जगाच्या पाठीवर (Jagachya Pathivar)








पुस्तक : जगाच्या पाठीवर (Jagachya Pathivar) 
लेखक : सुधीर फडके (Sudhir Phadke)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २२४
ISBN : 81-7434-258-3


श्रेष्ठ मराठी गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांचे हे आत्मचरित्र आहे. "किर्लोस्कर" मासिकातून लेखमालेच्या स्वरूपात हे प्रसारित झाले होते. त्या लेखमालेत केवळ १५च भाग बाबूजी लिहू शकले. नंतर सावरकरांवरच्या चित्रपटाचा ध्यास त्यांनी घेतल्यामुळे ही लेखमाला बंद झाली. त्यामुळे हे अपूर्ण आत्मचरित्र आहे. 


त्यांच्या बालपणापासून त्यांचे पहिले गाणे ध्वनिमुद्रित झाले तिथपर्यंतचा प्रवास यात येतो. सुधीर फडके नावारूपाला येण्याआधी त्यांनी काय संघर्ष केला होता ते आपल्याला यातून दिसतं. घरच्या गरीबीमुळे नातेवाईकांच्या, मित्रांच्या आधारावर जगायला लागलं. उपासमार सहन करावी लागली. उधार-उसनवार करून गाण्याच्या जिवावर आयुष्य सावरायचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. प्रत्येकवेळी नियती मात्र आशा-निराशा, यश-अपमान असे हेलेकावे देत होती. हे वाचून अंगावर काटा येतो. 
बाबूजींना एकेकाळी फूटपाथवर राहून दिअस काढावे लागले असतील ही कल्पनाच करवत नाही. त्याबद्दल पुस्तकातले ही पाने वाचा.

(फोटोवर क्लिक करून झूमकरून वाचा)



त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध कोल्हापुरात आला. त्या ओळखीतूनच ते मुंबईला आले. संघ कार्यालयातच राहायचे. संघकार्य आणि गाण्याचे शिक्षण घेणे-देणे त्यांनी सुरू केले. पोटसाठी काही मिळवण्याचा झगडा चालू असतानाही संघकार्यात योगदान ते देत होते. पण पुढे संघातील तत्कालीन पदाधिकाऱ्यांशी मतभेद झाल्याने त्यांना संघकार्यालयातून सामानासकट बाहेर काधलं गेलं. आणि त्यांची पुन्हा भटकंती सुरू झाली. संघातील ओळखीच्या आधारे गावोगाव फिरून गाणयाचे कार्यक्रम करणे, थोडेफार पैसे जमवणे आणि पुढचा प्रवास. काही गावांमध्ये कार्यक्रम होत काही ठिकाणी कोणीच कार्यक्रम करत नसत. कधी सामान्य माणसंही बऱ्यापैकी वर्गणी जमाकरत तर राजे-संस्थानिक-जमीनदार मात्र तुटपुंज्या पैशात बोळवण करीत. हा विरोधाभासही त्यांना अनेकदा अनुभवायला मिळाला आहे. यामुळे वेड लागण्याची पाळी त्यांच्यावर आली तर कधी आत्महत्या करून सगळ्यातून सुटावं असं वाटू लागलं. या भटकंतीचे, त्यात झालेल्या मान-अपमानांचे, फसवणुकीचे, मदत केलेल्या माणसांचे सविस्तर वर्णन पुस्तकात केले आहे.

"मी भिकारी का होतो" असं शीर्षक दिलेला हा परिच्छेद वाचा.



