

पुस्तक - ओडिसी (odyssey)
लेखक - होमर (Homer)
अनुवादक - प्रणव सखदेव (Pranav Sakhadeo)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Ὀδύσσεια (Odýsseia)
मूळ पुस्तकाची भाषा - प्राचीन ग्रीक
पाने - १८४
प्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन, जुलै २०२६
छापील किंमत - रु. २५०
ISBN - 978-93-47457-06-7
संस्कृत, ग्रीक, लॅटिन, हिब्रू, चिनी सारख्या प्राचीन भाषांमधली ग्रंथपरंपरा अनोखी आहेत. हे साहित्य म्हणजे माणसाच्या सामाजिक बदलाची शब्दरूपातली संग्रहालयंच आहेत. त्यांच्या वाचनातून हजारो वर्षांपूर्वी माणूस कसा होता, समाजव्यवस्था कशी होती हे लक्षात येतं. खानपान, कुटुंबव्यवस्था, राज्यव्यवस्था, नैतिकतेच्या कल्पना, सुखाच्या कल्पना काय होत्या हे समजतं. इतकंच काय, त्यावेळचा माणूस कल्पनाशक्तीची भरारी म्हणून काय अद्भुतरंजक विचार करत होता हे सुद्धा जाणवतं. आपल्या भारतीयांना रामायण-महाभारत-पुराणांचा अद्भुत वारसा मिळालेला आहे. चार वेद आणि ही दोन महाकाव्य यांना जगन्मान्यता आहे. जगभर त्यांचा अभ्यास केला जातो. त्याप्रमाणेच ग्रीक भाषेतील होमर या कवीने लिहिलेली इलियड आणि ओडिसी ही दोन महाकाव्य जगन्मान्य आहेत. त्यामुळे त्यांचं वाचन, ते समजून घेणं सुजाणवाचकाला नक्की आवडेल. मधुश्री पब्लिकेशन आणि प्रणव सखदेव यांनी हे काम आपल्यासाठी अतिशय सोपं केलं आहे. होमरच्या ओडिसी या महाकाव्याचा मराठी अनुवाद त्यांनी आपल्यासाठी प्रकाशित केला आहे. त्यामुळे प्रणवची फेसबुकवर पुस्तकाबद्दल पोस्ट बघितल्या बघीतल्या पुस्तक लगेच विकत घेतलं. आणि पुस्तक वाचून हजारो वर्षांपूर्वीच्या ग्रीसमध्ये भ्रमंती करून आलो.
होमरच्या "इलियड" या काव्यात ग्रीस परिसरातील दोन राज्यांच्या युद्धाचं वर्णन आहे. ट्रॉय चं युद्ध, ट्रोजन हॉर्स हे शब्द कदाचित तुम्ही ऐकले असतील. ग्रीक लोकांच्या राणीला ट्रॉय नावाच्या देशाच्या राजपुत्राने पळवलेलं असतं. तिला परत आणण्यासाठी ग्रीक लोक ट्रॉय वरती हल्ला करतात. हे युद्ध बराच काळ म्हणजे दहा वर्ष चालतं. शेवटी ग्रीक लोकांचा विजय होतो आणि ते आपल्या घराकडे परतू लागतात. त्यांच्या या परतीच्या प्रवासाबद्दलचं वर्णन हे पुढच्या महाकाव्यात म्हणजे "ओडिसी" मध्ये आलं आहे.
या प्रवासाचं वर्णन करण्याचं कारण म्हणजे हा प्रवास साधासुधा झाला नाही. परतीच्या प्रवास सुरुवात झाल्यावर त्यांना वादळाचा सामना करायला लागतो. सैन्याच्या तुकड्या विखुरलेला जातात. ग्रीक लोकांचा एक महत्त्वाचा सरदार म्हणजे ओडिसियस आणि त्याचे सैन्य यांच्यावर आलेली संकटे फारच जास्त होती. त्यांचं झालेलं नुकसान हे सगळं इतरांपेक्षा फारच जास्त होतं. त्याला परत यायला अजून दहा वर्ष लागली. त्या सगळ्याचा तपशील या काव्यात येतो. पण हे प्रवासवर्णन नाही. ओडिसियस ट्रॉयहून निघाला आणि आपल्या "इथाका" राज्यात परतला याची ही डायरी नाही. तर हे काव्य आहे त्यामुळे ट्रॉयच युद्ध संपल्यानंतर दहा वर्षांनी इथाका मध्ये काय चालू आहे इथून वर्णनाला सुरुवात होते. दहा वर्षे झाली तरी ओडिसियस चा पत्ता नाही, म्हणून त्याचा मुलगा त्याच्या शोधार्थ बाहेर पडतो. तो आजूबाजूच्या राज्यांना युद्धात सहभागी असलेल्या लोकांना भेटतो. त्यातून माहितीचे तुकडे त्याला मिळतात आणि वाचकालाही मिळतात. मग दुसरीकडे ओडिसियसचं सध्या काय चालू आहे, कुठे अडकून पडला आहे याचं वर्णन घेतलं. तिथून निघायच्या प्रयत्नात तो जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा त्याने काय काय अनुभवलं याचा तो वर्णन करतो. त्यातून आपल्याला अजून काही गोष्टी समजतात. थोडं आजचं वर्णन, थोडं मागचं, तर कधी एखाद्या भविष्यवेत्त्याच्या पुढचं वर्णन असं करत करत आपल्यासमोर चित्र उभं राहू लागतं.
