ज्युलियस सीझर (Julius Caesar)




पुस्तक - ज्युलियस सीझर (Julius Caesar)
लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare)
अनुवाद - शिरीष सहस्रबुद्धे (Shirish Sahasrabuddhe)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
पाने - १२७
प्रकाशन - वैशाली प्रकाशन, एप्रिल २०२६
छापील किंमत - रु. ३००/-
ISBN - 978-93-48129-36-9

वैशाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या शेक्सपियरच्या नाटकांच्या मराठी अनुवादातलं हे एक पुस्तक. जगप्रसिद्ध नाटककाराचं जगप्रसिद्ध नाटक. सार्वत्रिक आणि सार्वकालिक सुसंगत संदेश देणारं नाटक.

ज्युलियस सीझर हा रोमचा राज्यकर्ता आहे. महापराक्रमी आणि लोकप्रिय आहे. त्याने अनेक युद्धांत जय मिळवला आहे. रोमच्या समृद्धीत भर घातली आहे. परंतु त्याचा अहंकार वाढत चाललेला आहे. सामान्य लोक सीझरचे चाहते असले तरी निवडक लोकांना तो हळूहळू तो सम्राट बनेल आणि मग हुकूमशहा बनेल अशी धास्ती वाटते आहे. त्यांना रोमची लोकशाही टिकवायची आहे. सीझरची शक्ती अजून वाढण्याआधी, लोकांनी त्याला राजा घोषित करायच्या आधी त्याचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे, त्याला ठारच मारलं पाहिजे असा कट ते करतात. मार्कस ब्रूटस आणि कायस कॅशियस हे बंडवाल्यांचं नेतृत्त्व करतात. ब्रूटस सीझरचा मित्र असला तरी रोमच्या कल्याणासाठी मित्राची हत्या करायला तोही तयार होतो. सीझरबद्दल आकस असणारे इतरही ह्या टोळीत समाविष्ट होतात. सगळे मिळून दरबारात सीझरची हत्या करतात. सीझर बघतो की त्याचा मित्र ब्रूटसही घाव घालतो आहे. तेव्हा ते सुप्रसिद्ध वाक्य येतं. "ब्रूटस तूसुद्धा !"

हत्या झाल्यावर नागरिकांत गोंधळ माजतो. ब्रूटस आणि कॅशियस लोकांना समजावून सांगतात की ह्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही. तर रोमच्या भविष्यासाठी हे आवश्यक होतं. सीझर बद्दल त्यांना आदरच आहे. म्हणून त्याचा अंत्यसंस्कारही नीट होईल. आम्ही काही माथेफिरू खुनी नाहीत. त्यामुळे आम्ही बाकी कोणाला मारलं नाहीये. लोकांना हे पटतं. पण त्यानंतर सीझरचा साथी अँटनी लोकांशी बोलतो. सीझरचे गुणगान करतो. त्याचे पराक्रम, त्याची लोकप्रिय कामे आणि पुढेही तो लोकांसाठी काय करणार होता हे सांगतो. तेव्हा काही लोक त्याच्या बाजूने उभे राहतात. राज्यात दोन गट पडतात, संघर्ष होतो. शेवटी बरेच जण मारले जातात, काही जण होऊ घातलेल्या पराभवाच्या शल्याने आत्महत्या करतात. असा नाटकाचा एकूण पट आहे.

नाटक रोममध्ये घडत असलं, मुख्यपात्र सीझर असला तरी, हे नाट्य देशोदेशी आणि वेगवेगळ्या काळात घडताना दिसतंय. अगदी भारतातले आणि इतर देशांमधले सत्ताधारी आठवा. लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेले आणि नंतर अंतर्गत कलहामुळे पदच्युत झालेले असे किती लोक दिसतील. कधी त्यांची हत्या झाली, कधी कैद झाली तर कधी परागंदा व्हावे लागले. सुरुवातीला लोकांसाठी काम करणारी व्यक्ती लोकप्रियता वाढत गेल्यावर स्वतःला अत्युच्च समजू लागते. ज्यांच्या जीवावर आणि ज्यांच्यासाठी सत्ता मिळवली तेच दुय्यम वाटायला लागतात. स्वतःच्या शौर्यावर, निर्णयांवर इतका विश्वास वाढतो की आजूबाजूला होणाऱ्या असंतोषाची किंवा त्यातून काही घातपात होऊ शकेल ह्याचीही काळजी वाटेनाशी होते. कणखर स्वप्रतिमेच्या नादात वेडे धाडस करणे अत्यावश्यक होऊन बसते. दुसरीकडे राज्यकर्त्याला पदच्युत करण्याची प्रामाणिक इच्छा असणारे असतात तसे स्वार्थीही असतात. आत्ताचा सत्ताधारी जाऊन तिथे आपण बसावं अशी सुप्त महत्त्वाकांक्षा बाळगणारे असतात. जणू सीझरला मारतानाच स्वतःला पुढचा सीझर बनवण्याची म्हणजेच स्वतःच्या पदच्युतीचीही बीजे ते रोवत असतात.

नाटकात कॅशियस आणि ब्रूटस च्या तोंडी अशी वाक्य येतात "हे महान दृश्य यापुढची कितीतरी शतकं वेगवेगळ्या देशांत पुन्हा पुन्हा प्रत्यक्षात आणलं जाईल. या क्षणी अस्तित्वांत नसलेल्या देशांत आणि भाषांतही ते घडेल... सीझरचा वध पुन्हा पुन्हा होत राहील. जसा आज तो मरून पडला आहे ..धुळीत आणि धुळीसारखाच". किती अजरामर वाक्य. किती अजरामर भविष्यवेध.

नाटक जगप्रसिद्ध आहेच. जगभरातले संशोधक, अभ्यासक त्याचं विविधांगी रसग्रहण करत असतात. त्यामुळे मी त्यात काही भर घालू शकत नाही. शिरीषजींनी केलेला अनुवाद अत्युत्तम आहे. अगदी ओघवता. जुनी भाषा शैली टिकवत तरीही लेखन खूप बोजड होणार नाही ह्याचा समतोल साधला आहे. ह्या अनुवादामुळेच इतकी महत्वाची साहित्यकृती पूर्ण वाचण्याचं धाडस मी करू शकलो. त्याबद्दल अनुवादक आणि प्रकाशकांचे आभार.

काही पानं उदाहरणादाखल

सीझरचा रोमला असलेला धोका ब्रूटसला पटवून देताना कॅशियस


धोक्याची सूचना धुडकावून लावणारा सीझर



सीझरची हत्या कशी चुकीची आहे हे लोकांना सांगणारा अँटनी.



