पुस्तक : जयवंत दळवींचा विनोदनामा (Jayavant Dalavincha Vinodanama)
लेखक : जयवंत दळवी (Jayavant Dalvi)
संपादक : मुकुंद टाकसाळे (Mukund Taksale)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २५५
ISBN : दिलेला नही
प्रसिद्ध मराठी लेखक जयवंत दळवी यांच्या निवडक विनोदी साहित्यकृतींचा हा संग्रह आहे. अनुक्रमणिकेवर नजर टाकली की पुस्तकाबद्दल कल्पना येऊन जाईलच.
मराठीतल्या जुन्या विनोदी लेखकांची (चि.वि., गडकरी यांची) काही पुस्तके मी वाचलेली पण त्यातल्या विनोदावर आता फार हसू येत नाही. दळवींच्या कथा ५० वर्षं जुन्या असल्या तरी आत्ताही वाचताना खळखळून हसायला येतं. विनोदांची शैली थोडी पुलं सारखी - मध्यमवर्गीय जीवन आणि जीवनमूल्य यांवर बोलणारी, गुदगुल्या करणारी - आहे पण कधीकधी गुदगुल्या "कंबरेखाली"देखील होतात. शिव्या, स्त्रीपुरुषशरीरसंबंध यांचे कथेच्या ओघात येणारे उल्लेख टाळायचा अट्टाहास न करता सरळ लिहिलं आहे.
उदा. "एका सहलीची गोष्ट" मध्ये एक गावकरी माणूस मटण बनवून द्यायचे कबूल करून गावात सहलीला आलेल्या तरुणांकडून पैसे घेतो. कितितरी वेळ झाला तरी जेवण काही येतच नाही. इकडे दारू पार्टी केलेले तरूण चिडतात तो प्रसंग :
कल्पनारम्यता/फँटसी प्रकारातल्या विनोदी कथा पण मस्त आहेत.
पुस्तकाच्या उत्तरार्धातला भाग हा साहित्य आणि साहित्यिक यांच्याबद्दल दळवींनी लिहिलेल्या लेखांचा आहे. त्यांचाही बाज विनोदी, तिरकस, थट्टा करणारा असाच आहे. हल्ली वृत्तपत्रांत किंवा मासिकांत काहितरी टोपण नाव घेऊन चालू घडामोडींवर भाष्य करणारं सदर असतं उदा. पुर्वी लोकसत्तात "तंबी दुराई" या नावाने किंवा सध्या सकाळ मध्ये "ब्रिटीश नंदी" या नावाने लिहिले जाणारे सदर. या लेखांचे विषय बहुतेक वेळा राजकारण, कधी समाजकारण किंवा सिने-क्रिकेट जगत असं असतं. दळवींनी १९६४ ते १९८४ ही वीस वर्षं असं लेखन केलं. ठणठणपाळ व अलाणे-फलाणे या टोपणनावांनी. पण त्यांचे विषय हे नवीन पुस्तके, त्यावर नव्या-जुन्या जाणकरांकडून दिली जाणारी मतं, साहित्यिकांचे तऱ्हेवाईक स्वभाव हे आहेत.
उदा. जीए कुलकर्णी एकीकडे प्रसिद्धी पराङ्मुख म्हणून वागत तर दुसरीकडे भेटायला आलेल्या लोकांशी तऱ्हेवाईकपणे वागून आपल्याबद्दल गूढ/कुतुहल माणसाच्या मनात जागतं राहील असं वागत. पुण्यामुंबईतल्या साहित्यिक वर्तुळात काय घडतंय याची खडान्खडा माहिती ठेवत हे दिसतं.
भाउसाहेब (वि.स. खांडेकर)आणि भाऊराव (ग.त्र्यं.माडखोलकर) या श्रेष्ठ साहित्यिकांच्या सहवासात काय फरक जाणवला, माडखोलकरांच्या स्वभावातला चावट-खोडकरपणा कसा होता हे एका लेखात आहे.
"मोहिनी दिवाकर" या नावाने मराठीतल्या बऱ्याच साहित्यिकांना पत्र येत होती. स्त्री वाचकाने पत्र पाठवलंय म्हणून भले भले लेखक "पाघळून" जाऊन कशी पत्रोत्तरं लिहित होते, तिला भेटायला बोलवत होते, तिला भेटायची जुळवाजुळव करत होते हे वाचून एकिकडे हसू येतं आणि आदर्शवादी लिहिणारे साहित्यिक पण असे कसे? याचं आश्चर्य वाटतं.
"अलाणे-फलाणे" या या सदरात श्री. अलाणे आणि श्री.फलाणे ही टोपणनावाने घेऊन दोन मित्रांचा मजेशीर पत्रव्यवहार आहे. एका पत्रात भालचंद्र नेमाडे हा विषय अहे. त्याची एक झलक:
"आपुले मरण पाहिले म्यां डोळा" पण मजेशीर आहे. दळवी गेले अशी अफवा पसरली आणि त्यांच्या घरी फोन, भेटायला माणसं यायला लागली. या बातमीवर प्रत्येकाच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि त्यावर दळवींच्या प्रति-प्रतिक्रिया कशा होत्या हे वाचतना खूप हसू येतं.
हा संग्रह संपादित करण्यामागची भूमिका टाकसाळे यांनी प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच मांडली आहे. ती अशी :
प्रस्तावनेतही त्यांनी या पुस्तकात नसलेल्या काही विनोदी लेख किंवा कथांमधले परिच्छेद उद्धृत केले आहेत. त्यामुळे विनोदाची मेजवानी प्रस्तावनेपासूनच सुरू होते. दळवींच्या विनोदी लेखनशैलीचे त्यांनी विश्लेषण केले आहे. अत्रे-पुल यांना मराठी समाजाने डोक्यावर घेतलं तसं दळवींना का घेतलं नाही याचा ऊहापोह केला आहे. म्हणून प्रस्तावनाही तितकीच वाचनीय आहे.
पुस्तक विनोदी आहे म्हणुन वाचायला मजा येतेच पण तीसेक वर्षांपूर्वी साहित्य आणि नाटकं हे मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या विरंगुळ्याचे आणि चर्चेचे विषय असतानाचं वातावरण कसं होतं हे आज (टीव्हीचा जमाना मागे पडून ऑनलाईनचा जमाना आल्यावर) वाचताना नव्या पिढीला वेगळी जाणीव आणि जुन्या पिढीला पुनर्भेटीचा आनंद नक्की देईल.
माझ्यासारख्या हौशी परिक्षण लेखकाला हे परीक्षण लिहिताना दळवींची इच्छा पूर्ण केल्याचं कारण ते म्हणतात.
आता दळवींनी हे विनोदाने लिहिलेलं आवाहन मी मात्र गांभिर्याने घेतो आहे हे बघून स्वर्गात अलाणे-फलाणे एकमेकांना काय बरं पत्रं पाठवतील?
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment