वत्सलावहिनींचा आधुनिक ॲडव्हाईस (Vatsalavahinincha Adhunik advhais)



पुस्तक - वत्सलावहिनींचा आधुनिक ॲडव्हाईस (Vatsalavahinincha Adhunik advhais)
लेखिका - मंगला गोडबोले (Mangala Godbole)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५९
ISBN - 978-93-5220-337-6

हे माझं दोनशे बारावं पुस्तक परीक्षण. पण हे पुस्तक विशेष आहे. माझ्या परीक्षण लेखनातलं वैविध्य आणि सातत्य ह्याचं कौतुक लोकप्रिय मंगला गोडबोले ह्यांना वाटलं. त्यातून त्यांच्या भेटीची, गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्यांच्या स्वहस्ते, त्यांच्या स्वाक्षरीसह त्यांची नव्याने प्रकाशित झालेली दोन पुस्तके मिळाली. त्यामुळे आनंद तर झालाच पण परीक्षण लेखनाचा हुरूप सुद्धा वाढला. त्या दोन पुस्तकांपैकी एकाचं हे परीक्षण. दुसऱ्याचं परीक्षण थोड्या दिवसांनी लिहीनच. 




आता पुस्तकाबद्दल ...
गेल्या काही वर्षांमध्ये तुमची आमची सगळ्यांची जीवनशैली झपाट्याने बदलत गेली आहे. 90 च्या दशकात आलेल्या खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण याच्या जोडीला वाढते यांत्रिकीकरण, इंग्रजीकरण, इंटरनेटीकरण, सांस्कृतिक सपाटीकरण अशी बरीच "करणं" ह्या बदलांमागे आहेत. सगळेच बदल वाईट नाहीत आणि सगळेच बदल चांगलेही नाहीत. एकाच बदलाचा चांगला आणि वाईट असा दोन्ही परिणाम होतो आहे. यंत्रांमुळे एकीकडे आयुष्य सोपं होतंय तर दुसरीकडे आपण शारीरिक क्षमता गमावतोय. इंटरनेटमुळे जग जवळ आलंय पण आपल्या जवळच्या, समोरच्या व्यक्तीशी बोलायला आपल्याला फुरसत नसते, हे चित्र आहे.

ह्या बदलांचा झपाटा इतका आहे की दोन पिढ्यामधलं अंतर सोडा; आपलं आपल्यालाच दहा वर्षापूर्वीचे आपण आणि आजचे आपण यात कितीतरी फरक दिसतो. पूर्वीच्या आपल्या जगण्यातल्या आनंदाच्या छोट्या-छोट्या जागा आता हातून निसटल्या आहेत असं वाटतं. हे असं निसटून जाणं संवेदनशील मनाला अधिकच खुपतं. संवेदनशील मनाची ही घुसमट मंगला गोडबोले यांनी आपल्या खास विनोदी शैलीतून मांडली आहे. त्यांनी 2020 मध्ये "लोकसत्ता" वृत्तपत्राच्या "चतुरंग" पुरवणीत लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. लेखात मांडायचा मुद्दा गंभीर असला तरी तो विनोदी शैलीत खुसखुशीत भाषेत मांडला आहे त्यामुळे वाचायला मजा येते आणि मुद्दाही थेट पोचतो.


प्रत्येक लेखात मुख्य पात्र वेगळं आहे. कधी एका सोसायटीतले प्रौढ काका, कधी एखादा तरुण मुलगा, कधी गृहिणी तर कधी आजीबाई. आपल्या आजूबाजूला रोजच्या रोज घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनातून एक मोठा सामाजिक बदल जाणवून ते अस्वस्थ होत आहेत. अस्वस्थपणा फारच वाढल्यावर ते एका हेल्पलाइनला फोन करतात. ही वत्सलाबाईंची
हेल्पलाईन तुमच्या समस्येवर ठोस असं उत्तर देत नाही पण तुमच्या समस्येवर हलकेच फुंकर घालायचा प्रयत्न करते. कधी हसून त्याकडे वेगळ्या नजरेने बघायला सांगते तर कधी त्याकडे दुर्लक्ष करून संपूर्ण शरणागती स्वीकारायला सांगते. तर कधी आपल्या दृष्टिकोनातच बदल करायला सांगते. मुख्य पत्राला आलेल्या अनुभवातून सामाजिक स्थित्यंतराचा वेध घेतला आहे तर वत्सलाबाईंच्या बोलण्यातून दुसरी बाजू मांडण्याचा छोटा प्रयत्न.

उदाहरणार्थ हल्लीच्या मुलांना आपले नातेवाईक, त्यांचं येणं जाणं फार आवडत नाही ते त्यांच्या मित्रांमध्ये आणि फेसबुक फ्रेंड्स मध्येच खुश असतात. नातेवाईक त्यांना बोरिंग वाटतात. असे अनुभव घेणारी आई आणि तिचा हेल्पलाईनशी संवाद.



ऐतिहासिक चित्रपट आणि मालिकांचं पेव सध्या फुटलं आहे. पण चिमुटभर इतिहासावर स्वतःच्या कल्पनांचं कलम करुन इतिहासाच्या विडंबन कलाकृतीच जास्त होतायत. अशाच एका चित्रपटाचा दिग्दर्शक आपल्या इतिहासाच्या शिक्षिकांना भेटायला येतो तो प्रसंग.