काल पुणे मुंबई प्रवासात हे पुस्तक वाचायला घेतलं. ते वाचताना इतका रंगून गेलो की गाडी पाऊणेक तास उशीरा पोचली तरी कळलंच नाही. प्रवास झाला असं वाटलंच नाही. जणू तीन तास मी रोममध्ये होतो. आणि मध्येच भारताच्या इतिहासातल्या आणि चालू घडामोडींचं प्रतिबिंब त्यात बघत होतो. तुम्ही सीझर असा, प्रजा असा, ब्रूटस असा की आणखी कोणी... हे पुस्तक नक्की वाचा.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

तुकाराम (Tukaram)




पुस्तक - तुकाराम (Tukaram)
लेखक - शफी पठाण (Shafi Pathan)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २१६
प्रकाशन - न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, जुलै २०२६
छापील किंमत - रु. २५०/-
ISBN - 978-81-69805-01-8

सध्या (२०२६ मध्ये) गाजत असलेले आयएएस अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे. मे २०२६ मध्ये महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांनी अन्न व औषध भेसळीविरोधात राज्यभर अत्यंत आक्रमक आणि धडक मोहीम उघडली आहे. त्यांच्या कडक कारवायांमुळे राज्यातील हॉटेल व्यावसायिक, तसेच अन्न व औषध उत्पादकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ह्या आधीही तुकाराम मुंढे ह्यांच्याकडे ज्या ज्या जबाबदाऱ्या होत्या तिथे तिथे कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ख्याती झाली होती. सहकारी, वरिष्ठ आणि राजकारणी ह्यांच्या नाराजीला व दबावाला न जुमानता जे काम नियमानुसार आहे ते काम ते प्रामाणिकपणे आणि शिस्तशीरपणे करत आले आहेत. साहजिकच त्यांची कारकीर्द वादळी ठरली आहे. सामान्यतः एका आयएएस अधिकाऱ्याचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो, परंतु तुकाराम मुंढे यांच्या अवघ्या २१ वर्षांच्या सेवेत २५ पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत. खोटेनाटे आरोप झाले आहेत. त्यांनी केलेल्या कारवाईमुळे ज्यांचे अवैधधंदे बंद झाले अशा "सामान्य जनतेनेही" त्यांना हटवण्यासाठी खटपटी केल्या आहेत. पण ह्या कुठल्याही दबावाला न जुमानता त्यांनी आपला शिस्त आणि नियम ह्यांचा मार्ग सोडला नाहीये.

त्यांची कारकीर्द अजून बरीच बाकी आहे. परंतु राजकारणी - समाजकारणी - प्रशासन - जनसामान्य ह्या प्रत्येक बाबतीत "सारेच दीप कसे मंदावले आता" अशी अवस्था अनुभवाला येत असताना असताना मुंढे साहेबांसारखे काही एकांडे शिलेदार पाय रोवून उभे राहतात ही अपूर्वाईची, कौतुकाची बाब आहे. त्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता वाटते की हे मुंढे साहेबा इतरांपेक्षा असे वेगळे का वागतात ? दबाव झुगारून देण्याचं आत्मिक बळ कसं आलं ? मुळात त्यांना प्रशासकीय अधिकारी का व्हावंसं वाटलं ? त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील शफी पठाण लिखित "तुकाराम" ह्या चरित्रात.

तुकारामजींच्या जन्मापासून ते त्यांना आयएएस अधिकारी म्हणून पाहिलं पूर्णवेळ पोस्टिंग मिळालं तिथपर्यंतचा काळ ह्या पुस्तकात आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना गावी १९७५ मध्ये त्यांचा जन्म झाला. घरची शेती होती पण त्यातून पुरेसं उत्पन्न नसल्यामुळे परिस्थिती अतिशय हलाखीचीच. तुकारामजींचे वडील अतिशय कष्टाने तरी प्रामाणिकपणे कुटुंब चालवत होते. पिढीजात परंपरेनुसार मुलंही शाळकरी वयाची झाली की त्यांनी शेतीच्या कामात स्वतःला जुंपून घ्यावं हीच त्यांची अपेक्षा. त्यानुसार तुकारामजींचा मोठा भाऊ - अशोक -काम करू लागला. लहान तुकारामही शाळा आणि शेतीकाम असं दोन्ही संभाळू लागला. पण गरीबीचं दुष्टचक्र थांबत नव्हतं. मोठ्या अशोकने वेगळा विचार करायचं ठरवलं, शिक्षणासाठी घर सोडलं. छ. संभाजीनगरला गेला. पुढे वडिलांचा विरोध पत्करून तुकारामलाही संभाजीनगरला नेलं.

दोघांनी अर्धपोटी, उपाशीपोटी राहून शाळा, महाविद्यालय पूर्ण केलं. इंग्रजी सुधारलंशहरात आल्यापासून एक ध्येय अशोकरावांनी तुकारामजींच्या मनात बिंबवलं होतं की "तुला कलेक्टर व्हायचंय". ते कसं व्हायचं हेही ते ठरवत गेले. त्यामुळे मोठ्या भावाने सांगितलं त्याप्रमाणे शाळा, कॉलेजची निवड, विषयांची निवड तुकारामजी करत गेले. वर्षानुवर्षे प्रयत्न केले. आयएएसची मुख्य परीक्षा पुन्हा पुन्हा अनुत्तीर्ण होण्याच्या नामुष्कीलाही तोंड द्यावं लागलं. खर्च भागवण्यासाठी काही नोकरी करायची आणि दुसरीकडे अभ्यास करत राहायचा अशी काही वर्ष गेली. स्वतःचं व्यक्तिमत्त्व, बोलण्याची शैली, मुलाखत देण्याची पद्धत, आक्रमकता ह्या प्रत्येक बाबतीत स्वतःत आवश्यक बदल घडवत गेले. टाकीचे घाव सोसून शेवटी ते आयएएस झाले.

प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असतानाही अनधिकृत बांधकामे पडण्याची कारवाई, डान्सबारवर अचानक छापा घालणे ह्यातून त्यांनी पुढच्या वाटचालीची चुणूक दाखवली. राजकारण्यांनी हा संदेश बरोबर ओळखला. पूर्णवेळ सेवा सुरु होण्याआधीच व्यवस्थेला नकोशी व्यक्ती ते ठरले. त्यातून अगदी पहिला नियुक्ती आदेश सुद्धा दोनदा रद्द झाला !

हा सगळा जीवनप्रवास लेखकाने अतिशय सविस्तरपणे मांडला आहे. लहान लहान प्रसंग कसे घडले असतील ह्याचं मनोज्ञ वर्णन आहे. त्यामुळे पुस्तक थोडं संथ लयीत आणि बरेच तपशील सांगत चालतं. काहीवेळा थोडं एकसुरी झालं तरी पण आपण पुढे पुढे वाचत राहतो. गरीबी, साधनांची कमतरता, भूक ह्याला तोंड देतानाचे प्रसंग वाचताना डोळ्यात पाणी येतं. गावातून शहरात आल्यावर होणारा गोंधळ - फजीती वाचताना थोडं हसू येतं. ह्या सगळ्यावर मत करत प्रचंड मेहनत घेऊनही जेव्हा त्यांना पुन्हा पुन्हा अपयश येतं तेव्हा ते जितके निराश झाले तितकेच आपणही आपण निराश होतो. यश मिळतं तेव्हा आपणही मनात "पेढे वाटा" असं म्हणतो. अधिकारी म्हणून नियमानुसार काम करूनही राजकारणी दबाव येतो तेव्हा आपणही त्रस्त होतो. ह्या नव्या तरुण अधिकाऱ्याची आपल्याला काळजी वाटते. ह्याचं कारण तुकारामजींच्या जीवनातील आशा-निराशा, यश-अपयश, वडिलांचा विरोध - भावाची साथ, स्वतःच्या आवडीनिवडी आणि भावाने सांगितलं तसंच वागायचं हे सगळे ताणेबाणे लेखकाने आपल्यासमोर जिवंत केले आहेत. समरसून लिहिले आहे. जणू एक कादंबरीच आपण वाचतो आहोत असे आपण त्यात गुंगून जातो. हे लेखकाच्या निवेदनाचे यश आहे.

