झी मराठी दिशा (Zee Marathi Disha)




झी मराठी या लोकप्रिय मराठी दूरदर्शन वाहिनीने "झी मराठी दिशा" हे नवीन साप्ताहिक नुकतेच सुरु केले. साप्तहिकाच्या अनावरणाच्या बतमीपासून हे सप्ताहिक कसे आहे हे बघायची इच्छा होती. काल अंक विकत घेतला. छान वाटला. म्हणून माझी परीक्षणे वाचणाऱ्यांनाही या साप्ताहिकाची ओळख करून द्यावी असं वाटलं.




विजय कुवळेकर याचे संपादक आहेत. हे साप्ताहिक टॅब्लॉईड आकारातलं आहे. मिडडे, महानगर, मुंबई मिरर ही वृत्तपत्रं असतात तसं. मासिक (magazine या अर्थी) असलं तरी त्याला मुखपृष्ठ-मलपृष्ठ नाही. थेट पहिल्या पानापासून मजकूर आहे. आणि मजकूर आहे हेही विशेष हल्ली कुठल्याही पेपरच्या पहिल्या पानावर बहुतेक गृहप्रकल्पांचीच जाहिरात असते.

४४ पानांच्या या अंकाची किंमत १०रु. आहे. आणि त्यात बरेच वाचनीय लेख आहेत. त्यातील काही लेख आणि लेखकांची नावे उदाहरणादाखल.

या अंकातील लक्षवेधी लेख:
  • राम सेतू सत्य की मिथ्या - बाळ फोंडके
  • वसईतला मराठी नाताळ - स्टॅन्ली गोन्साल्विस
  • एकाकी (इंदिरा गांधींच्या व्यक्तीमत्त्वाचा वेध घेणारा लेख)-नरेंद्र चपळगावकर
  • फोन मेमरी रिकामी करायचीय - प्रशांत जाधव
  • आजगावकर नावाचे साने गुरुजी - डॉ. सागर देशपांडे
  • लाल मातीत फुलले वसुंधरेचे विज्ञान - समीर कर्वे - मराठी विज्ञान परीषदेच्या कुडाळ इथल्या अधिवेशनाविषयी
  • गुंतवणुकीतील पथ्ये - नयना एन. एन.





साप्ताहिकात काही आठवडी किंवा पाक्षिक सदरंही आहेत. जिथे सदर आहे असा उल्लेख आहे किंवा हा एकवेळचा लेख नसून सदर आहे असं मला वाटलं ती सदरे अशी :

  1. चौकातील चर्चा - "बहिर्जी बातमीदार- चालू घडामोडींवर विनोदी खुसखुशीत भाष्य
  2. माईंड इट - रजनी म्हणे - नर्मविनोदी धारावहिक कादंबरी
  3. दिग्गज - दीपा देशमुख, अच्युत गोडबोले - त्या त्या महिन्यात जन्म/मृत्यु झलेल्या असामन्य व्यक्तींची अल्पचरीत्रे
  4. ललित - सुरेश खरे
  5. मधुरव - मधुरा वेलणकर - अभिनेत्री मधुरा वेलणकरच्या मनमोकळ्या शैलीतील सदर
  6. आत्मविकास - स्वामी मकरंदनाथ - पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या शिष्य परंपरेतील लेखकाचे खास तरूणांसाठीचे सदर. या वेळचा विषय "व्यवहार सांभाळून परमार्थ"
  7. सूर नवा - कमलेश भडकमकर - नवोदित, होतकरू गायक गायिकांचा परिचय
  8. गोष्ट गाण्याची - प्रभा जोशी - लोकप्रिय अजरामर गाण्यांमागच्या गोष्टी
  9. आजचा सिनेमा - जयंती वाघधरे - चित्रपट समीक्षा
  10. गावोगावचे शायर - प्रदीप निफाडकर- ठिकठिकाणच्या बेहतरीन शायरांना पेश करणारे सदर
  11. अर्थविचार - - हे गुंतवणूक, कर इ.ना दिलेले पान आहे.
  12. मोठ्यांचे बालपण- - प्रथितयश व्यक्तींच्या बालपणात डोकावणारे सदर
  13. इतर ग्रहगोलांवरचे जग - डॉ. प्रकाश तुपे - खगोलशास्त्रावरचे सदर
  14. आरोग्यसंपदा - वैद्य अश्वीन सावंत - आयुर्वेदिक सल्ले
  15. स्पर्धा परीक्षा - रोहिणी शहा - स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मूलभूत संकल्पना समजावून देणारे सदर
  16. ऑटिझमच्या बेटावर - आशा कबरे मटाले - ऑटिझम विषयीचे सदर
  17. बाळबोध - सुनृता सहस्रबुद्धे - लहान मुलांच्या मोठं होण्याची प्रक्रिया समजावून सांगणारे सदर
  18. कविता - वाचकांनी स्वरचित कविता पाठवायच्या आहेत







लहान मुलांसाठीची सदरे:

  1. गोष्ट .. अर्धी तुमची अर्धी आमची - - नामवंत साहित्यिक अर्धी गोष्ट लिहितील. मुलांनी ती पूर्ण करून पाठवायची. मूळ लेखक परीक्षण करून विजेते ठरवतील. विजेत्यांना पारितोषिक आहे.
  2. चित्र रंगवून पाठवायची स्पर्धा.
  3. बालकिशोर - लहान मुलांसाठी छोट्या गोष्टी, सामान्य ज्ञान

इतर: व्यंगचित्रे (हास्यदिशा - श्रीनिवास प्रभुदेसाई ), शब्दकोडे, राशीभविष्य, बॉलिवूड बातम्या गप्पा, क्रीडाविषयक (बातम्या,विश्लेषण,लेख), वाचकांचा प्रतिसाद इ. आहेच.

सुटसुटीत छपाई, रंगित-कलात्मक मांडणी असली तरी झगमगित/गुळगुळीत कागदाचा वापर केलेला नाही हे पण मला आवडलं. नाहितर ट्युबलाईटच्या उजेडात वाचताना त्रास होतो. रोजच्या वर्तमानपत्रातली नकारात्मकता टाळून चांगलं वाचायला मिळतंय हाही चांगला भाग आहे. झी मराठीचं प्रकाशन असलं तरी वाहिनीवरच्या मालिकांची जाहिरात किंवा त्यांचा उदोउदो कुठेच दिसला नाही.

एकूणच ४४ पानी साप्ताहिकात लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत, गंभीर विषयांपासून हलक्याफुलक्या लेखांपर्यंत, ज्ञान, विज्ञान, साहित्य, संगीत, अर्थकारण, समाजकारण, शेरोशायरी, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन, आरोग्य अशा आपल्या जगण्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक पैलूबद्दल काही ना काही आहेच. लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, चित्रलेखा यांसारख्या प्रसिद्ध मासिकांच्या यादीत "झी मराठी दिशा" स्थान मिळवेल हे निश्चित. ज्यांना मासिकवाचन आवडते त्यांना आवडेलच पण ज्यांना पुस्तकं वाचायला कंटाळा येतो, खूप वाचायला कंटाळा येतो त्यांना हे वाचन सोपं, सुटसुटीत आणि तरीही ज्ञानवर्धक वाटेल. 

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------
तांत्रिक/औपचारिक माहिती

Serve to win (सर्व टू विन )




पुस्तक : Serve to win   (सर्व टू विन )
लेखक : Novak Djokovic  (नोवाक जोकोविच)
भाषा : English (इंग्रजी )
पाने : १६१
ISBN : 978-0-552-17053-6

यशस्वी आणि महान टेनिस खेळाडूंपैकी एक गणला जाणाऱ्या नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने आपल्या यशामधील आहाराच्या भूमिकेबद्दल हे पुस्तक लिहिलं आहे. जोकोविच एक व्यावसायिक खेळाडू म्हणून आवश्यक तो आहार, व्यायाम, सराव सर्व काही करत होता. तरीही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये अटीततीच्या प्रसंगी गळून जाणं, डोळ्यापुढे अंधारी येणं, एकाग्रता पूर्णपणे गमावणं या समस्यांमुळे सर्वोच्च श्रेणीतील यश त्याला नेहमी हुलकावणी देत होतं.

अशा वेळी एका सर्बियन डॉक्टरने त्याला आहारात बदल करायचा सल्ला दिला. "ग्लुटेन" टाळायचा सल्ला दिला. "ग्लुटेन" अर्थात गव्हामधील ते प्रोटीन ज्यामुळे गव्हाच्या पदार्थांना घट्टपणा येतो. मराठीत ज्याला आपण "पिठाची विरी" म्हणतो त्याचं कारण "ग्लुटेन" असावं. तर हे ग्लुटेन टाळण्याचा बदल केल्याने त्याला चमत्कार वाटावा असा फरक दिसला. आणि १८ महिन्यांच्या आत विंबल्डन मध्ये नडालला हरवत अजिंक्यपद मिळवलं.