या स्थित्यंतराच्या काळात काही गोष्टी मात्र अजिबात बदलेल्या नाहीत हं! उदा. वस्तू गोळा करायचं आपलं कौशल्य. फ्री मिळालं म्हणून घेतलं, स्वस्तात मिळालं म्हणून घेतलं, हौस म्हणून घेतलं, कोणी दिलं म्हणून घरात ठेवलं, जुन्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत म्हणून घरात ठेवलं... असं करता करता घरातल्या वस्तूंची संख्या वाढत जाते आणि घर बदलायची किंवा आवराआवरी ची वेळ आली डोक्याला झिणझिण्या येतात. काय टाकावे काय शोधावे कळत नाही. प्रत्येकाला दुसर्‍याची वस्तू अडचण वाटते. असाच एक अनुभव.




गृहिणी पदाची जबाबदारी आणि करियर ही तारेवरची कसरत. आणि त्याचे अनुभव मांडणारे काही लेख आहेत. मराठी भाषा, मराठी संस्कृती लोकांना आता नकोशी वाटते आहे. इंग्रजी माध्यमाचा सुळसुळाट झाला आहे, मराठी मातृभाषा धड बोलता येत नाही. आपले सणवार संस्कृती नीट माहिती नाही.  फक्त नथ घालून मिरवणे किंवा फेटा बांधून नाचणे असल्या फोटो पुरतीच संस्कृती. अशा व्यथा मांडणारे लेख आहेत. शाळेतल्या मुलांना सुद्धा सतत कसली ना कसली शिकवणी लावून त्यांना लहान वयातच सुपरमॅन सुपरवुमन करण्याची पालकांची धडपड आहे. पूर्वीचा बालपणीचा निवांतपणा आता त्यांना मिळत नाही ही रुखरुख सुद्धा काही लेखात आहे.

"श्रीमंत पतीची राणी" या लेखात सुखवस्तू कुटुंबातल्या एखाद्या स्त्रीने स्वतः धडाडी दाखवत काही केलं तरी ती सुखवस्तू आहे तिला सगळं आयतं कुटुंबाकडूनच मिळालं असं म्हणत तिच्या कामाचं श्रेय देत नाहीत हे निरीक्षण मांडलं आहे.




शहरी-निमशहरी, मध्यमवर्गीय, उच्च-मध्यमवर्गीय समाजातल्या ह्या नेहमीच्या घटनांचे बरे-वाईट कंगोरे मंगलाताईंनी मांडले आहेत. त्यांची खुसखुशीत, शाब्दिक कोट्या करणारी विनोदी शैली मला नेहमीच भावते. ह्या पुस्तकातही ती आवडली. भाषेवरची पकड, एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ, एकाच शब्दाभोवती गुंफलेले वेगवेगळे वाक्प्रचार यांच्या वापरातून मजा आणली आहे. त्यामुळे लेखांमधल्या मुद्द्यांइतकंच हे भाषिक खाद्य सुद्धा पौष्टिक आहे.
ही काही नमुन्यदाखल वाक्ये  

आम्हाला पूर्वी शिकवायचे चांगला विनोद हे शस्त्र असतं. हत्यार. आता जास्त वेळा विनोदाची हत्याच करतात एकेक जण.

"नको बाई. ती दार लावून झुंबाचे ऑनलाईन क्लासेस घेते आणि तो फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जातो".
"वास्तविक "तिला" लाइनीवर आणणं, दार उघडं ठेवून नाच शिकणं काही अशक्यप्राय नव्हतं. पण घराच्या तालावर नाचण्याच्या नादात तो पर्याय विचारातच घेतला नाही."

"खरं तर लग्नात बहुतेक 'बिनउपाशी' माणसं मजबूत दुधातुपाशी जेऊन उठलेली होती पण नंतर साबुदाणे वडे थाळ्यांतून आल्यावर त्यातल्या काहींना देवभक्ती आठवली. त्यांनी भरल्यापोटी वडे हाणल्यावर काही उपाशीपोटींची झाली जराशी गैरसोय

"... आपलं बायकांचं वेगळं पडतं ना हो"
"काय पडतं ?एक प्रपंच गळ्यात पडला की स्वतःचं सगळं मागे पडतं ? की पडतं घेण्याचं सुरक्षित वळण पडतं ?.."


मंगलाताईंची निरीक्षणशक्ती इतकी जबरदस्त आहे की आपल्याला म्हणावं लागतं की "खरंच, अगदी तंतोतंत असंच घडतं. .. असेच संवाद होतात". त्यामुळे आपण त्यांच्या लिखाणाशी समरस होतो. 

लेखांमधले सगळे मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. वाचकाला "मीही असंच वागतो की काय? माझंही काही चुकत असेल का ?" असं आत्मपरीक्षण करायला लावणारे आहेत; ते ही हसत खेळत !