तुकारामजींची सेवा अजून सुरु आहे म्हणून कदाचित पुढचा कालखंड पुस्तकात घेतला नसावा. तसंच जो भाग घेतला आहे तिथेही संबंधित राजकारणी, अधिकारी ह्यांची थेट नावे न लिहिता सूचक उल्लेख केले आहेत.

काही पाने उदाहरणादाखल

घरच्या परिस्थितीची एक झलक आणि वडिलांना विरोध


परीक्षेत यश मिळवण्यासाठी नाना प्रकारे प्रयत्न आणि पुन्हा पुन्हा हुलकावणी


आयएएस प्रशिक्षणार्थी म्हणून राजकारण्यांचे पहिले दर्शन



तुकारामजींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, बालपणाबद्दल उत्सुकता म्हणून हे पुस्तक वाचायला घेणं स्वाभाविकच आहे. पण त्या व्यतिरिक्तही खेडोपाड्यांतल्या मुलांनी हे पुस्तक विशेष वाचलं पाहिजे. आर्थिक दुर्बल परिस्थितीशी झगडताना त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा शिक्षण हाच मुख्य मार्ग आहे, शिक्षणाची हेळसांड करता कामा नये हा विचार त्यांच्या मनात रुजेल. त्याचवेळी "स्पर्धा परीक्षा" ह्याबद्दल वाढता "रोमँटिसिझम" कमी व्हायलाही मदत होईल. "स्पर्धा परीक्षा" देणं, त्यात उत्तीर्ण होणं किती खडतर, वेळखाऊ आणि शरीर-मन-बुद्धी ह्यांचं शोषण करणारं आहे हे लक्षात येईल. जर आपली आवड, बौद्धिक क्षमता आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जनसेवेची भावना मनात नसेल तर ह्या परीक्षांच्या नादी लागू नये, ह्याचं भान येईल. पुस्तक वाचून असं जाणवतं की "कलेक्टर हो" ही मोठ्या भावाची महत्त्वाकांक्षा होती. तुकारामजींचा स्वतःची निवड नव्हती. सध्या बालसंगोपन आणि करियरनिवड ह्याबद्दल समुपदेशन करताना पालकांना सांगतात की आपली स्वप्न, आपली आवड मुलांवर लादू नका. त्यांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना शिक्षण घेऊ द्या, करियर निवडू द्या. दुर्दैवाने तुकारामजींना हे स्वातंत्र्य मिळालं नाही, ही भावना मनात येते. आयएएस ऐवजी ते इतर काही शिक्षण घेऊ शकले असते तर कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लवकर आणि जास्त चांगलं देऊ शकले असते. कदाचित एखादा चांगला संशोधक, पत्रकार किंवा नवउद्यमी मिळाला असता, कुणी सांगावं !


असं हे प्रेरणादायी, विचारप्रवृत्त करणारे आणि अगदी ताज्या विषयावरचं पुस्तक वाचकांना नक्की आवडेल.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इथियोपियी सुरस कथा (Ethiopiyi suras katha)




पुस्तक - इथियोपियी सुरस कथा (Ethiopiyi suras katha)
लेखक - उमेश कदम (Umesh Kadam)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १६०
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस, जानेवारी २०२६
छापील किंमत - रु. २६०/-
ISBN - 9789357201704

आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस या जागतिक मानवतावादी संस्थेसाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वीस वर्षे कायदा सल्लागार म्हणून उमेश कदम यांनी काम केलं आहे. त्यापैकी २००८ ते १८ ही दहा वर्ष ते आफ्रिकेमध्ये होते. त्यातील पहिली अडीच वर्षे ते इथियोपियात वास्तव्याला होते. त्यानंतर इतर देशात त्यांची बदली झाली. इथिओपिया आणि आजूबाजूच्या बऱ्याच आफ्रिकी देशांना कमीअधिक कालावधीसाठी भेट देण्याचीही संधी मिळाली. प्रत्यक्ष वास्तव्य करताना तिथली संस्कृती, खानपान, हवामान याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता आला. रेडक्रॉस च्या कामामुळे आदिवासींची जीवनपद्धती, एकूण सामाजिक समस्या आणि त्यांची राजकीय कारणे इ . जवळून बघता आले. भारतापेक्षा इतिहास, भूगोल, संस्कृती, गरिबी, सामाजिक प्रश्न, सशस्त्र बंडखोरी, अंतर्गत यादवी या सर्व बाबतीत इथिओपिया खूपच वेगळा आहे. तिथे कामानिमित्त जाऊन राहणं हे युरोपअमेरिके सारख्या प्रगत देशांमध्ये स्थायिक होण्यासारखं नक्कीच नाही. आपल्यापैकी असं धाडसाचं काम फारच थोडे लोक करतील. आपल्यासाठी आफ्रिकेचा इतका मोठा विभागभूभाग अपरिचितच राहू शकतो. म्हणूनच उमेश कदम यांच्यासारखी धाडसी आणि संवेदनशील व्यक्ती जेव्हा तिचे अनुभव आपल्यासमोर मांडेल तेव्हा ती संधी तरी आपण दवडता कामा नये.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती. (जन्मवर्ष चुकलेलं आहे असं वाटतंय.)


हे पुस्तक प्रवासवर्णन नाही किंवा सामाजिक -ऐतिहासिक असं दस्तऐवजीकरणही नाही, तर शीर्षकात म्हटल्याप्रमाणे या सुरस कथा आहेत. किस्से आहेत. लेखकाला आलेले अनुभव आहेत. तिथल्या वास्तव्यात सहकाऱ्यांकडून समजलेल्या घटना आहेत. काही मजेशीर, काही गंभीर. तर काही आश्चर्यचकित करणाऱ्या. त्याला थोडी कल्पनेची जोड देऊन कथास्वरूप आणलं आहे. ह्यांत आफ्रिकन आदिवासींच्या चालीरीतींची धमाल दिसेल तर काही वेळा त्यातून निर्माण झालेला पेचप्रसंग वाचायला मिळेल. आदिस अबाबा शहराचे वातावरण, राहणीमान कसं झकास आहे हे समजेल. दुसरीकडे अंतर्गत यादवीमुळे लोक आपला जीव मोठे धरून परागंदा होत निर्वासित म्हणून इतर देशात जायची धडपड का करतात हेही समजेल. आता यातल्या काही कथांबद्दल सांगतो

तुम्ही भयानक आहात - लेखक त्याच्या एका आफ्रिकन सहकाऱ्याला कौटुंबिक समस्येबद्दल सल्ला देतो. त्या सल्ल्यानुसार वागल्याने समस्या सुटते. तो लेखकाला अभिनंदनपर पत्र पाठवतो. पण आफ्रिकन सहकाऱ्याचे इंग्रजीचे ज्ञान यथातथा असल्यामुळे त्या लिखाणातून झालेल्या गैरसमजातून लेखकाच्या घरीच कौटुंबिक समस्या उभी राहू लागते.