गहू हा सगळ्यांच्याच आहारातला मुख्य घटक त्यामुळे ग्लुटेन सगळ्यांच्या आहारात मोठ्या प्रमाणावर आढळते. म्हणूनच वाढते वजन, अस्वस्थता, एकाग्रतेचा आभाव, चपळतेचा अभाव इ. दिसून येते असा त्याचा (आणि त्याविषयीच्या संशोधकांचा ) दावा आहे.  ग्लुटेन सारख्या आहारातल्या कितितरी ज्ञात ज्ञात घटकांचं आणि आपल्या प्रकृतीचं वावडं असू शकतं. रक्त चाचणीतून ते नक्की करता आलं की ते घटक टाळणारा आहार घेतला की प्रचंड फरक पडतो असा विचार पुस्तका मांडला आहे.

ग्लुटेन टाळायचं म्हणजे आहारातला हा मुख्य घटकच टाळायचा. असं करणं शक्य आहे का? जोकोविचचं म्हणणं आहे "हो, हे शक्य आहे". ग्लुटेन विरहित आहारासाठी त्याने काय केलं हे सविस्तर सांगितलं पुस्तकात आहे. ग्लुटेन विरहिततेबरोबरच कॅलरीजवर नियंत्रण, सर्व जीवनसत्त्वांचा समावेश या पैलूंवरही प्रकाश टाक्ला आहे. आठवडाभराचे पूर्ण आहारपत्रक आणि कितितरी पदार्थांची कृतीपण दिली आहे.


आहाराला जोडीने वार्म-अप आणि स्ट्रेचिंग व्यायामप्रकार, झोपेचं-विश्रांतीचं महत्त्व, मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग आणि ध्यानाचे महत्त्व, यशामध्ये कुटुंबिय, प्रशिक्षक यांचा वाटा याबद्दलही छान माहिती दिली आहे. जेवणापूर्वी प्रार्थना म्हणने, झोपण्यापूर्वी मन शांत करणे, सेंद्रिय-रसायनविरहित अन्न खाणे, मुक्त वातावरणात वाढलेल्या प्राण्यांचे मांस खाणे इ. नेहमीचे सल्ले ही आहेत.

अनुक्रमणिका :



आहार-विहार-विचार-व्यायाम-विश्रांती ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे ही "थेअरी" आपल्या सगळ्यांना माहिती असते. पण ... कळतं पण वळत नाही. या पुस्तकाच्या वाचनातून त्या थेअरीची उजळणी होईल. "ग्लुटेन फ्री" ही नवी संकल्पना कळेल. जोकोविचचं म्हणणं आहे की "तुही १४ दिवस हे करून बघा. तेवढा निग्रह ठेवा. तुमच्या वजनात, चपळतेत, उत्साहात तुम्हालाच इतका बदल जाणवेल की पुढे त्याचं नक्कीच पालन कराल".

आहाराबद्दल तुम्ही आधी काही वाचलं नसेल तर तुम्हाला या पुस्तकातून आहाराकडे बघण्याची नवी दृष्टी लाभेल. आहाराबद्दल बरंच वाचलं असेल तर कदाचित "ग्लुटेन-फ्री" एवढीच नवीन संकल्पना यातून समजेल. जोकोविचच्या थाळीत डोकावायची संधी मिळाळ्याने नवनवीन आरोग्यदायी पदार्थ कळतील. एक यशस्वी खेळाडू किती मेहनत घेतो, किती काटेकोरपणे प्रत्येक गोष्ट करतो याचीही उजळणी होईल. स्वतःतही शारिरिक, मानसिक बदल घडवण्यासाठी प्रेरणा मिळेल.


(ता.क. : १४ दिवसांनंतर माझं वजन किती कमी झालं विचारू नका :p :p :p )

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

संस्कृतिसंचित (Sankrutisanchit)






पुस्तक : संस्कृतिसंचित (Sankrutisanchit)
लेखिका : दुर्गा भागवत (Durga Bhagwat) 
संपादन : मीना वैशंपायन (Meena Vaishampayan)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २५६
ISBN : 978-93-82364-38-2

दुर्गाबाई भागवत यांच्या वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये पूर्वी प्रकाशित झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे. लोकगीते, लोककथा यांचा त्यांनी केलेला संग्रह आणि त्याचे विश्लेषण हे या लेखांचे मुख्य विषय आहेत.

अनुक्रमणिका




मराठी, प्राकृत, पाली या भाषांमधील गीतं, कथा यांचे संदर्भ या लेखांत आहेत. तसंच छत्तीसगड, छिंदवाडा, बंगाल, सातपुड्यातील गोंड, भिल्ल, कोरकू इ. आदिवासींच्या कथा, गीतं आणि चलिरिती यांचंही विश्लेषण आहे. 

हे पुस्तक म्हणजे या कथा किंवा गीतांचा संग्रह नाही. तर या लोकसाहित्याची साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक चिरफाड आहे. वैदिक, पौराणिक संकल्पना आणि या कथांचा संबंध काय , या दोन परंपरंचा एकमेकांवर होणारा परिणाम काय इ. ची चर्चा आहे. काही लेखांबद्दल थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला कल्पना येईल.

मोर या लेखात वेगवेगळ्या व्यक्तींच्या काव्यात मोराचा कसा उल्लेख येतो, त्याच्या बद्दलच्या दंतकथा काय आहेत याची जंत्री आहे. 
"पिवळीच मी पाकोळी की" मध्ये वैदिक काव्यापासून लोकसाहित्यापर्यंत सगळिकडे भुंगा आणि पतंग यांच्याच उपमा सारख्या आहेत पण नेहमी दिसणारे फुलपाखरू मात्र कुठेच आढळून येत नाही हे सिद्ध केलं आहे.
सीता हे पात्र रामायणखेरीज अनेक लोककथांतून दिसतं आणि त्याचा संबंध सुपिक जमिनीच्या रूपकाशी कसा आहे हे "कृषिदेवता सीता"त सोदाहरण स्पष्ट केलं आहे. 
तुळशीच्या कुठल्या कुठल्या कथा प्रचलित आहेत आहेत आणि त्यात कशी परंपरांची मिसळण आहे हे त्यावरच्या लेखात दिलं अहे. 
"आदिवासींचे आमच्या जीवनातील स्थान" या लेखात आदिवासी आणि ग्रामीण-नागरी हिंदू यांच्या चालिरिती वेगळ्या असल्या तरी त्यांच्यात वैर नव्हते. दोन्ही समजांचचा एकेमेकांशी संबंध आला तेव्हा परंपरांमध्येही एकेमेकांचा प्रभाव पडला. पण ख्रिश्चन मिशनरींच्या धर्मांतरणातून या सहजीवनाला छेद जाऊन संघर्षाचे रूप येत आहे हा धोका त्यांनी १९५० सालच्या लेखात मांडला आहे. 
भोंडल्याच्या-हादग्याच्या गाण्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न केला आहे. 
"गाथासप्तशती" मध्ये प्रेमगीतं, विरहगीतं, शृंगारगीतं अहेत आणि संस्कृत साहित्यात दिसणारे स्त्रीपुरुषसंबंधातले नीतीनियम या काव्यात कसे दिसत नाही आणि त्याकाळी प्रेम-श्रुंगार य भावनांना सहित्यात स्थन होतं असं विष्लेषण "प्राचीन मराठी भावगीते" लेखात आहे. 

एकूणच हे पुस्तक दुर्गाबाईंच्या चौफेर संशोधनाचा आणि त्यासाठी आवश्यक चौफेर ज्ञान-माहिती संकलनाचा अवाका आपल्यसमोर उघड करतो. देव संकल्पना, नीतीनियम कसे कसे ठरत गेले असतील, बदलत गेले असतील याची जाणीव आपल्याला होते. 

पुस्तक संशोधनात्मक, विष्लेषणात्मक असल्याने भाषा बरीचशी जड, संस्कृतसंज्ञाप्रचुर असणारी आहे. लोककथांमध्ये पण इतक्या काल्पनिक आणि चमत्काराच्या गोष्टी अहेत की त्या वाचतान प्रौढ वाचकला काही मजा येणार नाही( पण जर तुम्ही रजनीकांत, बाहुबली वगैरेंचे चहते आसाल तर मात्र तुम्हाला आवडतील :) ). त्या बोधकथाही नाहीत.  