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 

दीपज्योतिर्नमोस्तुते Deepajyotirnamostute

 



पुस्तक - दीपज्योतिर्नमोस्तुते (Deepajyotirnamostute)
लेखिका - सुशीला महाजन (Sushila Mahajan )
भाषा - मराठी (Marathi )
पाने - २३०
ISBN - दिलेला नाही


डोंबिवलीच्या "डोंबिवली ग्रंथसंग्रहालया"त एक जुने पुस्तक हाती लागले. महत्त्वाच्या तरीही अल्पपरिचित व्यक्तीचे हे चरित्र आहे. ह्या चारित्राच्या नायिका आहेत "राष्ट्र सेविका समिती" च्या संस्थापिका "मावशी केळकर' !

१९३० आसपासचा काळ. स्वातंत्र्यलढ्याचा, देशभक्ती आणि समजाभिमुखता यांनी भारलेला हा काळ होता. नाना विचारधारा आणि विविध कार्यपद्धती ह्यातून असंख्य संस्था, संघटना सुरू झाल्या होत्या. अश्या वातावरणात स्त्रियांनी सुद्धा समाजकार्यात भाग घेतला पाहिजे आणि स्वसंरक्षणार्थ सक्षम झालं पाहिजे ह्या भावनेतून केळकर मावशींनी राष्ट्र सेविका समिती ची स्थापना केली. त्याआधी काही वर्ष डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSSची) स्थापना केली होती, परंतु ही संस्था केवळ पुरुषांसाठी मर्यादित होती. त्यामुळे डॉक्टरांशी विचार विनिमय करून संघासारखीच पण संघापेक्षा पूर्ण वेगळी अशी "समिती" त्यांनी स्थापन केली. मुलींनी महिलांनी एकत्र यावं, "अबला" ना राहता स्वसंरक्षण करण्यासाठी लाठीकाठी शिकावी, काही बौद्धिक मार्गदर्शन घ्यावे अश्या सुरुवातीच्या कल्पनेतून वर्ध्यात सुरु झालेली समिती देशभर पसरली.

संघाइतकी ही संस्था प्रसिद्ध नसली तरी ८५ वर्षांपूर्वी ह्या संस्थेची स्थापना झाली आणि अजूनही ही संस्था चालू आहे हे विशेष. चूल आणि मूल ह्या परिघाबाहेर पडून नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आज सुद्धा शहरी-निमशहरी भागातच जास्त आहेत. इतरत्र कमी. मग ८५ वर्षांपूर्वी स्त्रियांना उपलब्ध अवकाश किती मर्यादीत होते. तरीही त्या अवकाशात जितके होईल तितके संगठन आणि समाजकार्य माववशींनी केलं. तेही स्वतः ६ मुलांची आई आणि तिशीतच वैधव्य नशीबात आलेलं असताना ! पुस्तकात दिलेल्या त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल थोडं वाचा म्हणजे ह्या नायिकेची आपल्याला अजून कल्पना येईल.

अनुक्रमणिका



पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती


स्त्रियांचे संगठन का असावे ह्याबद्दल मावशींच्या मनाची अवस्था आणि गांधीजींशी झालेली भेट





समितीचे सुरुवातीचे रूप आणि मावशींची त्याबद्दलचे मार्गदर्शन दाखवणारा हा एक प्रसंग





फाळणीच्या आधी समितीच्या शाखा सिंध प्रांतातही सुरु झाल्या होत्या. त्यातून महिलांना आत्मरक्षणाचे धडे दिले गेले होते.पाकिस्तानात गेलेल्या सिंधप्रांतातल्या भगिनींना भेट देण्यासाठी दंगलीच्या धामधुमीतही स्वतः मावशी १४ ऑगस्ट १९४७ ला कराचीत गेल्या होत्या. नंतर सुमारे सिंधमधून १०० युवतींची  सोया त्यांनी समितीमार्फत लावली. मागाहून त्यांचे कुटुंबीय भारतात आले. अन्यायग्रस्त आणि हिंसा ग्रस्त हिंदू बांधवांना आपलं म्हणून साथ देण्याचं मोठं काम त्यांनी केलं. हे रोमांचक प्रसंग पुस्तकात आहेत. 

गांधी हत्येननंतर संघावरच्या बंदीमुळे समितीचं कामही स्थगित करावं लागलं. त्या दोन अडीच वर्षांत विस्कळीत झालेली संस्था पुन्हा उभारावी लागली. धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम थोर पुरुषांच्या/स्त्रियांच्या जयंत्या , मेळावे ह्यातून त्यांनी सेविका जोडल्या; गुण हेरून योग्य त्या जबाबदाऱ्या दिल्या; त्यासाठी सदैव फिरतीवर राहिल्या. ह्या जोडीला घरगुती आघाडीवरही जिवलगांचे मृत्यू; कौटुंबिक वाद, आर्थिक ताण हे होतंच.  हे नीट वाचाण्यासारखं आहे. ज्याला स्वतःची अशी संस्था म्हणा किंवा राजकीय पक्ष म्हणा सुरु करायचं असेल त्याला काय कष्ट घ्यावे लागतील हेच ह्यातून अधोरेखित होतं. 

आणीबाणी हे सुद्धा संघ आणि समितीवर आलेलं असंच संकट. त्याबद्दलचा एक प्रसंग




मावशींच्या कार्याचा थोडक्यात परिचय 
तुम्हाला झाला असेल.  हे किंवा त्यांचं दुसरं चरित्र वाचायची इच्छा होत असेल; असं मला वाटतं.