आफ्रिकी युती आणि सम्राटांची युक्ती - साऱ्या आफ्रिकी राष्ट्रांची एक विभागीय संघटना स्थापन करावी या उद्देशाने इथियोपियाच्या सम्राटांनी १९६३ मध्ये एक शिखर परिषद बोलावली होती. बहुतेक सगळ्या मुद्द्यांवर सर्व राष्ट्रांचं एकमत झालं. पण संघटनेचं मुख्यालय कुठे असावं यासाठी दोन-तीन देशांमध्ये चुरस निर्माण झाली. मुख्यालय आपल्या देशात आदिस अबाबा इथे यावं यासाठी इथिओपियन सम्राट काय प्रलोभन दाखवतात ते वाचा . इतक्या उच्च दर्जाच्या वाटाघाटींमध्ये असंही घडत असेल हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

मेंगेशाची महत्त्वकांक्षा - गरिबीतून बाहेर पडण्याची धडपड करणाऱ्या, सन्मार्गाने चालणाऱ्या मेंगेशा नावाच्या मुलाची ही गोष्ट आणि त्याचा सुखांत शेवट.

चाट खाऊन पडावे - "चाट" नावाच्या वनस्पतीची पानं आफ्रिकेत तंबाखू सारखी खाल्ली जातात. त्याची नशा चढते. तिथल्या बाजारात म्हणे ती सर्रास दिसते आणि आजूबाजूच्या देशात निर्यातही होते. या चाट खाण्याची मनोरंजक निरीक्षणे या लेखात आहेत.

मसूर मॅक्रोनी नि मुर्सी - आदिवासींच्या चित्रविचित्र सवयींचे, स्वागताचे आणि बेरकीपणाचे किस्से

मियाझाची मुलगी मरीना - इथिओपिया देशाला लागून एरिट्रिया नावाचा देश आहे. लेखकाच्या घरी स्वयंपाककाचं काम करणाऱ्या मियाझाची मुलगी मरीना एरिट्रियात होती. मायलेकींची अशी ताटातून कशी झाली. निर्वासित म्हणून परागंदा होण्याचा निर्णय मरीनाने कसा घेतला आणि शेवटी तिसऱ्याच देशात मायलेकींची भेट कशी झाली याची एक अस्वस्थ करणारी पण सुखान्त कहाणी.

अपहरण( होऊ घातलेल्या) पत्नीचे - लग्नाच्या बाबतीत आफ्रिकन आदिवासी जमातींचे आपापले रीतीरिवाज आहेत. एका जमातीत अशी प्रथा आहे की, मुलगा वयात आला की त्याने आपल्या आवडीच्या मुलीचे चक्क अपहरण करायचे! तिला पटवायचे आणि मग लग्न करायचे !! अहो पण हा रिवाज आफ्रिकेच्या बाहेर युरोपात पाळायला गेलात तर घोटाळा नाही का होणार? पण हा घोटाळा केला "बिर्हानू"ने. हा बिर्हानू कोण युरोपात कसा पोहोचला आणि त्याच्या घोटाळ्याचा शेवट काय झाला की धमाल वाचण्यासारखी आहे.

एक धक्कादायक गोष्ट - इथे पुन्हा गरिबीतून बाहेर पडण्याची त्यासाठी निर्वासित होण्याची , रेफ्युजी बनण्याची कहाणी आहे. पण ही मेंगेशासारखी सरळमार्गी व्यक्ती नाही तर इथे एक बनेल बाई आहे. ही बाई इथियोपियातून कशी बाहेर पडते आणि काय काय "उद्योग" करते हे लेखकाला तिच्या नवऱ्याच्या तोंडूनच ऐकायला मिळते.

मी इथिओपियी तुरुंगात जातो - आपले लेखक महाशय तुरुंगात गेले होते... पण फक्त बघायला, सामाजिक उपक्रमांचा सर्वेक्षण करायला. आणि ते तुरुंग इतके सुंदर दिसले की कदाचित तुम्हीही तिथल्या तुरुंगात जायचा विचार कराल.

चिन्मय आफ्रिका - हे शीर्षक वेगळं आहे. भक्तिमय, सूरमय च्या धर्तीवर "चीन"मय" याअर्थी चिन्मय असा उल्लेख लेखकाने केला आहे. आफ्रिकेमधल्या अराजकाचा आपल्या फायद्यासाठी वापर करत चीनने आपले पाय आफ्रिकेत रोवले आहेत. तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर हक्क प्रस्थापित केला आहे. रस्ते, पूल रेल्वे, सरकारी इमारती अशा सर्व पायाभूत सुविधांमध्येही चीनचाच वरचष्मा आहे. एका अर्थाने चीनचा हा नववसाहतवादच आहे. त्याचं लेखकाला दिसलेलं स्वरूप.

काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका

"चाट" विषयी


"अस्सा तुरुंग सुरेख बाई "


आदिवासींच्या तलावात पोहल्यामुळे ते रागावले


कष्ट करून पोट भरणारा आणि प्रगतीचा विचार करणारा मेंगेशा


अशा कथा व अनुभववर्णनपर ललित लेख आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर "फक्त प्रौढांसाठी" असा उल्लेख आहे. पुस्तकावर असा उल्लेख मी पहिल्यांदाच बघितला. त्याबद्दल मनोगतात लेखक असे म्हणतात की; "सुरस कथा" म्हटल्यावर या कथा फक्त लहान मुलांसाठी असाव्यात असा समज झाला असता. पण तसं नसल्यामुळे कंसात फक्त प्रौढांसाठी असा उल्लेख जाणीवपूर्वक केला आहे. पण "फक्त प्रौढांसाठी" म्हटल्यावर पुस्तक अश्लील, शृंगारिक किंवा अति हिंसक
 असेल असं मनात येतं. प्रत्यक्षात तसं काही नाही. दोन-तीन गोष्टींमध्ये नवराबायकोचे संबंध , गर्भधारणा, फसवणूक, व्यभिचार यांचे उल्लेख येतात. पण इतपत उल्लेख हल्ली कुठल्याही कादंबरीत वा सामाजिक लेखांमध्ये वाचायला मिळतात -"फक्त प्रौढांसाठी" असं न लिहिता. त्यामुळे हे असं स्वतंत्र लिहिण्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. काही वाचक पुस्तक घेणार नाहीत तर काही वाचक फार अपेक्षेने पुस्तक घेतील. :) गोंधळ टळेल असं आकर्षक शीर्षक सुचलं असतं. (एक गंमत ... हे पुस्तक वाचत असताना पंकज भोसले यांचं "फ्रेन्च मेनिॲक" असं पुस्तक वाचण्यात आलं. त्यात तर पानोपानी अश्लील चित्रफितींची सूचक वर्णनं आणि पॉर्नस्टार ह्यांचे उल्लेख आहेत. किंबहुना तोच पुस्तकाचा आत्मा आहे. तरी त्या पुस्तकावर "फक्त प्रौढांसाठी" असं लिहावसं वाटलं नाहीये . असो. ) 