लोकगीतं, लोककथा हा ज्यांचा खूपच जिव्हाळ्याचा विषय नाही किंवा संशोधनाचा विषय नाही त्यांना पुस्तकातली चर्चा नीरस वाटू शकते.  म्हणूनच हे पुस्तक लोकसाहित्यप्रेमींसाठी नसून लोकसाहित्यसमीक्षाप्रेमी किंवा लोकसाहित्यसंशोधकांसाठी आहे असं मला वाटतं.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------


मोडी लिपीतील पहिले ईबुक आणि मोडीलिपीचा फाँट तयार करण्याचा प्रवास



मराठी भाषेतील पण मोडी लिपीतील जगातील पहिलेच ईबुक नुकतेच वाचले.  जयसिंगराव पवार लिखित "राजर्षी शाहू छत्रपती महाराज" हे पुस्तक नवीनकुमार माळी यांनी मोडी लिपीत लिप्यंतरित करून ईबुक स्वरूपात सादर केले आहे.

आधी पुस्तकातल्या मजकूराबद्दल थोडं सांगतो आणि मग "मोडीतले  पुस्तक" या त्याच्या वैशिष्ट्याबद्दल सविस्तर सांगतो.  ईपुस्तकाची शंभर पाने असली तरी छापील पुस्तक पाठपोट 50-60 पाने भरेल. या छोटेखानी पुस्तकात शाहू महाराजांच्या कार्याची थोडक्यात ओळख  करून दिली आहे. शाहू महाराजांबद्दल समजून घेण्यासाठी पाहिले पाऊल म्हणून हे पुस्तक वाचणं अगत्याचे ठरेल.

अनुक्रमणिका :




मोडी लिपीच्या प्रचारासाठी नवीनकुमार अतिशय समर्पित भावनेने आणि कल्पकतेने (dedication and innovation) काम करत आहेत. मोडी शिकवणाऱ्या त्यांच्या "मोडी लिपी शिका सरावातून (Modi Script Learn & Practice" पुस्तकाची ओळख काही दिवसांपूर्वी मी करून दिली होती ( http://kaushiklele-bookreview.blogspot.in/2017/10/modi-script-learn-practice.html ). मोडी मुळाक्षरे शिकल्यावर विद्यार्थ्याला मोडीत वाचन सराव करता यावा या उद्देशाने त्यांनी हे ईपुस्तक तयार केलं आहे. ईपुस्तक तयार करायचे तर त्यासाठी मोडीत टायपिंग करता आलं पाहिजे. टायपिंग करायचं तर त्यासाठी मोडी फॉन्ट पाहिजे. या आधी काही व्यक्तींनी असे फॉण्ट बनवायच्या प्रयत्न केला होता पण त्या फॉन्ट मध्ये काही ना काही त्रुटी होत्या. पुस्तकात खूप वेगवेगळे शब्द - लिहायला किचकट, जोडाक्षरे असणारे- असेही येतात. तसंच मोडीत 'र' हे अक्षर शब्दातील आधीच्या शब्दाला जोडून लिहायची पद्धत आहे ज्याला 'र'ची करामत म्हटले जाते . उदा.




ही "र ची करामत" आणि जोडाक्षरे फॉन्ट मध्ये आली तरच मोडी फॉन्ट लिखित मोडीच्या जवळ जाणारा ठरणार होता. त्यामुळे एका परिपूर्ण फॉन्ट ची आवश्यकता होती. नवीनकुमार यांनी स्वतःच्या वेळेची, पैशाची आणि मेहनतीची गुंतवणूक करून हे काम पूर्ण केले आणि त्यानंतर आपल्यासाठी हे ईपुस्तक सिद्ध झाले. नमुन्यादाखल त्यातलं पाहिलं पान  

हे काम वाटतं तितकं सोपं आणि पटकन होण्यासारखं नव्हतं हे मला जाणवलं म्हणून मी नवीनकुमारांना त्यांचा या प्रयासाबद्दल सविस्तरपणे लिहायला सांगितलं. माझ्या आग्रहाला मान देत त्यांनी या प्रयासाबद्दल मोकळेपणे लिहिलं आहे ते त्यांच्याच शब्दात आपण पुढे वाचा. त्यांच्या प्रयत्नांना सुज्ञ वाचक नक्कीच दाद देतील, इतरांना याबद्दल सांगून मोडी प्रसारासाठी आपला हातभार लावतील याची खात्री आहे.
---------------------------------------------------------



मोडीलिपीचा फाँट तयार करण्याचा माझा प्रवास : नवीनकुमार माळी 

मोडी ही भारताची वैभवशाली लिपी आहे, ही जवळपास ६००-७०० वर्षे हस्तलिखीत होती, सदरच्या मोडी लिपीचे ऐकविसाव्या शतकात फाँट उपलब्ध झाले आहेत, पण काही मोडी तज्ञांचे मत होते की सध्या उपलब्ध असलेल्या फाँटमध्ये काही त्रुटी आहेत, त्यामध्ये मोडीचे खास वैशिष्ट्ये असलेली ’’र’’ च्या करामतीची अक्षरे खुप कमी आहेत, त्यात अजुन वाढ होण्याची गरज आहे. मोडीला नव्या फाँटची गरज आहे असे कळल्यावर मी कामाला लागलो. मॉड्युलर इन्फोटेक प्रा. लि(श्री लिपी) पुणे, यांच्या कार्यालयात पोहचलो. भारतातील बहुसंख्य भाषेचे फाँट श्री लिपीने तयार केलेले आहेत, त्यांनीही काही वर्षापूर्वी मोडी लिपीचा फाँट तयार करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना त्यामध्ये यश प्राप्त झाले नव्हते.
            
मी स्वत: हा विचार त्यांच्याकडे घेऊन गेल्यामुळे, श्री. निशिकांत आपटे सरांना आनंद झाला, कारण त्यांनी अर्ध्यावर सोडलेला मोडी लिपीच्या फाँट निर्मितीचे  काम परत सुरु होणार होते. श्री लिपी बरोबर सर्व व्यवहारीक बाबींचे बोलणे संपवून आम्ही फाँट निर्मीतीचे काम सुरु केले. श्री लिपीने पहिली मुळाक्षरे एका महिन्यात तयार केली. फाँटचा पहिला टाईप तयार झाल्यावर, मी मोडी तज्ञांना दाखविला. प्रत्येक मोडी तज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे योग्य बदल करुन परत एक टाईप तयार केला. पण परत काही तज्ञांच्याकडून सूचना आल्या की सदरच्या फाँटमध्ये ‘‘र‘‘ च्या करामतीची अजुन जास्त अक्षरे असतील तर अजुन चांगले होईल, मग परत तशी अक्षरे त्यामध्ये वाढवलीत. मोडी हस्तलेखनात ’’र’’ ची करामत वापरुन लिहिणे हे सहज शक्य आहे, पण तेच ज्यावेळी फाँटमध्ये वापरासाठी लिहावे लागते त्यावेळी त्याच्यापाठीमागे खूप मोठे इंजिनिरींग असते. जर एखाद्या अक्षरामध्ये बदल वा वाढ करायची असेल तर तीन–तीन विभागात काम करावे लागत असे. एका अक्षरावर तीन विभागात काम करणे अवघड नाही पण तीन विभागातील लोकांशी गोड बोलून त्यांना त्याच अक्षरावर परत कार्य करण्याची मानसिकता तयार करणे, तसेच त्या कामाची व्यवहारीक बाजूही बघणे हे महत्वाचं काम मला करावे लागे.
            
संपूर्ण फाँट तयार झाल्यावर परत सर्व तज्ञांना दाखवून घेतला. तरीही त्यामध्ये खूप चुका राहिल्या होत्या, कारण मोडीलिपीची अक्षरे ही हस्तलिखीत असल्याने बरेच वळणप्रकार अस्तित्वात होते, तसेच वेगवेगळ्या लेखणशैली मोडीलिपीत प्रचलित होत्या. तसेच मोडीचा वापर हा ६००–७०० वर्षापासून होत असलेने त्यामध्ये प्रत्येक कालखंडाप्रमाणे अक्षरांच्या लेखन पद्धतीमध्ये बदल झालेला आढळतो. मोडी लिपीचा वापर यादव कालखंडापासून सुरु झाला, पुढे शिवकाळातही मोडीचा वापर खूप झाला, पेशवेकाळात मोडीला बहर आला. एखादे अक्षर एका कालखंडात जसे लिहिले जाते त्यामध्ये पुढील कालखंडात थोडा वा जास्त बदल झालेला आढळतो. असे बदल काही अक्षराबाबतीत कमी जास्त प्रमाणात पाहण्यास मिळतात. मग नेमका कोणत्या कालखंडातील अक्षरांचा फाँट तयार करायचा हा यक्ष प्रश्न उभा राहिला होता.
            