ह्या पुस्तकाच्या लेखिकेने स्वतः समितीत मावशींबरोबर काम केलं आहे त्यांना जवळून पाहिलं आहे. त्या पूज्यतेच्या भावनेतूनच हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे मावशींच्या किंवा समितीच्या कामाची साधकबाधक चर्चा किंवा त्यावेळी त्यांच्या विरुद्ध असणारी मतमतांतरे ह्यात नाहीत. मावशींना कोणकोण सेविका कधी भेटल्या; त्यांना कुठली जबाबदारी देण्यात आली ह्याचे फार तपशील आणि खूप नावं पुस्तकात आहेत. समितीशी संबंधित लोकांसाठी हा मोठा दस्तऐवज आहे पण त्रयस्थ वाचकाला त्यापेक्षा व्यापक दृष्टिकोन जास्त भावाला असता. पुस्तकात अनेक उपक्रम, संस्था आणि प्रसंगांचा उल्लेख आहे आहेत समितीच्या तत्कालीन कामाचा प्रभाव समाजावर किती पडला होता हे स्पष्टपणे पुढे येत नाही; असं मला वाटलं.

तरी समाजासाठी तन-मन-धन अर्पण करणाऱ्या ह्या दीपज्योतीला नमस्कार करण्यासाठी "दीपज्योतिर्नमोस्तुते" वाचा.

पुस्तक खूप जुनं आहे त्यामुळे त्याची तांत्रिक माहितीसुद्धा इथे देतो.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

The Psychology of Money (द सायकोलॉजी ऑफ मनी)- पैशाचे मानसशास्त्र (Paishache Manasashastra)





पुस्तक - The Psychology of Money द सायकोलॉजी ऑफ मनी 
लेखक - Morgan Housel मॉर्गन हाउजेल   
भाषा - English इंग्रजी 
पाने - २४१
ISBN - 978-93-90166-26-8

मराठी भाषांतर - पैशाचे मानसशास्त्र (Paishache Manasashastra)
अनुवाद - डॉ. जयंत कुलकर्णी  (Dr. Jayant Kulkarni)
ISBN - 9788194870159
पाने - २२४

हे परीक्षण लिहिताना आजची तारीख आहे १ जानेवारी २०२२. सर्वप्रथम सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
नवीन वर्षाची सुरुवात एका महत्त्वाच्या विषयावरच्या तितक्याच ताकदीनं लिहिलेल्या पुस्तकाच्या परीक्षणाने करतो आहे. 

पैसा, हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक. आपल्या आयुष्याचा मोठा भाग पैसा मिळवण्यासाठी नोकरी-व्यवसाय करण्यात जातो. नोकरी-धंद्यावरून घरी आल्यावरही बऱ्याच जणांच्या डोक्यात पैशाचे विचार चालूच असतात - मिळणारा पैसा पुरेल का ? किती बचत करावी ? केलेली बचत कुठे गुंतवावी ? ह्या नव्या योजनेत गुंतवायची जोखीम घ्यावी का ?  किती टक्क्याने पैसा वाढेल ? का पैसा बुडेल ? म्हातारपणाचं काय ? अचानक आजारपण किंवा धंद्यात खोट आली तर "बॅकप प्लॅन" काय ? एक ना दोन ..हजारो विचार. पैसा ज्याच्याकडे आहे त्याला सुद्धा हे विचार आणि ज्याच्याकडे नाही त्याला सुद्धा. आपल्या मनाचा एक कोपरा ज्याने व्यापला आहे असा हा विषय. ह्या विषयाबद्दल आपल्या मनात काय चालतं ह्याचा वेध घेणारं हे पुस्तक- The Psychology of Money अर्थात "पैशाचे मानसशास्त्र". 

बघायला गेलं तर किती पैसा लागणार, किती मिळणार, किती गुंतवायचा, किती टक्के परतावा...  हे सगळे आकडे, त्यांची समीकरणं आणि उत्तरं. म्हणजे निखळ गणित. त्यात मानसशास्त्र कुठून आलं? ते आलं; कारण आपण पैशाचे निर्णय घेताना आपण फक्त गणित करून थांबत नाही तर आपल्याला काय "वाटतं" ह्याला सुद्धा तितकंच महत्त्व देतो. 

आपल्याला खर्चाला किती पैसा लागेल हे ठरवताना आपल्या किरणा मालाच्या बिलाबरोबर आपल्या आवडीनिवडीनवर किती पैसा खर्च करावासा "वाटतो" हेही धरावं लागतं. एखादा स्टॉक पडेल का चढेल ह्या बद्दल आपल्याला काय "वाटतं" ? शेजाऱ्याने "रिस्की स्कीम" मध्ये गुंतवणूक केली ती जोखीम घेताना मला काय "वाटतं" ? छातीत धडधड का जोखीम घेतल्याचा कैफ. इ. आणि हे फक्त वैयक्तिक नाही तर एक समाज म्हणून, देश म्हणून सामूहिक "वाटण्यातून" मार्केट पडतं-चढतं. नाही का ? म्हणूनच पैशाच्या दृष्टीकोनातून मनाचा विचार म्हणजेच त्याच्या मानसशास्त्राचा मागोवा !