पण ओडिसियसला अडचणी येतात म्हणजे ते नक्की काय, हे वाचताना आपल्याला ग्रीक लोकांची "देव" ही संकल्पना थोडी थोडी लक्षात येते. भारतात परमेश्वर म्हणजे सर्वशक्तिमान, उत्पत्ती-स्थिती आणि लय करणारा, दयाळू न्यायी अशी संकल्पना आहे. पुराणांमध्ये देव-दानव, देवांचा राजा इंद्र, पाऊस पाडणारा वरुण, समुद्रदेवता, वृक्षदेवता, जलदेवता, वायूदेवता, यक्ष असे वेगवेगळे देवगणही असतात. ग्रीक लोकांची देवता संकल्पना सुद्धा आपल्यासारखीच आहे. समुद्राचा देव पॉसिडॉन. सगळ्या देवांचा प्रमुख झ्यूस. ऑलिंपिया पर्वतावर राहणारे बारा देव, जादू करणाऱ्या पऱ्या, देवदूत, देवपुत्र अशा अद्भुत संकल्पना तिथे आहेत. आपल्या इथल्यापेक्षा त्यांचे देव फारच लहरी आहेत. बळी दिला नाही तर रुसतात...बळी दिला की सुखावतात. माणसाला स्वतःच्या लहरीनुसार मुद्दामून संकटात टाकतात. दोन देवांचं आपापसात भांडण होऊन एक देव माणसाला संकटांत टाकतो तर दुसरा संकटात सापडलेल्या मदत करतो असं सगळं घडू शकतं.
तर या सगळ्या देवगणांच्या आणि पारलौकिक शक्तींच्या लहरीमुळे ओडिसियसला समोर वेगवेगळी आव्हानं उभी राहतात.पॉसिडॉन देवाच्या अवकृपेमुळे समुद्रात मोठ मोठी वादळ येऊन ओडिसीस आणि चमूची जहाजं भटकतात, फुटतात. एक अप्सरा त्याला आपल्या बेटावर कैद करून ठेवते. एक डोळा असणारा महाकाय राक्षस त्यांना गुहेत कोंडून ठेवतो आणि त्याच्या साथीदारांना खाऊन टाकतो. सायरन नावाच्या यक्षिणी गाणं गाऊन त्यांना मोहित करायचा, घरी परत जाणं विसरायला लावायचा प्रयत्न करतात. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यामुळे ओडिसियसला कधी स्वतःच्या शक्तीचा वापर करतो, कधी युक्तीचा वापर करतो. कधी त्याच्या बाजूने असलेली देवपुत्री "अथनी" त्याला चमत्कार करून करून मदत करते. तर कधी काही जादुई वस्तू त्याला मिळतात. लहान मुलांसाठीच्या चेटकिणीच्या, जादूगाराच्या, राक्षसाच्या गोष्टी कशा असतात तशाच साधारण या घटना आहेत. इतकं होऊन अथक परिश्रम करून जेव्हा आवडीचेच परत येतो तेव्हाही त्याचं राज्य बळकवण्यासाठी टपलेल्या लोकांशी त्यांला सामना करावा लागतो आणि शेवट गोड होतो.
रामायण-महाभारताप्रमाणे इथे सुद्धा भरपूर पात्रं आहेत, चमत्कार आहेत. पण तिथल्या तुलनेत इथे नैतिक पेच फार काही नाहीत. रामायण-महाभारतात प्रत्येक पात्र तसं का वागलं, वेगळं वागलं असतं तर काय झालं असतं, वेगळं वागणं परिस्थितीमुळे जमलं असतं का, अशी खूप गुंतागुंत आहे. बरीच उपकथानकं आहेत. धर्म,नीती, स्वभाव, परिस्थतीचा रेटा असे ताणेबाणे आहेत. त्या तुलनेत ओडिसीची रचना ही एकरेषीय आहे. फक्त ते पुढे-मागे, उलट-सुलट करून सांगितल्यामुळे उत्सुकता टिकून राहते. या सगळ्या घटनांना कारणीभूत असलेल्या देवांच्या लहरीपणालाही "आले देवाजीच्या मना" याच्या शिवाय दुसरं उत्तर नाही. जागतिक प्रसिद्धीचं हे कथानक तुम्हीही वाचून बघा. त्याचं साहित्यिक मूल्यमापन, टीकात्मक रसग्रहण, इतर महाकाव्यांशी तुलनात्मक विश्लेषण हा पुढचा भाग झाला. पण एकूण वाचायला मजा येते. आता पुढे काय होतंय ह्या उत्सुकतेने मी भराभर वाचत गेलो. व्यक्तींची नावं, ठिकाणं आणि घटना नीट समजून पुन्हा एकदा नजरेखालून घालणार आहे. ओडिसीच्या अद्भुतरम्यतेची चे भुरळ अजूनही लोकांना आहे नुकताच (जुलै २०२६) ख्रिस्तोफर नोलान या प्रथितयश दिग्दर्शकाचा इंग्रजी चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.
काही पानं उदाहरणादाखल
ओडिसियस त्याची गोष्ट सांगायला सुरुवात करतो.