पेशवेकाळात मोडीला बहर आलेला होता व बरीच अक्षरे कशी लिहिली पाहिजेत यासाठी काही पद्धती ठरल्या होत्या. तसेच पेशवेकाळातील मोडी अक्षरलेखन हे कोरीव, आणि सहज वाचता येईल असे होते. मग असे ठरले की पेशवे काळात वापरात असलेल्या लेखन पद्धतीचा व अक्षरांचा वापर करुन फाँट तयार करावा. मग परत सगळा तयार झालेला फाँट बदलून घेतला. त्यात ’’र’’ ची करामत वापरुन तयार केलेली अक्षरे वाढवली. मोडी लिपीचा SHREE_MODI_2100  हा फाँटमध्ये अचुक बदल करण्यासाठी श्री.राजेश खिलारी (जागतीक मोडी लिपी प्रसार समिती, मुंबई) यांनी पुण्याला प्रत्यक्ष श्री लिपी कार्यालयाला भेट देऊन मार्गदर्शन केले होते.
            
सदरचा फाँट पूर्ण होण्यास जवळपास सहा–सात महिन्याचा कालावधी लागला, व या दरम्यान मी कोल्हापूर–पुणे–कोल्हापूर असे कमीत कमी २० ते २५ वेळा ये–जा केली आहे. सदरचे कार्य करताना अनेक अनुभव आले, प्रत्येकांच्या सूचना समजून घेणे, त्याप्रमाणे फाँट मध्ये बदल करुन घेणे व त्यासाठी लागणारी व्यवहारीक बाजूची काळजी घेणे यासाठी सगळे कौशल्य पणाला लागले होते. मोडीमध्ये एकाच अक्षरांचे विविध लेखनप्रकार असतात. सगळेच सगळ्यांनाच माहित असतील असे नसते. तशा स्वरुपाच्या दस्तऐवजांचे वाचन जर त्या अभ्यासकाकडून झाले असेल तरच ते अक्षर त्यांना माहित असते, पण एखाद्या अभ्यासकच्या वाचनात जर ते अक्षर आले नसेल तर ते अस्तित्वातच नव्हते असे नसते. अशा बाबी माझ्यापेक्षा अनुभवी अभ्यासकांनी नजरेस आणून दिल्यावर त्यांना सदरचे संदर्भ द्यावे लागत असत. तसेच मी मोडीचा अभ्यासक आहे म्हणजे मलाही सगळ्याच बाबी माहितच आहेत असे नाही. म्हणूनच मी महाराष्ट्रातील मोडी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच फाँट तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.  
           
‘‘मोडी लिपी-शिका सरावातून‘‘ या पुस्तकात मी लिहलेल्या वर्णमालेतील अर्धस्वरांची चूक मला जवळपास सगळ्यांनीच दाखविली. मला माझ्या चुका दाखविल्याबद्दल मला किचिंतही राग नाही, उलट एखादी व्यक्ती ज्यावेळी आपल्याला आपली चूक दाखवते वा सूचना सांगत असते त्यावेळी आपल्या कार्यातच सुधारणा होणार असते. पण मराठी वर्णमालेतील अर्ध स्वरा बाबत बोलायचे झाले तर चूक कोणाची हेच नेमकं समजत नाही. महाराष्ट्रात नव्याने प्रकाशीत झालेल्या ९८% मराठी वर्णमालेत अर्धस्वर चूकीच्या पद्धतीने लिहिलेले असतात. मूळ स्वरातूनच त्यांचे अर्धस्वर उत्पन झाले, त्यांचा क्रमही मुळ स्वराप्रमाणेच असतो हे व्याकरण सांगते. जुन्या संदर्भ पुस्तकात ही गोष्ट पाहण्यास मिळते. मूळ स्वर इ–ई, उ–ऊ, ॠ, लृ यांचे अर्धस्वर म्हणून य, व, र, ल वापरतात. पण अलिकडे महाराष्ट्रात प्रकाशित झालेल्या बहुतांश पुस्तकात अर्धस्वर हे य, र, ल, व असे चुकीचे लिहिलेले असतात. असे का असते, वा कोणत्या वर्षी व कोणत्या पुस्तकापासून ही पद्धत सुरु झाली हा एक संशोधनाचा विषय आहे. पण बहुधा पाठांतर करताना सोपे म्हणून य, र, ल, व असा चूकीचा क्रम झाला असावा असे वाटते. पण लिहिताना वा छापताना तरी योग्य क्रम पाहिजे होता, पण असे झालेले आढळत नाही.

पुस्तकात सरावासाठी अक्षर गिरवण्याची दिशा दाखवावी अशी सुचना आली, जी मलाही योग्य वाटली व सदरचा बदल तसेच अशाच योग्य सूचनांप्रमाणे दूसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होईल. हस्तलेखनाला कोणत्याही मर्यादा नसतात, ते आपण कसेही लिहू शकतो; पण फाँटला मर्यादा पडतात कारण एका अक्षराच्या बदलामूळे संपूर्ण फाँटमध्ये पुढील बरेच बदल होत असतात. त्यामुळे आजही काही अभ्यासकांना असे वाटत असेल की एखाद्या अक्षराचा आकार वा उकार असा नसून तसा पाहिजे होता पण काही तांत्रिक बाबीमुळे मोडी फाँटला काही मर्यादा पडतात. तरीही जास्तीतजास्त तज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच सदरचा अचुक फाँट तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजुनही यामध्ये सुधारणेला वाव आहे, व फाँटच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये हे बदल केले जातील. हे लगेचच शक्य करण्यास व्यावहारीक बाब महत्वाची ठरते. त्यात कालबाह्य झालेल्या या मोडी लिपीमधुन केलेल्या गुंतवणुकीचा परतावा कधी मिळेल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून यात जास्त लोक गुंतवणीकीसाठी तयार होत नाहीत. मी हे धाडस केले पण माझ्या एकाही जवळच्या मित्रांनी मला या गोष्टीला मानसिक पाठींबा दिला नाही. उलट ते मला सांगत होते की असे काही करण्यात आजीबात वेळ व पैसा वाया घालवू नकोस. पण मी मला जे योग्य वाटले व जसे ठरविले तसेच मी केले. मी केलेल्या कामाचे पूर्ण समाधान मला आहे.


’’राजर्षी शाहू छत्रपती महाराज ’’ हे पुस्तक प्रथम ई-पुस्तक प्रकाशित करावे असे वाटले होते. याचे कारण आज प्रत्येकजण मोबाईल व इंटरनेटशी जोडलेला आहे. परत पुस्तक स्वरुपात जर एखादे पुस्तक वितरीत करायचे असलेस त्यास खुप मोठी वितरण व्यवस्था पाहिजे असते. काही वितरण व्यवस्था महाराष्ट्रात आहेत पण त्या संस्था मोडी पुस्तकाला किती स्थान देतील हे सांगता येण्यासारखे नव्हते. कारण माझ्या पहिल्या ’’मोडी लिपी–शिका सरावातून‘‘ या पुस्तकातून मला याचा अनुभव आलेला होता. वितरणाअभावी पुस्तक जास्तीत लोकांपर्यत पोहचत नाही, म्हणुन मी ई–पुस्तकाचा मार्ग निवडला. कोणालाही सदरचे ई–पुस्तक आपल्या मोबाईलवर कधीही, कोठेही मोफत डाऊनलोड करता येऊ शकते.  


या पुस्तकाचे लिप्यंतर करताना जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लागला, देववनागरी ते मोडी लिपी असे लिप्यंतर करताना मोडीच्या वेगवेगळ्या शैलीप्रमाणे टंकीत करावे लागे. टंकन झाल्यावर परत ’र’ च्या करामती करणे व मोडी अक्षरांच्या टंकनातील चुका दुरुस्त करणे असे सर्व सोपस्कार करावे लागत. अजुनही काही तांत्रिक गोष्टीमुळे झालेल्या चुका ई–पुस्तकामध्ये आहेत. पण ई–पुस्तकाचा एक फायदा असाही आहे की पुस्तकात सुधारलेल्या गोष्टी, वाचकांनी त्यांचे ॲप अपडेट केल्यावर अगोदर डाऊनलोड केलेल्या पुस्तकातही सुधारणा होते.