अनुक्रमणिका 


मराठी अनुवादाची अनुक्रमणिका 



पुस्तकाच्या प्रकरणात एकेका पैलूचा विचार केलेला आहे. प्रत्येक प्रकरणात एकेक मुद्दा त्याच्याशी संबंधित आकडेवारी, उदाहरणं घेऊन समजावून सांगितलं आहे. त्या मुद्द्यांबद्दल लिहितो म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. 

No one is crazy - प्रत्येकाची गुंतवणुकीची पद्धत वेगळी असते कारण प्रत्येकाला आयुष्यात आलेले अनुभव वेगळे असतात. जगाकडे बघायची दृष्टी वेगेळी असते. त्यामुळे कोणीही पूर्णपणे चुकीचं नाही. 

Luck & Risk - जोखीम घेणे हे गुंतवणुकीत आवश्यक आहे. पण त्यात आपल्याला फायदा होईल का नुकसान हे बऱ्याच अंशी नशीबावर अवलंबून आहे. त्यामुळे काही वेळा आपल्याला फटका बसेल हे स्वीकारलंच पाहिजे 

Never Enough - पैसा मिळाला की खर्चाची भूक वाढतच जाते. त्यामुळे कितीही कमवा, पैसा पुरेसा नाही असंच बऱ्याच जणांना वाटतं. त्या हव्यासापोटी श्रीमंत लोक देखील नको ते धंदे करतात.शेवटी त्यात अडकून उलट गरीब होतात. 

Confounding Compounding - थोडा थोडा पैसा गुंतवून तो बराच काळ ठेवला तर व्याजदर कमी असला तरी चक्रवाढ व्याजाच्या नियमानुसार खूप फायदा होतो. त्यामुळे गुंतवणूक न मोडता संयम ठेवून बराच काळ जाऊ देऊन फळाची वाट बघणे योग्य. हे आपल्याला कळतं पण मग वळत का नाही ?

Getting wealthy vs Staying wealthy - काहीतरी घबाड मिळून किंवा एखाद दुसरी गुंतवणूक खूप यशस्वी झाल्याने श्रीमंत झालो तरी ते तसंच श्रीमंत राहण्यासाठी वेगळा विचार लागतो. 

Tails, you win - गुंतवणूक ही पैजेप्रमाणेच आहे. १० पैजा लावल्या व त्यातल्या दोनतीन मध्येच जिंकलो तरी बाकीच्या आठचा खर्च वसूल होतो. त्यामुळे मोठ्या लोकांचे सगळेच निर्णय बरोबर नसतात. मात्र बरोबर ठरलेले निर्णयच आपण बघतो आणि चुका करायला घाबरतो.  

Freedom - पैशाचा खरा उपयोग स्वतःचं मानसिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झाला पाहिजे. म्हणजे आपल्या 
आवडीचं काम, आपल्याला हवं तेव्हा, हवं तितकं करता आलं पाहिजे. उपजीविकेसाठी कामाची गरज पडता कामा नये. 

Man in the car paradox - तुमच्या पैशाचं प्रदर्शन तुम्ही केलंत तरी लोकांना त्यात रस नसतो. तुमचं तुम्हालाच बरं वाटतं; लोकांना नाही. त्यामुळे .... . 

Wealth is what you don't see - त्यामुळे, पैसा उधळायच्या आधी विचार करा. तुम्ही पैसा उधळला नाहीत तर तो तुमचं जवळ राहील आणि तरच तुम्ही श्रीमंत "रहाल".   

Save money - बचत करा आणि गुंतवा. कारण मार्केट, अर्थव्यवस्था तुमच्या हातात नाही. पैसे गुंतवणे तुमच्या हातात आहे 

Reasonable > Rational - तुमच्या जोखीम उचलण्याच्या क्षमतेनुसारच गुंतवणूक करा. गुंतवलेल्या पैशाबद्दलचा भीतीपोटी रात्रीची झोप उडाली तर काय उपयोग ?

Surprise ! - जगात अनपेक्षित घटना घडतातच. त्याचा परिणाम आपल्या मालमत्तेवर होणारच. त्यासाठी मानसिक रित्या तयार राहा.  

Room for error - अनपेक्षित घाटांनमुळे आपला प्लॅन बिघडू शकतो. हे मान्य करा. कितीही सुयोग्य प्लॅन बनवला तरी तो भविष्यात गडबडण्याची शक्यता असतेच. त्यामुळे योजना असफल झाली तर काय; हा सुद्धा त्या योजनेचा भाग हवा. 

You'll change - वाढत्या वयाबरोबर, जीवनाच्या अनुभवाबरोबरच आपण बदलतो. आपली स्वप्न, ध्येय बदलतात. त्याबरोबरीने आपली पैशाची गरज, जोखीमक्षमता बदलते. हे स्वीकारा आणि त्याप्रमाणे विचारपूर्वक बदल करा. 