देवी अथिनीचे ओडिसियसला मार्गदर्शन

अनोळखी पण संकटग्रस्त व्यक्तीला भरभरून मदत करण्याची वृत्ती


ओडिसी काव्य आहे म्हणजे मूळ पद्य स्वरूपात असेल असा माझा अंदाज आहे. पण हे पुस्तक गद्य स्वरूपात आहे. प्रणवने केलेलं भाषांतर अतिशय सुगम आणि ओघवतं आहे. मराठी माणसाने ग्रीसवर आधारित एक दीर्घ कादंबरी लिहिली आहे असंच वाटतं. पौराणिक किंवा ऐतिहासिक पुस्तकांत वापरली जाते तशी औपचारिक, संस्कृतप्रचुर भाषा फार न वापरता आजची मराठी वापरली आहे. त्यातून वाचनीयता वाढली आहे. नव्या वाचकवर्गाला भाषांतर जास्त भावेल. त्याबद्दल प्रणवला शंभर टक्के गुण.
पुस्तकात बरीच रेखाचित्र आहेत. भार्गवकुमार कुलकर्णी ह्यांनी मुखपृष्ठ आणि आतली चित्रं काढली आहेत. त्यामुळे पुस्तक देखणं झालं आहे. उदा. वरच्या अथिनी व ओडिसियस भेटीच्या प्रसंगाच्या बाजूला असलेलं चित्र.

या पुस्तकाच्या प्रकाशकांना मला काही सुचवावंसं वाटतं....जर एखाद्या व्यक्तीला ट्रॉय, ग्रीक देवतांची संकल्पना माहिती नसेल तर वाचताना सुरुवातीला गोंधळ होऊ शकतो. ओडिसियस कोण? ट्रोजन कोण? पॉसिडॉन कोण? अथिनी काय? असे प्रश्न पडू शकतील. त्यादृष्टीने सुरुवातीला एक प्रकरण घालून पार्श्वभूमी तयार करायला हवी. ज्यात होमरची माहिती, इलियड मधले प्रसंग, प्रमुख व्यक्तिरेखा ह्यांचा गोषवारा घ्यावा. मुख्य म्हणजे पुस्तकात येणाऱ्या ग्रीक देवता, त्यांचा स्वभाव आणि एकमेकांशी संबंध ही माहिती असायला हवी होती. हे सगळं डोक्यात असेल तर वाचनाची मजा वाढेल. योगायोगाने मी नुकतीच नेटफ्लिक्सवर "ट्रॉय" ही सिरीज बघितली होती त्यामुळे त्यातले काही संदर्भ लक्षात आले. ग्रीक देवतांबद्दल सुद्धा नेटवर थोडं वाचून समजून घेतलं. त्याचा हे पुस्तक वाचताना उपयोग झाला. मूळ ग्रंथ किती मोठा आहे आणि या भाषांतरात तो पूर्ण घेतला आहे का संक्षिप्त, हे पुस्तक मूळ ग्रीक पुस्तकावरून भाषांतरित केलं आहे का इंग्रजी भाषांतरावरून मराठी भाषांतर केले आहे ही माहितीही द्यायला हवी होती. त्यातून त्या पुस्तकाच्या उपयुक्तेत आणि रसग्रहणात भर पडेल.
मी इथे थांबतो. पण तुम्ही ग्रीक ज्ञानदेवता अथिनीला प्रणाम करून हे पुस्तक लवकर वाचायला घ्या !
——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
No comments:
Post a Comment