मोडीलिपीचे ई–पुस्तक तयार करत असतान सगळ्यात मोठा गोंधळ झाला तो मोडीच्या फाँटला कोणतेही ई–पुस्तक संकेतस्थळ सपोर्ट करत नव्हते, सुरुवातीला अमॅझानवर सदरचे ई–पुस्तक प्रकाशित केले पण फाँटला सपोर्ट मिळाला नाही. तो सपोर्ट अमॅझान या संकेतस्थळाने अजुनही दिलेला नाही. अमॅझानवर मराठी-देवनागरी फाँट उपलब्ध आहेत, याला सपोर्ट मिळतो पण मोडीसाठी एक वर्ष पाठपुरावा करुन पण अजूनही यश मिळाले नाही. पण श्री लिपीने गुगलसाठी बरेच फाँट तयार करुन दिले आहेत, त्यामुळे त्यांच्या सहकार्याने मला मोडी लिपीतील जगातील पहिले ई–पुस्तक गुगलच्या प्ले बुक्सवर प्रकाशित करण्यात यश आले. गुगल या संकेतस्थळच्या नियमावलीप्रमाणे "ई–पब" फाईल श्री लिपी यांनी तयार करुन दिली. गुगलने त्यांच्या संकेतस्थळावर नव्या प्रकाशकांची नोंदणी बंद केलेली आहे, मग परत गुगल संकेतस्थळावरील प्रकाशक शोधण्याची सुरुवात केली, खुप शोधाशोध करुन ब्रोनॅटो.कॉम (bronato.com) या संकेतस्थळाची माहिती मिळाली. त्यांच्याशी संपर्क झाला. सदरच्या ई–पुस्तकाला प्रकाशक म्हणून ब्रोनॅटो.कॉमचे संचालक श्री. शैलेश खडतरे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.


आज मितीला ’’राजर्षी शाहू छत्रपती महाराज ’’ या  ई-पुस्तकाच्या तीन हजार प्रती, भारताबरोबर, अमेरिका, इंडोनिशिया, मलेशिया, रशीया, टर्की, इटली, हाँगकाँग, इ. देशात डाऊनलोड झालेल्या आहेत. मी तयार करुन घेतलेला मोडी लिपी फाँट SHREE_MODI_2100 सर्वांसाठी उपलब्ध आहे. हा फाँट युनिकोड आहे. सदरचा फाँट मॉड्युलर इन्फोटेक प्रा. लि. पुणे यांच्या कार्यालयातून प्रत्येकाला परवान्यासहीत विकत घेता येणे शक्य आहे. अजून वेगवेगळ्या विषयावरील मोडी लिपी पुस्तकांचे कार्य सुरु आहे, ’’स्वामी विवेकानंदांची बोधवचने’’(मोडीलिपी) हे पुस्तक मागील महिन्यात मुंबई येथे प्रकाशित झालेले आहे. आता सदरच्या पुस्तकाचे ई–पुस्तकाचे काम सुरु आहे, सदरचे ई–पुस्तकही वाचकांना लवकरच मोफत उपलब्ध होईल. याचबरोबर ’’सावित्रीबाई फुले’’ यांच्या जीवन चरीत्रा वरील मोडी पुस्तकाचे कार्य सुरु आहे. असाच मोडीच्या प्रचाराचा सुरु केलेला प्रवास अखंडपणे चालू ठेवण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

---------------------------------------------------------

आपली मोफत प्रत डाऊनलोड करण्यासाठी https://goo.gl/WXKck2 किंवा Google Play Books वर "rajarshi shahu" शोधा.
'             
नवीनकुमार माळी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी 
www.navinmali.com
https://www.facebook.com/navinmali.page/
https://twitter.com/navinmali


हे पुस्तक नव्या जुन्याचा सुंदर मिलाप आहे. 

मोडी लिपी जुनी पण फॉन्ट तंत्र नवे. 
राजा जुना पण त्याचे विचार आजच्या काळापेक्षाही नवे
म्हणून हे ईपुस्तक तुम्ही आवर्जून वाचायलाच हवे 


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

----------------------------------------------------------------------------------


Selected short stories Rabindranth Tagore सिलेक्टेड शॉर्ट स्टोरीज : रवींद्रनाथ टागोर




पुस्तक : Selected short stories Rabindranth Tagore  सिलेक्टेड शॉर्ट स्टोरीज : रवींद्रनाथ टागोर
लेखक : Rabindranth Tagore (रवींद्रनाथ टागोर )
भाषा : English  (इंग्रजी)
मूळ भाषा : Bengali (बंगाली)
अनुवादक : Wiliam Radice ( विल्यम रॅडिस )
ISBN : 978-0-140-18854-7

अनुक्रमणिका :



रवींद्रनाथ टागोरांच्या ३० लघुकथांच्या इंग्रजी भाषांतरचा हा संग्रह आहे. या कथा टगोरांनी १८९० च्या दशकात लिहिलेल्या आहेत.

मला असं वाटलेलं की रवींद्रनाथ टागोरांच्या कथा - "गुरुदेवांच्या" कथा - म्हणजे खूप भव्यदिव्य, तत्त्वज्ञानपूर्ण असं काहितरी असेल. राजेरजवाडे, देवदानव, शाप-उःशाप यांच्या गोष्टी असतील. पल्लेदार वाक्ये आणि पात्रांच्या तोंडच्या मोठमोठ्या संवादातून वैश्विक सत्य वगैरेंचे खंडन-मंडन असणार, तेही इंग्लिशमधून; म्हणजे हे पुस्तक चांगलंच विद्वत्जड असणार या समजुतीने काहिसं घाबरतच मी हे पुस्तक वाचायला घेतलं. पण पुस्तक वाचायला सुरुवात केली, थोडं चाळलं आणि लक्षात आलं की पुस्तक अजिबात "जड" नाही. कुठलीही गोष्ट पौराणिक, काल्पनिक, दिव्यलोकातली नाही. तुमच्या आमच्या सारख्या साध्या माणसांच्या साध्या सोप्या गोष्टी आहेत. जमीनदार, पोस्टमास्तर, डॉक्टर, मजूर, फेरिवाला, प्रौढ गृहिणी, बालविवाह झालेल्या नववधू, पौगंडवस्थेतली मुलं अशी वेगवेगळी माणसं त्यांच्या कथांची मुख्य पात्रं आहेत. पल्लेदार वाक्ये, ताव च्या ताव संवाद इथे नाहीत. 

प्रत्येक कथेचा विषय वेगवेगळा आहे. सर्व गोष्टी गंभीर आहेत. बऱ्याच शोकांतिका आहेत. दुःख, वेदना, फसवणूक, गरीबीमुळे आलेले दैन्य, परिस्थितीमुळे झालेला प्रियजनांची ताटातूट, अनोळखी व्यक्तींची भेट आणि विरह, कुणाच्या पुत्रप्रेमातिरेकाचे दुष्परिणाम तर कुणाच्या अतिरेकी काटकसरींचे मुलांवर होणारे परिणाम असे वेगवेगळे विषय यात आहे. 

काही गोष्टींचा शेवट नाट्यमयरीतीने किंवा ठोस झाला आहे असं वाटलं नाही. तर काही गोष्टींत "मग पुढे काय झालं सांगा न" असं वाटतं. काही गोष्टी आणि त्यांचे विषय अगदी साधे आहेत की इतपत कथा हल्लीचे नवोदित लेखकही लिहितात असं वाटतं. पण १८९० साली म्हणजे सुमारे १२० वर्षांपूर्वी जेव्हा नवीन मध्यमवर्ग उदयास येत होता, कथांचे विषय जेव्हा पौराणिकच जास्त होते तेव्हा त्यांनी या कथा लिहिल्या आहेत. आत्ता त्या साध्या वाटल्या तरी तेव्हा त्या खासच होत्या. त्यांच्या सारख्या तत्कालीन साहित्यिकांनीच हा साहित्याचा नवीन रस्ता उघडला आणि "सोपी केली पायवाट". 

२ कथा सोडल्या तर सगळ्या गोष्टींना ग्रामीण बंगलची पार्श्वभूमी आहे.  बंगालचा पाऊस, पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नदी-कालवे-तलाव यातून होणारी जलवाहतूक, आषाढ, श्रावण, चैत्र, कार्तिक या महिन्यांतील निसर्ग इ. आपल्याला जागोजागी दिसते. रवींद्रनाथांमधला चित्रकारही वाचताना जाणवतो. त्यांची वर्णनाची चित्रमय शैली आशी आहे की तुम्ही खूप वेळ जर गोष्टी वाचल्यात आणि डोळे मिटलेत तर तुमच्या डोळ्यासमोरही चित्रे उभी राहतील. बंकिमचंद्रांच्या वंदे मातरम्‌ मधला "सुजलाम सुफलाम सस्यशामलाम" बंगाल इथे आपल्याला भरपूर भेटतो. बालविवाह, हुंडाप्रथा आणि त्याचे परिणाम गोष्टीत डोकावतात. त्या काळी आयुष्यमानता फार कमी होती वाटतं. गोष्टींमध्ये व्यक्ती कमी वयात मरण पावताना दिसतात; थोड्या आजारानेही माणसं मरतात. तेव्हा माणसं फार हळवीही होती वाटतं. या गोष्टींमधली माणसं मानसिक त्रास झाला की दुःखातिरेकाने जीव सोडतात - "सुटतात". 