गाण्याची "रेकॉर्ड" ध्वनिमुद्रित होण्याची संधीही कितीदा समोर आली आणि हाता तोंडाशी आलेला घास नियतीने वेळोवेळी कसा हिरावून घेतला असे प्रसंगही पुन्हापुन्हा घडले आहेत. भटकंतीत ते कलकत्त्याला  राहिले होते. आता इथेच स्थिरस्थावर होता येईल असा विचार करत होते. भावांना भेटायला कोल्हापुरला आले असता योगायोगानेच त्यांचा गदिमांशी तिथे दौऱ्यावर आलेल्या "एचएमव्ही" शी संपर्क आला आणि गंगेत घोडं न्हालं. तो प्रसंग वाचताना आपल्यालाही आनंद होतो. एखाद्या चित्रपटात नायकाने अटीतटीच्या द्वन्द्वयुद्धात रक्तबंबाळ अवस्थेत शेवटी एक फटका असा द्यावा की प्रतिस्पर्धी कायमचा गारद व्हावा आणि प्रेक्षकांचा एकच जल्लोश व्हावा; तसं आपलं वाचताना होतं.

इथपासून पुढचे सुधीर फडके कदाचित आणि कुणाच्या लेखनातून अर्धेमुर्धे का होईना पुढे आले असतील, येतील. पण या प्रसंगापर्यंतचा संघर्ष त्यांच्याशिवाय इतरांना नीट सांगता येणं अशक्यच आहे. तो भागतरी ते लिहू शकले हे खरंच बरं झालं. पुढच्या आयुष्यातला गीतरामान्याणाची निर्मिती, इतर विषेश गाण्यांचे व संगीत दिग्दर्शनाचे अनुभव, सावरकर चित्रपट निर्मिती आणि गोवा-दादरा-नगरहवेली मुक्ती संग्रामातला थरार हेदेखील त्यांच्या लेखणीतून वाचणं म्हणजे अवर्णनीय ठरलं असतं. या विषयीच्या काही आठवणी त्यांच्या पत्नीने या पुस्तकात लिहिल्या आहेत. 

प्रकतीच्या अडचणींवर मात करत गीतरामायणाचे कार्यक्रम ते सादर करत त्याची ही आठवण.





प्रसिद्ध संगीतकार आणि गायक म्हणून बाबूजींचं हे पुस्तक वाचनीय आहेच पण त्याहून जास्त सामाजिक पैलू याला आहे असं मला वाटतं. 

रा.स्व.संघाच्या विचारांचा जोर सध्या देशात असताना संघाच्या सुरुवातीच्या काळात (आणि आजही) स्वयंसेवक कसे त्याग करून संघ वाढवत होते हे आपल्याला दिसतं. 

सध्याच्या वातावरणातला दुसरा बहुचर्चित मुद्दा आरक्षणाचा. जातीय आरक्षणाची मागणी वाढते आहे आणि त्यातून काहीवेळा ब्राह्मणद्वेषाचा सूर निघतो. पण या पुस्तकातून हे जाणवेल की ब्राह्मणांतही गरीबी सर्वदूर पसरलेली होती, त्यांनाही हाल अपेष्टा, अपमान-धक्के सहन करूनच पुढे यावं लागलं. ज्याला खरंच समाजाचं भलं करायचं आहे त्याने जातीय चष्मे न लावता खऱ्या गरजवंतांची व गुणवंतांची पारख करणं आवश्यक आहे हे या पुस्तकातून जाणवेल. हे अनुभव वाचताना ह.मो. मराठेंच्या "बालकांड" आणि "पोहरा" या पुस्तकांची त्यामुळेच आठवण येते. 

तिसरं म्हणजे आजकाल कलाकारांच्या मुलाखतीतून "स्ट्रगल" हा शब्द फार ऐकू येतो. एखाददुसरी मालिका केलेला अभिनेता; एकदोन गाणी गाजलेली गायिका सुद्धा आपण कसा "स्ट्रगल" केला ते सांगायला लागते. छोटी छोटी कामं करत शिकणं, हळूहळू मोठं होणं या उमेदवारीलाच लोक स्ट्रगल म्हणू लागलेत. अशा लोकांनी सद्गुणराशी असणाऱ्या बाबूजींचा खरा "स्ट्रगल" वाचायलाच हवा आणि आपण त्यामानाने खूपच सुस्थितीत आहोत यासाठी देवाचे आभारच मानायला हवेत.

पुस्तकात फोटोही भरपूर आहेत.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

1 comment:

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...