प्रत्येक लेख हा मिश्र निवेदनशैलीचा आहे. लेखक त्यावेळी तिथे कसा आणि का होता हे सांगितलं आहे. किस्सा समजून घेण्यासाठी आवश्यक ती ऐतिहासिक, भौगोलिक पार्श्वभूमी सुद्धा थोडक्यात स्पष्ट केली आहे. लेखक आणि इतर पात्रांच्या संवादातून किस्सा खुलतो. पुन्हा लेखक आपलं मत मांडतो. अशाप्रकारे त्या त्या कथेला आवश्यक अशा पद्धतीने निवेदन होतं. लेखकाची शैली मिश्किल, नर्मविनोदी आहे त्यामुळे आपण त्याच्याबरोबर समोरासमोर गप्पा मारतोय असंच वाटतं. त्यातून पुस्तकाची वाचनीयता दुणावते.
मुखपृष्ठ आकर्षक आहे. आदिवासी व्यक्ती आणि तिच्या पार्शवभूमीवर गोष्टीच्या संदर्भातले दृष्य असं चित्र आहे. सरदार जाधव ह्यांनी मुखपृष्ठ केलं आहे. पुस्तकाच्या आतही खरे फोटो किंवा किमान रेखाचित्र असती तर अजून प्रेक्षणीय झालं असतं. 

काही वर्षांपूर्वी लेखकाचं झांजिबारी मसाला हे पुस्तक वाचलं होतं आता हे दुसरं. लेखकाचे अनुभव हे सहसा मराठी समाजात न घेतले जाणारे आहेत.
 त्यामुळे त्यांनी लिहित राहावं आणि अशा अनोख्या प्रदेशाची सैर वाचकांना घडवत राहावी.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

ओडिसी (odyssey)



पुस्तक - ओडिसी (odyssey)
लेखक - होमर (Homer)
अनुवादक - प्रणव सखदेव (Pranav Sakhadeo)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Ὀδύσσεια (Odýsseia)
मूळ पुस्तकाची भाषा - प्राचीन ग्रीक
पाने - १८४
प्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन, जुलै २०२६
छापील किंमत - रु. २५०
ISBN - 978-93-47457-06-7

संस्कृत, ग्रीक, लॅटिन, हिब्रू, चिनी सारख्या प्राचीन भाषांमधली ग्रंथपरंपरा अनोखी आहेत. हे साहित्य म्हणजे माणसाच्या सामाजिक बदलाची शब्दरूपातली संग्रहालयंच आहेत. त्यांच्या वाचनातून हजारो वर्षांपूर्वी माणूस कसा होता, समाजव्यवस्था कशी होती हे लक्षात येतं. खानपान, कुटुंबव्यवस्था, राज्यव्यवस्था, नैतिकतेच्या कल्पना, सुखाच्या कल्पना काय होत्या हे समजतं. इतकंच काय, त्यावेळचा माणूस कल्पनाशक्तीची भरारी म्हणून काय अद्भुतरंजक विचार करत होता हे सुद्धा जाणवतं. आपल्या भारतीयांना रामायण-महाभारत-पुराणांचा अद्भुत वारसा मिळालेला आहे. चार वेद आणि ही दोन महाकाव्य यांना जगन्मान्यता आहे. जगभर त्यांचा अभ्यास केला जातो. त्याप्रमाणेच ग्रीक भाषेतील होमर या कवीने लिहिलेली इलियड आणि ओडिसी ही दोन महाकाव्य जगन्मान्य आहेत. त्यामुळे त्यांचं वाचन, ते समजून घेणं सुजाणवाचकाला नक्की आवडेल. मधुश्री पब्लिकेशन आणि प्रणव सखदेव यांनी हे काम आपल्यासाठी अतिशय सोपं केलं आहे. होमरच्या ओडिसी या महाकाव्याचा मराठी अनुवाद त्यांनी आपल्यासाठी प्रकाशित केला आहे. त्यामुळे प्रणवची फेसबुकवर पुस्तकाबद्दल पोस्ट बघितल्या बघीतल्या पुस्तक लगेच विकत घेतलं. आणि पुस्तक वाचून हजारो वर्षांपूर्वीच्या ग्रीसमध्ये भ्रमंती करून आलो.

होमरच्या "इलियड" या काव्यात ग्रीस परिसरातील दोन राज्यांच्या युद्धाचं वर्णन आहे. ट्रॉय चं युद्ध, ट्रोजन हॉर्स हे शब्द कदाचित तुम्ही ऐकले असतील. ग्रीक लोकांच्या राणीला ट्रॉय नावाच्या देशाच्या राजपुत्राने पळवलेलं असतं. तिला परत आणण्यासाठी ग्रीक लोक ट्रॉय वरती हल्ला करतात. हे युद्ध बराच काळ म्हणजे दहा वर्ष चालतं. शेवटी ग्रीक लोकांचा विजय होतो आणि ते आपल्या घराकडे परतू लागतात. त्यांच्या या परतीच्या प्रवासाबद्दलचं वर्णन हे पुढच्या महाकाव्यात म्हणजे "ओडिसी" मध्ये आलं आहे.