गोष्टींचं भाषांतर उत्तमच. इतकं सहज सुंदर भाषांतर की रवींद्रनाथांनी कथा इंग्रजीतच लिहिल्या असाव्यात असं वाटतं. योगायोगाने दुर्गाबाई भागवतांचं एक पुस्तक पण वाचतोय त्यातही या पुस्तकातल्या एका गोष्टीचं मराठी भाषांतर आहे. तरीही मला इंग्रजी भाषांतरच जास्त सहज वाटलं. योग्य तिथे बंगाली शब्द वापरले आहेत आणि संदर्भात(ग्लोसरीत) त्यांचे अर्थ स्पष्ट केले आहेत. 

३० पानी प्रस्तावनेत टागोरांची ओळख, त्यांच्या साहित्याचे टप्पे, कथालेखनाची पार्श्वभूमी, त्यांच्या जमीनदारीचा अनुभव आणि त्याचा कथालेखनावर झालेला परीणाम, या संग्रहासाठी १८९० च्या दशकातील कथाच का निवडल्या याचं कारण, त्यांच्या साहित्याचं थोडं समीक्षण असा माहितीपूर्ण मजकूर आहे. रवींद्रांची निवडक पत्रं, त्यांची वंशवृक्ष, टागोरांची जमीनदारी कुठे होती ते दाखवणारा बंगालचा नकाशा अशी पूरक माहितीही आहे. 


सव्वाशे वर्षांनंतरही या गोष्टी वाचताना जुन्या वाटत नाहीत. अव्वल इंग्रजी राज्यात त्यांनी बंगालीत, बंगालच्याच पार्श्वभूमीवर लिहिलं. पण जे लिहिलं ते सगळीकडे आणि सगळ्या काळात सुसंगत वाटेल असं लिहिलं म्हणून ते "ग्लोबल" ठरलं. देशी विदेशी भाषांमध्ये त्याची भाषांतरे झाली. "ग्लोबल" म्हणजे फक्त इंग्रजी; "ग्लोबल" म्हणजे विदेशात घडणारे, देशीविदेशी पात्र असणारे कथानक अशी जर कुणाची समजूत असेल तर त्याला या पुस्तकाच्या वाचनातून "ग्लोबल" चा नवा अर्थ कळेल. कुणाच्याही स्वभाषेत, मातीत किती ताकद असते याचं प्रत्यंतर येईल.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------



Devlok ( देवलोक)






पुस्तक : Devlok ( देवलोक )
लेखन : Devdutt Pattanaik (देवदत्त पट्टनाईक)
भाषा : English इंग्रजी  
पाने : १८२
ISBN : 978-0-143-42742-1

वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत हे ग्रंथ हजारो वर्षांपासून भारतीय समाजमनाला आकार देणारे, मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत. पण गंमत म्हणजे हे सर्व ग्रंथ मूळ संस्कृतमधून वाचलेले फारच कमी लोक आहेत. या ग्रंथांची शिकवण, त्यातलं तत्वज्ञान त्यांची आपल्यापर्यंत अप्रत्यक्षपणे पोचत असते गोष्टींमधून. आईवडिलांनी, आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी, पुस्तकं, देवळातली कथाकीर्तने, टीव्हीवरच्या पौराणिक मालिका, पौराणिक चित्रपट यांमधून. हे पुस्तक याच प्रकारातलं इंग्रजी पुस्तक आहे.

अनुक्रमणिका:


पुस्तकाचं स्वरूप प्रश्न-उत्तरं असं आहे. पुराणातल्या कथा, त्यात येणारे देवांचे उल्लेख, त्यांच्या रूपाचं वर्णन, अवतार कार्य या बद्दलचे प्रश्न आणि त्यांची एक दोन परिच्छेदांत उत्तरं असं स्वरूप आहे.त्यामुळे या पुस्तकात आपण लहानपणापासून ऐकत आलेल्या बऱ्याच कथा पुन्हा दिसतील; थोड्या न ऐकलेल्या कथा वाचायला मिळतील.
उदा. 





पौराणिक कथा या खूप मनोरंजक असतात, चमत्कारिकही असतात. पण प्रत्येक कथेमध्ये काहितरी संदेश दडलेला असतो. पूर्वी कथेचं तात्पर्य शेवटी लिहायचो तसं. या पुस्तकांत काही कथांचं तात्पर्यही सांगितलं आहे.

हिंदू देवदेवतांची रूपही खूप वेगवेगळी, वाहनं वेगवेगळी. हातांची-डोक्यांची संख्या, वाहने, शस्त्र अस्त्रे, आवडते रंग, आवडते भोजन इ. सगळ्यात खूप वेगळेपणा आणि बऱ्याच वेळा विरोधाभासही आढळतो. पण या देवतांची रूपं ही प्रतिकं आहेत हे पण आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. गणपतीचे मोठे कान म्हणजे भरपूर ऐका, लहान डोळे म्हणजे  सूक्ष्म निरीक्षण, मोठं डोकं म्हणजे बुद्धिमत्ता इ. या पुस्तकात अश्या बऱ्याच प्रतिकांमागचे अर्थ सांगितले आहेत.


वेदांची रचना सुमारे ४ हजार वर्षांपूर्वी झाली, पुराणांची रचना २ हजार वर्षांपूर्वी तर भागवत आणि इतर संत साहित्य गेल्या हजार वर्षांतली आहे. देव या संकल्पनेत फरक पडत गेला आहे आहे. वेदांमध्ये सूर्य, अग्नी, इंद्र अशा निसर्गशक्तींची देवतास्वरूपात आराधना आहे. पुराणकाळात ब्रह्म, विष्णू, महेश, देवी ई. चे उल्लेख आहेत. तर त्या नंतरच्या काळात गणपती, राम, कृष्ण इ. आधुनिक देवदेवतांची संकल्पना पुढे आली. शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य या पंथांचे प्रमुख देव भिन्न तशीच त्यांची कथासूत्रही भिन्न. असे लेखक सांगतो. 

हे पुस्तक वाचताना माहितीच्या गोष्टीच पुन्हा वाचतोय असं बऱ्याच वेळा झालं. प्रतिकांचे अर्थ सांगतानाही एकसुरीपणा आहे असं वाटलं. ही प्रतिकं "ओपन टू इंटरप्रिटेशन" असल्याने लेखकाचं म्हणणं पटेलच असं नाही. काहिवेळा त्यांचा अर्थ ओढूनताणून काढल्यासारखा वाटलं. पौराणिक कथा एक परिच्छेदात उरकल्यामुळे गोष्टी वाचल्याचा गोडवा आला नाही आणि तेच तेच तात्पर्य पुन्हा सांगितल्यासारखं वाटलं आणि कंटाळवाणं झालं. शेवटी शेवटी तर मी पानं उलटून केवळ चाळलं.

जे हिंदू नाहीत किंवा हिंदू असूनही ज्यांच्या घरात या कथांचे संस्कार होत नाहीत अशांना या पुस्तकातून हिंदू धर्मातील देव-प्रतिकं यांची तोंडओळख होईल. ज्यांना फारच थोड्या पौराणिक गोष्टी माहिती आहेत त्यांना काही नव्या गोष्टी कळतील. ज्यांना गोष्टी, देवता माहिती आहेत पण त्यांचे अर्थ समजले नाहीत त्यांना काही अर्थ नव्याने कळतील. हिंदू धर्मातील देवसंकल्पना कशी बदलत गेली हा विचारही काहींना नवा वाटेल.



पुस्तकात संस्कृत शब्द येणं हे स्वाभाविकच. पण हे शब्द इंग्रजीत लिहितना साध्याच नेहमीच्या रोमन लिपीत लिहिले आहेत. संस्कृत शब्दांचा अचूक शब्द ओळखता यावा यासाठी लिहिताना जी वेगवेगळी चिन्हे वापरतात ती न वापरल्याने अनोळखी शब्दांचे योग्य उच्चार समजत नाहीत. अभारतीय माणसाने पुस्तक वाचले तर भलतेच उच्चार समजून बसेल तो.

