीय कंपनी पर्यंतचा प्रवास दोन्ही सोपे नाहीत. म्हणूनच "एका गोड उद्योगाचा खडतर जगप्रवास" हे उपशीर्षक योग्य आहे.

आता काही पाने उदाहरणादाखल वाचा

अनुक्रमणिका


संस्थापक "चायवाला" जॉन कॅडबरी



व्यावसायिक स्पर्धा नवीन उत्पादन तयार करायला कशी भाग पाडते.



निवेदकांच्या "गप्पांची" झलक.



ह्या पुस्तकाचे एक प्रकाशन डोंबिवलीत २९ ऑगस्ट २०२६ 
ला झाले होते. त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो.






कार्यक्रमाचे अजून फोटो आणि व्हिडीओ बघण्यासाठी लिंक https://www.facebook.com/kaushik.lele/posts/pfbid0UNLbu5PvzJm28qbFNmwjxNZ93hE2tgQECrBoMuueGje1kAGyBxRKFf7SNBrr1ippl

निवेदनाच्या ओघात ह्या क्षेत्रातल्या खूप वेगवेगळ्या लोकांची आणि घटनांची नावं, सनावळ्या येतात. पुस्तक पूर्ण केल्यावर कदाचित ते तपशील पूर्णपणे लक्षात राहतील असं नाही. मात्र चॉकलेट उद्योगाचे महत्त्वाचे टप्पे, किस्से, व्यावसायिक स्पर्धेचं मर्म, सहृदय उद्योजकांचे गुण ह्या गोष्टी मनात नक्की रेंगाळतील. मग घ्या कॅडबरी हातात !


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

कॅडबरी (Cadbury)

पुस्तक - कॅडबरी (Cadbury) लेखक - निकेतन तावडे (Niketan Tawde) भाषा - मराठी (Marathi) पाने - २०४ प्रकाशन - राजहंस प्रकाशन, ऑगस्ट २०२६ छापील क...