या प्रवासाचं वर्णन करण्याचं कारण म्हणजे हा प्रवास साधासुधा झाला नाही. परतीच्या प्रवास सुरुवात झाल्यावर त्यांना वादळाचा सामना करायला लागतो. सैन्याच्या तुकड्या विखुरलेला जातात. ग्रीक लोकांचा एक महत्त्वाचा सरदार म्हणजे ओडिसियस आणि त्याचे सैन्य यांच्यावर आलेली संकटे फारच जास्त होती. त्यांचं झालेलं नुकसान हे सगळं इतरांपेक्षा फारच जास्त होतं. त्याला परत यायला अजून दहा वर्ष लागली. त्या सगळ्याचा तपशील या काव्यात येतो. पण हे प्रवासवर्णन नाही. ओडिसियस ट्रॉयहून निघाला आणि आपल्या "इथाका" राज्यात परतला याची ही डायरी नाही. तर हे काव्य आहे त्यामुळे ट्रॉयच युद्ध संपल्यानंतर दहा वर्षांनी इथाका मध्ये काय चालू आहे इथून वर्णनाला सुरुवात होते. दहा वर्षे झाली तरी ओडिसियस चा पत्ता नाही, म्हणून त्याचा मुलगा त्याच्या शोधार्थ बाहेर पडतो. तो आजूबाजूच्या राज्यांना युद्धात सहभागी असलेल्या लोकांना भेटतो. त्यातून माहितीचे तुकडे त्याला मिळतात आणि वाचकालाही मिळतात. मग दुसरीकडे ओडिसियसचं सध्या काय चालू आहे, कुठे अडकून पडला आहे याचं वर्णन घेतलं. तिथून निघायच्या प्रयत्नात तो जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा त्याने काय काय अनुभवलं याचा तो वर्णन करतो. त्यातून आपल्याला अजून काही गोष्टी समजतात. थोडं आजचं वर्णन, थोडं मागचं, तर कधी एखाद्या भविष्यवेत्त्याच्या पुढचं वर्णन असं करत करत आपल्यासमोर चित्र उभं राहू लागतं.

पण ओडिसियसला अडचणी येतात म्हणजे ते नक्की काय, हे वाचताना आपल्याला ग्रीक लोकांची "देव" ही संकल्पना थोडी थोडी लक्षात येते. भारतात परमेश्वर म्हणजे सर्वशक्तिमान, उत्पत्ती-स्थिती आणि लय करणारा, दयाळू न्यायी अशी संकल्पना आहे. पुराणांमध्ये देव-दानव, देवांचा राजा इंद्र, पाऊस पाडणारा वरुण, समुद्रदेवता, वृक्षदेवता, जलदेवता, वायूदेवता, यक्ष असे वेगवेगळे देवगणही असतात. ग्रीक लोकांची देवता संकल्पना सुद्धा आपल्यासारखीच आहे. समुद्राचा देव पॉसिडॉन. सगळ्या देवांचा प्रमुख झ्यूस. ऑलिंपिया पर्वतावर राहणारे बारा देव, जादू करणाऱ्या पऱ्या, देवदूत, देवपुत्र अशा अद्भुत संकल्पना तिथे आहेत. आपल्या इथल्यापेक्षा त्यांचे देव फारच लहरी आहेत. बळी दिला नाही तर रुसतात...बळी दिला की सुखावतात. माणसाला स्वतःच्या लहरीनुसार मुद्दामून संकटात टाकतात. दोन देवांचं आपापसात भांडण होऊन एक देव माणसाला संकटांत टाकतो तर दुसरा संकटात सापडलेल्या मदत करतो असं सगळं घडू शकतं.

तर या सगळ्या देवगणांच्या आणि पारलौकिक शक्तींच्या लहरीमुळे ओडिसियसला समोर वेगवेगळी आव्हानं उभी राहतात.पॉसिडॉन देवाच्या अवकृपेमुळे समुद्रात मोठ मोठी वादळ येऊन ओडिसीस आणि चमूची जहाजं भटकतात, फुटतात. एक अप्सरा त्याला आपल्या बेटावर कैद करून ठेवते. एक डोळा असणारा महाकाय राक्षस त्यांना गुहेत कोंडून ठेवतो आणि त्याच्या साथीदारांना खाऊन टाकतो. सायरन नावाच्या यक्षिणी गाणं गाऊन त्यांना मोहित करायचा, घरी परत जाणं विसरायला लावायचा प्रयत्न करतात. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यामुळे ओडिसियसला कधी स्वतःच्या शक्तीचा वापर करतो, कधी युक्तीचा वापर करतो. कधी त्याच्या बाजूने असलेली देवपुत्री "अथनी" त्याला चमत्कार करून करून मदत करते. तर कधी काही जादुई वस्तू त्याला मिळतात. लहान मुलांसाठीच्या चेटकिणीच्या, जादूगाराच्या, राक्षसाच्या गोष्टी कशा असतात तशाच साधारण या घटना आहेत. इतकं होऊन अथक परिश्रम करून जेव्हा आवडीचेच परत येतो तेव्हाही त्याचं राज्य बळकवण्यासाठी टपलेल्या लोकांशी त्यांला सामना करावा लागतो आणि शेवट गोड होतो.

रामायण-महाभारताप्रमाणे इथे सुद्धा भरपूर पात्रं आहेत, चमत्कार आहेत. पण तिथल्या तुलनेत इथे नैतिक पेच फार काही नाहीत. रामायण-महाभारतात प्रत्येक पात्र तसं का वागलं, वेगळं वागलं असतं तर काय झालं असतं, वेगळं वागणं परिस्थितीमुळे जमलं असतं का, अशी खूप गुंतागुंत आहे. बरीच उपकथानकं आहेत. धर्म,नीती, स्वभाव, परिस्थतीचा रेटा असे ताणेबाणे आहेत. त्या तुलनेत ओडिसीची रचना ही एकरेषीय आहे. फक्त ते पुढे-मागे, उलट-सुलट करून सांगितल्यामुळे उत्सुकता टिकून राहते. या सगळ्या घटनांना कारणीभूत असलेल्या देवांच्या लहरीपणालाही "आले देवाजीच्या मना" याच्या शिवाय दुसरं उत्तर नाही. 
जागतिक प्रसिद्धीचं हे कथानक तुम्हीही वाचून बघा. त्याचं साहित्यिक मूल्यमापन, टीकात्मक रसग्रहण, इतर महाकाव्यांशी तुलनात्मक विश्लेषण हा पुढचा भाग झाला. पण एकूण वाचायला मजा येते. आता पुढे काय होतंय ह्या उत्सुकतेने मी भराभर वाचत गेलो. व्यक्तींची नावं, ठिकाणं आणि घटना नीट समजून पुन्हा एकदा नजरेखालून घालणार आहे. ओडिसीच्या अद्भुतरम्यतेची चे भुरळ अजूनही लोकांना आहे नुकताच (जुलै २०२६) ख्रिस्तोफर नोलान या प्रथितयश दिग्दर्शकाचा इंग्रजी चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.

काही पानं उदाहरणादाखल

ओडिसियस त्याची गोष्ट सांगायला सुरुवात करतो.



देवी अथिनीचे ओडिसियसला मार्गदर्शन


अनोळखी पण संकटग्रस्त व्यक्तीला भरभरून मदत करण्याची वृत्ती




ओडिसी काव्य आहे म्हणजे मूळ पद्य स्वरूपात असेल असा माझा अंदाज आहे. पण हे पुस्तक गद्य स्वरूपात आहे. प्रणवने केले
लं भाषांतर अतिशय सुगम आणि ओघवतं आहे. मराठी माणसाने ग्रीसवर आधारित एक दीर्घ कादंबरी लिहिली आहे असंच वाटतं. पौराणिक किंवा ऐतिहासिक पुस्तकांत वापरली जाते तशी औपचारिक, संस्कृतप्रचुर भाषा फार न वापरता आजची मराठी वापरली आहे. त्यातून वाचनीयता वाढली आहे. नव्या वाचकवर्गाला भाषांतर जास्त भावेल. त्याबद्दल प्रणवला शंभर टक्के गुण.