लेखकाची ओळख, या विषयातला त्याचा अभ्यास काय, अधिकार किती याबद्दल पुस्तकात माहिती नाही. पुस्तक वेदांसारख्या गहन गंभीर विषयावर असलं तरी पुस्तकात कुठेही जुन्या पुस्तकांचा संदर्भ, लेखकाच्या किंवा दुसऱ्या कुणाच्या संशोधनाचा हवाला, लेखकाच्या स्वतःच्या विचारांचं खंडन-मंडन; वैज्ञानिक आधार आवश्यक पण असा गंभीर मामलाही नाही. पुस्तकात "काहीच्या काही" विधानं ही आहेत. उदा. इंग्रजांनी गीतेचं भाषांतर केल्यावर गीतेचं महत्त्व वाढलं; पेशव्यांच्या काळापासून गणपती मूर्ती पूजनाची पद्धत रूढ झाली त्याआधी गणपती फक्त मत्रांमधील शब्द होता.  (वाचताना मनात आलं  मग १२ व्या शतकात गीतेवरचं भाष्य असणारी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी काय गंमत म्हणून लिहिली आणि "ओम नमोजी आद्या .. "म्हणत गणपतीचे वर्णन केले ते काय ? पण गंमत म्हणून)

म्हणुन हे पुस्तक तुमचं ज्ञान वाढवणार नाही पण माहिती वाढवेल. ज्यांना महिती कमी आहे अशांना वाचायला आवडेल. 



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
---------------------------------------------------------------------------------- 

कांचनगंगा (Kanchanganga)




पुस्तक : कांचनगंगा (Kanchanganga)
लेखिका : माधवी देसाई (Madhavi Desai)
भाषा : मराठी (Marati)
पाने : २१६
ISBN :8177661337 (For printed)ISBN :9788184987386 (for e-book)

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती :


अंजनीबाई मालपेकर या जुन्या जमान्यातल्या प्रसिद्ध गायिका; हिराबाई पेडणेकर या महाराष्ट्रातील पहिल्या नाट्यलेखिका आणि राजा रविवर्मा या महान चित्रकाराची प्रेरणा असणारी सुरंगा मुळगावकर; या तिघींवर आधारलेली ही कादंबरी आहे असं लेखिकेने प्रस्तावनेत सांगितलं आहे. मात्र या तिघींपैकी अंजनीबाई हेच या कथेचं मुख्य पात्र आहे आणि त्यांच्या जन्मापासून वृद्धापकाळपर्यंतचा प्रवास त्यात आहे. या तिघी बालमैत्रिणी. एकाच शाळेत शिकलेल्या, मुंबईत स्थायिक असलेल्या गोवेकर समजातल्या. त्यामुळे शाळेत आणि अंजनीबाईंच्या नंतरच्या आयुष्यात जेव्हा त्यांची भेट झाली असेल त्या त्या वेळच्या प्रसंगात त्या येतात. हिराबाईंनी लेखनात खूप नाव कमवले. पण त्यांच्या गुणांपेक्षा त्यांच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन सलगी करणरेच त्यांना जास्त भेटले. शेवटी योग्य जोडिदार मिळाल्यावर त्या सगळ्यांपासून दूर रहायला गेल्या. या पेक्षा जास्त माहिती कादंबरीतून कळत नाही. तसंच तरूण सुरंगाला पाहून राजा रविवर्मा मोहित झाले. त्यांनी आपल्या चित्रांत देवी, अप्सरा या रूपात सुरंगाचीच प्रतिमा चितारली. सनातनी मंडळींना ही चित्र आवडली नाहीत. या लोकापवादातून सुरंगाने आत्महत्या केली इतकीच माहिती पुस्तकातून मिळते. 

आता मुख्य पात्र सुरंगाकडे वळूया. लेखिकेने प्रस्तावनेत म्हटलंय की "..चारित्र्यसंपन्न अशी अंजनी,गोमंतक मराठा समाज, त्या समाजाची, त्या काळची अवस्था या साऱ्या चौकटीतूनंजनीचं मोठेपण जाणवून द्यायचं होतं.  गायिका म्हणून अंजनीबाईंना मी पूर्णपणे व्यक्त करू शकले नसेनही...पण व्यक्ती म्हणून त्यांचं मोठेपण व्यक्त व्हावं हा माझा प्रयत्न आहे". कादंबरी वाचताना हे तिन्ही प्रयत्न फसलेले दिसतात. तो काळ, म्हणजे नक्की कुठला ? ते कळत नाही. ब्रिटिशराजवटीतला काळ आहे हे कळतं पण नक्की कुठले साल कळत नाही. खऱ्या व्यक्तिवर कादंबरी असताना काळ, तारखा यांचा उल्लेख असला की संदर्भ नीट लागतो. ते या पुस्तकात होत नाही. तसंच अंजनी बाईंचा समाज/जात नक्की कोणता याचाही उल्लेख नाही. मी गोव्यावरच्या कादंबऱ्या आधी वाचल्या होत्या ( प्रार्थनातांडव, होमकुंड) त्यामुळे कलावंतिणी, भाविणी, यजमान, त्यांची कुटुंबव्यवस्था या बद्दल जुजबी माहिती होती. म्हणून मला पुस्तकातल्या गोष्टींचा संदर्भ लागला. पण ज्याला याची काहीच माहिती नाही त्याला पुस्तकातले प्रसंग नीट कळणार नाही किंवा तीव्रता जाणवणार नाही. त्या समाजावरचे संदर्भ ग्रंथ काही मी वाचलेले नाहीत तरी आधीचा कादंबऱ्या वाचून जे जाणवलं, समजलं तसं काही या कादंबरीने होत नाही. 

अंजनीबाई कलावंत समाजात जन्मल्या. गाणं-वाजवणं-नृत्य करणं हे या समाजाच्या उपजीविकेचं साधन आहे. त्यामुळे त्या गाणं शिकल्या, कुठल्याही महान कलाकाराप्रमाणे भरपूर रियाज केला, आवाज खूप चांगला होता म्हणून भरपूर प्रसिद्धी, पैसे, मानसन्मान मिळाले. शेवटी पतीच्या आर्थिक अडचणींमुळे आणि शारिरिक व्याधींमुळे बहुतेक संपत्ती गमवावी लागली हा सरधोपट प्रवास दिसतो (हा प्रवास कथा म्हणून बघताना. प्रत्यक्ष व्यक्तीचं आयुष्य सरधोपट असं म्हणयचं नाहिये). यात "वेगळेपणा" ,"व्यक्ती म्हणून मोठेपणा" असलं काहीच कादंबरीतून जाणवत नाही. 

लेखिकेने प्रस्तावनेत म्हटलं आहे की त्यांनी अंजनीबाईंवरचा एक लेख वाचला आणि त्यातून हे कथाबीज निर्माण झालं. ही कादंबरी पूर्ण वाचल्यावर असं वाटलं की तो लेख आणि लेखिकेच्या संशोधनातून मिळलेली माहिती उदा. - त्यांचे गुरु,त्यांचे घराणे, गाण्याची वैशिष्ट्ये, सन्मान, शिष्य, सहकलाकार इ. जरी कादंबरीच्या सुरुवातीला दिला असता तरी पूर्ण कादंबरी वाचायची गरज पडली नसती. या कादंबरीपेक्षा पण एखाद्या लेखातून अंजनीबाईंची ओळख अजून छान आणि लक्षात राहील झाली असती.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------


डॉ. केतकर (Dr.Ketkar)







पुस्तक :  डॉ. केतकर (Dr.Ketkar)
लेखक : द. न. गोखले (D.N. Gokhale) 
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३३९
ISBN : दिलेला नाही

ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे हे चरित्र आहे. "ज्ञानकोश" म्हणजे मराठीत सांगायचं तर "एनसाक्लोपिडिया" हं :). "एनसाक्लोपिडिया ब्रिटानिका" हे नाव नाव तुम्ही ऐकलं असेल. ऑनलाईन "विकिपिडिया" हे संकेतस्थळ वापरले असेल. विविध भाषांमधील छापिल ज्ञानकोशांची परंपरा बरीच जुनी आहे. त्याच प्रकारचा ज्ञानकोश मराठीत १९२० च्या दशकातच प्रकाशित झाला होता. हा पूर्ण ज्ञानकोश आता ऑनलाईन वाचायला उपलब्ध आहे: http://ketkardnyankosh.com/ 
२३ खंडांचा हजारो पानांचा हा ज्ञानकोश बनवण्याचं मुख्य श्रेय जातं डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांना. 