Nothing's free - गुंतवणुकीत होणारं नुकसान किंवा अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न ह्याकडे खिलाडूवृत्तीने बघा. चांगलं उत्पन्न मिळवण्याचे शुल्क म्हणून बघा, शिक्षा म्हणून नको.  

You and Me - दुसऱ्यांच्या सल्ल्यावर, टिप्स वर गुंतवणूक टाळा कारण दुसऱ्यासाठी चांगलं ते तुमच्यासाठी चांगलं असेलच असं नाही. दुसरे करतायत म्हणून आपण पण पैसे गुंतवले पाहिजेत; ह्या वृत्त्तीने "इकॉनॉमिक बबल" (आभासी भरभराट) कसे तयार होतात आणि फुगा फुटला की अर्थव्यवस्था कशी कोलमडते. २००८ साली फुटलेला  "रियल इस्टेट बबल" कसा तयार झाला आणि का फुटला. 

The seduction of pessimism - आता मार्केट पडणार ! जगाचा अंत जवळ आलाय ! अर्थव्यवस्था डबघाईला जाणार ! ह्या बातम्यांना जितकी प्रसिद्धे मिळते तितकी प्रसिद्धी सकारात्मक बातम्यांना मिळत नाही. पण खरंच बातम्या म्हणतात तसं होतं का ? लोकांना इतकी नकारात्मकता का भावते ?

When you will believe anything - लोक दुसऱ्यांचे सल्ले का ऐकतात ? कोणी काही म्हटलं की त्यावर विश्वास का ठेवतात ? त्यामागे काय मानसिकता असते ?

All together now - इतकं सगळं वाचता वाचता आपल्या मनात हा प्रश्न पडलेला असतो की "हे सगळं कळलं मग आम्ही नक्की वागायचं तरी कसं ?" ह्या प्रश्नाचं उत्तरदेणारं प्रकरण. ह्या प्रकरणात सुद्धा कुठे गुंतवणूक करा, कुठले शेअर्स घ्या असे थेट सल्ले नाहीत.  तर पैशाचं मानसशास्त्र, मार्केटचं मानसशास्त्र आणि आपली मानसिकता ह्याची सांगड घालत स्वतःला पुरणारं, झेपणारं प्लॅनिंग कसं करावं हे सांगितलं आहे.  

Confessions - लेखकाने स्वतः कशी गुंतवणूक केली आहे. काय तत्त्व पाळली आहेत. 

A brief history of why the U.S consumers .. - गेल्या शतकभरात अमेरिकेत मोठ्या गोष्टी घडल्या (महायुद्ध महामंदी, तंत्रज्ञान क्रांती इ. ) ह्यातून अर्थव्यवस्था कशी वरखाली होत गेली. प्रत्येकवेळी वाटलं की आता सगळं संपलं. सगळी वाट लागली. पण अर्थव्यवस्था सावरली. पुढे जात राहिली. शंभर वर्षांचा विचार केला तरमानवजात पूर्वीपेक्षा खूप चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या ह्या "चक्रनेमिक्रमेण" हालचालीचा स्वीकार करून विचार केला पाहिजे.  


काही प्रकरणांची पानं देतो म्हणजे पुस्तकाच्या शैलीचा अंदाज येईल
No One is crazy (प्रत्येकाची गुंतवणूक शैली वेगळी)






न फसणारी योजना नाही तर, फसली तरी सावरता येईल अशी योजना हवी


लेखक स्वतः गुंतवणूक कशी करतो. काही निर्णय हे प्रचलित वागण्यापेक्षा वेगळे असले तरी ते त्याच्या पुरते कसे योग्य आहेत. 




अर्थशास्त-मानसशास्त्र आणि नकळत तत्त्वज्ञान सांगणारं हे पुस्तक आहे असं मला वाटलं. उदा. 
अर्थशास्त्र- महायुद्ध संपल्यावर लाखो सैनिक अमेरिकेत परत येत होते. आता त्यांची सैनिक म्हणून गरज नव्हती. पण मग त्यांनी करायचं काय ? शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या कारखान्यांनी आता काय करायचं ? ह्यावर उपाय म्हणून लोकांच्या हातात पैसा कसा जाईल अशी व्याजदर रचना करण्यात आली. खर्च करायला उद्युक्त करण्यात आलं. लोकांच्या हाती जास्त पैसा - म्हणून जास्त खर्च - म्हणून बाजारात जास्त वस्तूंची गरज - म्हणजे जास्त उत्पादनाची गरज - जास्त कामकरी हात - कमी बेरोजगारी- जास्त लोकांच्या हातात पैसा - त्यातून जास्त खर्च अशी साखळी कशी तयार झाली. हे पुस्तकात सांगितलं आहे. 
मानसशास्त्र - फक्त पैसा आनंद देत नाही. "पैसा कशासाठी?" तर पैसा मिळवण्याच्या घडपडीतून सुटका करून घेण्यासाठी. अशी सुटका झाल्यावर तुम्ही काय कराल; ह्यावरून ठरेल तुम्ही आयुष्यात आनंदी व्हाल की नाही. 
तत्त्वज्ञान - जगात पुढे काय होईल हे माहीत नाही पण तज्ज्ञ लोक आपल्याला सगळं कळलंय अश्या आविर्भावात आपल्याला समजलेल्या गोष्टींवरून जगाची कल्पना करून ते सांगतात. पुस्तकातला शब्द illusion. भारतीय तत्त्वज्ञानातला शब्द "मिथ्या जग". 