पुस्तकात बरीच रेखाचित्र आहेत. भार्गवकुमार कुलकर्णी ह्यांनी मुखपृष्ठ आणि आतली चित्रं काढली आहेत. त्यामुळे पुस्तक देखणं झालं आहे. उदा. वरच्या अथिनी व ओडिसियस भेटीच्या प्रसंगाच्या बाजूला असलेलं चित्र.


या पुस्तकाच्या प्रकाशकांना मला काही सुचवावंसं वाटतं....जर एखाद्या व्यक्तीला ट्रॉय, ग्रीक देवतांची संकल्पना माहिती नसेल तर वाचताना सुरुवातीला गोंधळ होऊ शकतो. ओडिसियस कोण? ट्रोजन कोण? पॉसिडॉन कोण? अथिनी काय? असे प्रश्न पडू शकतील. त्यादृष्टीने सुरुवातीला एक प्रकरण घालून पार्श्वभूमी तयार करायला हवी. ज्यात होमरची माहिती, इलियड मधले प्रसंग, प्रमुख व्यक्तिरेखा ह्यांचा गोषवारा घ्यावा. मुख्य म्हणजे पुस्तकात येणाऱ्या ग्रीक देवता, त्यांचा स्वभाव आणि एकमेकांशी संबंध ही माहिती असायला हवी होती. हे सगळं डोक्यात असेल तर वाचनाची मजा वाढेल. योगायोगाने मी नुकतीच नेटफ्लिक्सवर "ट्रॉय" ही सिरीज बघितली होती त्यामुळे त्यातले काही संदर्भ लक्षात आले. ग्रीक देवतांबद्दल सुद्धा नेटवर थोडं वाचून समजून घेतलं. त्याचा हे पुस्तक वाचताना उपयोग झाला. मूळ ग्रंथ किती मोठा आहे आणि या भाषांतरात तो पूर्ण घेतला आहे का संक्षिप्त, हे पुस्तक मूळ ग्रीक पुस्तकावरून भाषांतरित केलं आहे का इंग्रजी भाषांतरावरून मराठी भाषांतर केले आहे ही माहितीही द्यायला हवी होती. त्यातून त्या पुस्तकाच्या उपयुक्तेत आणि रसग्रहणात भर पडेल.

मी इथे थांबतो. पण तुम्ही ग्रीक ज्ञानदेवता अथिनीला प्रणाम करून हे पुस्तक लवकर वाचायला घ्या !

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

भारत माझ्या नजरेतून (Bharat majhya najaretoon)









पुस्तक - भारत माझ्या नजरेतून (Bharat majhya najaretoon)
लेखक - कोबी शोशानी (Kobbi Shoshaani)
अनुवादक - गौरी जोशी (Gauri Joshi)
भाषा - मराठी
मूळ पुस्तक -
שבעה נהרות שבעה שערים הודו ישראל
(shav'a neharot shav'a sharim hodo yisral)
अर्थ - सात नद्या, सात दरवाजे, भारत, इस्राएल
मूळ पुस्तकाची भाषा - हिब्रू
पाने - २००
प्रकाशन - बुकगंगा पब्लिकेशन, मे २०२६
छापील किंमत - रु. २९९/-
ISBN - 978-93-47786-53-2

एक भारतीय म्हणून भारताचं वर्णन करा असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय लिहाल? किंबहुना काय काय लिहाल? हजारो वर्षांची संस्कृती आणि परंपरा लिहाल. मोठमोठ्या साम्राज्यांचा इतिहास, हजारो वर्षांची आक्रमण आणि त्याला पूर्ण उरलेला भारत हे लिहाल. जाती व्यवस्था सामाजिक अव्यवस्था याबद्दल लिहाल. भारताच्या भाषा, वेशभूषा, खानपान ह्यातलं वैविध्य लिहाल. उत्सवप्रियता हे लिहाल. इतिहासातले महत्त्वाचे टप्पे, प्रमुख व्यक्तिरेखा यांबद्दल लिहाल. कितीही पान लिहिलं तरी भारतासारख्या खंडप्राय देशाचं समग्र वर्णन करणे अशक्यच. अशावेळी भारतात काही वर्ष राहिल्यावर एखाद्या परदेशी व्यक्तीला, "तुला भारत कसा दिसला, तुझ्या मनात भारताची प्रतिमा काय तयार झाली" हे विचारलं तर तो काय सांगेल? आपण भारतीय दुसऱ्याला कसे जाणवतो, वास्तव आणि प्रतिमा यात किती अंतर आहे हे तपासून बघायला आवडेल का? तसं असेल तर "भारत माझ्या नजरेतून" हे पुस्तक वाचलं पाहिजे.

कोबी शोशानी ९० च्या दशकात वर्षभर भारतात होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी २०२१ ते २५ मध्ये इस्रायल देशाचे भारतातील कौन्सिल जनरल म्हणून काम केले. त्यावेळी त्यांचे ऑफिस मुंबईमध्ये होते. परक्या देशातल्या दूतावासात काम करणे म्हणजे दुसऱ्या देशाची सांस्कृतिक, राजकीय, लष्करी जडणघडण तपशीलवार समजून घेणे, तिचा स्वदेशाच्या हितसंबंधाच्या दृष्टीने सकारात्मक वापर करणे, दोन देशातील संबंधात विविध पातळ्यांवर सुधारणा घडवून आणणे. या जबाबदाऱ्या पाडायचा व भारत देश मनापासून समजून घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला. ते करताना भारत कसा दिसला ह्याचे अनुभव त्यांनी पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत.

सुरुवातीच्या काही प्रकरणात ब्रिटिशराज, स्वातंत्र्यलढा, स्वातंत्र्यानंतरच्या महत्त्वाच्या टप्प्यांचा त्यांनी धावता आढावा घेतला आहे. तेव्हा डेव्हिड ससून हे प्रथितयश ज्यू असामी भारतात होते. त्याचाही उल्लेख आहे. भारत आणि इजरायल अगदी लागोपाठ स्वतंत्र झाले त्या दोन्ही देशांच्या विकासाच्या टप्प्यांची ही तुलना कथनाच्या ओघात होते. नेहरू आणि इंदिरा गांधी यांची कार्यपद्धती ही समाजवादी आणि थोडी डाव्या विचारसरणीकडे झुकणारी होती. इस्रायलच्या सुरुवातीच्या काळातल्या नेतृत्वाचीही धारणा अशीच होती. गेल्या काही वर्षात भारतात बदल होऊन उजव्या विचारसरणीकडे नेतृत्व आलं आहे, तशीच परिस्थिती तिकडे आहे. हे समान टप्पे त्यांनी छोटी छोटी उदाहरण देऊन सांगितले आहेत.