कुशाग्र बुद्धिमत्तेच्या डॉ. केतकरांनी अमेरिकेतून शिक्षण घेतलं होतं. तिथे समाजशास्त्रिय अभ्यास केला होता. या संशोधनातून त्यांच्या प्रतिभेला वैश्विक सामजिक सत्य आणि भारताच्या उन्नतीचे मार्ग सापडले. भारतात परत येऊन लोकांना त्यानुसार मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्यांचं ठाम मत असं होतं की देशी भाषांचा विकास होणं राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक आहे. मराठी ज्ञानभाषा व्ह्यायची असेल तर जागातलं उत्तमोत्तम ज्ञान मराठीत उपलब्ध असलं पाहिजे. त्यासाठी मराठीतही ज्ञानकोश असला पाहिजे. "हे असलं पाहिजे; कुणितरी काहितरी करायला पाहिजे" असं म्हणत वाट बघत बसणारं व्यक्तिमत्त्व ते नव्हतं. त्यांनी हे काम स्वतःच करायचं ठरवलं. १९१६ ते १९२८ इतका काळ ह्या कामाला वाहून २३ खंडांचं काम पूर्ण केलं. आजपासून १०० वर्षांपूर्वी दळणवळणाची, संपर्काची साधनं कमी असताना त्यांनी इतकी माहिती जमवली. अनेक मोठ्या विद्वानांनी वेगवेगळी कारणं देऊन मदत करायचं नाकारलं. टिळकांसारख्या व्यक्तीने लिहायची दाखवली पण लिहिण्याआधीच त्यांचं निधन झालं. ज्ञानकोश कुणा संस्थानिकाच्या, धनिकाच्या देणगीवर नको; इतकंच काय लोकांच्या दानदक्षिणेतूनही नको असा विचार पुढे करत त्यांनी "लिमिटेड कंपनी" स्थापन केली आणि त्याद्वारे भागधारकांकडून (शेअर होल्डर्सकडून) पैसे उभारून काम सुरू केलं. हुशार लेखनिक, संपादक जमवले आणि काम सुरू केलं. त्यांनी पगारावर लोक ठेवले. ज्ञानाची उपासना म्हणजे पदरमोड करून, उपाशीपोटी करायची गोष्ट अशी कल्पना असणाऱ्या समाजात संशोधनासाठी पगार, "लिमिटेड कंपनी" या कल्पना अभिनव होत्या. आजुबाजुच्या समाजाच्या कितितरी पुढे त्यांचे विचार होते; कल्पना खूप पुढच्या होत्या.

काम सुरू झालं म्हणून ते सुरळीत पार पडलं असं नव्हे. व्यवस्थापकीय मंडळातले हेवेदावे, छपखान्यांची दिरंगाई, श्रेयाची लढाई या सगळ्यातून त्यांना जावं लागलं. ज्ञानकोश प्रसिद्ध झाल्यावर त्या प्रती खपवणं, ज्ञानपराङमुख समाजाला त्याची आवश्यकता पटवून पैसे खर्चायला लावणं हे देखील दिव्य होतं. त्यांच्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून ते स्वतः देखील ऊनपावसात घरोघरी हिंडून ज्ञानकोशाची विक्री करत होते. ज्ञानकोशात वेगवेगळ्या जातींबद्दल, धर्मगुरूंबद्दल संशोधनाअंती त्यांनी लिहिलं होतं. असं सत्य ज्यांच्या स्वाभिमानाआड आलं त्यांच्याशीही त्यांचे वाद झाले. पण तेव्हा वादाचं नियतकालिकांमध्ये लेख लिहिणे, निषेध पत्र पाठवणे, कायदेशीर लढाई लढणे असं होतं. आजच्या सारखं आक्रस्ताळं नव्हतं. नाही म्हणायला मुस्लिम समाजाने तेव्हाही आपले बाहुबल दाखवत त्यांना जिवे मारायची धमकी दिली होती आणि शेवटी महंमद पैगंबरांबद्दलचा भाग गाळायला लावला होता. 

ज्ञानकोशाची निर्मितीप्रक्रिया आणि त्यातला केतकरांचा सिंहाचा वाटा हा या पुस्तकाचा मुख्य गाभा. या कामाला सुरुवात होण्या आधीचा आणि नंतरचा या दोन्ही काळाबद्दलही लेखकाने सविस्तर लिहिलं आहे. बालपण, तेव्हाचा स्वभाग, संस्कार, अमेरिकेतील शिक्षण, तिथे मिळालेली विद्वद्जनांची मान्यता, भारतात परत आल्यावर "राष्ट्रगुरू"च्या भूमिकेतून देशभर लोकांना मार्गदर्शन, ज्ञानकोशानंतर इतर संशोधन; कथा, कादंबऱ्या, राजकीय लेख यांचं लेखन; भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेले वेगेवेगळे प्रयोग, इतर भाषांमध्ये ज्ञानकोश तयार करण्यासाठी घेतलेला पुढाकार हे सगळं आहे.

डॉक्टरांच्या च्या पत्नी श्री. शीलवती केतकर या मूळच्या जर्मन-ज्यू मिस. कोहेन. त्या केतकरांना इंग्लंडमध्ये भेटल्या आणि त्यांचा स्नेह जुळला. पण देशभक्ती करू इच्छिणाऱ्याने या बंधनात अडकणं इष्ट नाही म्हणुन ते त्यांचा स्वीकार करत नव्हते. स्वतःची जाज्वल्य हिन्दुत्ववादी भूमिकाही त्यांना परधर्मिय युवतीशी लग्न करायला मागे ओढत होती. ते तसेच भारतात आले. ७-८ वर्षं गेली तरी त्यांच्या प्रेयसीने मात्र त्यांच्यावर पत्राद्वारे प्रेम जागेच ठेवले. आणि बरेच वर्षांनी हो-नाही करता केतकर लग्नाला तयार झाले. मिस. कोहेन या आधी हिंदू झाल्या आणि मग त्या दोघांचे लग्न झाले. कोहेनबाईंना हिंदू करून घेण्यासाठी स्वतःच्या वैदिक अभ्यासातून "व्रात्यस्तोम" नावाचा वैदिक विधी त्यासाठी त्यांनी पुन्हा उजेडात आणला. सहाजिकच सनातनी मंडळींना ही बाब रुचली नाही. केतकरांचा हा आणि या पुढचा वैयक्तिक प्रवासही लेखकाने आपल्यासमोर दाखवला आहे. 

पुस्तक साधारण ६० वर्षांपूर्वीचं असल्यामुळे पुस्तकाची भाषा त्यावेळची, औपचारिक, बरीचशी संस्कृतप्रचुर, जरा जड आहे. काही जुनी छायचित्रे आहेत. हे चरित्र म्हणजे कादंबरी नाही तर लेखकाने निवेदकाची भूमिका घेऊन चरित्र उलगडले आहे. केतकरांनी ज्या भूमिका घेतल्या, विचार मांडले, कृती केल्या त्याचं सडेतोड विश्लेषणही जागोजागी आहे. केतकरांनी केलेल्या चुका, बुद्धिमत्तेच्या अहंकारातून आलेला दडपेपणा, अचाट कल्पनाशक्तीचा अतिरेक होऊन कधिकधी त्याचा संशोधनावर झालेला परिणाम, वागण्यातला विक्षिप्तपणा हे सगळंही निःसंकोचपणे मांडलं आहे.

त्यामुळे हे चरित्र नुसत्ती घटनांची जंत्री न होता जिवंत चरित्र होते. राजकारणी, उद्योजक, कलाकार यांचा संघर्ष आपल्या वाचनात येतो. पण बौद्धिक संशोधकालाही संघर्ष करावा लागतो; व्यवहारात लक्ष दिलं तरच काम पूर्णत्वाला जातं; काम कितीही चांगलं असलं आणि आपण निस्वार्थभावनेने काम करत असलो तरी क्षुद्र्भावनेच्या व्यक्तींचा सामना करावाच लागतो हेही आपल्याला मार्गदर्शक ठरेल.  पुस्तकाची भाषा आणि त्यातल्या तपशीलांमुळे सर्वसामान्य वाचकाला पूर्ण चरित्र वाचणं जरा जड वाटू शकतं. पण  मराठीला ज्ञानभाषा बनवायला एका महान व्यक्तीने आयुष्य अर्पण केलं या कृतज्ञतेतून ज्ञानकोशाच्या निर्मितीचा भाग तरी मराठीप्रेमींनी वाचायलाच हवा.


------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------




पुस्तकाची अनुक्रमणिका :








खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...