असं पैशाबद्दल योग्य विचार करायला लावणारं हे पुस्तक आहे. आपल्या हातात काय आहे आणि काय नाही ह्याचा स्वीकार करायला लावणारं पुस्तक आहे. इंग्रजीत म्हणतात तसं "हेडलेस चिकन" प्रमाणे वेड्यावाकड्या उड्या न मारता समजून उमजून झेप घ्यायला लावणारं पुस्तक आहे. पैसे नसताना विवंचना करणं शिकवावं लागत नाही पण पैसे आल्यावर निवांतपणा मात्र शिकून घ्यावा लागतो हे ध्वनित करणारं पुस्तक आहे. 
प्रत्येकानेच हे पुस्तक वाचून त्यावर स्वतः विचार करावा, आपला मार्ग शोधावा; कारण भगवान श्रीकृष्णांचा उपदेश विनोबांच्या शब्दांत हाच आहे की 

उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी । आत्मा चि आपुला बंधु आत्मा चि रिपु आपुला ॥
जिंकूनि घेतला आत्मा बंधु तो होय आपुला । सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करितो स्वये ॥


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

टु किल या मॉकिंग बर्ड (To kill a mockingbird )







पुस्तक - टु किल या मॉकिंग बर्ड (To kill a mockingbird )
लेखिका - हार्पर ली (Harper Lee)
अनुवादक - विद्यागौरी खरे (Vidyagauri Khare)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - To kill a mockingbird (टु किल या मॉकिंग बर्ड)
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
पाने - २४६
ISBN - 978-81-95235-05-6


१९६० साली प्रकाशित झालेल्या पुरस्कारप्राप्त इंग्रजी कादंबरीचा हा मराठी अनुवाद आहे. १९३० च्या आसपासच्या कालखंडात ग्रामीण अमेरिकेतील एका लहानश्या गावात घडणारे हे कथानक आहे. ॲटिकस नावाचा वकील आपल्या दोन शाळकरी मुलांबरोबर राहत आहे. ह्या मुलांच्या लहानपणीच त्यांची आई वारल्याने, कॅलपुर्निया नावाची एक कृष्णवर्णीय महिला मुलांना सांभाळायला घरी काम करते आहे. गोऱ्या लोकांकडून कृष्णवर्णीयांना कमी लेखण्याचा, वंशभेदाचा हा काळ. परंतु ॲटिकस मात्र कृष्णवर्णीयांशी सहृदयतेने वागतो आहे. एक माणूस म्हणून काळ्या लोकांनासुद्धा गोऱ्यांसारखाच सन्मानाने जगण्याचा, न्यायाचा अधिकार आहे हे तो मनोमन मानतो. वंशभेदाला विरोध करण्यासाठी तो बंड करून उठला नसला तरी 
त्याच्या वागण्यातून हे दिसतं. म्हणूनच आपल्या मुलांवर सुद्धा तो संस्कार करतो आहे आपल्या वागण्यातून, मुलांच्या नकळत. सहृदयता, सद्सद्विवेकबुद्धी, ज्ञानाची आस, दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायची वृत्ती, क्षमा करण्याची वृत्ती, वाचनाची आवड अश्या कितीतरी गोष्टी तो स्वतः जगतो आहे. मुलांशी बोलताना, त्यांना समजावून सांगताना, वेळप्रसंगी रागे भरताना तो संवेदनशीलपणे वागतोय. वडिलांशी मैत्रीचं, आदराचं नातं म्हणूनच निर्माण झालंय. त्याची मुलं - जेम आणि स्काऊट - अश्या मोकळ्या वातावरणात घरी वाढत असले तरी गाव तितकं मोकळ्या विचारांचं नाही. वंशभेद तर आहेच पण "व्यक्ती तितक्या प्रकृती" ह्या उक्तीप्रमाणे गावात सगळंच काही आदर्श नाही. त्यामुळे घरचे आदर्श आणि गावाचे आदर्श ह्यात मुलांचा गोंधळ होत राहतो. ते गावात काय बघतात; त्यांचे शाळूसोबती काय म्हणतात, त्यांचे नातेवाईक काय टिप्पण्या करतात त्यावर ॲटिकस काय बोलतो ह्यातून त्यांच्या बालबुद्धीचा विकास होत राहतो.