भारतात जातीव्यवस्था खोलवर रुजलेली आहे. इस्रायलमध्ये त्या अर्थाने जातीव्यवस्था नाही. मात्र भेदभावाची एक सुप्त जाणीव तिथेही आहे. युरोपातून गेलेले गोरे ज्यू - अश्केनाझी - ज्यू स्वतःला इतरांपेक्षा थोडे वरचे वरिष्ठ मानतात. सरकारमधली महत्त्वाची पदे, महत्वाच्या नियुक्त्या होताना हा भेदभाव दिसतो असे लेखकाचे निरीक्षण आहे. त्याचीही उदाहरणे लेखकाने मनमोकळेपणे सांगितली आहेत.

भारतातील भगवद्गीता रामायण महाभारत हे ग्रंथ, ब्रह्माविष्णूमहेश अशा संकल्पना, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, समाजाच्या चार वर्णांची निर्मितीची पुरुषसुक्तातले वर्णन, वेगवेगळे सण उत्सव यांची मोघम ओळख त्यांनी वाचकाला करून दिली आहे. ज्यू परंपरांमध्ये त्यातलं काय दिसतं ही तुलना आहे. अभारतीय वाचकांसाठी तो भाग उपयुक्त आहे.

"मोदी युग" या प्रकरणात नरेंद्र मोदी आणि इजरायल चे बेंजामिन नेतन्याहू यांची मैत्री, मोदींचा परराष्ट्र धोरणाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन, आलिंगन देऊन नेत्यांना भेटणे, राम मंदिर निर्माण, 370 कलम हटवणे, भारतीय अस्मितेला बढावा देणे अशी मोदी राजवटीची व्यवच्छेदक लक्षणं समजावून दिली आहेत. राम मंदिर निर्माण आणि जेरुसलेम मधील मशिदीचा वाद, काश्मीर आणि पॅलेस्टाईन ह्याची तुलना करून इस्रायली वाचकावर परिस्थितीचं गांभीर्य ठसवलं आहे.

भारताचे अण्वस्त्र धोरण, महत्त्वाचे उद्योजक, मुंबई नगरी याबद्दलच्या प्रकरणात अशाच प्रकारे गोषवारा घेतला आहे. अंबानी-अदानी ही नावं, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडखोरी मुळे झालेले सत्तापरिवर्तन, आदित्य ठाकरे, शरद पवार या सगळ्यांचे मोघम उल्लेख एका परकीय माणसाच्या लिखाणात वाचताना मजेशीर वाटलं. भारतात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या छोट्या बदलाकडेही इतर देशांचं किती बारकाईने लक्ष आहे हे जाणवलं.

भारतातही ज्यू अगदी कमी संख्येने का होईना राहतात. कोकण परिसरात राहणारे बेने इस्रायली आणि केरळातील कोचीन ज्यू यांची माहिती पुस्तकात आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात ज्यूधर्मीयांच्या नरिमन हाऊसला लक्ष्य करण्यात आलं होतं. त्या प्रसंगाला या पुस्तकात स्थान मिळणं अपेक्षितच होतं. मुंबईत आल्यावर लेखकाने त्या स्थळालाही भेट दिली. त्याचंही वर्णन आहे. ज्यू वारसा टिकवण्याचे सरकार आणि सामाजिक संस्थांचे प्रयत्न चालू आहेत. त्याबद्दल काही परिच्छेद आहेत.

भारतीय समाजाचं वर्णन अजून व्यापक करताना "बॉलिवूड" प्रकरणात महत्त्वाचे कलाकार कोण, त्यांची लेखकाने घेतलेली भेट, काश्मीर फाईल चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्यामुळे झालेला वाद हेही पुस्तकात आहे. दोन देशातल्या लोकांचे परस्पर संबंध यावेत एकमेकांना समजून घ्यावं यासाठी लेखक वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना हजेरी लावतो, लोकांची संवाद साधतो, त्याबद्दल समाज माध्यमांवर लिहितो त्याची उदाहरणे दिली आहेत.

उपसंहार या भागात लेखकाने इजरायली परराष्ट्र मंत्रालयाचे कामकाज, राजदूतांची नियुक्ती, पदोन्नतीची प्रक्रिया याबद्दल त्याला जाणवलेल्या समस्या आणि नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य वाचकाला तो भाग फार समजेल असं वाटत नाही.

काही पाने उदाहरणादाखल.
अनुक्रमणिका

स्वातंत्र्यलढ्याच्या धावत्या आढाव्यातली दोन पाने. गांधी, जिना, मोपले, नाविकांचे बंड अशा विविध पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न.


लेखकाचे जनसंपर्काचे प्रयत्न

अमीर खान बरोबर फोटो काढल्याने टीका आणि काश्मीर फाईल बघितल्याबद्दलही टीका. बदलत्या सामाजिक जाणिवांचा प्रत्यक्ष अनुभव.



लेखकाची निवेदनशैली थेट आहे. फार आडपडदा ठेवून लिहिलेलं नाही. तरीही "सामान्य ज्ञान" ह्या सदरात मोडेल अशीच माहिती आहे. वादग्रस्त ठरेल किंवा खूप आतली बातमी असं काही नाही. बरेच मुद्दे सांगायचे असल्यामुळे निवेदनाचे रूळ खटाखट बदलतात. त्यामुळे वाचताना सतत अडखळायला होतं. उदा., एका परिच्छेदात आपण योगा बद्दल वाचत असतो आणि अचानक पुढच्या परिच्छेदात खेळाबद्दल वर्णन येतं आणि ते दोन परिच्छेद संपतायत न संपतायत तोच, लेखक आणि एका सायकलपटूच्या भेटीची चार वाक्य येतात. त्याऐवजी छोटे छोटे परिच्छेद करून, एकेक उपशीर्षक दिलं असतं तर वाचनीयतेत भर पडली असती.

मराठी भाषांतर ठीक झालं आहे. बऱ्याच वेळा इंग्रजी वाक्यरचना तशीच ठेवून भाषांतर केलं आहे असं वाटतं. शब्दरचना चुकीची नाही पण त्यात मराठी आत्मा गवसत नाही. सतत हे वाक्य इंग्रजीत कसं लिहिलं असेल हे लक्षात येत राहतं. त्यामुळे मुळातच विस्कळीत असलेल्या मजकुरात अजूनच ठेचकाळायला होतं.

हे पुस्तक मुळात इस्रायली लोकांना भारताची ओळख करून देण्यासाठी आहे. त्यामुळे मराठी वाचकाला त्यात भारताबद्दल काही नवं सापडणार नाही. इस्रायलबद्दल थोडी माहिती कळेल. तो ऐवज खूप मोठा आहे असं नाही. तरी भारताबद्दल इतर लोक काय विचार करतात हे वाचायचं असेल तर हे पुस्तक वाचा.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

ज्युलियस सीझर (Julius Caesar)

पुस्तक - ज्युलियस सीझर (Julius Caesar) लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare) अनुवाद - शिरीष सहस्रबुद्धे (Shirish Sahasrabuddhe) भाष...