हे सगळे प्रसंग लहानगी स्काऊट आपल्याला सांगते. कादंबरीच्या पहिल्या अर्ध्या भागात लहान मुलांच्या खोड्या, गावात घडणारे प्रसंग ह्यातून वेगवेगळ्या पात्रांची नकळत ओळख होते. नेपथ्यरचना साधली जाते. त्यांच्या घराशेजारी राहणारा, कधीही घराबाहेर ना पडणारा रहस्यमय "बू रॅडले" हा त्यांच्या कुतूहलाचा, भीतीचा विषय. काहीतरी करून त्याला बघितलं पाहिजे, त्याला घराबाहेर काढलं पाहिजे ह्यासाठी त्यांच्या खोड्या चालू असतात. अश्याच गमतीजमती चालू असताना त्यांना कळतं की लोक आपल्या वडिलांबद्दल कुसकटपणे बोलतायत. त्याला "निगर-लव्हर" (काळ्या लोकांना विशेष आपुलकीने वागवणारा) म्हणून टोमणे मारतायत. ॲटिकस मात्र लोकांना काही उत्तर द्यायच्या भानगडीत न पडता आपलं काम करत राहतो. एका काळ्या माणसाचा गोऱ्या माणसाविरुद्धचा खटला दाखल झालेला असतो.  त्यात काळ्याच्या बाजूने लढायचं काम न्यायालयाने त्याला दिलेलं असतं. लोकांची अपेक्षा अशी असते की त्याने थातुरमातुर खटला लढून गोऱ्याची बाजू जिंकू द्यावी. पण सद्सद्विवेकबुद्धीला प्रमाण मानत तो काळ्या व्यक्तीची बाजू कशी न्याय्य आहे हे पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आपल्या वडिलांचा आदर्शवाद, त्याला गावाचा विरोध, तरीही गावावर प्रेम करत राहण्याची वृत्ती मुलं बघत असतात. नकळत शिकत असतात. वयाने मोठी होत असतात. आणि नकळत जाणीवेनेही. ह्या सगळ्यात कधी त्यांच्यावरही संघर्षाचा प्रसंग येतो. तेव्हा लहान मुलांना जितकं झेपेल तितक्या जोरकसपणे विरोधाचा प्रयत्न करतात अगदी इतर मुलांशी मारामारी सुद्धा करतात. पण ॲटिकस कसा वागला असता; ॲटिकस काय म्हणेल ही फूटपट्टी मनात लावूनच.

वडिलांचा मुलांवर आणि मुलांचा वडिलांवर होणारा हा मानसिक परिणाम हे ह्या कादंबरीचं गर्भित सूत्र मला वाटलं. "जग काय म्हणेल" ह्याबद्दल पूर्ण बेपर्वाई करता आली नाही तरी त्यातूनही आपलं स्वत्व जपायचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ह्या सोज्ज्वळ कुटुंबाबाची ही नाट्यमय गोष्ट आहे.

काही पाने वाचा. 
घरातून कधीही बाहेर ना पडणाऱ्या "बू रॅडले" ला घराच्या बाहेर आणण्यासाठीचे पोरांचे चाळे 





निग्रोच्या खटल्याबद्दल वडिलांशीमुलांचा संवाद. दुसऱ्याबद्दल आगपाखड किंवा स्वतःबद्दल कुठलीही प्रौढी न या मिरवता निखालस तथ्य तेवढं ॲटिकस मुलांना सांगतो तो प्रसंग. (माझ्या मनात विचार आला ह्या खटल्याची माहिती आजच्या वृत्तवाहिन्यांनी दाखवली तर किती मीठ मसाला आणि नाटकीपणा करून सांगतील; नाही का ?)
खटला सुरु झाल्यावर फिर्यादी गोऱ्या माणसाची साक्ष. 'आपण गोरे, आरोपी काळा; मग आपलं कोण काय वाकडं करणार" ह्या गुर्मितली त्याची साक्ष 

कादंबरीचा पहिला भाग मुलांच्या खोड्या आणि गावगप्पा हा थोडा कंटाळवाणा आहे. कथानक पुढे जातच नाहीये असं वाटतं. पण एकदा खटल्याचा भाग आला की खूप वेगाने घटना घडतात. न्यायालयातील प्रसंग, तुरुंगातील प्रसंग, त्यातून दिसणाऱ्या वल्ली आणि मानवी स्वभावाचे कंगोरे हे सगळं आपल्याला पुस्तकाशी खिळवून ठेवतं. आधी वाचलेले प्रसंग किंवा लोक ह्यांची सांगड घालता येते. शेवट तर थरारक आणि नाट्यमय वळण घेणारा आहे.

लेखकाच्या वर्णन शैलीतून आपण त्यावेळच्या अमेरिकन खेड्यात जातो. जुन्या अमेरिकेतलं ग्रामीण वातावरण कसं आपल्या गावांसारखंच सारखंच खेडवळ होतं; आपल्याकडे जातींची उच्चनीचता तर तिकडे वर्णांची आणि घराण्याची उच्चनीचता; शेती आणि गावातल्या घडामोडी हेच विश्व असणारे लोक हे साम्य जाणवतं.

विद्यागौरी खरे ह्यांनी उत्तम दर्जाचा अनुवाद केला आहे. सहज, रसाळ. कुठेही कृत्रिमता नाही. "मूळ पुस्तक मराठीच असेल असं वाटतंय" हे अनुवादासाठी ठरलेलं प्रमाणपत्र द्यायलाच पाहिजे. ही सुंदर साहित्यकृती मराठीत आणल्याबद्दल त्यांचे आणि प्रकाशकांचे आभार.

 पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती

पुस्तकात दिलेली अनुवादिकेची माहिती
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat)

पुस्तक - पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat) लेखिका - सुधा मूर्ती (Sudha Murty) अनुवादिका - लीना सोहोनी (Leena Sohoni) मूळ पुस्तक - The old ...